ग्रामीण पर्यटनाचा सिक्कीमानुभव

भारताच्या एकूण भूभागाच्या केवळ २% भूभाग लाभलेला या प्रदेशात देशाच्या २६% जैव विविधता तेथे आहे.

सिक्कीम
गिर्यारोहण मोहिमांच्या निमित्ताने म्हणून उत्तरेतील अनेक राज्यांना वारंवार भेटी व्हायच्या. पण नजीकच असणाऱ्या सिक्कीममध्ये फारसे डोकावता आले नव्हते. युथ होस्टेलसाठी उत्तर पूर्वेकडील राज्यांतील भटकंतीमुळे सिक्कीमची ओळख झाली होती. सिक्कीम म्हटल्यावर आठवतात ती पिलिंग आणि गंगटोक ही दोन लोकप्रिय पर्यटन स्थळे. त्यातही गंगटोकचा संबंध नथुला पासला जाण्यासाठी येतो म्हणून सर्वानाच माहित असणारा. पर्यटनाच्या लोकप्रिय पॅकेजमध्ये दार्जिलिंगच्या जोडीला सिक्कीम जोडण्यात येते. कांचनजुंगा बेस कॅम्पसाठी म्हणून भटक्यांचा राबता अंतर्गत भागात  असतो. पण या पलिकडेदेखील सिक्कीम आहे हेच अनेकांच्या गावी नसते.

भारताच्या एकूण भूभागाच्या केवळ २% भूभाग लाभलेला या प्रदेशात देशाच्या २६% जैव विविधता तेथे आहे. तसेच अति उंचीवरील निर्सग सौंदर्य, निर्मळ झरे, स्वच्छ नद्या, अति उंचीवरील तलाव, विविध कटीबद्धातील घनदाट जंगले अशी विविधता आहे जी आपल्या देशात दुर्मिळ होत आहेत. तसेच या राज्यात जगातील तृतीय क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कांचनजुंगा व  ७००० मीटर पेक्षा जास्त उंचीची अनेक  हिमशिखरे आहेत.

अर्थातच या निसर्गरम्य राज्याच्या ग्रामीण भागात जाण्याची ओढ होती. मागच्याच वर्षी सिक्कीमच्या या ग्रामीण पर्यटनाचा अनोखा अनुभव घेता आला. प्रशासन जर उत्सुक असेल तर अनेक प्रकल्प मार्गी कसे लागू शकतात हे जाणवलं. ग्राम विकास विभागाचे सचिव संदीप तांबे तांबे यांच्या सहकार्याने दोन गावं ठरवण्यात आली. टिंगवाँग आणि किताम. एक पक्षी अभयारण्य तर दुसरे लेपचा जमातीचे मूळ गाव. संपूर्ण गावाला एकत्र आणून पर्यटकांना राहण्यासाठीच्या सोयी सुविधा गावात निर्माण केल्या. सिक्कीममध्ये अनेक गावांमध्ये मुक्कामांच्या सोयी जपल्या आहेत. मात्र त्यात एकसूत्रता नव्हती. यावेळी संपूर्ण गावच या माध्यमातून एकत्र आले.

युथ होस्टेलच्या महाराष्ट्र शाखेमार्फत मागच्या वर्षी तब्बल २०० लोकांना हा ग्रामीण पर्यटनाचा आनंद घेता आला. दोन्ही गावांच्या निसर्गरम्य परिसरातील भटकंती, पक्षी निरिक्षण आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अशी एकंदरीतच रेलचेल होती. पर्यटकांना थेट स्वयंपाकघरापर्यंत जाता येत होते. एकप्रकारचे सांस्कतिक आदानप्रदानच होते. या दोन चार महिन्यांच्या एकंदर प्रक्रीयेत सिक्कीमच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने ओळख झाली. उत्तरपूर्वेकडील इतर राज्यांच्या तुलनेत हा तसा सुरक्षित आणि शांत प्रदेश आहे. लोक प्रेमळ आहेत. वाहतुकीची व्यवस्था तुलनेने सोपी. म्हणजे जीपमधून अगदी सीटबेसिसवरदेखील जाता येतं.

आज सिक्किम सरकारने पुढाकार घेऊन एक स्वतंत्र संचालनालय सुरु केलं आहे. त्यांच्याकडे रितसर नोंदणी करुन आपणदेखील या ग्रामीण पर्यटनाचा सिक्किमानुभव घेऊ शकता. सिक्कीम होम स्टे योजना इको टुरिझम कॉन्झव्‍‌र्हेशन सोसायटी ऑफ सिक्कीम यांच्या वतीने राबविली जात आहे. त्यांनी दक्षिण सिक्कीममध्ये लिंगी पायोंग, रे मिंदू, किवझिंग, किताम, पश्चिम सिक्कीममध्ये योक्सुम व धारप गावात, उत्तर सिक्कीम मध्ये झोंगु, पूर्व सिक्कीममध्ये पास्तेंगा गावात ग्रामीण निवास योजना सुरु केली आहे.

जाण्यासाठी योग्य कालावधी

एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर

सिक्किमची ओळख सध्या कलकत्याचे हिल स्टेशन अशीच झाली. साधारण मे महिन्यात कलकत्तावासीयांची बरीच गर्दी या ठिकाणी असते. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत जर जाता आले तर आणखीन शांतता लाभू शकेल. ऑक्टोबर नोव्हेबर हा मान्सूननंतरचा काळदेखील अगदी उत्तम आहे.

जाण्याचा मार्ग – जवळचे एअरपोर्ट बागडोगरा, जवळचे रेल्वेस्टेशन सिलिगुडी – दोन्ही ठिकाणाहून चार तासांत गंगटोक गाठता येते. रेल्वे स्टेशनवरुन जीप सुविधा सुरु असते. (दहा जणांची एक जीप)

इको टुरिझम कॉन्झव्‍‌र्हेशन सोसायटी ऑफ सिक्कीमचा गंगटोक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक : ०३५९२-२३२७९८

टिंगवाँग गाव हे लेपचा जमातीचे मूळ गाव आहे. या भोळ्या जमातीच्या सुरक्षेसाठी तेथील राजाने प्रवेशावर निर्बध लावले होते. आजदेखील सिक्किम सरकार ते पाळत आहे. म्हणूनच येथे जाण्यासाठी त्यासाठी सिक्कीम सरकारकडून विशेष परवानगी काढावी लागते.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती ( Lokbhramanti ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article on increase in sikkim tourism

Next Story
दुचाकीवरून : एक पॅडल मारून तर पाहा..
फोटो गॅलरी