जायचं, पण कुठं? : शिवमोगा

कर्नाटकातील तुंगा नदीतीरी वसलेले शिवमोगा पश्चिम घाटाचे प्रवेशद्वारच समजले जाते.

कर्नाटकातील तुंगा नदीतीरी वसलेले शिवमोगा पश्चिम घाटाचे प्रवेशद्वारच समजले जाते.

कर्नाटकातील तुंगा नदीतीरी वसलेले शिवमोगा पश्चिम घाटाचे प्रवेशद्वारच समजले जाते. प्रचंड पाऊस आणि हिरव्यागार वनश्रीने समृद्ध अशा या प्रदेशाने जागतिक वारसा यादीत स्थान पटकावलेले आहे. बंगळुरूपासून गाडीने सहा तासांच्या अंतरावर शिवमोगा असून इथली प्रचलित भाषा कन्नड आहे. प्रेक्षणीय स्थळात इथे शरावती नदीच्या खोऱ्यातील वन्यजीव अभयारण्य व जवळचा जोग फॉल्स खास आहेत. शरावतीचे विस्तीर्ण खोरे, गर्द हिरवी झाडी आणि जंगलातले पशू-पक्षी सर्वच अवर्णनीय. वाघ, सांबर, हरिण, चित्ता, अस्वल, कोल्हे, साप- सुसरी, जंगली खारूताई, हॉर्नबिल तसेच दुर्मीळ जातींची फुलपाखरे या जंगलात आढळून येतात. शरावतीचा ट्रेक साहसवीरांना नेहमीच खुणावत असतो. कवलेदुर्ग किल्ल्याचा ट्रेक असाच एक सुंदर अनुभव देणारा ठरतो. जोग फॉल्सच्या वरच्या बाजूस असणारे धरण पूर्ण भरल्यानंतर जेव्हा त्याची सर्व दारे उघडली जातात, तेव्हा जोगचे चारही धबधबे एकत्र होऊन एक महाकाय प्रपात कोसळू लागतो. ते दृश्य फारच मनोहारी असते. दुपारी चार वाजेपर्यंत खाली पायऱ्यांवरून जाण्यास परवानगी असते. पावसाळ्यात आसमंत धुक्याने भरून जातो. जवळच्या जंगलातील एलिफंट कॅम्पमध्ये सकाळीच नाश्तापाणी करून आठ वाजेपर्यंत गेल्यास तेथील आजूबाजूच्या जंगलातून येणाऱ्या हत्तींच्या कळपाशी चक्क क्रिकेट, फुटबॉल, इ. खेळ खेळता येतात. त्यांना अंघोळ घालता येते. त्यांना खायला देता येते. तशी तिथे तिकीट काढून खास सोय केली आहे. हे हत्ती माणसाशी एकदम गट्टी करून असतात. हत्तीच्या पिल्लाला अंघोळ घालायला तर खूपच मजा येते. एकूणच जर व्यवस्थित आखणी करून शिवमोगा बघायला गेले तर जोगचा धबधबा, शरावतीचे खोरे-अभयारण्य, हाती-स्नान, कवलेदुर्ग आदी गोष्टी अनुभवता येतात.

कसे जाल?

बंगळूरुहून सहा तासांत शिवमोग्याला जाता येते. उडुपी, मंगलोर, बंगलोरहून नियमित बससेवा उपलब्ध आहे. जवळचा विमानतळ मंगलोर आहे. शिवमोगानगर रेल्वे स्थानकाहून पुणे, मुंबई, बंगळुरु, हंपी आदी ठिकाणी रेल्वे सेवा उपलब्ध आहे.

सोनाली चितळे – sonalischitale@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Best places to visit in shimoga

ताज्या बातम्या