29 February 2020

News Flash

चिंब भटकंती : अंधारबन

पुण्याजवळ मुळशी तालुक्यातील अंधारबन हे ठिकाण उत्तम आहे

पुण्याजवळ मुळशी तालुक्यातील अंधारबन हे ठिकाण उत्तम आहे

धुवांधार पावसात भटक्यांना दोन पर्याय असतात. एक तर पावसाळ्यात सदाबहार निसर्ग नुसता न्याहाळायचा नाहीतर दुसरा पर्याय म्हणजे त्या तुफान पावसात चिंब भिजायचं. यापकी कुठलाही पर्याय अनुभवायचा असेल तर पुण्याजवळ मुळशी तालुक्यातील अंधारबन हे ठिकाण उत्तम आहे. पुण्याहून माणगावला जायला लागले की ताम्हिणी घाटाच्या अलीकडे लोणावळ्याला जाणारा फाटा फुटतो. इथून उजवीकडे २ किमी अंतरावर एक बांधलेला तलाव दिसतो. आपले वाहन इथे ठेवून पुढे जाता येते. इथूनच सुरू होते अंधारबनची वाट. तो तलाव आणि अंधारबन यामध्ये असलेल्या दरीला म्हणतात कुंडलिका व्हॅली. इथेच दरीला लोखंडी रेलिंग लावून बंद केले आहे. समोरच्या डोंगरावरील अंधारबनची गर्द झाडी आणि कोसळणारे धबधबे यांचे नेत्रसुखद दर्शन इथून होते. कधी कधी दरीतून वर येणाऱ्या वाऱ्यामुळे धबधब्याचे पाणी उलटय़ा दिशेने वर उडताना पाहता येते. आणि जर पावसात भटकायचे असेल तर समोर अंधारबन आहेच. या दरीला वळसा घालून आपण अंधारबनच्या जंगलात प्रवेश करतो. इथे एक मोठा ओढा लागतो जो पुढे कुंडलिका दरीमध्ये एका मोठय़ा धबधब्याच्या रूपात कोसळतो. पुढे रस्ता हिरडी गावात जातो. सह्यद्रीच्या ऐन खांद्यावर हे हिरडी गाव वसले आहे. इथून परत मागे फिरावे.

हाटकेश्वर

धुवाधार पाऊस, धो धो कोसळणारे धबधबे, ढग बाजूला झाल्यावर उंचावरून खाली दरीत दिसणारी टुमदार गावं, असंख्य रानफुलांनी फुललेले पठार अशा सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी पाहायच्या असतील तर जुन्नर तालुक्यातील हाटकेश्वरला जायलाच हवे. पुणे-जुन्नर-गोद्रे-हाटकेश्वर असा प्रवास किंवा मुंबई-माळशेज घाट-अणे-गणेशिखड-गोद्रे-हाटकेश्वर अशा मार्गाने इथे पोहोचता येईल. गोद्रे गाव हाटकेश्वरच्या अगदी कुशीत वसले आहे. तीनही बाजूंनी डोंगरामुळे बंदिस्त आणि एकाच बाजूने रस्ता. ऐन पावसाळ्यात गावाच्या तीनही बाजूंनी धबधबे कोसळत असतात. गोद्रे गावातून खडी चढण चढायला सुरुवात होते. दीड ते दोन तास चढून गेल्यावर आपण हाटकेश्वरला पोचतो. तिथून दिसणारा हरिश्चंद्र गड, आजोबा, घनचक्करची रांग आपल्याला जागेवर खिळवून ठेवतात. इथे मोठे देऊळ असे नाहीये. अगदी साधी पत्र्याची शेड आहे. त्यासमोर अनेक नंदीच्या प्रतिमा मांडून ठेवलेल्या. जवळच दगडात एक खोदलेले पाण्याचे टाके आहे पण ते पाणी काही पिण्याजोगे नाही. समोरच्या डोंगरात काही गुहा आहेत. पण तिथे जायला मार्ग नाही. गावकरी या भागाला नवरा-नवरीची गाठ असे म्हणतात. ऐन पावसाळ्यात तर हा सगळा परिसर धुक्यात लपेटलेला असतो. किंचित ढग बाजूला झाले तर पायथ्याशी असलेला आळेफाटा माळशेज हा रस्ता, त्यावरून जाणारी वाहने, आजूबाजूची खाचरे, आणि पिंपळगाव जोगा धरणाचा जलाशय असे अत्यंत रमणीय दृश्य पाहता येते. हाटकेश्वरच्या पठारावर अनेक रानफुलांची जत्राच भरलेली असते.  सुंदर फुलांमुळे सगळे पठार रंगीबेरंगी झालेले दिसते. माथ्यापर्यंत येताना एकूण तीन टप्पे लागतात. आणि या प्रत्येक टप्प्यावर समोर डोंगरावरून कोसळणारे असंख्य धबधबे आपल्याला खिळवून ठेवतात.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

First Published on July 26, 2017 4:45 am

Web Title: trip to andharban near pune during monsoon
Next Stories
1 जायचं, पण कुठं? : मशोबरा
2 अगुंब्याच्या जंगलात .. धो धो पावसात ..
3 चिंब भटकंती : नळदुर्गचा जलमहाल
X
Just Now!
X