17 February 2020

News Flash

वरंधची घळ

पाठीमागे पाहिले की सह्याद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे.

‘दासडोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो’ या नीतीने समर्थाचे वास्तव्य हे गावात, मठात, मंदिरात कधीच नसायचे. त्यांनी वास्तव्य केलेल्या विविध घळी या रामघळी म्हणून प्रसिद्ध झाल्या. शिवथरघळीच्या अगदी जवळ अजून एक घळ आहे. या घळीचे नाव स्थानिक लोक सुंदरमठ असे सांगतात. ही घळ आहे वरंध गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरामध्ये. पुण्याहून महाडला जाताना वरंध घाट लागतो. तो उतरून गेले की वरंध नावाचे गाव येते. याच गावातून काहीसे पुढे महाडच्या दिशेला जायला लागले की रस्त्याच्या उजव्या बाजूला काही दुकाने दिसतात आणि तिथे उजवीकडे आत एक रस्ता जातो. (मुंबईकडून आल्यावर वरंध गावाच्या काहीसे अलीकडे डाव्या हाताला ही जागा येते.) त्या रस्त्यावरून आत गेल्यावर अंदाजे चार किलोमीटरवर ही घळ आहे. आत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे आणि पुढे गेल्यावर अंगावरची चढण एक-दोन ठिकाणी लागते. ऐन पावसाळ्यात तर तिथे पदभ्रमणच करावे लागेल. पण सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे. पाण्याची एक टाकी आणि एक बांधलेली समाधी अशा ठिकाणी रस्ता संपतो. वाहन तिथेच ठेवून समोरच्या डोंगराच्या पोटातून गेलेली एक पायवाट घळीपाशी जाते. तिथून दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून आपण घळीच्या तोंडाशी येऊन उभे राहतो. पाठीमागे पाहिले की सह्याद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे. त्याचे पाणी पडून खालच्या बाजूला एक डोह तयार झाला आहे आणि तिथून ते पाणी पुढे नदीचे रूप घेऊन पुढे वाहत जाते. दक्षिणाभिमुख असलेली ही घळ आतमध्ये डाव्या बाजूला पूर्व-पश्चिम अशी जवळजवळ ६० फूट लांबीला आहे. तसेच ती १० ते १२ फूट रुंद आहे. दारातून आत गेल्यावर समोरच्या भिंतीमध्ये दगडात कोरलेली बसण्याची जागा आहे. मूलत: ही नसíगक घळ असणार. नंतर मानवाने ती त्याला हवी तशी खोदून काढलेली दिसते. आतमध्ये जाताना डाव्या बाजूला एक फूट उंचीचा आणि अंदाजे ३ फूट लांबी-रुंदीचा एक दगडी चौथरा आहे. तसेच पुढे गेले की खडकामध्ये खोदलेले एक पाण्याचे टाके दिसते. तिथून पुढे किंचित घळ वळते आणि मग दुसऱ्या बाजूने बाहेर येण्याचा मार्ग दिसतो. या ठिकाणाचा उल्लेख हा ‘मठाचा माळ’ असा केलेला आढळतो. याचा अर्थ इथे मठ होता याची यावरून खात्रीच होते असे तज्ज्ञ सांगतात.

आशुतोष बापट shutosh.treks@gmail.com

First Published on January 25, 2017 4:55 am

Web Title: tourist place in maharashtra
Next Stories
1 जायचं, पण कुठं?   जैसलमेर
2 वन पर्यटन : पेंच व्याघ्र प्रकल्प
3 डोंगर भटकंतीच्या आनंदावर विरजण
Just Now!
X