scorecardresearch

चिंब भटकंती : मुकुंदराज समाधी

धार्मिक पर्यटनासोबत ही निसर्गाची उधळण पाहायला अंबेजोगाईला जायलाच हवे.

मराठवाडय़ात ऐन पावसाळ्यात मुद्दाम जावे अशी काही ठिकाणे आहेत. त्यात अंबेजोगाई इथे असलेली मुकुंदराज समाधी हे ठिकाण होय. बीड जिल्ह्यतील अंबेजोगाई इथली योगेश्वरी देवी ही चित्पावनांची कुलदेवता. देवी मंदिराखेरीज कोरीव लेणी, दासोपंतांची समाधी, तसेच गावात असलेले अनेक प्राचीन शिलालेख या गोष्टी आवर्जून पाहाव्यात अशा. कवी मुकुंदराजांची समाधी इथूनच दोन किलोमीटरवर आहे. बाराव्या शतकात होऊन गेलेल्या या नाथसंप्रदायी कवीने ‘विवेकसिंधू’ हा ओव्यांचा संग्रह लिहिला. मराठीमधील हे आद्यकवी समजले जातात. त्यांचा जन्म विदर्भात पौनी इथे झाल्याचे सांगितले जाते. त्यांची समाधी अंबेजोगाई इथे आहे. बालाघाट डोंगररांगेच्या उतारावर असलेले हे ठिकाण डोंगराच्या ऐन पोटात एका गुहेमध्ये असल्यामुळे काही पायऱ्या उतरून जावे लागते. अतिशय शांत, रम्य असा हा परिसर आहे. या समाधीच्या शेजारीच जयंती नदीवरील धबधबा पावसाळ्यात अविरत कोसळत असतो. या ठिकाणचं दुसरं वैशिष्टय़ म्हणजे परिसरात मोर मोठय़ा संख्येने पाहायला मिळतात. रिमझिम बरसणारा पाऊस, कोसळणारा धबधबा आणि मोरांचे नृत्य! यापेक्षा अजून सुंदर दुसरं काय असू शकेल. मराठवाडय़ात इतर वेळी असणारा रूक्षपणा ऐन पावसाळ्यात कुठच्या कुठे निघून गेलेला असतो. धार्मिक पर्यटनासोबत ही निसर्गाची उधळण पाहायला अंबेजोगाईला जायलाच हवे.

टिकलेश्वर

धुवांधार पावसात कोकणात फारशी भटकंती केली जात नाही. परंतु जरा सरत्या पावसात किंवा ऐन श्रावण महिन्यात जर कोकणात गेलं तर किती बघू आणि किती नको असं होतं. अनेक ठिकाणे ही त्याच्या जवळ असलेल्या दुसऱ्या प्रसिद्ध पावलेल्या ठिकाणामुळे काहीशी झाकोळली जातात. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख या सुंदर गावाजवळ डोंगरावर असलेले टिकलेश्वर हे ठिकाण अगदी असेच आहे. डोंगरमाथ्यावर असलेल्या या ठिकाणापासून रौद्र सह्य़ाद्री अफलातून दिसतो. माल्रेश्वर या देखण्या धबधब्यामुळे टिकलेश्वर हे ठिकाण काहीसे अपरिचित राहिले आहे. देवरुखवरून माल्रेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावरच टिकलेश्वरला जाणारा एक फाटा फुटतो. लांबूनच डोंगरमाथ्यावर पांढरा रंग दिलेले देऊळ आपले लक्ष वेधून घेते.

टिकलेश्वरला पूर्वी पायथ्याच्या तळावडे गावातून चालत जावे लागे. परंतु आता मात्र तिथपर्यंत गाडीरस्ता झाला आहे. टिकलेश्वरच्या मंदिराची जागा चांगली प्रशस्त आहे. आत दोन समाध्या आहेत. शिखराच्या थोडेसे खालच्या टप्प्यावरून संपूर्ण शिखराला प्रदक्षिणा घालता येते. मंदिरापासून दिसणारा नजारा केवळ अवर्णनीय आहे.

पूर्वेला ममतगड हा देखणा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. संपूर्ण हिरवागार झालेला घाटमाथा, त्यावर दिसणारी गोठणे गावापासून माल्रेश्वरला येणारी वाट आणि पायथ्याच्या कुंडी गावातून घाटावरील चांदेल गावी जाणारा कुंडी घाट असे हे इतिहासकालीन घाट रस्ते इथून फारच सुंदर दिसतात. तसेच बारमाही वाहणारा धोधावणे हा धबधबासुद्धा टिकलेश्वर आणि प्रचीतगड यांच्या सान्निध्यात वसलेला आहे.

निसर्गरम्य पाटेश्वर

सातारा शहराच्या जवळच एका डोंगरावर असलेलं हे भन्नाट आणि वैशिष्टय़पूर्ण असं ठिकाण म्हणजे पाटेश्वर. सरत्या पावसाळ्यात अगदी वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर पाटेश्वरला पर्याय नाही. सातारा-रहिमतपूर रस्त्यावर देगाव इथे पाटेश्वरचा फाटा आहे. गाडीरस्ता पुढे जाऊन एका डोंगरावर चढतो आणि काही अंतर गेल्यावर हा रस्ता संपतो. तिथून पुढे सुरुवातीला काही पायऱ्या लागतात आणि तिथेच दगडात कोरलेले गणपतीबाप्पा दर्शन देतात. तिथून पुढे आपण डोंगर सपाटीवर येतो. तिथून अंदाजे ४५ मिनिटे चालत जायचे. दोन्ही बाजूंनी सभोवतालचा परिसर अप्रतिम दिसतो. शिवाय अधूनमधून दरीतून येणारा भन्नाट वारा झेलत हे चालणे फारच आनंदाचे जाते. रानवाटेने पुढे गेल्यावर उजवीकडे एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या पाठीमागे जाऊन काही पायऱ्या चढून वर गेले की पुढे झाडीमध्ये लपलेले श्रीपाटेश्वराचे सुंदर मंदिर सामोरे येते. समोर दगडी नंदी आणि बाजूला असलेले वऱ्हाडघर मुद्दाम पाहण्याजोगे. इथेच काही दगडामध्ये कोरलेली लेणी आहेत आणि त्या लेण्यांमध्ये सर्वत्र कोरलेली असंख्य शिविलगे अचंब्यात टाकतात. एका लेणीच्या तीनही भिंतींवर शिविलगाच्या माळा कोरलेल्या आहेत. शेजारच्याच लेणीमध्ये सहस्रिलगी शिविपड, धारािलग, चतुर्मुख लिंग, काही शिविलग नंदीच्या पाठीवर, काही पायाशी असा सगळा अप्रतिम परिसर. एका लेणीमध्ये शिविलगाच्या शेजारच्या खांबांवर नागाची शिल्पे आहेत.

ashutosh.treks@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती ( Lokbhramanti ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Exciting places to visit in maharashtra during monsoon

ताज्या बातम्या