scorecardresearch

थोडीशी काळजी.. भरपूर आनंद!

उन्हाळी सुट्टय़ांमध्ये हल्ली परदेश प्रवासाला जाणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे.

थोडीशी काळजी.. भरपूर आनंद!

उन्हाळी सुट्टय़ांमध्ये हल्ली परदेश प्रवासाला जाणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. अशा पर्यटनात प्रवासाच्या नियोजनाबरोबरच थोडीशी काळजी घेतली, तर परदेश प्रवासाचा आनंद द्विगुणित होईल.
उन्हाळी सुट्टय़ा सुरू होण्याआधीच वेध लागतात ते पर्यटनाला जाण्याचे. भटकंतीला कुठे जायचे, कधी जायचे याचे नियोजन आपण खूपच आधीपासून करत असतो. पण पर्यटनादरम्यान काय करावे आणि काय करू नये याविषयी थोडीशी काळजी घेतली तर भटकंती अधिक आनंददायी होते. परदेश भटकंतीच्या आनंदावर कधी कधी छोटय़ाशा घटनेमुळेदेखील विरजण पडू शकते. परदेशात कधी तेथील संकेत अथवा नियम माहीत नसतात. मग अनावस्था प्रसंगदेखील ओढवतात. अशा वेळी भटकंतीच्या आखणीबरोबरच काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.
रोजच्या आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंची- गोष्टींची आपणास सवय झालेली असते. मॉईश्चरायझर, कोल्ड क्रिम, सनग्लासेस (रिटेनरसह), सनस्क्रिन लोशन, कॅमेरा, मोबाइल (चार्जस), एक्स्ट्रा बॅटरीज/मेमरी चिप्स, टॉयलेटरीज, छत्री, कवळी किंवा चष्मा वापरत असल्यास अशा गोष्टींचे दोन सेट जवळ ठेवावेत. तुम्ही नेहमी काही औषधे घेत असल्यास, ती औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह आठवणीने बरोबर घ्या. पादत्राणे आरामदायी व सवयीची असावीत, उगाच आयत्या वेळी नवीन खरेदी करू नये. त्याचप्रमाणे स्लीपर्सही बरोबर घ्याव्यात. पाण्याने ओल्या झालेल्या शूजमुळे पायाला फोड येऊ शकतात म्हणून डस्टिंग पावडर सोबत घ्यावी.
सोबत लहान मुलं असतील तर खेळणी, पझल्स, ड्रॉइंग बुक व क्रेयॉन्स सोबत ठेवा. म्हणजे मुलांना प्रवासाचा कंटाळा येणार नाही. मुलांच्या अंगावर पटकन पांघरता येईल, अशी शाल कायम बरोबर असावी. लांबची सहल करताना पूर्ण सहलीच्या प्लॅनच्या दोन कॉपीज तरी सोबत ठेवाव्यात, ज्यात हॉटेल्सचे पत्ते-फोन नंबर इत्यादी सगळी माहिती असेल. एक कॉपी मुख्य बॅगेत आणि एक रोज फिरताना सोबत ठेवावी.
अशा गोष्टींची यादी तर प्रचंड लांबू शकते. पण परदेश प्रवासात काही गोष्टी आवर्जून लक्षात घेणे गरजेचे असते. कारण इथे आपण एक व्यक्ती म्हणून तर स्वत:ला सादर करत असतोच, पण त्याचबरोबर आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्वही करत असतो. अशा वेळी काही बाबी जाणीवपूर्वक कराव्या लागतात. तेव्हा आपली आणि आपल्या देशाची प्रतिमा जपत आनंददायी प्रवास करूयात आणि या वर्षीची उन्हाळी सुट्टी अविस्मरणीय करूया!
विमान प्रवासातील काळजी
टूथपेस्ट, केसाचे तेल, जेल, क्रिम, शाम्पू, हेअर ड्रायर, रेझर, आफ्टरशेव्ह लोशन, कॉस्मेटिक्स, लिकर्स, परफ्र्युम्स, बॉडी स्प्रे, बॅटरीज, टिश्यूज, बेबी नॅपकिन, पाण्यासारखे द्रवपदार्थ या गोष्टी केबीन लगेज (हँडबॅग)मध्ये ठेवायला परवानगी नाही, हे लक्षात ठेवा. अन्यथा अशा वस्तू चेकइन दरम्यान गमवाव्या लागतात. तुम्हाला विमान प्रवासात थंडी वाजत असेल तर स्वेटर हाताशी ठेवणं कधीही उत्तम.लांबच्या विमान प्रवासात भरपूर पाणा प्या व वरचेवर पाय मोकळे करण्याचा प्रयत्न करा.
लँडिंगपूर्वी डिसएम्बार्केशन (आपला देश सोडला आणि संबंधित देशात प्रवास करतोय हे जाहीर करणारा) फॉर्म भरायला विसरू नका. हा फॉर्म कधी कधी विमानात भरून घेतला जातो, तर कधी जेथे उतरणार त्या विमानतळावर उपलब्ध असतो. त्याची पावती जपून ठेवावी, ती परत निघताना पुन्हा द्यावी लागते.
पासपोर्ट आणि इन्शुरन्स
आंतरराष्ट्रीय प्रवासात पासपोर्ट आणि व्हिसाच्या छायांकित प्रती प्रत्येक बॅगमध्ये असाव्यात.
ओव्हरसीज् ट्रॅव्हल इन्शुरन्स हे तुमच्या बिझनेस ट्रीप, कौटुंबिक ट्रीप यांपैकी कुठल्याही ट्रीपचे संपूर्ण सुरक्षा कवच असते. त्याचा वापर करा.
विमान प्रवासात चेकइन बॅगेज हरवले वा उशिरा आले, त्याचप्रमाणे सहलीदरम्यान काही वैद्यकीय उपचार करावे लागल्यास अशा विम्यामुळे तुम्हाला नुकसानभरपाई मिळू शकते.

हे लक्षात ठेवा
बऱ्याचशा हॉटेलमध्ये जिम्नॅशियम आणि स्विमिंग पूलची निशुल्क सेवा उपलब्ध असते. आपण याचा लाभ घेणार असाल तर त्यानुरूप पोशाख करावा. कारण परदेशात आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो.
काही देशांमध्ये कपडे परिधान करण्याचे काही संकेत असतात, ते पाळावेत. अशा ठिकाणी नाइट गाऊन, नाइट ड्रेसेस हे डायनिंग एरिया, रिसेप्शन एरियामध्ये घालायला बंदी असते.
हॉटेलमध्ये शक्यतो करन्सी एक्स्चेंज करणं टाळावं. कारण त्यांचा एक्स्चेंज रेट हा इतरांपेक्षा थोडा जास्त असतो.
जिथे जाणार आहात तिथल्या हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार कपडे सोबत न्यावेत.
साईटसिइंग करताना वा शो बघण्यासाठी तुम्हाला दिलेले तिकीट वा पासेस शेवटपर्यंत सांभाळून ठेवा.
फोटो काढण्याआधी गाइड, टूर मॅनेजर यांची परवानगी घ्यावी.

स्मृती आंबेरकर – writersmruti@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती ( Lokbhramanti ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या