ऐन पावसाळ्यात मुद्दाम गेलंच पाहिजे, असं ठिकाण म्हणजे पुणे महाड रस्त्यावर असलेला वरंध घाट. वर्षांतल्या कोणत्याही दिवशी गेलं तरी कायम हिरवेगार दिसणारे हे ठिकाण. दुर्गाडी, कावळ्या किल्ला आणि शिवथरघळ अशा एकेका दिग्गज स्थानांचे सान्निध्य लाभलेले हे ठिकाण. मस्त हवा, दरीमध्ये ढगांची झालेली दाटी, मधूनच सणकून येणारी पावसाची मोठी सर, हे सगळं अनुभवायला इथे यायलाच हवं. ढग बाजूला झाल्यावर खोल खोल दिसणारी दरी आणि समोरच्या डोंगरावरून कोसळणारे अफाट धबधबे बघायला यांसारखे दुसरे ठिकाण नाही. या घाटाच्या मध्यावरच वसली आहे वाघजाई. द्वारमंडपानंतर घाटाच्या मध्यावर काहीशा सपाट ठिकाणी वाघजाईचे छोटेखानी मंदिर आहे. आत देवीची विविध आयुधे घेतलेली फुटभर उंचीची मूर्ती आहे. मंदिराच्याच वरच्या डोंगरामध्ये पाण्याची नऊ टाकी खोदलेली आहेत. त्यासाठी मंदिराच्या अलीकडून डोंगरावर एक पायवाट जाते. त्याने वरती जातात येते. वरंधा घाट कावळ्या किल्ल्याच्या पोटातूनच खोदून काढलेला आहे. धो धो पडणारा पाऊस आणि त्यामुळे सारा आसमंत हिरवागार झालेला असतो. या घाटात मिळणारी गरमागरम भजी, वडे आणि चहा घेताना समोर कोसळणारे असंख्य प्रपात आपली भेट सत्कारणी झाल्याचे जाणवून देतात. पुण्याहून इथे येताना भोरच्या अलीकडे डाव्या हाताला दिसणारे नीरा नदीचे देखणे रूप मुद्दाम थांबून पाहिले पाहिजे. नेकलेस पॉइंट असे त्याचे नामकरण झालेले आहे. हिरव्यागार शेतातून झोकदार वळण घेत जाणारी नीरा नदी इथून फारच अप्रतिम दिसते.

धोदावणे

सह्याद्रीत अगदी अनगड ठिकाणी खरोखरच निसर्गाचा अनमोल खजिना दडवून ठेवलेला असतो. शब्दश: सह्याद्रीच्या कुशीत म्हणावे, अशा ठिकाणी पर्यटक सोडा पण ट्रेकर्ससुद्धा फारसे जात नाहीत. लोकवस्तीपासून काहीशी फटकून ही ठिकाणे वसलेली असतात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरजवळ असेच एक नितांत रमणीय ठिकाण वसलेले आहे. कसबा संगमेश्वर इथून आपण शृंगारपूरकडे जायला लागलो की वाटेत एक रस्ता नायरी-तिवरे इथे जातो. या छोटय़ाशा वस्तीवरून एक रस्ता सरळ आत जंगलात जातो. गाडीरस्ता संपला की पुढे फक्त जंगलातून चालत जायचे. प्रचितगड आणि टिकलेश्वराच्या डोंगररांगांच्या मधून हा रस्ता पुढे पुढे जात असतो. वाटेत अगदी एखाद दुसरे घर लागते. आपल्याला सोबत छोटय़ा नदीची असते आणि हा रस्ता जिथे जाऊन संपतो तिथे ५० फूट उंचावरून पडणारा धोदावणे धबधबा आपली वाट पाहत असतो. काही अंतर आधीपासूनच त्याचा आवाज ऐकू येत असतोच. नायरी तिवरे इथला हा धोदावणे धबधबा बारमाही आहे. शक्यतो सरत्या पावसात इथे जावे. ऐन पावसाळ्यात जर गेले तर धबधब्यापर्यंत जाताच येत नाही. नदीचे पात्र एवढे विस्तारलेले असते की पुढे रस्ताच बंद होतो. पण सरत्या पावसात गेले तर मात्र मोठा धबधबा बघता येतो. एक मोठे कुंड या धबधब्यासमोर तयार झालेले आहे. गर्द झाडी, अतिशय शांतता, आणि समोर प्रचितगडाचा अजस्र डोंगर. सगळे वातावरण अत्यंत रमणीय झालेले असते. प्राचीन काळी देशावर जाण्यासाठी तिवरे घाट वापरात होता. आता मात्र ही वाट मोडलेली आहे.

मांगी-तुंगी

जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेले बागलाणातील मांगी-तुंगी हे ठिकाण मुद्दाम पावसाळ्यात बघावे असे आहे. नाशिक जिल्ह्यातील सेलबारी रांगांमधील उंच डोंगरावर वसलेली ही सुंदर जैन लेणी. सटाणा तालुक्याच्या पश्चिम सीमेवर लागून असलेला हा परिसर आहे. नाशिक-सटाणा-ताहराबाद माग्रे इथे जाता येते. समुद्रसपाटीपासून १३२६ मीटरवर असलेली ही दोन्ही शिखरे एका अरुंद नैसर्गिक धारेने जोडलेली आहेत. दोन्ही शिखरे आपल्या वैशिष्टय़पूर्ण आकारामुळे अगदी लांबूनसुद्धा ओळखता येतात. पायथ्यापासून इथे जाण्यासाठी अंदाजे तीन हजार पायऱ्या चढून जावे लागते. कमी उंचीच्या आणि टप्प्याटप्प्यावर विश्रांतीची सोय असलेल्या या पायऱ्या चढणे तुलनेने खूपच सोपे आहे. ज्या भक्तांना हे चालणे जमत नाही त्यांच्यासाठी इथे काही पैसे भरून डोलीची व्यवस्था केली जाते. ऐन पावसाळ्यात या पायऱ्या चढायचे श्रम जाणवत नाहीत. परंतु, माथ्यावर गेल्यावर दिसणारा आसमंत आपल्याला थक्क करून टाकतो. याचाच शेजारी असलेला तांबोळ्या आणि रतनगड, तर समोरच्या रांगेतील साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा-हरगड या बळिवंत दुर्गाचे माथे ढगात लपलेले असतात. या किल्ल्यांवरून धो धो कोसळणारे धबधबे आणि खाली मोसम नदीच्या खोऱ्यात सर्वत्र पसरलेला हिरवा गालिचा इतक्या उंचावरून न्याहाळणे यांसारखे सुख नाही. या मांगी-तुंगीच्या जुळ्या डोंगरामध्ये जैन लेणी खोदलेली आहेत. यात जैन र्तीथकर तसेच विविध जैन मुनी यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. बिहारमधील पवित्र अशा सम्मेदशिखरावरून मांगी-तुंगी या स्थानाला दक्षिणेचे सम्मेदशिखर असे नाव जैन मंडळींनी दिलेले आहे. बागलाणातील एक तीर्थक्षेत्र आणि त्याच्याच बरोबर इतके नितांतसुंदर प्रेक्षणीय ठिकाण मुद्दाम पावसात बघायला हवे.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com