भारतातील अनेक गिरिस्थानांवर ब्रिटिशराजच्या खाणाखुणा  दिसून येतात. त्यातील एक म्हणजे उत्तराखंडमध्ये वसलेलं लॅन्सडाऊन.  तिथली ठिकाणं पाहण्याबरोबरच थकल्या-भागल्या शरीराला नवी ऊर्जा देण्यासाठी लॅन्सडाऊनला जायलाच हवं.

आपण सुट्टीवर कशाला जातो? तर रोजची धावपळ, घाईगर्दी, गडबड यांपासून सुटका हवी म्हणूनच ना? पण मग अनेकदा सुट्टीचा बेत आखताना जिकडे जायचं तिकडे साइट सीइंगला किती ठिकाणं आहेत याचाच विचार का करतो? किंबहुना जिथे साइट सीइंगला भरपूर ठिकाणं आहेत अशाच ठिकाणी जायचा बेत का आखतो? रोजच्या रुटीनमध्ये जी घाई, गडबड आणि कशात तरी गुंतून राहाणं आपल्या सवयीचं झालेलं असतं त्यापासून ब्रेक हवा म्हणून तर आपण सुट्टीचा बेत आखतो. मग सुट्टीवर गेल्यावर रोजच्या लोकलऐवजी फक्त  साइट सीइंगची बस किंवा टॅक्सी इतकाच फरक होणार असेल तर काय उपयोग? जिथे खरोखरच आपल्याला हवीहवीशी असणारी उसंत मिळू शकते, जिथे खरोखरच आपल्या थकलेल्या, भागलेल्या तना-मनाला विश्रांती मिळू शकते, जिथे खरोखरच भोवतालच्या निसर्गाने, वातावरणाने रिफ्रेश व्हायला होतं अशा ठिकाणांची आपल्या देशात कमी नाही. अशा रिचार्ज करणाऱ्या ठिकाणांमधील एक म्हणजे उत्तराखंडाच्या पहाडांमध्ये वसलेलं लॅन्सडाऊन. पाहा, नावापासूनच आपण कुठल्या तरी वेगळ्या अनोख्या गावाला जाणार याची खात्री पटते. या गिरीस्थानाला उर्जितावस्था आणण्याचे श्रेयही भारतातल्या इतर अनेक गिरिस्थानांप्रमाणेच गोऱ्या साहेबाला द्यावे लागते. आता थंड हवेची मायभूमी सोडून या उष्ण कटिबंधातल्या देशावर राज्य करायला आलेल्या गोऱ्यांना इथला उन्हाळा कसा मानवणार, मग त्यावर उपाय म्हणून डोंगर पहाडातील शांत निवांत ठिकाणांची त्यांनी शोधाशोध सुरू केली आणि उत्तरेतल्या शिमल्यापासून ते दक्षिणेतल्या उटीपर्यंत भारताच्या नकाशावर हिल स्टेशन्सची नाममुद्रा उमटली. तर हे लॅन्सडाऊन याच मालिकेतलं अगदी नावापासूनच ब्रिटिशराजच्या खाणाखुणा मिरवणारं. उत्तराखंड राज्यातील पौडी गढवाल जिल्ह्य़ातील या ठिकाणाचे मूळचे नाव होते ‘कालू डाण्डा’. गढवाली भाषेत त्याचा अर्थ आहे ‘काळा पहाड’. नावात जरी काळा रंग असला तरी हे ठिकाण त्याच्या निसर्गसौंदर्याने विशेषत: इथल्या शांततेनं तुम्हाला अगदी मोहून टाकतं. ब्रिटिशांनी या ठिकाणी आपला डेरा टाकला तो सन १८८७ मध्ये. त्यामागचं कारण होतं गोरखा रेजिमेंटमधून ‘गढवाल रेजिमेंट’ स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या रेजिमेंटचं मुख्यालय म्हणून कालू डाण्डा या ठिकाणाची निवड करण्यात आली. पुढच्या काळात भारताचा ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड लॅन्सडाऊन याचे नाव या ठिकाणाला देण्यात आले आणि लॅन्सडाऊन नावाचे गाव नकाशावर विराजमान झाले.

Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
| Unable to board AC coach, angry passenger breaks train door’s glass Viral video
“रेल्वेच्या एसी डब्यात चढता येईना, चिडलेल्या प्रवाशाने रागात फोडली दरवाज्याची काच, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
Pune, Hinjewadi IT Park, Leopard Sighted, cub Rescued, Sugarcane Field, forest department, marathi news,
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर नवजात बछड्या ताब्यात

गढवालमधील पहाडावर ५६८६ फुटांवर वसलेल्या या गावाला ओक आणि ब्लू पाइनच्या हिरव्या गर्द वनराजीचा वेढाच आहे. त्यामुळे या गावाकडे जाताना, इथल्या परिसरात फिरताना कायम हिरवे छत्र तुमच्या अवतीभवती असते. डोंगराला बिलगून हिरव्यागर्द वनराईतून वळणे घेत घेत जाणाऱ्या इथल्या रस्त्यांवरून गाडी चालवणे हे जसं कौशल्याचे काम आहे तसेच आनंददायीसुद्धा आहे. लॅन्सडाऊनकडे जातानाच आपण एका कॅण्टॉनमेंटकडे चाललोय याची जाणीव व्हायला लागते. एकतर वाटेत लष्करी वाहने ये-जा करत असतात आणि लष्करी शिस्तीच्या पाटय़ा आपले स्वागत करत असतात. शिवाय गावात शिरताना एक लष्करी पोस्ट लागतं आणि आपली चौकशी होते तेव्हा आपण छावणीत आलोय याची खात्रीच पटते. सूचिपर्णी वृक्षांच्या दाटीतून डोकावणाऱ्या दगडी बांधणीच्या वास्तू आणि ठिकठिकाणी असलेल्या दिशादर्शक पाटय़ा यांमुळे आपण युरोपमधल्या एखाद्या हिल स्टेशनवर आल्याचा भास होतो. या पिटुकल्या हिल स्टेशनवर नाही म्हणायला साइट सीइंग सदरात मोडणाऱ्या दोन-चार जागा आहेत. पण हे ठिकाण आराम करायला अगदी उत्तम आहे. इथली अनेक रिसॉर्ट्स डोंगराच्या कडेवर, उतारावर आहेत. त्यामुळे खिडकी उघडली किंवा बाल्कनीत गेलं की भोवतालचे हिरवे डोंगर नजरेत भरतात. या डोंगरावरून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकी अंगावर घेत आरामखुर्चीत पहुडून एखादे झकास पुस्तक वाचावे, जोडीला कॉफीचा कप (किंवा बीअरचा मग) आणि आसमंतात भरून राहिलेली सुखद शांतता. वा वा, याला म्हणतात सुट्टीचा खरा आनंद. दुपारनंतर मूड आलाच तर भुल्ला ताल किंवा कालेश्वर महादेव मंदिराला भेट देऊन यावी. भुल्ला म्हणजे गढवाली भाषेत लहान भाऊ, हा तलाव खोदताना स्थानिक युवकांनी जे योगदान दिले त्याची आठव ण म्हणून त्याचे नाव भुल्ला ताल ठेवण्यात आले. या तळ्यात पायडल बोट चालवण्याची सुविधा आहे आणि त्याचे व्यवस्थापन लष्कराकडे असल्याने लाइफ जॅकेट घालून मगच बोटीत बसवले जाते. लॅन्सडाऊनमध्ये पाहायलाच हवं असं ठिकाण म्हणजे गढवाल रेजिमेंट म्युझियम, ज्याला ‘दरवानसिंग संग्रहालय’ म्हटले जाते. या संग्रहालयामध्ये गढवाल रेजिमेंटचा १०० वर्षांहून जुना इतिहास शिस्तबद्धपणे संग्रहित केलेला पाहायला मिळतो. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापासून ते कारगिलच्या युद्धापर्यंत आपल्या शौर्याचा आणि पराक्रमाचा ठसा उमटवणाऱ्या गढवाल रेजिमेंटच्या इतिहासाच्या खुणा पाहणाऱ्यांना रोमांचित करतात. लॅन्सडाऊनच्या भोवतालच्या डोंगरदऱ्यांचे विहंगम दर्शन घडतं ते ‘टिप एन टॉप’ पॉइंटवरून. या पॉइंटशेजारीच गढवाल पर्यटन विभागाच्या आकर्षक वूडन कॉटेजेस आहेत. या छोटय़ाशा गावात शॉिपगचा विषयच नसला तरी स्थानिक ‘बाल’मिठाई आणि सरबत अवश्य घ्यायलाच हवे.

दिल्लीहून लॅन्सडाऊनकडे येताना वाटेत दोन दिवस ऋषिकेश किंवा हरिद्वारला मुक्काम करून स्वार्थ आणि परमार्थ साधता येतो. शिवाय ऋषिकेशला गंगेच्या खळाळत्या प्रवाहात व्हाइट वॉटर राफ्टिंगचा थरारही अनुभवा येईल. पण खरं सांगायचं तर गुलजारजींच्या शब्दात जरा बदल करुन ‘दिल ढुंढता है, फिर वहीं फुर्सत के चार दिन’ अशी अवस्था असेल तर हे फुरसतीचे चार दिवस अनुभवायला लॅन्सडाऊनला जायलाच हवं.

कसं जायचं?

दिल्लीहून फक्त २४० किलोमीटर अंतरावर आहे. दिल्ली-मिरत-नजिबाबाद-कोटद्वार हा सोईचा मार्ग. जवळचा विमानतळ जॉली ग्रॅण्ट (डेहराडून) आणि रेल्वे स्थानक कोटद्वार (४० किलोमीटर)

कधी जाल?

ऑक्टोबर ते मे उत्तम काळ. बर्फ पडत नसला तरी डिसेंबर-जानेवारीत सर्वाधिक थंडी.

मकरंद जोशी makarandvj@gmail.com