जायचं, पण कुठं?  : अंदमान – निकोबार

नीरव शांतता आणि शांत समुद्र जिथे एकत्रितपणे अनुभवण्यास मिळते ते ठिकाण म्हणजे अंदमान-निकोबारची बेटे. सुट्टी समुद्रकिनारी घालवायची असेल तर पर्यटनाचे हे एक खास ठिकाण. अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. अंदमानचे समुद्रकिनारे काही खास गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील […]

नीरव शांतता आणि शांत समुद्र जिथे एकत्रितपणे अनुभवण्यास मिळते ते ठिकाण म्हणजे अंदमान-निकोबारची बेटे. सुट्टी समुद्रकिनारी घालवायची असेल तर पर्यटनाचे हे एक खास ठिकाण. अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. अंदमानचे समुद्रकिनारे काही खास गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील आकर्षण आहे.

ट्रेकिंग, स्कुबा, स्नॉर्केलिंग, सी वॉक, रंगीत मासे बघत करता येणारे बोटिंग, जेट स्कीईंग, स्पीड बोटिंग आदी साहसी करामती यथे करता येतात. पोर्ट ब्लेअर, नील, हेव्लोक, रॉस-स्मिथ अशी विविध बेटे प्रसिद्ध आहेत. डिसेंबर, जानेवारी महिन्यात असंख्य कासवे पिल्ले घालण्यासाठी रॉस-स्मिथ बेटावर येतात. पोर्ट ब्लेअरला सेल्युलर जेल आहे. तिथे साउन्ड आणि लाइट शो पाहता येतो. जवळच चिडिया टापू परिसरात नानाविध फुलपाखरांच्या जाती आणि अनेक पक्षी बघायला मिळतात.  तर हेव्लोक बेटावरील राधानगरच्या समुद्रकिनाऱ्यावर शांत सूर्यास्त-सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. हेव्लोक बेटावरील निवांतपणा मधुचंद्रासाठी लोक पसंत करतात. खास एलिफंट बीचवर हत्ती पोहताना आढळतात. इथल्या एका बेटावर सूर्यास्तानंतर फक्त पोपटांचेच थवे येतात आणि पहाट होताच एकत्र सगळे उडून जातात. हे दृश्य फार थोडय़ांनाच दिसू शकते. कारण ती वेळ गाठणे जरुरी असते. पाचू-नीलमच्या खडय़ांसारखे रंग असणारे इथले समुद्र, त्यांचे स्वच्छ किनारे, शुभ्र वाळू, हिरवा निसर्ग अंदमानला एक वेगळा दर्जा देऊन जातो. नोव्हेंबर ते मे महिना इथे येण्यासाठी उत्तम. चेन्नई, कोलकाताहून पोर्ट ब्लेअरला फेरी बोट असतात. तसेच दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, बंगळुरूरहून पोर्ट ब्लेअरला विमानसेवा उपलब्ध आहे. शिंपल्यांच्या वस्तू इथे विकायला असतात. इथला एको-टुरिझम प्रकर्षांने जाणवतो. निसर्गाचे संतुलन कुठेही न ढळता पर्यटन व्यवसाय विकसित केल्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Andaman and nicobar islands