आपल्याप्रमाणेच विस्तार आणि विविधतेने नटलेला देश म्हणजे इंडोनेशिया. प्राचीन इतिहासाचा वारसा येथेही आहे; पण प्राचीन वास्तू कशी जोपासावी आणि त्यातून पर्यटन कसे वाढवावे हे त्यांच्याकडून शिकायलाच हवे.

‘येथे कचरा टाकू नये’ असा फलक आणि तेथेच पडलेला ढीगभर कचरा हे चित्र आपल्याला चिरपरिचित असते; पण इंडोनेशियातल्या या दोन ठिकाणी असा कोणताही फलक नाही की कचरा टाकल्याबद्दल दंड नाही. फेरीवाल्यांचा, विक्रेत्यांचा ससेमिरा नाही की फसवेगिरीची भीती नाही. जागतिक वारसा यादीतील बोरोबुद्दूर आणि प्रांबनन ही ती ठिकाणं, ज्वालामुखींच्या संकटातून पुन्हा उभी राहिलेली, जणू काही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे.

पर्यटकांच्या डोक्यात इंडोनेशिया आणि बाली हे समीकरण इतके पक्के बसलेले असते की, बालीपलीकडे पाहणेच होत नाही. म्हणूनच इंडोनेशियातील मध्य जावा प्रांतातील बोरोबुद्दूर हे बौद्ध धर्मीयांचे महत्त्वाचे केंद्र आणि प्रांबनन हा हिंदू मंदिरांचा संकुल हा वाट वाकडी करून पाहायला हरकत नाही असाच आहे.

कधी काळी ही दोन्ही वास्तू संकुलं ज्वालामुखीमुळे उद्ध्वस्त झाली होती. प्रांबनन मंदिर संकुल तर भुईसपाटच झाले होते. बोरोबुद्दूरला तुलनेने हा धक्का कमी प्रमाणात होता; पण आज या दोन्ही ठिकाणी जगभरातील पर्यटक येत असतात. धार्मिकतेच्या पलीकडे जात या वास्तू जोपासल्या आहेत आणि त्याचबरोबर पर्यटनदेखील.

नवव्या शतकातील राजा सलेंद्रच्या काळातील बोरोबुद्दूरचे पिरॅमिडसदृश असे दहामजली बांधकाम नंतरच्या काळात ज्वालामुखीने जवळपास उद्ध्वस्त झाले होते. अठराव्या शतकात जावानीज लोकांनी येथे भेटी दिल्याचे काही उल्लेख सापडतात, पण ते खऱ्या अर्थाने प्रकाशात आणले ते १८१५ मध्ये सर स्टॅमफोर्ड राफेल्स या ब्रिटिशाने. १८८५ मध्ये इजरमान यांच्या काळात येथे बरेच उत्खनन झाले. त्यातूनच जमिनीखाली गाडले गेलेले अनेक अवशेष हाती लागले. त्यातच सापडलेल्या संस्कृत शिलालेखांवरून याचा काळ ठरवता आला. १९०७ मध्ये व्हॅन इर्प या डच व्यक्तीने चार वष्रे पुनर्उभारणीचे काम सुरू केले. त्यामुळे ही वास्तू काही प्रमाणात आकारास आली, टिकून राहिली. मात्र त्या कामात काही त्रुटी होत्या. काही शिल्पांच्या जोडकामाचे संदर्भ नीट लागत नव्हते. १९५६ नंतर युनेस्कोने या कामी पुढाकार घेतला आणि १९६३ ते १९६८ या काळात या संपूर्ण वास्तूची पुनर्बाधणी झाली.

बोरोबुद्दूरच्या प्रत्येक मजल्यावर असंख्य शिल्पाकृती कोरल्या आहेत. बुद्धाचा सिद्धार्थ ते बुद्ध असा प्रवास, जातक कथा आणि निर्वाणाचा मार्ग अशी दहा टप्प्यांची रचना येथे आहे. बुद्धाच्या चार मुद्रा दर्शविणाऱ्या ५०४ मूर्ती येथे असून २ हजार ६७२ इतक्या शिल्पपट्टिका आहेत. आजही अनेक पट्टिकांचा अर्थ पूर्णत: लागलेला नाही. ललित विस्तारची शिल्पं कोरलेल्या पट्टिकांचा अर्थ उलगडला आहे. बाकी काम अजून सुरूच आहे. हे सारं मार्गदर्शकाकडून व्यवस्थित समजावून घेता येते. पार्क परिसरात वस्तुसंग्रहालय, जहाज संग्रहालय, माहिती केंद्र, अभ्यास केंद्र अशा अनेक सोयीसुविधा आहेत. पार्कमधून बोरोबुद्दूरला हत्तीवरून व छोटय़ा ट्रेनमधून सफारीची सुविधा आहे.

बोरोबुद्दूरपासून तासभराच्या अंतरावर सातव्या-नवव्या शतकातील हिंदू आणि बौद्ध धर्माच्या त्या परिसरातील अस्तित्वांच्या खुणा दर्शवणाऱ्या जवळपास ३० साइट्स आहेत. ‘प्रांबनन प्लेन’ नावानेच हा सारा परिसर ओळखला जातो. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे येथील बहुतांश वास्तू जमीनदोस्त झाल्या होत्या. १९९१ मध्ये जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाला आणि या संकुलातील जमीनदोस्त झालेल्या वास्तूंचे पुनर्बाधकाम सुरू झाले. प्रांबनन प्लेनमध्ये महत्त्वाचं आकर्षण आहे ते प्रांबनन मंदिर संकुलाचं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची स्वतंत्र अशी गगनचुंबी या सदरात मोडणारी ही मंदिरं म्हणजे पुरातत्त्व संवर्धनाचे उत्तम नमुने म्हणावे लागतील.

येथील हिंदू मंदिरं नवव्या शतकात संजय घराण्यातील राजा रकाई पिकातन याच्या कारकीर्दीत बांधली गेली आहेत. याच काळात सलेंद्र राजाच्या बोरोबुद्दूरला उत्तर म्हणून याचं बांधकाम सुरू झालं असल्याचंदेखील सांगितलं जातं. बाराव्या-तेराव्या शतकात ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर मात्र येथील िहदू राजे बाली बेटाकडे स्थलांतरित झाल्याच्या नोंदी आहेत.

प्रांबनन मंदिर समूह हा तब्बल २४७ मंदिरांनी तयार झालेला आहे. त्यापकी आठ मंदिरांची पुनर्बाधणी झाली असून इतर अवशेष तसेच व्यवस्थित जपून ठेवले आहेत. ४०-५० मीटर उंचीची ही मंदिरे पाहिल्यावर दक्षिणेतील गोपुरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शिवमंदिरावर तर संपूर्ण रामायणाचे शिल्पांकन आढळते.

या संपूर्ण परिसरातील आठव्या-नवव्या शतकांतील निर्माणकर्त्यांच्या कल्पकतेला, कौशल्याला तर दाद द्यावीच लागेल, पण आजदेखील हे सारं इतक्या आत्मीयतेने जोपासणाऱ्यांनादेखील सलाम करावा लागेल असं हे पाहिल्यावर नक्कीच वाटतं. बोरोबुद्दूर असो की प्रांबनन मंदिर संकुल, येथे कमालीची स्वच्छता आहे. वास्तूच्या सभोवतालचा अर्धा एक किलोमीटरच्या परिसर बंदिस्त आहे. उपाहारगृह आणि विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र जागा आहे. अभ्यासकांसाठी विशेष व्यवस्था आहे आणि ही सर्व माहिती देण्यासाठी अनेक भाषांमध्ये मार्गदर्शन करणारे मार्गदर्शकदेखील आहेत.

या संपूर्ण परिसराला ज्वालामुखीचा धोका आजही आहेच. हवामान खात्याशी येथील प्रशासकीय व्यवस्था संपर्कात असतात. बोरोबुद्दूरची संपूर्ण वास्तू झाकता येईल अशी प्लास्टिकच्या आच्छादनाची व्यवस्था आहे आणि आपत्कालीन प्रसंगी स्वयंसेवकांची फौजच तनात आहे.

आपल्याकडे एखाद्या वास्तूकडे पाहताना त्याच्या धार्मिक बाजूला खूप महत्त्व दिले जाते. तसे ते द्यायलाही हरकत नाही, पण त्याही पलीकडे जात एक वास्तुकला, शिल्पकला म्हणून अशा ठिकाणी जायला काय हरकत आहे. त्यातून देशाची जडणघडण कशी झाली याचा अंदाज येतो आणि आजच्या काळाकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभते.

योग्यकर्ता (जोग्जाकर्ता असादेखील उल्लेख केला जातो) या शहरात राहून ही दोन्ही ठिकाणं सहज पाहता येतात; पण धावतपळत जाऊन भोज्याला हात लावून परत येण्यासारख्या या वास्तू नाहीत. शांतपणे, समरसून दोन दिवस त्याचा आनंद घेता आला पाहिजे. सायंकाळी प्रांबनन येथे मोकळ्या मदानावर रामायण बॅले सादर केला जातो. असे बॅले योग्यकर्तामध्येदेखील आहेत. योग्यकर्ता हे मस्त उत्साही शहर आहे. दिवसभर भटकून दमूनभागून सायंकाळी तूगू चौकातील फूटपाथवर इंडोनेशियन संगीत ऐकत कॉफीचा आस्वाद घेत या भटकंतीची सांगता करता येते.

सुहास जोशी

suhas.joshi@expressindia.com