15 December 2017

News Flash

एक सफर शांततेच्या बेटाची

रामेश्वरम्चे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल तर धनुष्कोडीला आवर्जून जायला हवे.

किन्नरी जाधव | Updated: August 9, 2017 5:05 AM

अनेक भाविक या मंदिर परिसरातील कुंडावर स्नान करतात

चहुबाजूने वेढलेला स्वच्छ निळाशार समुद्र, त्यामध्ये डोळे दिपावतील असे रंगीबेरंगी मासे, समुद्रामधून काढलेला रस्ता, नारळाच्या हिरव्यागार बागांनी जपलेले नेत्रसुखद सौंदर्य अशी जणू काही निसर्गाची चौफेर उधळण असंच रामेश्वरम्चे वर्णन करावे लागेल. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी केरळकडे जाणाऱ्यांचे प्रमाण हल्ली बरेच वाढले आहे. पण, तुलनेने तितकेच निसर्गरम्य रामेश्वरम् मात्र अजून तितकेसे पर्यटन नकाशावर दिसत नाही. रामेश्वरम्कडे धार्मिक महत्त्वाचे ठिकाण म्हणून पाहण्याकडे ओढा अधिक आहे, पण पर्यटनासाठी फारशी गर्दी येथे नसल्यामुळे या बेटावर एक अनोखी शांतता अनुभवायला मिळते. म्हणूनच मदुराईपासून १६९ किलोमीटरवर असलेले रामेश्वरम् हे निश्चितच एकदा तरी अनुभवावे असेच आहे.

निसर्गाची उधळण तर आहेच, पण थोडय़ा थोडय़ा अंतरावर असलेली रामाची मंदिरं, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे घर, कलामा यांनी शालेय शिक्षण घेतलेली शाळा, अमरनाथ यात्रेकरूंसाठी प्रसिद्ध असलेले रामनाथ स्वामी मंदिर अशा विविध वैशिष्टय़पूर्ण गोष्टींमुळे रामेश्वरम् बेटाला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे. रामेश्वरममध्ये उंच, टोलेजंग इमारती पाहायला मिळणारच नाहीत. इथल्या स्थानिकांची एक तर स्वतंत्र घरे आहेत किंवा लहान लहान चाळींमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. या साधेपणामुळेच रामेश्वरमच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. घरांवर आणि मिंदरांवर देवी-देवतांचे लहान लहान स्वरूपात केलेल्या नक्षीकामातून कलेप्रति असणारी आस्था जाणवते. रामेश्वरम्ची ओळख ही धार्मिक बाबतीत आपल्याकडे अगदी ठळकपणे आहे. येथील रामनाथस्वामी मंदिरात भाविकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात असते. कैलास पर्वतावरून हनुमानाने आणलेल्या शिवलिंगाची विश्वलिंग म्हणून पूजा केली जाते. ते या मंदिरात आहे, असे या मंदिराच्या पुजाऱ्यांकडून सांगितले जाते. अनेक भाविक या मंदिर परिसरातील कुंडावर स्नान करतात. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक उत्तम नमुनाच आहे. संपूर्ण मंदिर परिसर सुंदर कलाकृतींनी नटलेले आहे.

रामेश्वरम्चे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल तर धनुष्कोडीला आवर्जून जायला हवे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला निळाशार समुद्र आणि रस्ता संपताच पुढे अथांग समुद्र. अत्यंत शांत अशा या ठिकाणी एक अनोखा आनंद मिळतो. या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी मात्र तेथील सुरक्षा व्यवस्थापनाकडून खास परवानगी घ्यावी लागते. धनुष्कोडीमधील शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला १९६७ च्या वादळात मोडून पडलेल्या वास्तू पाहायला मिळतात. धनुष्कोडीचे टोक म्हणजे भारताचा शेवटचा टप्पा असल्याने टोकापर्यंत पोहोचल्यावर मोबाईलवर ‘श्रीलंकेत आपले स्वागत असो’ असा संदेशही मिळतो.

खरे तर १९६७ साली झालेल्या वादळामुळे या किनारपट्टीवरील अनेक गावं उद्ध्वस्त झाली. या वादळाच्या काही खुणा आजही रामेश्वरममधील उद्ध्वस्त वास्तूंमधून दिसतात. समुद्रकिनारी असणाऱ्या धनुष्कोडीमधील काही चर्च, पोलीस चौकी, घरं या उद्ध्वस्त झालेल्या वास्तू पाहताना वादळाच्या तीव्रतेची भीषणता जाणवत राहते. रामेश्वरममधून धनुष्कोडीकडे जाताना रस्त्याच्या कडेलाच या वादळामध्ये तुटलेले रेल्वेचे रूळ आजही इतिहासाची आठवण करून देतात. पण या सर्वातून सावरून आज रामेश्वर पुन्हा उभे राहिले आहे.

मदुराईपासून रामेश्वरमकडे जाताना समुद्र ओलांडावा लागतो. येथे समुद्रावर बांधलेल्या पंबन पुलाची भारतातील समुद्रावरील पहिला पूल आणि रेल्वे मार्ग अशी ओळख आहे. अर्थातच येथील निसर्गरम्यतेमुळे या पुलावर पर्यटकांची कायमच प्रचंड गर्दी असते. एकूणच पर्यटनासाठी सर्वच अंगाने रामेश्वरम् परिपूर्ण आहे. काही महिन्यांपूर्वीच रामेश्वरममध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या हयात प्लेस या हॉटेलने माध्यम सफर आयोजित केली होती. रामेश्वरममध्ये पर्यटनासाठी गेल्यावर ‘हयात प्लेस’सारख्या हॉटलांत राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.

कलाम यांचे घर 

डॉ. ए.पी.जे कलाम यांचे बालपण ज्या घरात गेले, त्या घरात कलाम यांचे वस्तुसंग्रहालय तयार करण्यात आले आहे. कलामांना मिळालेले पुरस्कार, त्यांची पुस्तके, दुर्मीळ छायाचित्रे यांचे जतन या संग्रहालयात करण्यात आले आहे. नुकतेच उद्घाटन झालेले कलाम स्मारक या घराच्या थोडे अलीकडेच आहे.  कलाम यांच्यासंबंधी वस्तूंचे प्रदर्शन या स्मारकामध्ये करण्यात आले आहे.

कसे आणि केव्हा जाल?

मदुराई विमानस्थळापासून रामेश्वरम्मध्ये जाण्यासाठी बस आणि खासगी वाहनांची सोय आहे. रामेश्वरम्मध्ये पावसाचा अनुभव घ्यायचा असल्यास सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत जाता येऊ शकते. मात्र, पावसाळ्यात समुद्राचा मनमुराद आनंद लुटता येत नसल्याने ऐनवेळी रामेश्वरम्ला भेट दिल्यास पर्यटनाचा उत्तम अनुभव घेता येऊ शकतो.

किन्नरी जाधव kinnari.jadhav@expressindia.com

First Published on August 9, 2017 5:05 am

Web Title: trip to rameshwaram kerala