युरोपियन चित्रकथी  वॉर्विक किल्ला

युरोप पाहायचा तर त्यांनी जतन केलेल्या गड-किल्ल्यांसाठीच. बालवयात ‘चांदोबा’ वाचत असताना त्यातील पौराणिक कथांचा आशय त्या कथेसाठी असलेल्या चित्रांमध्ये दिसायचा आणि त्या चित्रावरून त्या कथेची ओढ लागायची. असाच इंग्लंडमधील ‘वॉर्विक कॅसल’मध्ये अनुभव येतो.

वॉर्विक किल्ला हा लंडन शहरापासून ७० मल अंतरावर वार्वकि शायर या गावाजवळ ४५ एकर परिसरात १०६८ साली त्या ठिकाणी असलेल्या अकरा गढय़ा आणि चार हवेल्या पाडून त्यावेळचा नॉर्मडिचा उमराव विल्यम दुसरा याने बांधला. १०८८ मध्ये हेन्री द ब्युमॉण्ट हा किल्ल्याचा पहिला सरदार बनला. तेव्हापासून आजपर्यंत विविध कालखंडात एकूण ३६ सरदार/ किल्लेदार/ राजे यांचे आधिपत्य त्या किल्ल्यात होते. १०६८ सालातील त्या ४५ एकर जमीन नोंदणीचे तपशील आजही उपलब्ध आहेत.

किल्ला पाहण्यासाठी ९.६ स्टरिलग पॉण्ड (रु. ८००) इतके तिकीट आहे. परंतु, किल्ला पाहिल्यावर पैसे गेल्याचे दुख होत नाही. आतील बाजूस संपूर्ण मदान हिरवळीने सुशोभित केलेले आहे आणि सर्व बाजूंनी पायी चालण्यासाठी पथमार्ग आहेत. येथूनच किल्ल्याची भव्यता लक्षात येते. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर अनेक दालन सामोरी येतात. प्रत्येक दालनाच्या प्रवेशद्वारात सेन्सर बसवलेले आहेत, पर्यटक आला की त्याचे कार्य सुरू होते. विशेष प्रकाशयोजना, विशेष संवाद, विशिष्ट वस्तूंचे ध्वनी, त्या त्या दालनाप्रमाणे गंध-सुगंध इ. तंत्रांचा वापर करून त्या त्या दालनात पाचशे-हजार वर्षांपूर्वी वावर असलेल्या विशेष व्यक्तींचे मेणाचे पुतळे उभे, काही ठिकाणी बसलेले दाखवण्यात आलेले आहेत. ज्यामुळे या भौतिक तंत्रज्ञानाला जिवंतपणाचा अनुभव येतो. पर्यटक दालनाच्या बाहेर गेले की लाइट, संवाद, संगीत बंद होतात. पर्यटकांची श्रवणेंद्रिये आणि घाणेंद्रियांना चकविण्याचा वेगळा प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे.

या किल्ल्यास राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रमुख व्यक्ती भेटी देऊन गेलेल्या आहेत. त्यांचे प्रसंग मेणाच्या पुतळ्याच्या रूपाने आपल्याशी संवाद साधताना जाणवतात. असे किती तरी व्यक्तींचे पुतळे ऑडिओ क्लिपच्या साहाय्याने त्यांची माहिती देताना आपल्याला दिसतात. किचनमध्ये गेल्यावर राजघराण्यातील व्यक्तीच्या मेजवानीसाठी पदार्थ तयार करणारे स्वयंपाकी स्वयंपाक करतानाचे भांडय़ांचे आवाज, त्यांच्या हातात असलेल्या पदार्थाचे स्वाद, भारतातून घेऊन गेलेल्या मसाल्यांचे सुगंध हे पाहताना पोट भरल्यासारखे वाटते.

ग्रेट हॉलपुढील दालनात ‘फोटो फ्रेम शो’ आहे. यामध्ये समोरच्या भिंतीवर या किल्ल्यावर सरदार/ किल्लेदार/ राजे यांचे आधिपत्य असलेल्या व्यक्तीच्या तसबिरी क्रमाने टांगण्यात आलेल्या आहेत. पहिल्या तसबीरमधील चित्र टी.व्ही. स्क्रीनसारखे आपल्याशी बोलायला लागते. त्या तसबिरीतला सरदार त्याच्या स्वतच्या कालखंडातील विशेष घडामोडींचे वर्णन संवादरूपाने आपल्याला सांगून टाकते. तीन ते पाच मिनिटांत प्रत्येक चित्र आपापल्या कारकीर्दीत घडलेल्या घडामोडींचा इतिहास आपल्यासमोर मांडते. त्याचे संपले की त्यानंतर या किल्ल्यावर आलेल्या सरदाराच्या तसबिरीकडे पहिला सरदार पाहतो आणि पहिली तसबीर बंद होते आणि दुसऱ्या तसबिरीमधील सरदाराच्या फोटोवर प्रकाशझोत येतो. आणि ती तसबीर बोलू लागते. त्यापुढील दालनात ‘किल्ल्याचा प्रतिकृती शो’आहे. यामध्ये टेबलवर किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती मांडलेली आहे. भिंतीवर स्क्रीन आहे. त्यावर त्या किल्ल्यात आजपर्यंत युद्धात/ यादवीत घडलेल्या प्रसंगांचे वर्णन त्या त्या कालखंडातील किल्लेदार करत असतो. शत्रूंनी बॉम्ब टाकला त्या वेळी किल्ल्याच्या कोणत्या भागाची पडझड झाली हे त्या काचेच्या प्रतिकृतीमध्ये प्रकाशझोताच्या रूपाने समजते. फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये सतत १०० वर्षे लढाया चालू होत्या. तसेच दोनदा झालेल्या यादवी युद्धातील कैद्यांना तळघरात असलेल्या अंधार कोठडीत डांबून ठेवण्यात येत होते. आज त्या ठिकाणी पर्यटकांसाठी वीस मिनिटांचा ‘डंगन शो’चे आयोजन करण्यात आलेले आहे. या शोमध्ये त्या त्या काळी कैद्यांना कशा प्रकारे त्रास दिल्या जायचा, त्या त्रासाने त्यांचा विव्हळण्याचा, किंचाळण्याचा आवाज, मृत्युदंड देतानाची किंकाळी या बाबीमधून आपल्या संवेदनशील मनाला हे कधी तरी थांबले पाहिजे अशी जाणीव करून देतो. प्रशस्त अशा बठकीच्या दालनात युद्धावर जाणाऱ्या तरुण सनिकांची तयारी दृश्य स्वरूपात मांडलेली आहे.

आपल्याकडे कुडाळ तालुक्यातील मु. पो. पिंगुळी (गुढीपूर) या छोटय़ा गावात श्री परशुराम गंगावणे व त्यांचे कुटुंबीय ‘ठाकर-आदिवासी कला आंगण’द्वारे ‘चित्रकथी’ नावाचा शो सादर करतात. यामध्ये कागदावर पौराणिक कथांची चित्रे काढून ते चित्र समोर धरून एक व्यक्ती त्याबद्दलची कथा सांगते. ते ऐकलं की त्याच कथेचा पुढील भाग पुढे असलेल्या व्यक्तीजवळील चित्रात असतो. मग दुसरी व्यक्ती ती कथा पुढे घेऊन जाते. एकानंतर एक अनेक व्यक्ती त्या चित्रकथीच्या माध्यमातून आपल्याला/ पर्यटकांना पौराणिक कथांची ओळख करून देतात. हाच धागा मनी धरून शासनाने पावलं उचलली तर आपल्याकडे असे अनेक ‘वॉर्विक’ उभे राहतील.

चंद्रकांत गायकवाड chandrakant7662@rediffmail.com