News Flash

वर्षां भटकंती

पावसात गाडी काढून भिजरा निसर्ग अनुभवायचा असेल तर कसारा-जव्हार -मोखाडा मार्ग हा एक उत्तम पर्याय आहे.

जव्हार-मोखाडा-दाभोसा धबधबा
पावसात गाडी काढून भिजरा निसर्ग अनुभवायचा असेल तर कसारा-जव्हार -मोखाडा मार्ग हा एक उत्तम पर्याय आहे. मुंबईवरून कसारा घाटातून जव्हारकडे जाण्यासाठी लोहमार्गाखालून जाणाऱ्या बोगद्यातून बाहेर पडताच हिरवाईने सजलेला सभोवतालचा देखावा मनाला भुरळ पाडतो. वाडय़ावस्त्या ओलांडून जात असताना आजूबाजूच्या टेकडय़ांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या असंख्य पांढऱ्या रेषा खुणावत असतात. टेकडय़ा-टेकडय़ांवरून वाहणारे असंख्य ओहोळ ओलांडत आपला प्रवास सुरू असतो. कसाऱ्यापासून २१ किलोमीटर अंतरावरील विहीगावचा धबधबा विशेष प्रेक्षणीय आहे. याच रस्त्यावर पुढे खोडाळाजवळील देवबांध येथील
प्रसिद्ध गणपती मंदिरास भेट देऊन थेट जव्हार गाठावे.दाभोसा धबधबा जव्हारपासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या लेंडी नदीवरील साधारण ३०० फुट उंचावरून रोरावत कोसळणाऱ्या या धबधब्याचे रौद्रभीषणरूप पाहायला पर्यटकांची चांगलीच गर्दी जमते. धबधब्याच्या तळाशी मोठा डोह तयार झाला आहे. पावसाळ्यात डोहात उतरणे धोकादायक आहे. परतीच्या प्रवासात जव्हारच्या राजवाडय़ाला आवर्जून भेट द्यावी.

भूपतगड
जव्हारपासून १८ किलोमीटर अंतरावर झाप नावाचे छोटेसे आदिवासी वस्ती असलेले गाव आहे. याच गावापासून साधारण तासाभराची पायपीट करत भुपतगड गाठता येतो. निम्मीअधिक चाल बैलगाडी जाऊ शकेल एवढय़ा रुंद मातीच्या कच्च्या रस्त्यावरून होते. गावासमोरील टेकडीला वळसा घालून आपण भुपतगडाकडे जाणाऱ्या पायवाटेपाशी पोहोचतो.गडाच्या समोरील टेकडीवर आदिवासी लोकांची शेती आहे. त्यामुळे वाटेवर गावकऱ्यांचा सतत राबता असतो. येथून पुढे साधारण २०-२५ मिनिटांची सोपी चढाई आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जाते. गडावर पाण्याची काही टाकी, एक मोठे तळे, एक देऊळ आणि वाडय़ाचे काही अवशेष वगळता इतर कोणत्याही वास्तू शिल्लक नाही. पण गडमाथ्यावरून दिसणारा सभोवतालचा निसर्ग पाहून येथवर येण्यासाठी घेतलेल्या श्रमांचा विसर पडतो. दरीत खोल उतरू पाहणारे ढग आणि पायथ्याच्या गावातील हिरवीगार शिवारं निरखत गड फेरी पूर्ण करावी.

भंडारदरा – घाटघर परिसर
नाशिककरांचे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्धी पावलेल्या भंडारदरा परिसराची सफर म्हणजे पावसाळी भटकंतीची पर्वणीच जणू. खुद्द भंडारदरा गाव धरणाच्या पलीकडे वसलेले असून हॉटेल, बाजारपेठवगैरेची सोय आधीच्या शेंडी गावात होते. शेंडी-रतनवाडी-साम्रद-घाटघर-शेंडी अशी धरणाच्या जलाशयाला प्रदक्षिणा घालता येते. वळणावळणाचे रस्ते, उंच डोंगररांगांना वळसे देत जाताना दिसणारा धरणाचा दूरदूरवर पसरलेला जलाशय, आजूबाजूच्या डोंगरांवरून वाऱ्यासमवेत वेगात पाळणारे ढग, ठीकठिकाणी दिसणारे डोंगरातून वाहत येणारे ओहोळ, असं सारं काही ओल्या मनात साठवून घेत रतनवाडी गाव गाठायचे. रतनवाडी गावात पुरातन शिवमंदिर आणि त्याच आवारात असलेली शिल्पांकृत पुष्करणी पाहून साम्रद गावं गाठायचे.थोडीफार पायपीट करायची तयारी असल्यास साम्रद गावातून एखादा वाटाडय़ासोबत घेऊन सांधण दरी पाहून येता येऊ शकते. पुढे घाटघर धरणाजवळील घाटघरच्या कोकणकडय़ाला अवश्य भेट द्यावी.
प्रीती पटेल patel.priti.28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2016 1:23 am

Web Title: ultimate trekking destinations
Next Stories
1 अनोखा बर्फानुभव!
2 जायचं, पण कुठं? : मेघालय भटकंती
3 आडवाटेवरची वारसास्थळे : निलंग्याची हरगौरी
Just Now!
X