वन पर्यटन : कर्नाळा पक्षी अभयारण्य

पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला.

कर्नाळा पक्षी अभयारण्याचा खूपसा भाग दक्षिण दमट मिश्र पानझडी वनांनी व्यापलेला आहे,
रायगड जिल्ह्यतील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या १२ किलोमीटरवर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. १२.१५५ चौरस किलोमीटरच्या या परिसरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे हे माहेरघर आहे. आपण येथे १४७ प्रजातींचे पक्षी पाहू शकतो. त्यात ३७ प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत. मध्य आशिया, युरोप, उझ्बेकिस्तान, सैबेरियातून पक्षी येथे येतात.

कर्नाळा हे मुंबईकरांसाठी खूप सोईचे ठिकाण. धकाधकीच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी मुंबईकरांच्या मनाला आनंद देऊन जातात, त्यात या कर्नाळा पक्षी अभयारण्याचा समावेश होतो. भल्या पहाटे निघाले तर एका दिवसाच्या भटकंतीमध्ये या अभयारण्य भ्रमंतीचा आनंद घेता येतो. मुंबईप्रमाणे हे अभयारण्य सतत पक्ष्यांच्या किलबिलाटानं जागं असल्याचं लक्षात येतं.

कर्नाळा पक्षी अभयारण्याचा खूपसा भाग दक्षिण दमट मिश्र पानझडी वनांनी व्यापलेला आहे, तर दऱ्याखोऱ्यातील नाल्यालगतच्या खोलगट भागात अल्प प्रमाणात सदाहरित नदीकाठची वने आहेत. यात विविध प्रकारच्या ६४२ वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मीळ वनस्पती अस्तित्वात आहेत.

पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर टेल) पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती अस्तित्वात आहेत.

कर्नाळा किल्ला समुद्रसपाटीपासून ४४५ मीटर उंचीवर आहे. दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या मधुस्वरांचा मागोवा घेत डोंगररांगांवरून चढताना तटबंदी लागते. त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगठय़ासारखा दिसणाऱ्या सुळक्याची भव्यता आपल्याला जाणवू लागते. सुळक्यांच्या पोटात असलेली पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात. नजरेच्या टप्प्यातील प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड न्याहाळीत आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचंच नाही तर पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे.

पावसाळ्यात अभयारण्यावर गर्द हिरवी मखमल पसरलेली दिसते. अनेक छोटे छोटे ओहळ इथे वाहत असतात. पावसाळ्यानंतरच्या काळातही अभयारण्य तितकंच मोहक दिसतं. अभयारण्यात प्रवेश करताच आपल्याला निसर्ग संवर्धन केंद्र दिसते. अभयारण्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कप, पिशव्या व इतर वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे. जंगल भटकंतीचे रंजक मार्ग आपल्याला इथे सांगितले जातात. जसे की हरियाल निसर्ग मार्ग हा जवळचा, सोपा मार्ग असला तरी पक्ष्यांच्या मोहमयी दुनियेचं विस्मयकारक दर्शन घडवून आणतो. लांबवर चालत जाऊन ज्यांना रानवाटांचा अधिक आनंद लुटायचा आहे, त्यांनी मोरटाक मार्गानं जावं. तो सरळ अभयारण्यातून ६ कि.मी लांबवर जातो. वेगवेगळ्या रंगांची भरपूर फुलपाखरं आपण इथं पाहू शकतो.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Karnala bird sanctuary in raigad district

ताज्या बातम्या