चिंब भटकंती : निसर्गरम्य अहुपे

ऐन पावसाळ्यात इथे या कड्यावरून एक भन्नाट धबधबा खाली कोसळताना दिसतो.

Trekking during monsoon
धुवाधार पावसामध्ये पायपीट करायची असेल, डोंगर चढायचा असेल आणि धबधब्याखाली भिजायचं असेल तर कर्जत जवळ असलेल्या कोंडाणे लेणींना भेट द्यायला हवी.

धुवाधार पावसात सह्याद्रीचे रौद्र, राकट रूप न्याहाळण्यासारखं दुसरं सुख नाही. रौद्र राकट सह्यद्री, त्याचे अजस्र कडे आणि त्यावरून कोसळणारे धबधबे यांचे दर्शन घ्यायचे असेल तर अहुपे घाटात जायलाच हवे. भीमाशंकरला जवळच असलेले हे ठिकाण अत्यंत रमणीय आहे. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे जे अनेक घाटरस्ते आहेत त्यातलाच हा एक अहुपे घाट. मंचरवरून घोडेगाव-डिंभे अशा रस्त्याने अहुपे हे ५२ किलोमीटर अंतर आहे. रस्ता वळणावळणाचा. डावीकडे डिंभे जलाशय कायम सोबतीला असतोच. अहुप्याच्या शेजारीच एक मोठा कडा आहे त्याला ढग असे म्हणतात. ऐन पावसाळ्यात इथे या कड्यावरून एक भन्नाट धबधबा खाली कोसळताना दिसतो. वाघमाचा धबधबा असं याला स्थानिक लोक म्हणतात. कितीही वेळ घालवला तरी समाधान होत नाही असे हे ठिकाण. जवळच आहे वचपे गावचे प्राचीन सिद्धेश्वर मंदिर. अहुप्याच्या अलीकडे असलेल्या पिपरगणे गावातून दुर्ग आणि धाकोबा ही शिखरे दिसतात. अहुप्याच्या अलीकडे एक छोटी देवराई आहे. तिच्या अलीकडे खाली घोड नदीचे उगमस्थान दिसते. पूर्वी इथे अश्वमुखी असलेल्या दरीतून पाण्याचा प्रवाह वाहत असे. त्यामुळे या प्रवाहाला-नदीला घोड नदी असे नाव पडले. अहुप्यातून कोकणातल्या खोपिवली गावी चालत जाता येते, मात्र त्यासाठी भटकंतीची सवय आणि साधने हवीत.

कोंडाणे लेणी

धुवाधार पावसामध्ये पायपीट करायची असेल, डोंगर चढायचा असेल आणि धबधब्याखाली भिजायचं असेल तर कर्जत जवळ असलेल्या कोंडाणे लेणींना भेट द्यायला हवी. लोणावळ्याजवळ असलेल्या राजमाची दुर्गाच्या पोटात आहेत ही कोंडाणे लेणी. परंतु, इथे येण्यासाठी कर्जत गाठावे लागते. मुंबईहून नेरळ किंवा कर्जतला उतरले तर या दोन्ही स्टेशनवरून इथे येण्यासाठी सहा आसनी रिक्षा मिळतात. पावसाळी भटकंतीपण होते आणि आपला एक प्राचीन ठिकाण पाहिल्याचा आनंद सुद्धा मिळतो. स्वत:चे वाहन असेल तर ते अगदी कोंदिवटे गावापर्यंत येते. कोंदिवटेपर्यंत पक्का रस्ता आहे आणि पुढे अर्धा तास रमणीय पायवाट आपल्याला कोंडाणे लेण्यांमध्ये घेऊन जाते. ऐन श्रावण महिन्यात इथे आलं तर ऊन-पावसाचा खेळ अनुभवत या लेण्यांपर्यंत मजेत येता येते. डोंगरातून केलेली वाटचाल आपल्याला एकदम लेणींच्या तोंडाशी आणून सोडते. अत्यंत सुबक असे खडकातले कोरीव काम पाहण्याजोगे आहे. या ठिकाणी महायान संप्रदायाचे विहार आढळतात. या लेण्यांच्या प्रवेशावरील कोरीव काम विलक्षण देखणे आहे. बौद्ध भिक्खूंना वर्षां ऋतूमध्ये निवास करण्याच्या हेतूने या त्याची निर्मिती झाली. राजमाची किल्ल्यावरूनसुद्धा या लेण्यांमध्ये जाता येते. मात्र तो रस्ता सामान्यजनांसाठी नाही. ऐन पावसाळ्यामध्ये या लेण्यांच्या समोर मोठ्ठा धबधबा कोसळत असतो. त्या खाली भिजायचा मनसोक्त आनंद घेता येतो. कोंदिवटे गावात स्थानिक मंडळी जेवणाची सोय करतात. त्यासाठी लेणींकडे जाताना त्यांना पूर्वकल्पना द्यावी लागते. अस्सल मराठी जेवणाचा ऐन पावसात आस्वाद घेण्याची ही मोठीच सोय उपलब्ध आहे.

ashutosh.treks@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Trekking during monsoon season

ताज्या बातम्या