लोक पर्यटन : दुर्गाडी-नीरबावी

दुर्गाडीवरून खाली उतरले की मुख्य रस्त्याला येऊन डावीकडे वळायचे. लगेच एक किमीवर शिरगाव लागते.

Durgadi Fort
दुर्गाडी

ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात. तसेही ऋषिमुनी आता शोधूनही सापडत नाहीत, पण नदीचे मूळ शोधण्यातली मजा काही वेगळीच असते. पावसाळा संपला. सह्य़ाद्रीचा स्नानसोहळासुद्धा आटोपला, थंडीचे आगमन होऊ लागले. भटक्यांना वेध लागतात ते नवनवीन ठिकाणी जाण्याचे. अशाच एका थंडीच्या पहाटे भोर वरंध परिसरात भटकंती करायचे ठरवले. पाऊस महामूर झाल्यामुळे नीरा नदीचे पात्र तुडुंब भरलेले होते. भोरच्या अलीकडे नीरेच्या प्रवाहाला मिळालेले देखणे वळण, जे चित्रपटात आल्यामुळे नेकलेस पॉइंट म्हणून प्रसिद्ध झाले, ते फारच सुंदर दिसत होते. तिथून पुढे नीरा देवघर धरणाच्या काठाकाठाने प्रवास सुरू होतो.

हिरडस मावळाचा हा सगळा प्रदेश. कितीही वेळा आणि कोणत्याही ऋतूत इथे आले तरी अतिशय रम्य असा हा सगळा प्रदेश. ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेला आणि निसर्गत तेवढय़ाच समृद्ध अशा या हिरडस मावळात कधीही आणि कुठेही हिंडायला नेहमीच आनंद मिळतो. सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांनी सर्व बाजूंनी वेढलेला असा हा सगळा प्रदेश. या सगळ्याच्या मधून वळणे घेत नीरा नदी वाहात असते. तिचे सान्निध्य आणि आजूबाजूचे डोंगर आपला सगळा प्रवास रमणीय करतात. दरवेळी वरंध घाटात जाताना डावीकडे एक डोंगर नेहमी खुणावत असतो. दुर्गाडी त्याचे नाव. त्यावर असलेले एक मंदिर आणि त्यावरचा झेंडा रस्त्यावरूनही स्पष्ट दिसत असतो. अलीकडे काही संशोधकांनी मोहनगड अशीही केली आहे. बरीच वर्षे जायचे जायचे म्हणून जाणे काही होत नव्हते. या वेळी मात्र खास दुर्गाडीलाच जायचे म्हणून बाहेर पडलेलो. पुण्याहून भोरमाग्रे हिडरेशी हे अंतर अंदाजे ७५ कि.मी. इतके भरते. हिडरेशीच्या पुढे १४ कि.मी. गेले की शिरगाव येते. गाव काहीसे पुढे आहे, पण डावीकडून एक रस्ता येऊन इथे मुख्य रस्त्याला मिळतो. हाच तो दुर्गाडी फाटा. इथून डावीकडे वळल्यावर जेमतेम दीड कि.मी.वर डाव्या हाताला एक सुंदर छोटेखानी मंदिर दिसते. परिसर अत्यंत रम्य. एका बाजूने नीरा वाहते. मंदिराला समोर मंडप घातला आहे. आवारात काही वीरगळ, काही थडी पडलेली. जननीचे देऊळ असे ग्रामस्थ सांगतात. मंदिरात एक देवीची मूर्ती आणि बाजूला अशाच काही इतर मूर्ती. या मंदिरापाशी गाडी लावायला भरपूर जागा. मंदिराच्या समोरच रस्ता ओलांडला की एक पायवाट डोंगरावर चढते.

ही वाट दाट रानातून उंचउंच चढत जाते. काहीसे मोकळवन लागल्यावर परत वाट रानात शिरते. तिथून आपण एका सोंडेवर येतो. या सोंडेवरून सरळ डोंगराच्या दिशेने चालायला लागल्यावर अजून एका सोंडेवर वाट चढते. इथे मात्र बेफाट वारा आपला थकवा पार घालवतो. वाटेत कारवी फुललेली, तसेच सोनकीसारख्या फुलांचे गालिचे सर्वत्र पांघरलेले दिसत होते. दरीच्या उजवीकडे पिंपळवाडीच्या मंगळगडाचे सुंदर दर्शन होते. ही वाट अशीच सरळ जाऊन एका कडय़ाच्या पायथ्याशी येते. इथे छोटेसे बहिरीचे ठाणे आहे. तिथून एकदम अंगावरची चढण चढून गेल्यावर आपण माथ्यावर पोचतो. समोरच देवीचे सुंदर मंदिर आणि त्याच्या समोरची पडवी आपले स्वागत करते. मंदिरात सिंहावर बसलेल्या अष्टभुजा देवीची देखणी मूर्ती. भन्नाट वारा सुटलेला, आणि इथून दिसणारा आसमंत केवळ अप्रतिम. तोरणा, राजगड, मंगळगड, तिकडे लांब मकरंदगड, कावळ्या किल्ला आणि कोकणाचा नजरा आपली नजर खिळवून ठेवतो. मंदिरापासून एक पायवाट माथ्यावर जाते. पण माथ्यावर काहीच अवशेष नाहीत. मंदिराच्या खालच्या अंगाला खांब असलेले पाण्याचे मोठे टाके आहे. सह्य़ाद्रीचा कणा आणि तिथून खाली कोकणात उतरणाऱ्या घाटवाटांचे नयनरम्य दर्शन इथून होते. तासभर केलेल्या चढाईचे श्रम केव्हाच निघून जातात. इथे येताना वाटेत काही दगडी पायऱ्या लागतात. या शिखरावर यायला दुर्गाडी गावातल्या जननीच्या मंदिरापासूनसुद्धा एक वाट आहे. ही वाट आडवी आडवी येत थेट बहिरीपाशी येते.

दुर्गाडीचे नयनरम्य दर्शन झाल्यावर वेध लागले ती नीरा नदीचे मूळ बघायचे. दुर्गाडीवरून खाली उतरले की मुख्य रस्त्याला येऊन डावीकडे वळायचे. लगेच एक किमीवर शिरगाव लागते. गावात आत गेल्या गेल्या एक मोठे घर दिसते. या घराच्या मागे असलेल्या शेतातून एक पायवाट जंगलात जाते. त्या वाटेने चालू लागल्यावर ती वाट पुन्हा एका टेकडावर चढते. वरंध मार्गावरच्या वाहनांचे आवाज अगदी जवळ ऐकू येऊ लागतात. एक ओढा आपल्याला आडवा जातो. मग वाट एका खोलगट भागात उतरते आणि समोर दिसते दगडामध्ये बांधलेले सुंदर कुंड. कुंडाला आत उतरण्यासाठी आठ पायऱ्या केलेल्या आहेत. आत निवळशंख पाणी नजरेस पडते. हीच ती नीरबावी ! नीरा नदी या कुंडातूनच उगम पावते. कुंडाला एका अंगाला गोमुख केलेले असून त्यातून पाण्याचा प्रवाह अव्याहत वाहात असतो. आजूबाजूला गर्द झाडी आणि नीरव शांतता. इथे मंदिर मात्र नाही याचे आश्चर्य वाटते. पण हा परिसर अत्यंत रमणीय. इथून पाय काही निघत नाही. परतीच्या प्रवासात दुर्गाडीवरून दिसणारा नजारा डोळ्यासमोरून हलत नाही.

आशुतोष बापट  ashutosh.treks@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Durgadi fort nira river

ताज्या बातम्या