जायचं, पण कुठं? :  अष्टमुडी

अष्टमुडी म्हणजे ऑक्टोपसप्रमाणे आठ बाजूंनी पसरलेला केरळमधील कोल्लम जिल्ह्यतील तलाव

Ashtamudi Lake
अष्टमुडी म्हणजे ऑक्टोपसप्रमाणे आठ बाजूंनी पसरलेला केरळमधील कोल्लम जिल्ह्यतील तलाव.

अष्टमुडी म्हणजे ऑक्टोपसप्रमाणे आठ बाजूंनी पसरलेला केरळमधील कोल्लम जिल्ह्यतील तलाव. अष्टमुडी तलाव खूप पसरलेला असून, हा परिसर अगदी निवांत आहे. तलावाच्या काठाकाठाने मनुष्यवस्ती आढळते. हॉटेल्सची अगदी गर्दी इथे नसली तरी चांगली हॉटेल्स व रिसॉर्टवर राहण्याचे अनेक पर्याय इथे आहेत. होउसबोट्सवर राहण्याचीसुद्धा चांगली सोय असते. तसेच काही होम-स्टे आहेत. अष्टमुडीला आराम करण्यासाठी जावे; इथे जाऊन मोठे संगीत लावून पार्टी करण्यात मजा नाही. हे ठिकाण त्यांनाच आवडू शकते ज्यांना निसर्गात रमायला जमते आणि आवडते. सकाळ-संध्याकाळ लांबवर फिरायला जाणे, बोटिंग, पुस्तकवाचन इत्यादी गोष्टीत रमण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. अष्टमुडीला बोटराइड घेऊन अरबी समुद्र ज्या ठिकाणी तलावाला मिळतो ती जागा जरूर बघावी. पाण्यात उडय़ा मारणारे डॉल्फिन मासे बघायला मिळतात. गोडय़ा पाण्यातले मासे खाण्यासाठी पोहत पोहत खास इथवर ते येतात. जागोजागी पाण्यात मासेमारीसाठी जाळे टाकून ठेवलेले सर्वत्र आढळते. जवळच्या काही छोटय़ा बेटांवर भेट देऊन ताजी शहाळी आणि स्थानिक जेवणाचा आस्वाद घेता येतो. हाउसबोटवरचे जेवण चांगले असते. सात-आठजण एकत्र मिळून संपूर्ण बोट एखादा दिवस बुक करून घेता येते. रात्री डेकवर बसून दिसणारा चंद्र; त्या प्रकाशात पाण्यात डुलणारी बोट, पाण्याचा संथ प्रवाह आणि किनाऱ्यावरची नारळाची झाडे सगळेच एकदा अनुभवण्यासारखे आहे. सकाळची सुरुवात तर गरमागरम इडलीने होते. जवळच दुसरे पूवर नावाचे बेट आहे. ते बऱ्यापकी प्रसिद्ध असून तेथे पर्यटनही विकसित झाले आहे. या ठिकाणी बरेच परदेशी पर्यटक आयुर्वेदिक, स्पा आणि तत्सम गोष्टीसाठी, आराम करण्यासाठी येतात. निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी केरळची सहल महत्त्वाची आहे.

कसे जाल?

अष्टमुडीला जाण्यासाठी जवळचा विमानतळ त्रिवेन्द्रम आणि कोची.

जवळचे रेल्वे स्थानक : कोल्लम.

केरळमधील बऱ्याच शहरातून तसेच बेंगळूरु, चेन्नई, मदुराई, कोइमतूरहून कोल्लमपर्यंत बससेवा उपलब्ध आहे.

सोनाली चितळे sonalischitale@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ashtamudi lake in kerala

ताज्या बातम्या