‘अप्रासंगिक’ या संजीव खांडेकर यांच्या सदरातील ‘अ-शोकापासून न-शोकापर्यंत’ (रविवार विशेष, २७ डिसेंबर) हा लेख मनोवृत्तीच्या जडणघडणीवर एका वेगळ्याच दृष्टिकोनातून झगझगीत प्रकाश टाकतो आणि समाजाला शोकातून उन्मादाकडे नेणाऱ्या प्रवृत्तीवर नेमके बोट ठेवतो.
भाल्यावर शत्रूची डोकी मिरवणे असो किंवा मेणबत्त्या, या सर्वामागे संतापाची लाट वा अन्यायाविरुद्धची चीड असतेच. ‘फासावर लटकवा!’ हीसुद्धा भावना अनेक वेळा उफाळून आलेली असते. पण शोकाचे प्रकटीकरण स्फोटक व उग्र असू शकते. ते काबूत ठेवता यावे म्हणून शोक प्रकटीकरणाचे सामाजिक नियम इतिहासाच्या वाटचालीदरम्यान तयार झाले; या संयत वळण लावण्याच्या प्रक्रियेच्या फंदात न पडता भावनिक उद्रेकाचा संकुचित राजकारणासाठी उपयोग केला जातो, काही प्रसारमाध्यमांमधून आक्रमक आणि विद्वेषी भावनेच्या ‘प्रसारा’ला उत्साहात खतपाणी घातले जाते.
आधीच आर्थिक-सामाजिक कारणांमुळे समाजात झुंडशाही प्रकट होत असते. वेश्याव्यवसाय होत असल्याच्या आरोपांवरून जमावाने नागपूरला एका घरात बरीच मोडतोड केली. हिंसेशिवाय न्याय मिळाल्याचे समाधान मिळत नाही/ मिळून दिले जात नाही या वळणावर समाज येऊन ठेपला आहे. दुसऱ्यावर हिंसेचा प्रयोग करणे हे आक्षेपार्ह वाटतच नाही. त्यातच आपल्याकडे संघ, दल, परिषद व सेना वा सनातनी यांच्या व्यासपीठांवरून वा लोकसभेत पोहोचलेल्या साध्वी, साधू, मौलवी यांच्या वक्तव्यांतून अशीच गरळ ओकली जात असते; यातून फोफावणाऱ्या असहिष्णुतेमुळे मतभिन्नतेविरुद्ध केवळ शाब्दिकच नव्हे तर प्रसंगी शारीरिक युद्धसुद्धा पुकारले जाते.
आक्रमकतेची आणि युद्धखोरीची भाषा करून नेते धूर्त खेळी खेळतात, ‘स्फोटक व उग्र प्रकटीकरण काबूत ठेवणे’ अवघड करतात आणि जनतेला सावज बनवितात, हीच मानवी शोकांतिका आहे.
– राजीव जोशी, नेरळ

संबंध सुधारायचे आहेत, तर आधी का नाही सुधारू दिले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला दिलेली भेट हे धक्कातंत्र नसून ती पूर्वनियोजित भेट असावी असे वाटते, कारण पंतप्रधान मोदी हे पाक पंतप्रधान शरीफ यांच्या नातीच्या लग्नाला एका फोनवर जाऊ शकतील का, असा प्रश्न पडतो. तो बाजूला ठेवला तरी, सत्तेवर यायच्या आधी भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी २६/११ आदी दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानशी बोलणी करण्यास विरोध केला आणि सत्तेवर आल्यावर पाकशी जवळीक वाढवली हा पक्षधोरणातील विरोधाभास आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नवाज शरीफ यांच्या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारल्यावर भाजपने देशात गोंधळ का घातला? मनमोहन सिंग यांच्या पाकभेटीने मात्र भारत-पाक संबंध सुधारले नसते, असे काही होते काय? शेजारील देशांशी संबंध सुधारावेत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आता म्हणतात; मग २०१३ साली माजी पं. मनमोहन सिंग चोगम परिषदेला गेले असते, तर श्रीलंकेशी संबंध सुधारले नसते का? युरोपीय युनियन आणि आसियान देशाप्रमाणे भारत-पाक संबंध असायला हवेत, असे राम माधव म्हणाले. मग काँग्रेसच्या काळात पाकविषयी परराष्ट्र धोरणाला भाजपचा विरोध आणि सत्तेवर आल्यावर स्वागत. हेच का भाजपचे धोरण? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी, सार्क परिषद, उफा या प्रसंगी मोदी-शरीफ भेटींनंतर भारत सीमेवरील हल्ले/ घुसखोरी/ चकमकी थांबल्या का?
नकुल काशीद, परांडा (उस्मानाबाद)

शिंगणापूरची ‘बंद दारे’ भाविकांनीच उघडावीत
शनिचौथऱ्यावर प्रवेश करण्यावर शनी-शिंगणापूरच्या ग्रामस्थांनी बंदी घातलेली आहे. ती उठविण्यासाठी एक उपाय सुचतो. तेथे जाणाऱ्या सर्व स्त्री-पुरुष भाविकांनी तिथे मनोभावे देवदर्शन घ्यावे, मात्र अनिष्ट प्रथेचा निषेध म्हणून तेथील कुठल्याही देवापुढे एकही पसा ठेवू नये. त्या गावात फूलपुडा, उदबत्ती, प्रसाद इ. पूजेचे साहित्य विकत घेऊ नये. तेथील अभिषेक, दक्षिणा, हॉटेल, लॉज, भिकारी यांच्यावरदेखील पसा खर्च करू नये. वाटल्यास असा वाचलेला पसा स्वत:च्या गावी परतल्यानंतर तेथील शनी मंदिरात अथवा अन्यत्र खर्च करावा.
शनििशगणापूर येथील ग्रामस्थांनी स्वत:च्या मनाची, बुद्धीची, माणुसकीची कवाडे बंद करून घेतल्याचे दिसते. अशा कर्मठ, सनातनी प्रवृत्तींमुळेच पूर्वीच्या काळात िहदू समाजाचे अतोनात नुकसान झाले, सामाजिक भेदाभेदांमुळे अन्यायपीडितांपकी अनेकांनी धर्मातर केले. त्यातून ही ग्रामस्थ मंडळी काहीही बोध घेण्यास तयार दिसत नाहीत. ‘प्रथा’ ह्य़ा शब्दाला किती महत्त्व द्यायचे? सतिप्रथा राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नांनंतर ब्रिटिशांनी कायद्याने बंद केलीच. उद्या एखाद्या गावातील लोक म्हणतील, आमच्या गावात नरबळी देण्याची जुनी प्रथा आहे, त्यात शासनाने वा कुणीही ढवळाढवळ करून आमच्या धार्मिक भावना दुखवू नयेत. शासनाला हे चालणार का? घटनेने स्त्री-पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत. मग तेथील ग्रामस्थांचे हे घटनाविरोधी वर्तन शासनाला कसे चालते? तेव्हा जनतेनेच कृतिशील निषेध केल्यास, नाक दाबले की तोंड उघडेल, त्यांच्या मनाची कवाडेदेखील उघडतील.
अविनाश वाघ, पुणे</strong>

स्वागतच पाहिजे!
व्यापारी दृष्टिकोन ठेवून भारत आणि पाकिस्तानचे राजकीय संबंध जर सुधारणार असतील, तर त्यात वावगे ते काय? या भेटीमध्ये कोण्या एका भारतातील बडय़ा उद्योगपतीचे नाव समोर येत आहे. हे जर सत्य असेल तर अशा व्यक्तीचे जाहीर आभारच! देशाचे स्थान आंतरराष्ट्रीय राजकारणात जर टिकून ठेवायचे असेल, तर सर्वप्रथम शेजारील राष्ट्रांसोबतचे संबंध सुधारलेले बरे. श्रीलंकेतील सत्ताबदल असो, बांगलादेशसोबत झालेला ऐतिहासिक तिस्ता करार असो, अशा घटनांनी भारताचे स्थान मजबूत होत आहे. दुसरीकडे नेपाळमधील अलीकडच्या काही घडामोडी असोत अथवा पाचवीला पुजलेली वायव्य सीमेवरील शस्त्रसंधीची उल्लंघने असोत, अशा घटनांनी भारत कधी पण दोन पावले मागेच जाईल. गरज आहे ती अशा घटना होऊ नये यासाठी शांततामय मार्गाने प्रयत्न करण्याची आणि ते प्रयत्न होताहेत याचे स्वागतच झाले पाहिजे.
आम्ही जशास तसे उत्तर देऊ, हे आपल्यासारखे घरात बसून बोलणारे सीमेवरील जवानांच्या भावना काय समजणार? आम्ही आपले शहीद दिनसुद्धा घरात बसून साजरे करणारे आणखी किती जरी शहीद झाले तरी चालतील असाच फुका रुबाब मिरवत फिरणार, त्यात आपले काय जाणार?
धनराज व. अंधारे, बार्शी (जि. सोलापूर)

गाजावाजा नकोच!
‘पाक पापक्षालन’ हा अग्रलेख (२८ डिसेंबर) वाचला, परंतु काही मते पटली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा दौरा कोणत्याही प्रकारे गाजावाजा न करता केला तेच बरे झाले. कार्यक्रम आधीच जाहीर झालेला असता आणि तोही भारत – पाकिस्तान चर्चेचा.. तर मग ब्रेकिंग न्यूजवाल्यांना आणखी एक विषय मिळाला असता चघळायला. एरवीही एखादा दौरा जाहीर होऊन प्रत्यक्ष दौरा होईपर्यंत प्रसारमाध्यमांमध्ये खूप चर्चा रंगतात, किंवा रंगवल्या जातात. आणि त्याचा थोडासा तरी परिणाम त्या दौऱ्यावर नक्की पडतो. त्यामुळे खरे तर दौरे हे असेच व्हावेत.. गाजावाजा न करता.
रमेश आनंदराव पाटील, मु. पो. चावरे (कोल्हापूर)