scorecardresearch

चिंब भटकंती

पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की डोंगर भटकंतीला जाणाऱ्यांची संख्या वाढायला लागते

चिंब भटकंती

माणसाच्या साऱ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा पावसाळा, तुम्हाला घरी बसूच देत नाही. ढगांनी क्षितिजावर फेर धरला की डोंगरभटक्यांची झुंबड उडते. पण ह्य़ा भटकंतीत काही गोष्टींची नीट काळजी घ्यावी लागते.

पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की डोंगर भटकंतीला जाणाऱ्यांची संख्या वाढायला लागते. ट्रेकर्स, निसर्गप्रेमी, पर्यटक अशा सर्व गटांतील लोकांना डोंगरांच्या सान्निध्यात ओढून नेणारा हा पावसाळा. ट्रेकिंग संस्थांच्या पावसाळी ट्रेकला येणाऱ्यांची संख्या एकदम शेकडय़ांत जाते. लोहगड, राजमाची, सिंहगड अशा ठिकाणी तर पावसाळ्यात सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने ट्रेकर्सबरोबरच पर्यटकदेखील येतात. लोणावळा, माळशेज, आंबोली अशा ठिकाणी तर गर्दीचा रेटा इतका असतो की या पावसाळ्याच्या चार महिन्यांत सुटीच्या दिवशी वाहतूक नियमनाची स्वतंत्र व्यवस्थाच करावी लागते.
अर्थातच पावसाळी भटकंती सर्वानाच मोहवून टाकणारी असते. कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, डोंगरातून वाहणारे पांढरेशुभ्र ओढे, कडय़ावरून कोसळणारे धबधबे, हिरव्या रंगाच्या निरनिराळ्या छटांनी आच्छादलेले डोंगर व शेते, धुक्यात हरवलेले किल्ले व डोंगर, ऊन पावसाचा खेळ अशा विविधांगी छटांनी नटलेल्या या पावसाची मोहिनी सर्वानाच पडते.
हा पावसाळा जसा मोहवून टाकणार आहे, तसाच काळजी करायला लावणाराही आहे. पावसाळी भटकंतीत योग्य ती काळजी घेतली नाही, तर अनेक अपघातांना तोंड द्यावे लागते आणि भटकंतीचा विचका होतो. त्यामुळेच ही भटकंती जास्तीत जास्त निर्धोक व आनंददायी कशी होईल ह्य़ावर लक्ष द्यावेच लागेल.
डोंगरात अथवा किल्ल्यावर भटकायला जायचे असेल तर शक्यतो एखाद्या संस्थेबरोबर किंवा माहीतगार व्यक्तीच्या बरोबर जावे. पायथ्याच्या गावातून माहीतगार मार्गदर्शक घेतला तर उत्तमच. कारण पावसाळ्यात सर्वत्र गवताचे रान माजलेले असते. अशा वेळी वाट चुकण्याची शक्यता सर्वाधिक असते. तसेच ज्या डोंगरात वाट तुटलेली आहे किंवा वाट कठीण असलेले किल्ले, ट्रेक रुट शक्यतो पावसाळ्यात टाळावेत. अशा वाटांवर अपघाताची शक्यता अधिक असते.
पावसाळी भटकंतीत कपडय़ांचा एक जास्तीचा जोड कायम सोबत असावा. सर्व कपडे प्लास्टिकच्या पिशवीत बांधून सॅकमध्ये ठेवावेत. भिजल्यामुळे आणि अति थंडीमुळे हायपोथर्मियासारखे आजार हिमालयात हमखास अनुभवायला येतात. सह्य़ाद्रीत अशा आजारांची नोंद आजवर नाही. मात्र प्रदीर्घ काळ ओल्या कपडय़ांनी वावरणे हे धोक्याचे असते. त्यामुळे शक्यतो निवासाच्या ठिकाणी किंवा ट्रेक संपल्यावर कोरडे कपडे परिधान करावेत.
पायात योग्य ते बूट असावेत. शक्यतो रबरी तळव्याचे बूट घालावेत. कारण ते कोणत्याही प्रकारच्या वाटेवर घट्ट पकड करून ठेवतात. वाटेतील ओढे, नाले पार करताना विशेष काळजी घ्यावी. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याला वेग अधिक असतो. सहज पार करू, असे वाटणारे ओढेही धोकादायक ठरू शकतात. नदी, तलावात पोहण्यासाठी उतरू नये. पावसाळ्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे पाण्यात भोवरे तयार होतात. पाण्याची खोली वाढलेली असते आणि पाण्यातून आलेल्या गाळात पाय अडकू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसात भिजल्यामुळे शरीरातील उष्णता कमी झालेली असते. त्यातच पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यास पोहण्यासाठी शक्ती आणखी कमी होते.
पावसाळी भटकंतीतल्या आहारात काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात. पावसाळी वातावरणात गरमागरम भजी वा तत्सम पदार्थाचा मोह आवरत नाही. पण हल्ली दिवसभर पावसात भिजण्याची क्रेझ असल्यामुळे आपल्या आहारात शक्यतो चहा, सूप यासारख्या गरम पेयांचा वापर अधिक असावा. खाद्यपदार्थही शक्यतो गरमच असावेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. पावसाळी वातावरणामुळे तहान फार लागत नाही आणि पाण्याचे सेवन कमी होते. पण शरीर डिहायड्रेड होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक थोडय़ा थोडय़ा वेळाने पाणी प्यावे.
धबधब्याच्या डोहात डुबकी मारणे आनंददायी असते खरे; पण ते तितकेच धोकादायकही ठरू शकते. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच लहान-मोठे दगड खाली येऊ शकतात. ते शरीराला इजा करू शकतात. शिवाय धबधब्याचे पाणी वेगाने खाली पडत असल्याने डोहात भोवरा तयार झालेला असतो. त्यातून बाहेर पडणे पट्टीच्या पोहणाऱ्यालाही अवघड जाते. तसेच पाण्याच्या प्रवाहाभोवतीचा भाग निसरडा असतो. त्यावर घसरून दुर्घटना होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात डोंगरउतारावील किंवा घळीतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून लहान-मोठे दगड खाली येत असतात. अशा वाटेवरून चालत असताना काळजी घ्यावी. तसेच पावसाळ्यात शक्यतो प्रस्तरारोहणाचा समावेश असणारी डोंगरवाट निवडू नये. ओल्या प्रस्तरांवर आपली पकड ढिली पडते, आणि अपघातास आमंत्रण मिळते.
पावसाळ्यातील अपघाताचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते. अशा वेळी त्वरित मदत मिळणे गरजेचे असते. त्यामुळे आपण ज्या भागात ट्रेकला जाणार असतो, तेथील पायथ्याच्या गावातील गावकरी, जवळचे हॉस्पिटल, पोलीस चौकी आणि त्या भागातील गिर्यारोहणात कार्यरत संस्था यांचे संपर्क क्रमांक न चुकता जवळ बाळगावेत. महत्त्वाचे म्हणजे आपत्कालीन प्रसंगी हे संपर्क करण्यासाठी पूर्ण बॅटरी चार्ज असलेला एकतरी मोबाइल असावा.
आतापर्यंत पावसाळ्यात सह्याद्रीत अनेक अपघात झाले आहेत.ओढे, डोंगरातील तलावातही दुर्घटना झाल्याची नोंद आहे. पावसाळ्यात अवघड वाटेने डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या भटक्यांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे. अनुभव नसलेल्या लोकांसोबत डोंगर भटकंती करताना वाट चुकल्याने दुसऱ्याच डोंगरावर पोहोचल्याच्या किंवा रात्रभर उघडय़ावर रहावे लागल्याच्या घटनाही नवीन नाहीत. त्यामुळे योग्य काळजी घेतल्यास पावसाळी भटकंतीचा आनंद द्विगुणित होईल.
hrishikeshyadav@hotmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती ( Lokbhramanti ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या