जायचं, पण कुठं? : राजस्थानचे बुंदी

पूर्व राजस्थानमध्ये हदोती जिल्ह्य़ातील बुंदी नावाचे छोटे शहर आपले खास वेगळेपण आजही जपून आहे.

bundi city
पूर्व राजस्थानमध्ये हदोती जिल्ह्य़ातील बुंदी नावाचे छोटे शहर आपले खास वेगळेपण आजही जपून आहे.

पूर्व राजस्थानमध्ये हदोती जिल्ह्य़ातील बुंदी नावाचे छोटे शहर आपले खास वेगळेपण आजही जपून आहे. इतिहासात राजस्थान स्थानिक महल, किल्ले, लोककला, लोकसंगीत आदींसाठी ओळखले जाते. गर्दी टाळून शांतपणे पर्यटन करण्यासाठी एखाद्या माहितगारासोबत इथे धबधबे, तलाव, गुहेतील भित्तिचित्रे पाहण्यासाठी एक दिवसाची सफर करावी. तारागढ किल्ल्यावर खास राजस्थानी पद्धतीची अनेक पायऱ्यांची खोल विहीर, तसेच तेथील गढ महलमधील काही फ्रेस्को भित्तिचित्रे प्रेक्षणीय आहेत. बरीच पेंटिंग चांगल्या स्थितीत नाहीत, पण जी थोडी झलक बघण्यास मिळते त्यावरून त्या काळची रंगकला समजू शकते. सकाळी लवकर निघून या दोन्ही गोष्टी बघता येतात. तारागढ येथील चित्रशाळा बघण्यासारखी आहे. निळ्या रंगाचा मुक्त वापर असलेली रजपूत चित्रशैलीतील भित्तिचित्रे आजही तितकीच आकर्षक वाटतात. तीनशे वर्षे जुनी, अंदाजे तीन मजले खोल असलेली राणीजी की बावडी, त्यावरील कोरीव काम आणि वेगळ्या धाटणीसाठी प्रसिद्ध आहे. बुंदी शहर पायऱ्यांच्या विहिरींसाठी सुपरिचित आहे. जागतिक वारसा यादीत नाव असलेले अतिउष्ण राजस्थानातील बुंदी शहर अक्षरश: जागोजागी अशा बिनचूक रेखीव प्रमाणबद्ध विहिरी बाळगून आहे. धबाई कुंड अशीच एक मोठी विहीर, पण दु:खाची बाब म्हणजे आज त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. फिरण्यासाठी नवल सागर, जैत सागर तलाव तसेच ८४ खांबांची छत्री, सुख महल आहेत.

कार्तिक महिन्यात साधारणपणे नोव्हेंबरमध्ये येणारा बुंदी महोत्सव म्हणजे रंगांची उधळण; चंबळ नदीत पीठाचे बनवलेले दीप अर्पण करतात, पारंपरिक पोशाख करून लोकसंगीत, लोकनृत्य, राजस्थानी खानपान, अनेक विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. बुंदीचा उत्सव हळूहळू जास्त लोकप्रिय होत आहे. पायऱ्यांच्या विहिरी जगातील आश्चर्य ठरलेला स्थापत्यकलेचा नमुना आज काळजीपूर्वक जतन करण्याची आपणा सर्वाची सामाजिक जबाबदारी आहे.

कसे जाल?

जवळील विमानतळ जयपूर

राजस्थानातील अनेक शहरांतून बस सेवा उपलब्ध

रेल्वे सेवा :  दिल्ली, सवाई माधोपूर, उदयपूर, चित्तोडगढ, कोटा

sonalischitale@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Incredible places to visit in bundi rajasthan

ताज्या बातम्या