सहजसोपी युरोपवारी

आजकाल इंटरनेटमुळे परदेशातली हॉटेल्सही आपण घरबसल्या बुक करू शकतो.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आजकाल इंटरनेटमुळे परदेशातली हॉटेल्सही आपण घरबसल्या बुक करू शकतो. हॉटेल्सच नव्हे, तर फ्लाइट, ट्रेन इतकंच काय तर संग्रहालयांची तिकिटेसुद्धा इथूनच बुक करता येतात. पण तरी बऱ्याचदा तिथला स्थानिक प्रवास आपण कसा काय करू शकू, हा विचार परदेशातली सहल आपली आपण करण्याआड येतो. ते जर जमलं, तर स्वतच सगळं नियोजन करून कुटुंबासोबत मनसोक्तपणे आपण परदेशात फिरू शकतो. विशेष करून युरोपमध्ये तर अगदी निर्धास्तपणे.

पूर्वी कामासाठी जर्मनीला जायला लागायचं. त्यामुळे तिथल्या लांबपल्ल्याच्या ट्रेन्स आणि शहरातल्या मेट्रो, ट्राम, बस वगरे प्रकारांची चांगली सवय झाली होती. आणि युरोपात एखाद्या शहरातली व्यवस्था कशी आहे हे एकदा समजलं की आपण बहुतेक इतर कुठल्याही अनोळखी शहरातही अगदी सराईतासारखे फिरू शकतो. कारण सगळीकडच्या पद्धती अगदी तर्कशुद्धतेने बनवलेल्या असतात. आणि त्यामुळेच त्या जवळपास एकसारख्याच असतात.

सर्वात मुख्य म्हणजे प्रवाशांची सोय हा विचार सगळ्यांमागे असतो. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला जेव्हा आता डावीकडे जाऊ का उजवीकडे असा प्रश्न जेव्हा मनात येतो, नेमकं त्याच वेळी ती माहिती देणारा फलक आपल्याला साहजिकपणे दिसेल असा लावलेला आढळतो. (आणि त्या फलकावर मुंबईतल्या लोकलसारख्या ‘बाबा बंगाली’ वगरे जाहिराती चिकटवलेल्या नसल्यामुळे आपण तो वाचूही शकतो). जिथे लेखी माहितीऐवजी खुणा वापरलेल्या असतात, त्याही अगदी सामान्य माणसालाही अगदी सहजपणे समजतील अशा.

बहुतेक मोठय़ा शहरांमध्ये मेट्रो, ट्राम आणि बस यांचं प्रचंड जाळं विणलेलं असतं. त्यांचे प्रत्येकाचे अनेक मार्ग. ते मार्ग एकमेकांना ठिकठिकाणी छेदतात. अशा ठिकाणी आपण दुसऱ्या मार्गाची मेट्रो पकडू शकतो किंवा मग तिथे ट्राम किंवा बससेवाही घेऊ शकतो. शहरातल्या या सगळ्या प्रवाससाधनांचे नकाशे बनवायची पद्धतही सगळीकडे सारखीच. बहुतेक ठिकाणी शहरातल्या मुख्य ट्रेन स्थानकांवर ते फुकट मिळतात. आपल्याला कुठल्या थांब्याला पोचायचं आहे हे माहीत असेल तर वाटेवर मेट्रो, ट्राम, बस अशी अदलाबदल करत जायची गरज असतानाही आपण त्या नकाशानुसार अगदी सहज प्रवास करू शकतो. प्रवासात जर कनेिक्टग ट्राम किंवा बस घ्यायला लागणार असेल, तर त्यांचे थांबा आणि वेळाही अगदी सोयीने ठरवलेल्या असतात. बहुतेक देशांमध्ये मेट्रो, ट्राम, बस सगळंच अगदी ठरल्या वेळेनुसार धावत असतात. पण क्वचित यातल्या एखाद्याला थोडासा उशीर झाला, तर पुढली कनेक्टग ट्राम किंवा बस येणाऱ्या प्रवाशांसाठी थांबवली जाते. स्वित्र्झलडमध्ये एका ठिकाणी आमची ‘गोल्डन पास’ मार्गावरची ट्रेन बंद पडली. पण काही मिनिटांतच त्यांनी एका बसची सोय केली आणि सगळ्या प्रवाशांना पुढली गाडी पकडता येईल अशा स्टेशनवर नेऊन सोडलं.

या वेगवेगळ्या प्रवाससाधनांनी जाण्यासाठी वेगवेगळी तिकिटे काढायचीही गरज नसते. अंतिम स्थानकासाठी काढलेल्या तिकिटावर आपण गरजेनुसार यातले सगळे वाहनप्रकार वापरू शकतो. बहुतेक शहरांमध्ये दिवसासाठी किंवा आठवडय़ासाठी वगरे पासेसही मिळतात. नुसत्या एकेरी किंवा दुहेरी तिकिटापेक्षा हे खूपच स्वस्त पडतात. त्यातून चार-पाच जणांचा चमू असेल तर विशेष सूट असते. त्यामुळे प्रत्येकी जो खर्च येतो तो साध्या तिकिटापेक्षा खूपच कमी येतो. गाडीत चढल्या चढल्या तिकीट व्हॅलिडेट करणं मात्र लक्षात ठेवायला हवं.

अर्थात पद्धती सगळीकडे सारख्या असल्या, तरी अधूनमधून काहीतरी वेगळंच पाहायला मिळत. तंत्रज्ञानाने येणारे बदलही बऱ्याच काळाने तिथे गेलो तर जाणवतात. गेल्या वर्षी कुटुंबाबरोबर गेलो त्यापूर्वी लंडनला कधी गेलो नव्हतो. आणि एकंदरीतच मधल्या काही वर्षांमध्ये युरोपात जाणं झालं नव्हतं. तर लंडनच्या किंग्स क्रॉस स्टेशनवर आम्ही टय़ुबची तिकीट काढायला स्वयंचलित मशीन शोधत होतो. पण रोख पसे देऊन तिकीट काढता येतील असं मशीनच मिळेना. तिथल्या कर्मचाऱ्याने आम्हाला तिथलं ‘ऑयस्टर कार्ड’ काढायला सांगितलं. पण दोन दिवसांसाठी कुठे कार्ड काढणार. म्हणून मी सगळीकडे मशीन शोधत हडलो. शेवटी एक आपलाच आंध्र प्रदेशचा तरुण मुलगा भेटला. त्याच्याकडून समजलं की आता तिथे तिकीट काढायला ते कार्ड काढावंच लागतं. गरजेप्रमाणे आपण ते टॉपअप करू शकतो. तिकीट काढलं की त्यातले पसे वजा होतात. आणि शेवटी कुठल्याही स्टेशनवर मशीनला ते कार्ड परत केलं की त्यातली शिल्लक परत मिळते. थोडक्यात मुंबईतल्या स्मार्टकार्डसारखंच, शिल्लक परत मिळण्याचा भाग सोडल्यास.

असे फरक वेगवेगळ्या देशांतल्या पद्धतींमध्येही पाहायला मिळतात. जर्मनीमध्ये सगळं अगदी शिस्तीत आणि वेळेनुसार होत असतं. त्यांच्या रक्तातच आहे ते. क्वचित लांब अंतराच्या गाडय़ांना उशीर होतो. पण एरवी सेकंदावर गाडय़ा धावतात. कामासाठी जायचो तेव्हा माझ्या हॉटेलवरून ऑफिसला मेट्रो आणि बस असा प्रवास असायचा. हॉटेलवरून मेट्रोचे स्टेशन अगदी जवळ होते. बऱ्याचदा मी ट्रेनच्या वेळेआधी बरोब्बर तीन मिनिटे असताना खोलीतून निघायचो. फलाटावर पोचलो की काही सेकंदात गाडी यायची. तिथली स्टेशने आणि गाडीसुद्धा नेहमी अगदी व्यवस्थित. सगळं जागच्याजागी. पण फ्रान्समध्ये मात्र प्रकार वेगळा. एकतर पॅरिसमधल्या मेट्रोचे काही भाग खूप जुने आहेत. त्यामुळे फलाटांना जोडणारे बोगदे गुंतागुंतीचे आहेत. सगळा प्रकारही थोडा ढिसाळच. कर्मचारीही तितकेसे सेवेला तत्पर नाहीत. तिथल्या एका लांबपल्ल्याच्या गाडीत तर बहुतेक सगळ्या वॉशरूम्स खराब झालेल्या आणि वापरता न येण्यासारख्या होत्या. पण एकंदरीत युरोपात असे अनुभव क्वचितच येतात.

अशा सगळ्या सोयीसुविधा तर्कशुद्धपणे बनवलेल्या असल्यामुळे एकदा त्यांची पद्धत लक्षात आली की निवांत आपल्या सोयीने भटकायचं. पास काढलेला असला तर मग काहीच चिंता नाही. आपल्या पासच्या मर्यादेमध्ये कुठूनही कुठेही कितीही वेळा हडा. सहलीमध्ये तीन-चार देशांमध्ये फिरायचं असलं तर यू-रेल चा पासही काढता येतो. तोही भारतातूनच. अंतर लांबचे असेल तर रात्रीच्या गाडीने प्रवास करायचा. तेवढेच एका रात्रीचे हॉटेलचे पसे वाचतात. आणि प्रवास अगदी अतिशय सुखाचा असतो. त्यामुळे झोपही व्यवस्थित होते.

जर्मनीसारख्या देशांमध्ये अशी सुंदर प्रवासव्यवस्था असल्यामुळे तिथे गाडी चालवायची कधी गरज पडली नव्हती. पण खरं सांगायचं तर धीर कधी झाला नव्हता. एक तर परदेशात गाडी चालवण्याचं दडपण वाटायचं. त्यातून जर्मनीमध्ये लेफ्ट हॅण्ड ड्राइव्ह. त्यामुळे तिथे कधी धाडस केलं नाही. पण गेल्या वर्षी युकेला गेलो. तिथे आपल्यासारखंच राइट हॅण्ड ड्राइव्ह. म्हणून मग जरा हिय्या केला आणि भाडय़ाने गाडी घेऊन चालवली. थोडा वेळ चालवल्यावर दडपण जरासं कमी झालं. पण तरी ते चार दिवस गाडी चालवताना ताणातच गेले. मुख्य भीती ही की आपण कुठला तरी नियम मोडून ठेवू. तशातच एकदा एका छोटय़ा रस्त्याने गाडी चालवत असताना अचानक समोरून एक पोलिसांची गाडी डोळे वटारल्यासारखे दिवे फिरवत आणि सायरन वाजवत रस्त्याच्या मधून आम्हाला अडवल्यासारखी यायला लागली. त्यातला पोलीस हात बाहेर काढून आम्हाला थांबायचा इशारा करत होता. माझं धाब दणाणलं. म्हटलं आपण काही तरी मोठी चूक करून बसलोय. पण ती गाडी जवळ आल्यावर पोलीस म्हणाला की विरुद्ध दिशेने एक अवजड बोजा घेतलेला ट्रक येतोय, तो जाईपर्यंत तुम्ही गाडी जरा बाजूला घ्या. त्यासाठी आम्हाला ते थांबवत होते. ते ऐकल आणि जीवात जीव आला. चौथ्या दिवशी जिथून गाडी घेतली होती तिथे ती परत सोडली आणि ‘गडय़ा आपली ट्रेन बरी’ असं म्हणत परतीच्या ट्रेनमध्ये बसलो.

प्रसाद निक्ते

prasad.nikte@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Information about europe tour

ताज्या बातम्या