अलीकडेच भारतीय लष्कराने पाकव्यप्त काश्मीरात केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईमुळे सनिकांच्या शौर्याची आणि भारतीय लष्कराच्या क्षमतेची चुणूक दिसली. परंतु, ६८ वर्षांपूर्वी जेव्हा आपण नुकतेच ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालो होतो तेव्हा, खरे तर लष्करीदृष्टय़ा बाल्यावस्थेतच होतो. तेव्हाही लष्कराने काश्मीरमध्ये गाजविलेला पराक्रम अतुलनीयच आहे.

या १९४८च्या लढाईचे स्थान श्रीनगर कारगील मार्गावर, श्रीनगरपासून अंदाजे १५० किमी अंतरावर आहे. श्रीनगरपासून जसजसे दूर जाऊ लागतो तसतसा निसर्ग कठोर होताना दिसतो. सोनमर्ग, बालतलनंतर तर जो रस्ता होता त्याला रस्ता, महामार्ग का म्हणायचे हाच प्रश्न मनात उद्भवतो. एका बाजूला खोलच खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंचच उंच ठिसूळ पहाड. वाहन चालकाची जराशी हलगर्जी म्हणजे थेट यमाची गाठभेट. अशा वाटेने  सुप्रसिद्ध जोझीला खिंड पार केली की जीवात जीव येतो.

आजूबाजूला उंच पहाड, ऑगस्ट महिना असूनही तुरळक बर्फाची चादर पसरलेली, भर दुपारी वाहणारे थंडगार वारे, प्राणवायूच्या कमतरतेमुळे जरा भरभर चालले तरी लागणारी धाप, हे सारे अनुभवत जोझीला युद्धस्मारकासमोर स्तब्ध व्हायला होते. त्या सर्व अनामिक सनिकांना मनोमन सलाम केला जातो. स्मारकाच्या जवळच आपल्या सैन्यदलाने लावलेल्या देशभक्तीपर गीताचे बोल  कानावर पडत असतात. अंगावर सर्रकन काटा उभा राहावे असे  वातावरण.  डोळ्यासमोर त्या सनिकांची कुर्बानीच उभी राहिली. खरेतर तेथून दहा बारा किलोमीटरवरच कारगील स्मारक आहे. ते खूपच मोठे व अधिक भव्य आहे.  पण घुमरीच्या या स्मारकाचे महत्त्व अधिक आहे. त्यावेळी आपल्या सैन्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करत ज्या ज्वाजल्यतेने हे पाकिस्तानला चोख उत्तर दिले होते. त्यावेळच्या एकंदरच भूराजकीय परिस्थितीत या लढाईला खूप महत्व होते. असे हे घुमरीचे स्मारक.  प्रत्येक भारतीयाने आवर्जून एकदा तरी भेट द्यावे असेच आहे.

sunilkhanolkar@gmail.com