हल्ली एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे नियमित सायकलिंग करायला लागलेल्या कुठल्याही सायकलस्वाराला, नवीन काय, असा प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर असतं, आत्ताच २०० ची ‘बीआरएम’ पूर्ण केली किंवा ४०० च्या ‘बीआरएम’ची तयारी करतोय. नवख्याला प्रश्न पडतो की, ‘बीआरएम’ म्हणजे नेमकं काय? नवीन सायकलस्वार तर सोडाच, ‘बीआरएम’मध्ये सहभागी झालेल्यांना तरी त्याचा खरा अर्थ कळलेला असतो का असे त्यांच्याशी बोलताना जाणवते. म्हणूनच या लोकप्रिय प्रकाराबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

‘बीआरएम’च्या इतिहासाविषयीच माहिती घेताना त्यामागचं तत्त्वज्ञान जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. Brevets de Randonneurs Mondiaux या मूळ फ्रेंच वाक्याचा इंग्रजी अर्थ ‘वर्ल्डवाईड हायकर्स पेटेन्टस्’ असा होतो म्हणजेच ‘जगभर कुठेही दूरवर रपेटीला जाणारा’. खरं तर या वाक्यातूनच बऱ्याच गोष्टी समजायला सोप्या होतात.

‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

‘बीआरएम’ हा रँडोनीअरिंगचाच एक प्रकार आहे. रँडोनीअरिंग म्हणजेच स्वबळावर केलेलं लांब पल्ल्याचं सायकलिंग. पण ते करत असताना इतरांना मदत करणं आणि सहभागी सायकलस्वारासोबत स्पर्धा न करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. स्वत:सोबत इतरांनाही पुढे घेऊन जाणं हा ‘बीआरएम’चा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा नव्हे. ठरवून दिलेलं अंतर ठरवलेल्या वेळेत पूर्ण करणं ही एकमेव गोष्ट इथे लागू होते. कमीत कमी वेळेत पूर्ण करणाऱ्या सायकलस्वाराचं नावंही अंतिम यादीत पहिल्या क्रमांकावर न येता अक्षरक्रमाने येतं. ‘बीआरएम’मधील खिलाडूपणा टिकून राहतो तो यामुळेच. कोणत्याही गोष्टीकडे केवळ स्पर्धा म्हणून न बघता, प्रत्येकाला सोबत घेऊन कसं पुढे जाता येईल या दृष्टिकोनातून पाहणे हाच यामागचा खरा दृष्टीकोन. ‘बीआरएम’चे २००, ४०० किंवा ६०० किलोमीटरचं अंतर हे डोंगराएवढं असतं. परंतु, वाटेत जर कुणाचा टायर पंक्चर झाला असेल तर त्याला मदत करणं, कोणी चहा किंवा खाण्यासाठी थांबलं असेल तर त्यांच्यासोबत त्याचाही आस्वाद घेणं आणि मग आपल्या वेगानुसार पुढे निघून जाणं, ही ‘बीआरएम’ची खरी मजा आहे. ‘बीआरएम’मध्ये प्रत्येक अंतरासाठी वेळ ठरवून दिलेली आहे. दोनशे किलोमीटरचं अंतर १३ तास २० मिनिटांमध्ये पूर्ण करायचं असतं, ३०० किलोमीटरचं अंतर २० तासांत, चारशे किलोमीटरचं अंतर २६ तास ४० मिनिटे आणि सहाशे किलोमीटरचं अंतर ४० तासांत पूर्ण करायचं असतं. याचाच अर्थ अंतर वेळेत पूर्ण होण्यासाठी ताशी १५ किलोमीटर वेगाने सायकल चालवणं गरजेचं आहे.

महत्वाचे म्हणजे ‘बीआरएम’मध्ये भाग घेण्यासाठी कुठलीही पात्रता लागत नाही. अठरा वर्षांवरील कुठलाही मुलगा किंवा मुलगी यामध्ये सहभागी होऊ शकते. ज्यांच्यामध्ये चिकाटी आहे असा कोणीही रँडोनीअरिंगमध्ये  सहभागी होऊ शकतो. बीआरएमचं विश्व सर्वासाठी खुलं आहे.

फ्रान्समधील अ‍ॅडॉक्स क्लब पॅरिसिअन ही संस्था सायकल टुरिझमला प्रोत्साहन देते आणि ‘बीआरएम’चं आयोजनही करते. पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस (पीबीपी) हा १२०० किलोमीटरचा सायकल इव्हेंट १८९१ साली पहिल्यांदा झाला. टूर-दी-फ्रान्स या स्पर्धेपेक्षाही जुना असा हा इव्हेंट. ‘पीबीपी’ चार वर्षांतून एकदा आयोजित केला जातो. जगभरातून यामध्ये सायकलस्वार सहभागी होत असल्यामुळे यातील सहभागींची संख्या मर्यादीत ठेवणे गरजेचे असते. म्हणूनच त्यासाठी काही पात्रता ठेवली जाते. ही  पात्रता फेरी एक वर्ष आधीपासून सुरू होते. पात्र होण्यासाठी सायकलस्वाराने २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरची राइड केलेली असणं आवश्यक आहे.

‘पीबीपी’साठी जगभरातून चार ते पाच हजार सायकलस्वार पात्र ठरतात. चार वर्षांत प्रत्येक देशाने किती बीआरएम केल्या म्हणजेच त्यांनी एकूण किती अंतर पार केले (सायकल इव्हेंटचे अंतर आणि त्यामध्ये सहभागी सायकलिस्ट यांचे गुणोत्तर) यावरून पीबीपीमध्ये त्या देशाचे किती सायकलस्वार सहभागी होऊ शकतात हा आकडा ठरतो. त्यामुळे बीआरएम हा एका अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठा सांघिक इव्हेंट आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

प्रत्येक देशात ‘बीआरएम’चं आयोजन कुठलीही संस्था करू शकते. त्यासाठी त्यांना अ‍ॅडॉक्स क्लब पॅरिसिअनच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांची मार्गदर्शक तत्त्वे समजून घ्यावी लागतात. बीआरएममध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सायकलस्वाराची माहिती फ्रान्सला जात असल्याने त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. त्यासाठी सायकलस्वाराला कुणाचेही प्रायोजकत्व घ्यावे लागू नये अशा स्वरूपाचेच ते असते. भारतात ‘बीआरएम’ सुरू करण्याचं श्रेय नावाजलेले सायकलस्वार सतीश पत्कींना जातं. भारतातील पहिली ‘बीआरएम’ २०१० साली मुंबईत झाली होती. आज भारतात अनेक संस्था ‘बीआरएम’चे आयोजन करतात. सायकलिंग हा गेल्या काही वर्षांत एक क्रिडा प्रकार, छंद म्हणून चांगलाच लोकप्रिय झाला आहे. चौकटीबाहेरच्या भटकंतीचा आनंद देणारा हा नवा पर्याय चांगलाच रुळला आहे. शतकोत्तर अशा ‘बीआरएम’चा उद्देशदेखील हाच निखळ आनंद देण्याचा आहे. फक्त जिंकण्यासाठी अंतर पार करणं हे त्याचं उद्दीष्ट नाही याची जाणीव यानिमित्ताने होणं महत्त्वाचं ठरेल.

प्रशांत ननावरे

prashant.nanaware@expressindia.com