News Flash

भटक्यांचे कट्टे

गेल्या काही वर्षांत डोंगरभटक्यांची संख्या प्रचंड वाढली पण तुलनेनं संस्था कमी आहेत.

भटक्यांचे कट्टे

चार समविचारींनी एकत्र यावे, आपल्या आवडीविषयी गप्पा माराव्यात, नवीन काही तरी सांगावे, जुन्यावर चर्चा करावी अशा वेगवेगळ्या कट्टय़ांबद्दल आपणाला माहिती असतेच. डोंगरभटक्यांच्या विश्वातदेखील असे व्हायचे ते संस्थांच्या साप्तााहक बैठकांतून. त्यातदेखील एक अनौपचारिकपणा असायचा. तर संमेलनांच्या माध्यमातून वर्षांतून एकदा या सर्वाचे एकत्रीकरण होत असतेच. गेल्या काही वर्षांत डोंगरभटक्यांची संख्या प्रचंड वाढली पण तुलनेनं संस्था कमी आहेत. दुसरीकडे सायकलवरून भटकणारेदेखील खूप आहेत. या दोन्ही क्षेत्रातील उत्साही तरुणांनी एकत्र येऊन त्यांच्या या अनोख्या विश्वाचे कट्टे सुरू केले आहेत. भटकंती कट्टा आणि सायकल कट्टा या दोन्ही कट्टय़ांच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांची ओळख..

सायकल कट्टा

सायकल ही एके काळी आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक होती. मधल्या काळात हे प्रमाण निदान मोठय़ा शहरात तरी खूपच कमी झाले होते. परंतु, पुन्हा एकदा सायकलिंगची आवड वाढीस लागली आहे. सायकलवरून लांब अंतरावरील पर्यटन, डोंगरातील सायकलिंग, विशिष्ट विचारप्रसारार्थ केलेले सायकलिंग किंवा केवळ व्यायामाच्या हेतूने केले जाणारे सायकलिंग असे अनेक पैलू आजच्या सायकलिंगमध्ये आहेत. अशा प्रकारे सायकलिंग करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली असली तरी त्यांचे विचार, त्यांच्या समस्या किंवा नवीन कल्पना यांसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये कोणतेही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. याच विचारातून सायकलिंग करणाऱ्या तरुणांच्या एका गटाने मार्च २०१५ मध्ये ‘सायकल कट्टा’ सुरू केला.

‘सायकल कट्टा’ हे सायकलिंगवर प्रेम करणाऱ्या लोकांचे हक्काचे व्यासपीठ असून सायकलिंगच्या अनेकविध पैलूंवर चर्चा व्हावी, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण व्हावं आणि सायकलिंग कम्युनिटी उत्तरोत्तर वाढावी हाच याचा प्रमुख उद्देश आहे.

दर तीन महिन्यांनी एकदा या कट्टय़ाचे आयोजन होत असते. दहा-बारा सायकलप्रेमींच्या इच्छेतून तयार झालेल्या या कट्टय़ाची सदस्य संख्या आज आठशेच्या घरात पोहोचली आहे, यावरून या व्यासपीठाचे महत्त्व आणि गरज लक्षात येते. विशेष म्हणजे हा कट्टा केवळ सायकलिंगचा थरार इतपतच मर्यादित राहिलेला नाही, तर सायकलिंगच्या अनुषंगाने येणाऱ्या धोरणात्मक विषयांवरदेखील येथे चर्चा केली जाते. गेल्या तीन कट्टय़ांमध्ये अशा विषयांना चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. नगरनियोजनतज्ज्ञ श्वेतल कनवाळू यांनी सायकलिंग आणि भविष्यातील नगरनियोजन, अर्थतज्ज्ञ अरविंद दातार यांनी शहरांचा अर्थसंकल्प व सायकलिंग या विषयावर केलेली मांडणी उद्बोधक होती.

सायकलिंगमधील थरार, आनंद तर या कट्टय़ावर नियमितपणे शेअर होत असतो. सुनीता कुंभकर्ण व वंदना भावसार या केवळ दोन गृहिणींनी केलेला गोवा ते कन्याकुमारी हा प्रवास, धनंजय मदन आणि त्यांच्या चमूने केलेले नक्षलग्रस्त भागातले सायकलिंग, राजू पाटील यांनी उलगडलेले पोलीस दलातील सायकलिंग हे विषय इतर सायकलपट्टूंना प्रोत्साहन देऊन जाणारे ठरले. तिसऱ्या कट्टय़ावर तर एकाच विषयाने अधिराज्य गाजवले. सचिन गांवकर याने मानसिक आरोग्याचा संदेश घेऊन एकटय़ाने सायकलवरून केलेली ध्येयवेडी भ्रमंती ही सर्वानाच सायकलिंगचा एक अनोखा पैलू सांगून गेली, तर राजेश खांडेकर याची परदेशातील सायकल भटकंती सीमेपार जाऊन आल्याची भावना निर्माण करणारी होती.

‘सायकल कट्टा’ हे एक मुक्त व्यासपीठ असल्याने तिथे विषयाचे बंधन नाही. सायकलिंगशीसंबधित कोणत्याही विषयावर इथे चर्चा होऊ  शकते. एक समतोल असावा म्हणून प्रत्येक कार्यक्रमात एक वैचारिक विषय व एक अनुभव कथन असे स्वरूप ठेवण्यात आले आहे. यातील चर्चेचा गोषवारा लगेचच सायकल कट्टय़ाच्या फेसबुक पेजवर तसेच ट्विटरवर प्रसिद्ध केला जातो. त्यामुळे ही केवळ बडबड न राहता त्याचे दस्तऐवजीकरण होत जाते.

सायकल कट्टय़ाच्या आयोजनामागे यूथ हॉस्टेल्सच्या महाराष्ट्र शाखेची प्रेरणा ही प्रामुख्याने होती. त्यांच्याच सहकार्याने पहिले दोन कार्यक्रम परळच्या सोशल सव्‍‌र्हिस लीग येथे झाले, तर तिसऱ्या कट्टय़ाच्या वेळेस मात्र अधिक श्रोत्यांना सामावून घेण्यासाठी माहीमच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात कट्टय़ाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक अविनाश कुबल हेदेखील या उपक्रमात हिरिरिने सहभागी होत असतात आणि भविष्यातील योजनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा आहे.

सध्या सायकल कट्टय़ाच्या आयोजनात सायकलिंगच्या प्रसाराकरिता धडपडणारे काही तरुण सक्रिय आहेत. परंतु स्वत:ची मतं व्यक्त करण्याची इच्छा असणारे व इतरांचे विचार ऐकण्याची इच्छा असणारे कोणीही यात सहभागी होऊ  शकतात. सायकलिंगच्या सार्वत्रिक प्रसाराचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वाच्याच विचारांची व मदतीची गरज आहे.

फेसबुक पेज : www.facebook.com/CycleKatta

ट्विटर पेज : www.twitter.com/CycleKatta

भटकंती कट्टा

डोंगरभटक्यांनी एकत्र यावं, आपल्या भटकंतीतले अनुभव सांगावेत, चर्चा करावी, एकमेकांची ओळख व्हावी या अगदी अनौपचारिक उद्देशाने पुण्यात भटकंती कट्टय़ाची सुरुवात झाली ती २०१५च्या जानेवारीत. रवी पवार या खटपटय़ा डोंगरभटक्याची ही संकल्पना. पुण्यात असे दोन कट्टे झाल्यावर त्याचा विस्तार मुंबईत होणं अपरिहार्यच होतं. अर्थातच डोंगरभटक्यांच्या विश्वात अनौपचारिकतेला महत्त्व अधिक. त्यामुळेच येथेदेखील सारंच अनौपचारिक. एकाने दुसऱ्याला साद घातली, दुसऱ्याने तिसऱ्याला आणि टीम तयार व्हावी तसेच येथे झालंय. येथे वैयक्तिक नावाला महत्त्व नाही. भटक्यांनी भटक्यांसाठी चालवलेला कट्टा असा साधा सरळ उद्देश. कोणीही येऊन माहिती घेऊ शकतो, देऊ शकतो. ना सभासदत्व, ना सभासदाची वर्गणी. अशा संकल्पनेतून गेली वर्षभर हा कट्टा जोमात सुरू आहे. यात अनेक गिर्यारोहण संस्थांचे सदस्य आहेत, तसेच आपआपले भटकणारेदेखील आहेत.

केवळ गप्पा हा यामागचा हेतूच नाही. त्यामुळेच गेल्या वर्षभरात अनेक विषयांना येथे चालना मिळाली आहे. भटकंती डोळस व्हावी हाच यामागचा उद्देश. आपल्या भटकंती दिसणारी निसर्गातील अद्भुतं, मानवाच्या अचाट शिल्पकला, गडकिल्ल्यांवर दडलेली इतिहासाची अव्यक्त पानं यांची नव्याने ओळख करून देणाऱ्या विषयांनी कट्टय़ावर चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. प्रसंगानुरूप विषयांची मांडणी येथे केली जाते. मुख्य म्हणजे प्रस्थापित तज्ज्ञांपेक्षा डोंगरभटक्यांच्या विश्वाशी नाळ जुळलेल्या अनुभवी वक्त्यांची येथे हजेरी लागते. सह्य़ाद्रीचा सर्वागाने आढावा, पावसाळी भटकंती, सॅक भरण्याची पद्धत, प्रथमोपचार, दोराच्या प्राथमिक सुरक्षा नॉट्स, गिर्यारोहण सामग्रीची ओळख, पावसाळ्यादरम्यानचे वृक्षारोपण, सह्य़ाद्रीतील घाटवाटा आणि तत्कालीन व्यापार, सह्य़ाद्रीतील लेणी अशा अनेक विषयांची येथे वर्षभर रेलचेल असते. त्यातून डोंगरभटकंतीत जागरूकपणा यावा हाच उद्देश. आप्पा परब, शिल्पा परब, कौस्तुभ कस्तुरे, रवींद्र लाड, सदाशिव टेटविलकर, सुनील पिसाळ, मालोजी जगदाळे, विवेक काळे, दामोदर मगदूम, अजय काकडे, चंद्रशेखर किलाने, कल्याण वर्मा अशा डोंगरभटक्यांनी या कट्टय़ावर मार्गदर्शन केलं आहे. कट्टय़ावरचा एक विषय तर अगदीच भन्नाट होता. तो म्हणजे ‘मंतरलेला कट्टा’. दऱ्या खोऱ्यात भटकताना भूताखेतांच्या चर्चा भरपूर ऐकायला मिळतात. मी अनुभव घेतला असे ठामपणे सांगणारेदेखील असतात. असे अनुभव आधी कथन करायला लावले आणि मग त्यामागील मानसिकता आणि अशा घटनांना मानसिकदृष्टय़ा कसे सामोरे जावे यावर मानसोपचारतज्ज्ञांनी मार्मिक भाष्य केलं.

थोडक्यात काय, तर भटकंतीचा सर्वागीण वेध घेत हे अनौपचारिक एकत्रीकरण जोमात सुरू आहे. गेले वर्षभर दर महिन्याच्या साधारण दुसऱ्या गुरुवारी सारे पुणे आणि मुंबई येथे एकत्र येतात. नाशिकलादेखील असा प्रयोग झाला, पण एक दोन कट्टय़ानंतर थांबला. सुरुवातीला दादरला छबिलदास शाळेत तर आत्ता दादरलाच मामा काणेंच्या सभागृहात कट्टा जमतो. मामा काणेदेखील डोंगरभटक्यांच्या या उपक्रमाला मनापासून सहकार्याचा हात देत आहेत. पुण्यात म्हात्रे पुलाजवळ इंद्रधनुष्य सभागृह पुणेकर डोंगरवेडे एकत्र येतात. आपणदेखील डोंगरवेडे असाल तर यात नक्कीच सामील होऊ शकता.

भटकंती कट्टा फेसबुक ग्रुप –  https://www.facebook.com/groups/bhatkantikatta/

भटकंती कट्टा मुंबई फेसबुक पेज – https://www.facebook.com/Bhatakanti Katta Mumbai

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2016 5:31 am

Web Title: traveler spot
Next Stories
1 ट्रेकिंग गिअर्स : पेहराव
2 आडवाटेवरची वारसास्थळे : पळसंबेची एकाश्म मंदिरे
3 कोणार्कचे सूर्य मंदिर
Just Now!
X