जागतिक वारसा दर्जा असणारी रानी की वाव, सूर्यमंदिर, जगातील सर्वात प्राचीन गोदी आणि पक्षी अभयारण्य असे भटकण्याचे अनेक पर्याय  गांधीनगर परिसरात आहेत.गुजराती भाषेत राजधानीला पाटनगर म्हणतात. गुजरातची राजधानी गांधीनगरच्या परिसरात फिरण्यासाठी अनेक आकर्षक ठिकाणं आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात रुची असणाऱ्या मंडळींसाठी इथे खजिना दडलेला आहे. गांधीनगरला मुक्काम करावा आणि तीन-चार दिवसांची मस्त भटकंती करावी असा हा सुंदर परिसर. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेली आणि जवळजवळ दोन-तीन हजार शिल्पं असलेली अद्वितीय रानी की वाव, मोढेरा इथलं इ.स.च्या ११ व्या शतकातलं सूर्य मंदिर, जगातील सर्वात प्राचीन गोदी-लोथल, नळ सरोवर, इंद्रोडा, थोळ इथली पक्षी अभयारण्ये आणि गांधीनगरचे प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिर आणि तिथे होणारा ध्वनीप्रकाशाचा खेळ, ही आणि अशी अनेक ठिकाणे गांधीनगरच्या आसपास विखुरलेली आहेत.

गांधीनगरच्या उत्तर-पश्चिम दिशेला निघावे. गांधीनगर-मेहसाणामाग्रे मोढेरा हे अंतर अंदाजे ९० किलोमीटर इतके आहे. मोढेरा इथे पुष्पावती नदीच्या काठावर इ.स. १०३० साली मारू-गुर्जर शैलीत बांधलेले अतिशय सुंदर असे सूर्यमंदिर बघण्यासारखे आहे. गर्भगृहात सध्या कोणतीच मूर्ती नाही. परंतु, हे मंदिर शिल्पजडित आहे. अतिशय देखणे आहे. मंदिरावरील देवकोष्ठांमध्ये सूर्याच्या मूर्ती पाहायला मिळतात. तसेच मंदिराचे स्थापत्य आणि त्यावर केलेली कलाकुसर नितांत देखणी आहे. सभामंडपाचे छत आणि त्यावर केलेले नक्षीकाम मुद्दाम पाहावे असे आहे. सभामंडपात असलेले खांबसुद्धा कोरीव आहेत. तसेच या मंदिरावर असलेली विविध तोरणे अतिशय बारकाईने कोरलेली आहेत. इथली दुसरी देखणी गोष्ट म्हणजे याच मंदिरासमोर असलेली पुष्करिणी होय. रामकुंड किंवा सूर्यकुंड असे नाव असलेल्या या आयताकृती पुष्करिणीमध्ये उतरण्यासाठी अतिशय सुंदर अशा पायऱ्या तयार केलेल्या आहेत. त्यांच्या बाजूने असलेल्या विविध देवकोष्ठांत देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. सगळाच परिसर अतिशय रम्य आणि देखणा असा आहे. मोढेराचे सूर्यमंदिर हे अगदी न चुकता पाहावे असे स्थळ नक्कीच आहे.

इथूनच पुढे आपण रानी की वाव या अत्यंत देखण्या ठिकाणाला भेट द्यायला निघतो. हे ठिकाण पाटण इथे आहे. मोढेरा ते पाटण हे अंतर जेमतेम ५० किलोमीटर आहे.  सुप्रसिद्ध पटोला साडय़ांसाठी हे पाटण गाव ओळखले जाते. या गावात पटोला साडय़ा तयार करण्याचे हातमाग आहेत. वीस हजारांपासून ते अगदी चार लाख रुपयांपर्यंतच्या पटोला साडय़ा इथे विकल्या जातात. वाव म्हणजे विहीर. गुजरात-राजस्थान या पाण्याचे दुíभक्ष असणाऱ्या ठिकाणी तत्कालीन राजांनी खूप खोल अशा विहिरी खोदून घेतल्या. अनेक फूट खोल असणाऱ्या या विहिरींमध्ये जाण्यासाठी अर्थातच पायऱ्या केलेल्या आहेत. इंग्रजीत यांना स्टेपवेल असे म्हणतात. इसवीसनाच्या अकराव्या शतकात गुजरातमध्ये सोळंकी या बलाढय़ घराण्याचे राज्य होते. या घराण्याची राजधानी होती अनहिलपूर किंवा अनहिलपताका म्हणजेच आजचे मेहसाणा जिल्ह्यतील पाटण हे गाव. सोळंकी घराण्यातील राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ त्याची पत्नी राणी उदयमती हिने आपल्या राजधानीच्या गावी या शिल्पसमृद्ध विहिरीची निर्मिती केली. राणीने बांधलेली विहीर म्हणून याचे नाव ‘राणी की वाव’ असे पडले. रानी की वाव ही सात मजली खोल विहीर आहे. प्रत्येक पातळीवर अत्यंत सुडौल आणि भरपूर मूर्ती कोरलेल्या आहेत. विष्णूचे दशावतार आहेत, विष्णूच्या विविध मूर्ती आहेत, गणपती, शिव, चार हातांचा मारुती अशा असंख्य मूर्ती इथे पाहायला मिळतात. नृत्यांगना-अप्सरा यांच्याही देखण्या मूर्ती इथे आहेत. हे मूर्तीसौंदर्य पाहून डोळे दीपावतात. इथे असलेली शेषशायी विष्णूची मूर्ती निव्वळ देखणी आहे.

एका दिवसात या दोन गोष्टी मनसोक्त पाहून झाल्यावर रात्री गांधीनगरच्या स्वामीनारायण मंदिरात होणारा ध्वनिप्रकाश खेळ अजिबात चुकवू नये. पाण्याच्या कारंज्याच्या पाश्र्वभूमीवर होणारे विविध खेळ मुद्दाम पाहावेत असे आहेत. इथे मोबाईल, कॅमेरा, कंबरेचा पट्टा आतमध्ये नेऊ देत नाहीत. गांधीनगरमधेच इंद्रोडा नावाचे एक प्राणिसंग्रहालय आहे. इथे असलेले मोर आणि विविध प्राणी पाहण्याजोगे आहेतच. पण त्यापेक्षा गांधीनगरपासून ४० किमीवर असणारे थोळ हे पक्षी अभयारण्य अवश्य बघावे. पक्षी निरीक्षकांसाठी ही पंढरी आहे. फ्लेिमगो या स्थलांतरित पक्ष्यांचे हे निवासस्थान. त्याचसोबत इथे विविध प्रकारचे पक्षी अगदी मनसोक्त न्याहाळता येतात.

पुरातत्त्वविषयाची आवड असेल तर गांधीनगर-भगोदरामाग्रे लोथल इथे जावे. सिंधू संस्कृतीकालीन जहाजाची गोदी इथे आजही पाहायला मिळते. इथेच एक सुंदर प्रदर्शन मांडलेले असून त्यात या ठिकाणी सापडलेल्या विविध वस्तू मांडून ठेवलेल्या आहेत. तसेच लोथलवर इथे ४५ मिनिटांचा एक सुंदर लघुपट दाखवला जातो. गांधीनगरच्या जवळ फक्त ८ किलोमीटरवर अडालज या ठिकाणीसुद्धा प्रेक्षणीय अशी अजून एक स्टेप वेळ पाहायला मिळते. इथे मूíतकाम कमी पण भौमितिक रचना मोठय़ा प्रमाणावर केलेल्या आढळतात.

गुजरातमध्ये  निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळतात. अगदी प्राचीन काळापासूनचे अवशेष इथे खूप सुंदर जपलेले आहेत. फक्त गांधीनगरच्या आसपास एवढी विपुलता आहे. चार दिवसांची भटकंती करायची असेल तर गांधीनगरला अवश्य जावे. पर्यटनाबद्दल अतिशय जागरूक असलेले, खाण्यापिण्याची रेलचेल असलेले असे हे गुजरात राज्य जरूर अनुभवावे. एका राजधानीच्या आसपास एवढे बघण्यासारखे आहे त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा.

आशुतोष बापट