अनेक मजले खोलीच्या, पाण्याच्या पातळीपर्यंत पायऱ्या असणाऱ्या विहिरी गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतात. इंग्रजीत त्यांना स्टेपवेल असे म्हणतात. भूजल पातळी खूप खालावल्याने तिथे अशा विहिरी खोदल्या गेल्या. त्या आकर्षकरीत्या शिल्पांकितसुद्धा केल्या गेल्या आहेत. अहमदाबाद इथली अडालज आणि मेहसाणा जिल्ह्यतल्या पाटण इथली राणी की वाव या विहिरी आणि त्यावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. पण आपल्याकडेसुद्धा अशीच एक सुंदर विहीर आहे ती साताऱ्याच्या जवळ लिंब या गावी. पुण्याहून साताऱ्याला जाताना साताऱ्याच्या अलीकडे नऊ किलोमीटरवर लिंब फाटा आहे. तिथून तीन किलोमीटरवर आत ही विहीर आहे.
राणी वीरूबाई हिने सन १७१९ ते १७२४ या काळात ही पंधरा मोटा असलेली अत्यंत देखणी विहीर बांधली. आजूबाजूच्या शेतीला मुबलक पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने ही विहीर बांधण्यात आली. या विहिरीवर पाणी उपसण्यासाठी असलेल्या १५ मोटांच्या खुणा अजूनही दिसतात. स्थानिक लोक मात्र १२ मोटांची विहीर म्हणतात. इथे नुसतीच विहीर बांधली नाही तर त्यामध्ये एक सुंदर दालनसुद्धा तयार केले गेले. त्याच्या खांबांवर मोर, घोडेस्वार, कुस्ती खेळणारे पहिलवान अशी शिल्पे दिसतात. विहिरीवरील या दालनात बसल्यावर अतिशय थंडगार वाटते. या विहिरीवर आतल्या बाजूने व्यालांची शिल्पे कोरलेली दिसतात. व्याल म्हणजे ज्याचे डोके एका प्राण्याचे आणि खालचे धड दुसऱ्या प्राण्याचे आहे असा एक काल्पनिक प्राणी. षटकोनी आकाराच्या विहिरीत उतरणाऱ्या पायऱ्यांच्या दारावर गणपती कोरलेला आहे. तर तिथेच एक कमानदार पूल आहे. त्याच्या वरती एक प्रशस्त दालन आहे. या विहिरीच्या पायऱ्या उतरत असताना समोरच एक देवनागरी लिपीमधील शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखात ‘श्रीमंत सौभाग्यवती वीरुबाईसाहेब’ असे कोरलेले आहे.
या परिसरात पिकणारे गुलाबी गर असलेले पेरू अतिशय चविष्ट असतात. लिंब गावात कृष्णामाईचा उत्सव खूप मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. इथे शेजारीच असलेल्या गोवे या गावी कृष्णा नदी एक सुंदर वळण घेते. नदीच्या ऐन वळणावर वसलेले कोटेश्वराचे मंदिर सुद्धा आवर्जून पाहावे असे आहे. या परिसरात असलेले जुने चिंचेचे वृक्ष, हळद, आले, भुईमूग यांची शेती यामुळे सगळा परिसर हिरवागार झालेला दिसतो.
आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com