शिल्पसौंदर्य पाहण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणे आहेत. मात्र, डोळस पर्यटकांची पावले हमखास हम्पीकडे वळतात. जगभरातील पर्यटक हम्पीला भेट देत असतात. मात्र, पाषाण सौंदर्यापलीकडे हम्पीच्या सौंदर्याची अनुभूती घ्यायला हवी हवी.  त्यामुळेच तसे पाहिले तर तेथील प्रमुख मंदिरे पाहण्यासाठी एक दिवसही पुरतो आणि संपूर्ण हम्पी जगण्यासाठी एक महिनाही अपुरा पडतो.

हम्पी एक पाषाणातले काव्य आहे हे शंभर टक्के खरं पण त्याहूनही अधिक हम्पी हे खरं तर गारुड आहे. कुठलीही व्यक्ती हम्पीत गेली आणि ती एक वेगळी अनुभूती घेऊन आली नाही असे घडणे अशक्य आहे. विजयनगर साम्राज्याने राजधानीखातर वसवलेली हम्पीनगरी हे पाषाणातले एक काव्य आहे. एखादा कवी जसा एकामागोमाग एक ओळी रचत एखादे अजरामर काव्य जन्माला घालतो तसेच तत्कालीन कारागिरांनी इथली शिल्पे घडवत या अतीव सुंदर नगरीची रचना केली आहे. ते शिल्पसौंदर्य पाहायला हजारो पर्यटक हम्पीला भेट देतच असतात. परंतु, त्याच्या पलीकडेही एक हम्पीचे वेगळेपण आहे. ते पाहण्यासाठी वेगळी दृष्टी हवी.

हम्पीचे वेगळेपण जाणवते ते महामार्गावरच्या हितनल या गावापासूनच. हुबळी-धारवाडकडून येणारा किंवा विजापूरच्या दिशेकडून येणारा रस्ता हितनल क्रॉसपर्यंत सोबत दुतर्फा तूर, कापूस अशी पिकं घेऊन येतो. पण त्या चौकानंतर अचानक सभोवतालचा परिसर एकदम बदलून जातो. दुतर्फा भातखाचरांची रेलचेल आणि त्यांच्या सोबतीने हवेत झोके घेणारे माड. सपाट मदाने जाऊन मोठमोठय़ा शिळांनी भरलेले पहाड नजरेत भरतात. हम्पीचे हेच वेगळे सौंदर्य आहे. हम्पीनगरी तशी तुंगभद्रा नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेली आहे. प्रमुख मंदिरांच्या शिल्पांचे सौंदर्य न्याहाळायला हॉस्पेट-कमलापूरच्या बाजूला जाऊन दिवसभर मंदिरे पाहावीत. सायंकाळी हेमकुटा किंवा मातंग टेकडीवर गेलो की सोनेरी सूर्यास्ताच्या पाश्र्वभूमीवर तेजाळलेल्या हम्पीनगरीच्या मंदिरवैभवाचे उंचावरून असे दर्शन घडते की ते दृश्य आयुष्यभर हृदयात जपून ठेवावे. एखाद्या दिवशी सायंकाळी कोरॅकल बोट पॉइंटला सुंदर संधिप्रकाशात चाललेली लगबग न्याहाळत बसावे. टोपलीच्या आकाराच्या कोरॅकल बोटी डुबूक डुबूक करीत संथ वाहत्या तुंगभद्रेच्या पात्रात अजस्र शिळांमधून विहरत असतात ते दृश्य अतिशय विहंगम दिसते.

हम्पीत जागोजागी नजरेत भरते ती प्रस्तरारोहकांची गर्दी. हम्पीत ज्या आव्हानात्मक अजस्र शिळा विखुरलेल्या आहेत त्यावर प्रस्तरारोहणाचा सराव करणाऱ्या लोकांसाठी ही अतिशय आदर्श जागा. पाठीवर क्रॅशपॅडची गठडी आणि गळ्यात दोर  घेऊन प्रस्तरारोहक सकाळ-संध्याकाळ येथे फिरताना दिसतात.  हम्पीत काही ठिकाणी जगातले अत्यंत अवघड समजले जाणारे प्रस्तरारोहण मार्ग आहेत आणि त्यावर प्रयत्न करण्यासाठी जगभरातून प्रस्तरारोहक हम्पीत येत असतात.

अंधार पडल्यानंतर हम्पीतली सगळ्यात हॅपिनग जागा म्हणजे हम्पी बाजार. विविध लाकडी कलाकुसरीच्या वस्तूंची रेलचेल, चामडय़ाच्या वस्तू आणि एक रस्टिक फील देणारी जागा म्हणून हम्पी बाजाराचा अनुभव घेण्यास हरकत नाही. पोटपूजेसाठी मँगो ट्री नावाचे प्रसिद्ध हॉटेल आहे जिथे अमेरिकन, चायनीज, काँटिनेंटल आणि भारतीय असे सर्व प्रकारचे पदार्थ उपलब्ध आहेत. हम्पीत इतरत्र फिरण्याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे स्वत:ची गाडी असणे. नसल्यास तिथे मोपेड्स भाडय़ाने मिळतात. मंदिरे सोडून बाकी लोकजीवन जवळून पाहायचे असेल तर अशीच एखादी मोपेड भाडय़ाने घेऊन अनेगुंडीच्या बाजूचा परिसर भटकावा. हम्पीतून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी लहान बोटींची सुविधा अगदी नाममात्र दरात उपलब्ध आहे. त्या बोटींतून अगदी मोपेड्स, मोटारसायकलीदेखील पलीकडल्या तीरावर वाहून नेल्या जाऊ शकतात. अनेगुंडीच्या बाजूस सोनेरी भातशेती, त्यांत काम करणारे शेतकरी आणि त्यांच्याशी अर्धवट िहदी-कानडीत मारलेल्या गप्पा हाही एक आगळा अनुभव. खरी कर्नाटकची खाद्यसंस्कृती पाहायची असेल तर ती भेटते टिफिन सेंटर नावाने चालणाऱ्या लहान लहान हॉटेल्समधून. इडली-वडा-डोसा आणि पुरी भाजीची खरी दाक्षिणात्य चव अशा टिफिन सेंटर्समधूनच. म्हणून हम्पी पाहत असताना खरे दाक्षिणात्य पदार्थ खाऊन थोडे हम्पी जगायला हवे.

एखाद्या सकाळी कोवळ्या उन्हात गावातल्या नाक्यावरची चहाची टपरी गाठून खास वाफाळता चहा आणि कानडी बन खाण्यातही एक मज्जा आहे. हा बन म्हणजे कणीक आणि केळी यांच्या मिश्रणाची एक जाडसर गोड पुरीच असते. चहासोबत गावातल्या खमंग गप्पा हाच त्यातला बोनस. वेगळी हम्पी अनुभवण्यासाठी सानापूर तलाव, त्याच्या आसपास डोंगरांतून वाट काढणारे रस्ते, अनेक कालव्यांचे जाळे अशा अनेक जागा हम्पी परिसरात दडलेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर प्रमुख मंदिरे पाहायला एक दिवसही पुरतो आणि वेगळी हम्पी जगायला एक महिनाही कमी पडतो. फरक नजरेचा आणि दृष्टिकोनाचा असतो. चला, मग हम्पीची सफर करायची ना?

 

पंकज झरेकर

pankajzarekar@gmail.com