स्ट्रॅटफर्डच्या बार्डबाबाने (आपला शेक्सपियर हो!) जरी म्हटलं असलं की ‘नावात काय आहे? तरी एखाद्या व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं नाव ऐकल्यावर आपल्या मनात त्याच्याविषयी काही ना काही प्रतिमा उमटल्याशिवाय राहात नाही आणि मग प्रत्यक्ष दर्शनानंतर मनातल्या प्रतिमेचे तीनतेरा (कधी चांगल्या अर्थानं तर कधी..) वाजल्याशिवाय राहात नाही. अशीच अवस्था ‘नोह का लीकाइ’ धबधब्याकडे जाताना झाली होती. मुळात हा धबधबा ज्या राज्यात आहे त्या राज्यात म्हणजे मेघालयमध्ये आल्यापासून इथल्या ठिकाणांची आणि माणसांची नावे उच्चारताना जिभेला चांगलाच व्यायाम घडत होता. ईशान्य भारतात वसलेल्या या राज्यातला आमचा मार्गदर्शक होता किर्शाक (त्याचे स्पेलिंग के वाय आर असे करायचे हे त्यानेच सांगितले.) आणि या मेघालय भेटीचा नियोजनकर्ता होता डॉ. नान्गोम आओमोआ. या दोघांची नावे उच्चारतानाच आमची जी दमछाक व्हायची त्यात भर पडली ती ‘नोह का लीकाइ’ या धबधब्याच्या नावाने. पण पहिल्या एका दिवसातच आम्हाला कळून चुकलं होतं की इथल्या लोकांची, ठिकाणांची नावे जितकी अवघड आहेत तितकीच ही माणसे सरळ, साधी आणि आतिथ्यशील आहेत. त्यामुळे या धबधब्याच्या नावावर न जाता मेघालयातील हिरव्यागार डोंगरांना वळसे घालत आम्ही प्रवास सुरू केला आणि इच्छित ठिकाणी पोहोचलो. तिथे जे दृश्य दिसले ते पाहिल्यावर काही क्षण काय बोलावे तेच सुचेना. समोरच्या उंच डोंगरावरून पाण्याची एक मोठ्ठी धार अविरत कोसळत होती आणि वरून पडणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचे खाली पडल्यावर निळ्याशार डोहात रूपांतर होत होते. ते दृश्य पाहिल्यावर आपसूक मनात ओळी उमटल्या यह कौन चित्रकार है? आमची ती चित्र समाधी भंगली ती किर्शाकच्या आवाजाने, त्याने धबधब्याची जी लोककथा सांगितली, त्यामुळे ‘नोह का लीकाइ’ या नावाचे कोडे उलगडले. त्या कथेनुसार या धबधब्याच्या वरच्या अंगाला ‘का लिकाइ’ नावाची एक महिला राहात होती (खासी भाषेत महिलांना ‘का’ हे संबोधन लावतात). या का लिकाइचा पहिला नवरा अचानक मरण पावल्यानंतर तिने दुसरा विवाह केला. पण तिला पहिल्या नवऱ्यापासून एक लहान मुलगी होती, का लिकाइ रोज मोलमजुरीच्या कामांसाठी सकाळी उठून जायची, त्यामुळे परत आल्यावर आपल्या लहानग्या बाळाला जास्तीत जास्त वेळ द्यायची. ती आपल्यापेक्षा त्या बाळाला महत्त्व देते असा समज तिच्या दुसऱ्या नवऱ्याने करून घेतला आणि तो त्या बाळाचा द्वेष करू लागला. एक दिवस का लिकाइ कामावरून दमून भागून घरी आली तर घरात कोणीच नव्हतं, फक्त जेवण तयार होतं. नवरा बाळाला घेऊन बाहेर गेला असेल असं समजून तिने जेवण केलं आणि जेवल्यावर पान खायला पानाचा डबा उघडला तर त्यात तिला तिच्या मुलीची करंगळी मिळाली आणि मग नवऱ्याने काय केलंय हे समजलं. तिला भयंकर धक्का बसला. दुखाने आणि रागाने ती वेडीपिशी झाली. त्या भरातच ती घरातून धावत सुटली आणि या धबधब्याशेजारून तिने स्वतला कडय़ावरून झोकून दिलं. तेव्हापासून याला ‘नोह का लिकाइ’ म्हणजे ‘लिकाइची उडी’ असे नाव मिळाले. ही करुण कथा ऐकल्यावर त्या धबधब्याच्या अनुपम सौंदर्याला उगाचच एक काळी किनार असल्याचा भास झाला. १११५ फुटांवरून कोसळणारा हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपकी एक मानला जातो.

मेघालय राज्याची ओळख बनलेला दुसरा धबधबा म्हणजे ‘एलिफंट वॉटरफॉल’. शिलॉंगजवळच असलेल्या या मुळातल्या अप्रतिम धबधब्याला आता वेगळं वलय लाभलंय ते पंतप्रधानांच्या ट्वीटमुळे. हा धबधबा पाहिल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी ‘तुम्ही जर मेघालयला भेट देणार असाल तर एलिफंट फॉल पाहायलाच हवा’ असे ट्वीट केले होते. हे ट्वीट किती सार्थ आहे याची प्रचीती या धबधब्याला भेट दिल्यावर येते. आता ह्यचे नावही जरा गोंधळात पाडणारे आहे, कारण नावातील हत्ती आता या धबधब्याजवळ दिसत नाही. या भूमीवर आलेल्या गोऱ्यांना या धबधब्याच्या डाव्या अंगाला एक खडक हत्तीसारखा वाटला होता, त्यावरून त्यांनी एलिफंट फॉल हे नाव दिले. पुढे १८९७च्या भूकंपात तो खडक भंगला, त्यामुळे हत्ती गेला नी धबधबा उरला असे झाले. या धबधब्याला खासी भाषेत ‘का क्शैद लाइ पतेंग खोहसिव्यू’ म्हणजे ‘तीन पायऱ्यांचा धबधबा’ म्हणतात. खरोखरच तीन टप्प्यांमध्ये हा धबधबा कोसळतो, त्यातला सर्वात शेवटचा टप्पा अतिशय मनमोहक आहे. काळ्या खडकावरून पाझरणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याच्या धारा आणि भोवतीची हिरवाई यामुळे एक अनोखे निसर्गचित्र इथे तयार झालेलं पाहायला मिळते. या धबधब्याच्या तळाशी पोहोचण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि एका लहानशा पुलावरून धबधब्याचा दुसरा टप्पा ओलांडून आपण खाली पोहोचतो. मात्र सध्याच्या सेल्फी वेडामुळे धबधब्याच्या धारेसमोर सहकुटुंब सहपरिवार सेल्फी काढणाऱ्यांची इतकी गर्दी असते की फक्त धबधबा कॅमेऱ्यात बंद करायला अँगल शोधावाच लागतो.

उत्तर पूर्वेकडील सेव्हन सिस्टर्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या राज्यांतील मेघालय हे राज्य आकाराने आपल्या महाराष्ट्राच्या एक दशमांशही नाही. पण महाराष्ट्राच्या दसपट नसíगक विविधता या राज्याला लाभलेली आहे. बांगलादेशला चिकटून असलेलं हे राज्य म्हणजे भारतातील सर्वाधिक पावसाचं राज्य आहे (वर्षांला सर्वसाधारणपणे ४७० इंच पाऊस पडतो इथे). साहजिकच ‘मेघालय’ म्हणजे ढगांचं निवासस्थान हे नाव तर समर्पक आहेच, पण गोऱ्या साहेबाला इथे आल्यावर आपली मायभूमी आठवली आहे. त्याने ‘स्कॉटलंड ऑफ द ईस्ट’ हे बिरूद देऊन टाकले. खासी आणि गारो टेकडय़ांच्या रांगा, सुमारे ७० टक्के भूमीवर जंगलांचे हिरवे छत्र आणि वन्यजीवांचे कमालीचे वैविध्य यामुळे मेघालय आकाराने लहान असले तरी दोन-चार दिवसात आटोपत नाही. त्यात भरपूर पावसाने जागोजागी तयार केलेले धबधबे आणि त्यांना लाभलेली लोककथेची वलये, यामुळे मेघालयची सहल अधिकच रंगतदार होते. सोहरा म्हणजे चेरापुंजी जिल्ह्यतच डेन्थेन फॉल, खोह रामहा, मावस्वामी (सेव्हन सिस्टर फॉल) फॉल, कॅन्रेम फॉल हे धबधबे आहेत. शिवाय स्प्रेड ईगल फॉल, स्वीट फॉल, थम फॉल, पेल्गा फॉल, क्रांग सुरी फॉल आहेतच. त्यामुळे मेघालय म्हणजे धबधब्यांचा प्रदेश झाला आहे. शिवाय इथले अफलातून लिविंग रूट ब्रिज, स्टॅलेग्माइटची निसर्गशिल्पे मिरवणाऱ्या गुंफा, मनोवेधक रंगांनी नजर खिळवून ठेवणारी ऑíकडची फुले आणि अनोखे पक्षी, इथली मुलखावेगळी खाद्य परंपरा या सगळ्याबाबत लिहायचं तर जागा अपुरी पडणारच, त्यामुळे त्याविषयी पुन्हा कधीतरी. पण आपल्याच देशाचा हिस्सा असलेला हा नवलाईचा प्रदेश अवश्य पाहा. पर्यटनाच्या दृष्टीने पावसाळा संपल्यानंतर म्हणजे ऑक्टोबरपासून ते एप्रिलपर्यंत भेट द्यायला हरकत नाही. मेघालयाला जोडून आसाममधील गौहत्तीला भेट देणे सोपे जाते. इथला मनमोहक निसर्ग पहिल्यावर आणि स्थानिकांचा ऊबदार पाहुणचार घेतल्यावर आपोआप ‘खुबलेइ’ (म्हणजे खासी भाषेत आभारी आहोत) हा शब्द ओठांवर येईल.

मकरंद जोशी

makarandvj@gmail.com