डभोईचा किल्ला

गुजरात भ्रमंतीत सरदार सरोवराबरोबरच डभोई किल्ला हमखास पर्यटकांच्या यादीत असतो.

डभोई किल्ला
गुजरात भ्रमंतीत सरदार सरोवराबरोबरच डभोई किल्ला हमखास पर्यटकांच्या यादीत असतो. त्यात पर्यटकांना सर्वाधिक आकर्षण असते ते किल्ल्याचे अप्रतिम कोरीव काम असलेले दरवाजे. आपले गुजरात पर्यटन समृद्ध करायचे तर हा किल्ला आवर्जून पाहायला हवा.

गुजरातमधील सरदार सरोवर धरण पाहण्यासाठी हल्ली बरेच पर्यटक जातात. त्याच मार्गावर बडोद्यापासून ३० किलोमीटरवर डभोई नावाचे ठिकाण लागते. गुजरातमधल्या डभोईचा महाराष्ट्राशी संबंध म्हणजे एक मोठी लढाई डभोईच्या किल्ल्याच्या साक्षीने झाली होती. १ एप्रिल १७३१ रोजी पेशवे बाजीराव यांची सेनापती त्रिंबकराव दाभाडे, पिलाजी गायकवाड, धारचे पवार यांच्या संयुक्त सन्याशी लढाई झाली होती. या युद्धात दाभाडे मारले गेले.

सहाव्या शतकात बांधलेल्या डभोई ऊर्फ दर्भावती हा किल्ला वेगवेगळ्या काळात सोलंकी वाघेला, मुगल, मराठे यांच्या आधिपत्याखाली होता. हा नगरकोट असल्याने भारतातल्या सगळ्या नगरकोटांची जी अवस्था झाली आहे तशीच डभोईची अवस्था झाली आहे. किल्ल्यात असलेल्या नगराने वाढता वाढता किल्ल्यालाच गिळून टाकलेले आहे. किल्ल्याचेच सामान वापरून यातील अनेक घरे बांधलेली आहेत. इतर नगरकोटात उरतात त्याप्रमाणे येथेही किल्ल्याचे चार दिशांना असणारे चार दरवाजे उरलेले आहेत. पण हे दरवाजेच या किल्ल्याचे वैशिष्टय़  आहेत. बाराव्या शतकात बांधलेले, अप्रतिम कोरीव काम असलेले हे दरवाजे पाहण्यासाठी डभोईला वाट वाकडी करून जायला हरकत नाही. गुजरात पुरातत्त्व खात्याने हे दरवाजे अतिशय सुंदरपणे जतन केले आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी केवळ संरक्षित स्मारकाचा निळा फलक न लावता त्या ठिकाणी रक्षक नेमलेले आहेत. अशी ऐतिहासिक पाश्र्वभूमी आणि कलात्मक प्रवेशद्वारे असलेला किल्ला एका तासात व्यवस्थित पाहता येतो.

बडोद्याकडून डभोई गावात शिरतानाच डाव्या बाजूला किल्ल्याचा एक बुरुज, तटबंदी त्याला लागून असलेला पाण्याने भरलेला खंदक आणि तलाव पाहायला मिळतो. गावात शिरल्यावर आपल्यासमोर येते किल्ल्याचे भव्य असे पश्चिम द्वार. याला वडोदरा भागोल (प्रवेशद्वार) या नावाने ओळखले जाते. २० फूट उंच असलेला दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी पिवळ्या दगडात (सँडस्टोन)मध्ये बांधलेली आहे. या दरवाजाला सहा कमानी असून, त्या लाल दगडात बनवलेल्या आहेत. या कमानींवर सुंदर कोरीव काम केलेले आहे. त्यात पक्षी, फूल, वेलबुट्टी, व्याल, कीर्तिमुख कोरलेले आहेत. दोन कमानींच्या मधल्या भागात विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या डाव्या बाजूला २० खांब असलेले एक सुंदर दालन आहे. हा दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो. त्याला उत्तर दरवाजा (माहुडी भागोल) या नावाने ओळखले जाते. या दरवाजातून जाणाऱ्या रस्त्याने रहदारी चालू असते. दरवाजा पाच कमानींवर तोललेला असून कमानींवर कोरीव काम केलेले आहे. दोन कमानींच्या मध्ये मूर्ती आहेत. या पुढील दरवाजा पूर्व दिशेला आहे. या दरवाजाला हिरा भागोल या नावाने ओळखले जाते. किल्ल्याचा हा सर्वात सुंदर दरवाजा असून या दरवाजाच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या तटबंदीत १०० मीटर अंतरापर्यंत अप्रतिम कोरीव काम केलेले आहे. यात अनेक गवाक्षे, देवकोष्टके आहेत. त्यात विष्णू, लक्ष्मी, चामुंडा अशा अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. समुद्रमंथनापासून अनेक पौराणिक प्रसंग कोरलेले या ठिकाणी पाहता येतात. घोडय़ावर बसलेले योद्धे, हत्ती, हंस, व्याल, फुले, वेलबुट्टी याने हा दरवाजा सजवलेला आहे. दरवाजा सहा कमानींवर तोललेला असून, कमानींवर कोरीव काम केलेले आहे. या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस एक दरवाजा असून त्याची कमान ढासळलेली आहे, पण उरलेल्या भागावरील कोरीव काम सुंदर आहे.

बाराव्या शतकात बांधलेल्या या दरवाजाबद्दल एक दंतकथा या भागात प्रचलित आहे. या दरवाजाचे बांधकाम करणारा स्थापती हरीधर याने या दरवाजासाठी आणलेले दगड चोरून आणि इथलेच मजूर वापरून आपल्या बायकोसाठी तेन तलाव नावाचा तलाव डभोईपासून तीन किलोमीटरवर बांधला. हा अपहार राजाला कळल्यावर हरीधरला या दरवाजातच चिणून मारण्यात आले. त्यामुळे या दरवाजाचे नाव हिरा भागोल पडले आहे.

किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजे दक्षिण दरवाजा. हा दरवाजा नांदोडी भागोल या नावाने ओळखला जातो. सहा कमानी असलेल्या या दरवाजाच्या कमानींवर आणि दरवाजाच्या वरही कोरीव काम केलेले आहे. या दरवाजाच्या संरक्षणासाठी बाहेरच्या बाजूस अजून एक दरवाजा बांधलेला आहे.

कसे जाल?

बडोदा- डभोई राज्य मार्ग १६१ने बडोद्यापासून ३० किमीवर डभोई गाव आहे. मुंबईहून बडोद्याकडे येताना बडोद्याच्या अलीकडे करजन गाव आहे. करजन गावातून राज्यमार्ग १११ने डभोईला जाता येते. हे अंतर ३० किलोमीटर आहे.

अमित सामंत amitssam9@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Visit to dabhoi fort in gujarat

ताज्या बातम्या