आडवाटेवरची वारसास्थळे : लोणी भापकरचा यज्ञवराह

पुण्याहून अवघ्या ९५ किलोमीटरवर मोरगावजवळ हे ठिकाण आहे. इथे एक यादवकालीन मंदिर आहे.

जेजुरी मोरगावला भाविकांची प्रचंड गर्दी असते. पण तिथेच जवळ असलेले लोणी भापकर हे ठिकाण आणि तिथे असलेले सुंदर मंदिर कोणाला फारसे माहीतही नसते. पुण्याहून अवघ्या ९५ किलोमीटरवर मोरगावजवळ हे ठिकाण आहे. इथे एक यादवकालीन मंदिर आहे. आज जरी मंदिरात शिविपडी असली तरी मंदिरावर असलेल्या शिल्पांवरून हे कोणे एके काळी विष्णू मंदिर होते हे अगदी स्पष्ट आहे. मंदिरावर उत्कृष्ट वैष्णव शिल्पांची कलाकुसर दिसते. छतावर दगडी झुंबर, देखणे कोरीव खांब यांनी मंदिर समृद्ध आहे. कालिया मर्दन करणारा कृष्ण, गोपिकांसोबत खेळणारा कृष्ण, नटराज, तसेच विष्णूच्या विविध प्रतिमा मंदिरावर कोरलेल्या आहेत. मंदिरासमोरच १५ मीटर लांबी-रुंदीची एक अत्यंत देखणी पुष्करणी असून त्याच्या भिंतीमध्ये नक्षीदार कोनाडे खोदलेले आहेत. पुष्करणीमध्येच एक वाहन मंडप दिसतो. त्यावर चहूबाजूंनी कोरीव काम केलेले दिसते. यज्ञवराहाची मूर्ती सध्या शेजारच्या शेतात ठेवलेली दिसते. ही मूर्ती हेच इथले एक आश्चर्य आहे. विष्णूचा वराह अवतार हा भूवराह म्हणजे मानवी देह. परंतु चेहरा वराहाचा आणि यज्ञवराह म्हणजे संपूर्ण वराह रूपात असलेला असे दाखवले जातात. इथे यज्ञवराहाची अतिशय सुंदर मूर्ती इथे शेतात उभी आहे. तिच्या चार पायांशी विष्णूची चार आयुधे दिसतात. वराहाच्या पाठीवर झूल असून त्यावर अनेक विष्णू प्रतिमा कोरलेल्या आहेत. चाकण जवळच्या चक्रेश्वर मंदिरात अशीच एक भग्न मूर्ती दिसते. तर खजुराहोला यज्ञवराहाचे मंदिर सापडते. पण इथे मात्र ही सुंदर, देखणी मूर्ती उन्हापावसात एका शेतात उभी आहे. ती आगळीवेगळी मूर्ती आणि तिथले मंदिर अवश्य भेट द्यावे असेच आहे.
ashutosh.treks@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loni bhapkar temples near jejuri