सातपुडा परिसर आणि सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावरून चालत जाण्याची ‘वॉकिंग ऑन द एज’ ही साठ दिवसांची अनोखी मोहीम २५ मार्चपासून सुरू झाली आहे. त्या मोहिमेचा प्रवास खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी..

भराड हे नर्मदेच्या तीरावरचे एक छोटंसं गाव. किती छोटं तर गुगल अर्थवर केवळ नावच दिसतं. पण तेथे वस्ती असल्याच्या काही खुणा जाणवतच नाहीत. चार वर्षांपूर्वी डोंगररांगावरून भटकायचे ठरवले तेव्हा सुरुवातीचे ठिकाण काही तरी विशेष असावं असं डोक्यात होतं. आणि मोहिमेची व्याप्ती वाढवून सह्य़ाद्रीबरोबरच सातपुडय़ात देखील जावं असा विचार होता. त्यातूनच हे भराड समोर आलं. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमा जेथे एकत्र मिळतात ते ठिकाण. नर्मदेच्या पात्रालगतच वसलेलं. आणि केवळ नकाशातच अस्तित्व असावं असं. येथे ना कोणते वाहन जातं, ना वीज, ना पाणीपुरवठय़ाच्या काही सुविधा. नाही म्हणायला सौरऊर्जेचा काय तो आधार.

Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
BJP Vijay Wadettiwar criticizes Ajit Pawar and Shinde group gadchiroli
अजित पवार व शिंदे गटाची अवस्था रस्त्यावरच्या भिकाऱ्यापेक्षाही वाईट; वडेट्टीवार म्हणाले, ‘भाजपचे गुलाम…’
statue of Gond raje Bakt Buland Shah the founder of Nagpur city is Neglected by government
नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!

‘वॉकिंग ऑन द एज’ या मोहिमेची सुरुवात या गावातून करायची ठरवलं खरं, पण ते गाव शोधण्यासाठीच एक मोहीम काढावी लागली. त्यानिमित्ताने गावातील लोकांशी परिचय तर झालाच, पण एकूणच सातपुडय़ाचे बाह्य़रूप आणि तेथील लोकांनी भुरळच पाडली. तशी डोंगराची आवड सह्य़ाद्रीने आधीच लावली होती. सह्य़ाद्रीतल्या वाडय़ा-वस्त्यांची चांगलीच ओळखही झाली होती. पण सह्य़ाद्री आणि सातपुडय़ात एक मूलभूत फरक होता. कोकणातून घाटमाथ्याकडे पाहताना दिसणारी एक सलग डोंगररांग आणि त्यापलीकडे दख्खनचे पठार. पण येथे सातपुडय़ाचे गणितच काही वेगळं. शहादानंतर उजवीकडचा रस्ता तोरणमाळला जातो, तर सरळ जाणारा रस्ता धडगावला. दारा गावापासून सातपुडय़ाच्या डोंगरात चढून गेल्यावर त्याची रुंदी जाणवू लागली. पाऊणएकशे किलोमीटर पसरलेला तो आडवा पट्टा, रखरखीत डोंगररांगा, त्यात जंगल असं नाहीच. पण ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणून ओळखला जाणारा पळस मात्र जागोजागी मुबलक होता. धडगाव, रोषमाळ वगैरे पार करत भराडच्या दिशेने जाताना रस्त्याला सतत चढउतार. सारं काही दुर्गमच म्हणावं असं. अधूनमधून दिसणारी एसटी तीदेखील आकाशी-निळी आणि खासगी जीप हेच काय ते प्रवासाचे साधन.

एसटी तुरळक तर किमान तीसएक लोक गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत तसे जीपला चिकटल्याशिवाय जणू काही ती सुरूच होत नाही.

तर हे भराड. अंतरा-अंतरावर पसरलेल्या आणि डोंगरांनी वेढलेल्या दहा-पंधरा घरांचा पाडा. सह्य़ाद्रीत जशी कारवीने तयार झालेल्या कुडाच्या झोपडय़ा, तसे येथे सारा भर बांबूंवर. वेताच्या जाळीदार िभती. कसलंही िलपण नसलेल्या. हवा आणि उजेडाचा मुक्त वावर. हे गाव खरं तर महाराष्ट्रात आहे. पण अगदीच आवश्यक अशी कामं सोडली तर या गावाचा सारा संपर्क गुजरातशी. महाराष्ट्राच्या बाजूला डोंगर चढून उतरून तास दोन तास खर्चून पुन्हा जीपला लटकण्यापेक्षा सरळ होडी काढून नर्मदा पार करून गुजरातेत जाणं कधीही सोयीस्कर. नर्मदा पार केल्यावर २५ किमीवरचं कवाठ तालुक्याचं गाव हेच यांच्या जगण्याशी अधिक जोडलं गेलंय. भाजीपाल्यापासून घरासाठीचे बांबू किंवा लोखंडी कपाटासारख्या वस्तूदेखील याच गावातून होडीने येथे येतात. अर्थात यांच्या बोलण्यात काहीसा गुजराती लहेजा दिसतोच. पण ते आमच्याशी बोलताना. एरवी यांचं एकमेकांतलं बोलणं सारं त्याच्या भिलोरी भाषेत नाही तर पावरीत. म्हणजेच बोली भाषेत. आणि ते सारं आपल्या डोक्यावरून जाणारं.

गावाला उपजीविकेचं साधन असं फारसं काही नाही. धरण शेजारी असूनही सिंचनाची सोय नाही. पावसाळी शेती आणि मोहाच्या फुलांपासून मिळणारं थोडंफार उत्पन्न आणि मिळालीच तर मजुरीची कामं. सरदार सरोवर होण्यापूर्वी नदीचं पात्र अजून खाली आत होतं. गावपण नदी जवळच. पण धरणानंतर आता यांचे पुनर्वसन वरच्या अंगाला डोंगराच्या पायथ्याशी झालेलं. धरणाची उंची वाढली तर उद्या यांना डोंगर पार करून पलीकडल्या चिचखेडीला जावं लागेल, कायमचं. मात्र या भराडवासीयांचं आदरातिथ्य खूप मोठं. कोण कसली ओळख नसताना ते आमच्या पुढच्या पडावापर्यंत सोबतीला येत आहेत. या भराडपासून रविवारी चालायला सुरुवात केलीय.

उत्तरेला उजवीकडे विंध्य, दक्षिणेला सातपुडा आणि सोबतीला नर्मदेचं पात्र. आता पुढचे चार दिवस याच मार्गाने भराडसारखीच अजून काही गावं लागतील. थुवनी, केळी, अट्टी, मुखाडी वगरे. मग नर्मदेचा काठ सोडावा लागेल आणि दक्षिणेला सह्य़ाद्रीच्या दिशेने गाडीवाट पकडावी लागेल. पण तोपर्यंत जमेल तितका सातपुडा जाणून घ्यायचाय. त्यांची भाषा कितपत उमजेल माहीत नाही, पण या डोंगरातील माणसं नक्कीच उमजतील अशी अपेक्षा आहे.

प्रसाद निक्ते walkingedge@gmail.com