लोकप्रिय पर्यटनस्थळांवरील गर्दी टाळून होम स्टेमधील निवासाकडे हल्ली पर्यटकांचा कल वाढू लागलाय. किंबहुना अनेक पर्यटनस्थळांजवळ असे होम स्टे विकसित होत आहेत. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले देमुल हेदेखील असंच एक नयनरम्य आणि ग्रामीण पर्यटनाचा उत्तम अनुभव देणारे आहे.

स्पिती व्हॅली. काही जणांनी ऐकलेलं आणि अनेक जणांनी न ऐकलेलं नाव. दिल्ली-चंदिगड-मनाली-रोहतांग पास-काझा-देमुल-चंद्रताल आणि परत असा हा प्रवास. सह्य़ाद्रीचे कडे, हिरवा निसर्ग, पावसाने भिजलेला भवताल हे सारं पाहायची सवय झालेली. जसजसं उत्तरेकडे जावं तसा हिरवा रंग जाऊन पांढरा रंग त्याची जागा घेतो. सृष्टीतला हा बदल लक्षणीय असतो. मनाली किंवा रोहतांग पासपर्यंत ल्यालेली हिरवी शाल अचानक बाजूला करून आपल्या राकट, दणकट आणि भव्य

रूपात, पांढऱ्या-करडय़ा रंगात आसमंत समोर उभा ठाकतो. प्रथमदर्शनी एकसुरी वाटणारं हे रूप निरखून पाहायला लागलो की अनेक रंगछटा समोर येतात. राखाडी, करडा, हलका केशरी, शुभ्र, मातकट, आकाशाचा निळा, डोंगराचा पिवळा अशा कित्येक.

रोहतांगनंतर रस्ता म्हणावा असा प्रकार उरला नाही. गाडीवाट म्हणता येईल असा मातीचा आणि दगडगोटय़ांचा मार्ग. एका बाजूला खोल दरी, तिच्या तळाशी कोणती ना कोणती नदी, दुसऱ्या बाजूला अगदी चिकटून डोंगररांग, क्षणाक्षणाला वर किंवा खाली जाणारी वळणं. आजूबाजूला नजर जाईल तिकडे दिसणारे आकाशात घुसू पाहणारे अतिभव्य पर्वत. कुणाच्या माथ्यावर भुरभुरलेलं हिम, कुणाचे भालप्रदेश अगदी उघडेबोडके, एखादा काळाकभिन्न तर एखादा अनेक छटा मिरवणारा. कुणाच्या अंगावर खेळणारे लहानसे जलप्रवाह. कुणाच्या मस्तकावरून कोसळणारा प्रचंड प्रपात. कुणाची देहयष्टी अभिन्न तर कुणाची काया वाऱ्याने कोरीवकाम केल्यासारखी!

या खोऱ्यात देमुल नावाचं एक अगदी लहानसं खेडं आहे. काझाहून दोन तासांच्या अंतरावर. देमुल हे काही टिपिकल पर्यटकांच्या मुक्कामाचं ठिकाण नाही. इथेच टाका तंबू असं म्हणणंही शक्य नाही. कारण थंडी आणि वारा, शिवाय विरळ हवा अन भुरभुर पाऊस. पण येथे होम स्टेची चांगली सोय आहे. इतर ठिकाणच्या आणि इथल्या होम स्टेमध्ये खूपच फरक.

दुमजली पारंपरिक हिमाचली घरांचे हे गाव. सहा-सात जणांचं हसतमुख कुटुंब. लाकडाचा आणि शेणाचा घरबांधणीत भरपूर वापर, स्वच्छ सारवलेली जमीन, साधे आरामदायी बिछाने, नेपाळ, लेह, गया अशा अनेक ठिकाणांहून हौसेने आणलेल्या काचसामानाने, भांडय़ांनी सजवलेली जेवणाची उबदार खोली, मोठय़ा चुलीच्या भोवताली अंथरलेली बठक. कमी अधिक फरकाने सारी घरे अशीच.

सफरचंदी लाल गालांची, बसक्या नाकाची गोड मुले, गोऱ्या तरतरीत अन उत्साही कष्टकरी बायका, सतत कामात मग्न, अगत्यशील, विनम्र असे पुरुष. गप्पा मारता मारता घरच्या बाईने दहा-पंधरा जणांचा स्वयंपाक आटोपला. शेतातून आणलेल्या ताज्या बटाटय़ांचा रस्सा, टोमॅटो-मिरची-कोिथबीर घालून केलेली झणझणीत चटणी, हरभरा डाळीचं वरण, भात आणि हातावर केलेल्या जाडसर पण मऊ रोटय़ा असा फर्मास बेत असतो. अर्थातच त्यावर आडवा हात मारला हे ओघाने आलंच.

कष्ट हा जीवनाचा अविभाज्य भाग, मग ते थंडीच्या आधीची सामानाची बेगमी करणं असो किंवा प्रत्यक्ष थंडीत कोणत्याही दळणवळणाच्या साधनाशिवाय तीन दिवस पायी प्रवास करणं! पण आपल्याला काही विशेष कष्ट पडतात असा आविर्भावही नाही. डिसेंबर-जानेवारीमध्ये दोन महिने वीज गायब, मग त्या काळात लागणाऱ्या असंख्य गोवऱ्या तयार करणं, घरात पुरेसा लाकूडफाटा आणून ठेवणं, गुरांच्या चाऱ्याची सोय अशी कित्येक कामं अखंड चालू असतात. घराच्या छतावर शेतातून आणलेले टोमॅटो ठेवायचे, त्यांचा बर्फ होतो. थंडीच्या दिवसांत ते लागतील तसे घरात आणून वापरायचे ही गोष्ट यजमानबाई अशा सहजपणे सांगत होती जणू फ्रिजमधून टोमॅटो काढावेत तितकं सोपं सारं!

बाहेर बर्फ पडलं की घरात बसावं लागतं. मग त्या काळात रजया, मोजे, स्वेटर, गालिचे विणणं ही कामं चालतात. कधी एखादा बौद्ध गुरू प्रवचन देतो. चुलीभोवती सारं कुटुंब वेळ घालवतं. मिक्सर, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, फ्रिज, टीव्ही, मोबाइल, रेडिओ, वर्तमानपत्र अशा आपल्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंचा मागमूसही नसलेलं ते चिमुकलं जेमतेम बावीस घराचं शांत निरागस गाव. आपल्या कल्पनेपासून अनेक कोस दूर. शहरीकरणाचा स्पर्शही न झाल्यानं सुखी अन समाधानी. थकल्या शरीराला त्या उबदार घरात बिनघोर झोप लागते. रात्री हलकासा पाऊस झालाच तर पहाटे गावाला वेढलेल्या सगळ्या डोंगरमाथ्यावर बर्फाची पखरण झालेली असते. त्यावर कोवळं ऊन चमकतं. ते दृश्य  डोळ्यांत साठवायचं आणि मन भरलेलं नसूनही देमुलच्या अतिथ्यशील गावकऱ्यांचा निरोप घ्यायचा.

– कल्याणी टिळक

kalyanipalnitkar@gmail.com