शीतयुद्धाच्या काळापासून आपल्या वर्चस्वासाठी तेव्हाच्या प्रगतशील देशांनी आपल्या सन्याबरोबरच त्या त्या प्रदेशातील स्थानिक देशांना हाताशी धरून त्यांना युद्धसामग्री व छुपे युद्धाचे तंत्रज्ञान वितरित केले. हे सगळे प्रामुख्याने अफगाणिस्तान व पाकिस्तानला हाताशी धरून होत होते. नंतर तेलाच्या व्यापारी युद्धाचा इराकमध्ये भडका उडवला गेला. मग तसेच काही इराक, इराण व सीरियात झाले.
हे सगळे होत असताना दहशतवाद्यांचे कारखाने तयार होत होते. पद्धतशीरपणे माथे भडकविण्याचे काम होत होते. त्याची प्रचीती ९/११ च्या अमेरिकेवरील हल्ल्याने आली. महासत्ता असलेल्या अमेरिकेने त्वरित प्रगत तंत्रज्ञानाच्या बळावर आपली सुरक्षा भक्कम केली. बॉम्बस्फोटाचे तंत्रज्ञान सहज उपलब्ध होत गेले. मग सगळ्या जगात ही मालिका सुरू झाली. आखाती देशात सुडाच्या भावनेतून तसेच पंथाच्या वर्चस्वाच्या स्पध्रेतून युद्धसदृश परिस्थिती तयार होत गेली. अमेरिकेने आपल्या आíथक परिस्थितीवरील ताणामुळे या प्रदेशातील आपले बरेचसे सन्य माघारी बोलाविले. त्याला दुसरे एक कारण म्हणजे त्यांची खनिज तेलाची वाढलेली उत्पादन स्वयंपूर्णता! अल-कायदाचा बीमोड होत असताना आयसिसचा भस्मासुर तयार झाला. अल-कायदा, आयसिस व पाकिस्तानातील दहशतवादी संघटना यांना शस्त्रात्रे व युद्धसामग्रीचा पुरवठा होत होता. त्याचे स्रोत या पुढारलेल्या देशांतच आहेत (की आíथक संकटातील रशिया?). मग प्रगत सुरक्षेअभावी हे अतिरेकी अमेरिकेला साथ देणारे युरोपीय देश व पंथ आणि धर्माच्या वादातून आशिया खंडातील देश यांवर हल्ले चढवत आहेत; पण मुळात याला हे प्रगतशील देशच कारणीभूत आहेत. मग एखाद्या हल्ल्याचा निषेध करण्याची तत्परता दाखवली जाते.
या वेळेला तर कहर झाला. फ्रान्सबद्दल सहानुभूतीच्या नावाखाली ठिकठिकाणी फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाची रोषणाई करण्यात आली! जगाला या परिस्थितीत ढकलण्यास अमेरिकाच जबाबदार आहे.
– दिलीप राऊत, उमेळे, वसई

शाळा सहा तासच असावी!

शाळा सहा तासांवरून आठ तास करावी, असा शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. मुळात बालमानसशास्त्राला धरून जगाच्या पाठीवर कुठेच आठ तास शाळा भरत नाहीत. राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास आठ तास मुले शाळेत बसणे शक्य वाटत नाही.
अनेक शाळांमध्ये वर्गासाठी खोल्या कमी असल्याने ती दोन शिफ्टमध्ये चालवली जाते. त्याचे नियोजन कसे करणार? शाळा सुटल्यानंतर मुलांना शिकवणी, गृहपाठ, स्वाध्यायमाला सोडवणे हे सर्व करायला वेळ तरी मिळेल का? आता काही शिक्षणतज्ज्ञ हा प्रस्ताव कसा चांगला आहे, हे सांगत सुटतील. पण मुले आणि त्यांच्या पालकांचाही विचार होणे गरजेचे आहे. या धोरणाचा विपरीत परिणाम शिक्षणावर होऊ शकतो. शिक्षक आठ नाही, दहा तासही काम करतील, पण मुलांना हा ताण असह्य़ होईल. कालांतराने शाळेचा त्यांना कंटाळा येईल. आताच मोठय़ा शहरांतील मुलांचे बालपण कोमेजून जात आहे. त्यात आणखी भर न घालता आहे तशीच शाळा सहा तास चालू ठेवावी.
– संतोष मुसळे, जालना</strong>

साठेबाजांवर कारवाई हवीच!

दीपावलीच्या सणाच्या आनंदावर तूरडाळीच्या वाढलेल्या भावाने विरजण पडले. प्रशांत कुलकर्णी यांचे शनिवारचे व्यंगचित्र हे वास्तव अधोरेखित करते. अच्छे दिन येतील यावर मतदाराने विश्वास ठेवून सत्ता हातात दिली आहे, परंतु ‘दाल’ या विषयाबाबत मात्र व्यापाऱ्यांच्या पुढे सरकारची डाळ शिजू शकली नाही एवढे खरे! विविध आघाडय़ांवर सरकार ‘वेगळेपणाने’ निर्णय घेत आहे हे जरी खरे असले तरी रोजच्या भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय करणारे सरकार मतदाराला हवे असते. डाळीचे भाव दिवाळीच्या तोंडावर थोडेसे कमी दिसत असले तरी एखाद्या साठेबाजाला शासन झाल्याचे वृत्त दिवाळीच्या आनंदात भर घालणारे ठरले असते. सामान्य नागरिकांच्या लक्षात राहील अशी शिक्षा साठेबाजाला केली गेली, तर ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे वास्तव ठरू शकेल. पंडित नेहरू यांची जयंती नुकतीच साजरी झाली. ते साठेबाज, काळाबाजार करणाऱ्यांना चौकात फाशी दिले पाहिजे, असे म्हणत असत. आता फाशी शक्य आणि योग्यही नाही, पण साठेबाजांना ‘शासन’ होईल असे पाऊल उचलले पाहिजे.
– मधू घारपुरे, सावंतवाडी (सिंधुदुर्ग)

मराठी चित्रपटांनी
हा अतिरेक टाळावा

मराठी चित्रपटांचे ‘बजेट’ आणि तंत्र आता बॉलीवूडशी स्पर्धा करीत आहे याचा अभिमान आहे; पण जाहिरातींचा अतिरेक त्यांनी टाळावा असे वाटते. एखादा चित्रपट येणार असेल तर त्याचे डोहाळे सध्या फार आधीपासून लागतात. चित्रपटाची टीम मॉलमध्ये जाऊन ‘रोड शोज’ करू लागते. त्यातील गाणी किंवा तो चित्रपट कसा बनवला गेला (‘मेकिंग ऑफ..’) या धर्तीच्या कार्यक्रमांचा रतीब सर्व वाहिन्यांवर घातला जातो. ‘तो शुक्रवार’ जवळ येत जातो तेव्हा अनेक उत्पादनांच्या जाहिरातीतसुद्धा चित्रपटाची जाहिरात (त्यातलेच नायक-नायिका दाखवून) घुसडली जाते. वाहिन्यांवरील सर्व चर्चा, बातम्या, इतर कार्यक्रम असेच व्यापले जातात. हे कमी पडते म्हणून की काय, पण अनेक लोकप्रिय ‘डेली सोप्स’च्या कथानकाशी चित्रपटातील पात्रांचा ओढूनताणून मेळ घातलेले ‘संकरित एपिसोड्स’ केले जातात आणि ते सर्व अगदी केविलवाणे वाटू लागते.
सध्या चित्रपट जेमतेम ३-४ आठवडे चालतो आणि त्यातच जास्तीत जास्त कमाई व्हावी म्हणून असे मार्केटिंग केले जाते असे म्हणतात. पण सतत एकच गोष्ट कानावर/ डोळ्यांवर आपटल्यामुळे त्याचा ‘मेंटल फटीग’ येऊन अनेक रसिकांवर नेमका उलटा परिणाम होईल अशीही शक्यता वाटते.
– विनिता दीक्षित, ठाणे<br />टिपू सुलतानच्या धर्माधतेचे असंख्य पुरावे उपलब्ध

‘टिपू सुलतानची निधर्मी वृत्ती’ हे पत्र (लोकमानस, १४ नोव्हें.) वाचले. पत्रलेखकाने मांडलेले बहुतांश मुद्दे समकालीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार व अभ्यास न करता मांडलेले असल्यामुळे ते समाजाची दिशाभूल करणारे आहेत. म्हैसूरचा इतिहासकार मीर हुसेन अली खान किरमाणी याने हैदर आणि टिपू यांची चरित्रे लिहिली आहेत. विशेष म्हणजे हा मीर हुसेन टिपूच्या सन्यात त्याच्या हाताखालचा एक अधिकारी होता, त्यामुळे त्याने टिपूला जवळून पाहिले आहे व त्याने लिहिलेले टिपूचे चरित्र हे विश्वसनीय मानले जाते. तो आपल्या चरित्रात म्हणतो, ‘‘टिपूचा प्रमुख उद्देश म्हणजे मुसलमानी धर्माला उत्तेजन देऊन त्याचे संरक्षण करणे हाच होता. त्यातही तो सुन्नी पंथाचा कडवा अभिमानी होता. इस्लामला निषिद्ध असलेल्या कोणत्याही प्रकाराला त्याने हातही लावला नाही. इतकेच नव्हे, तर त्याने आपल्या नोकरांनाही तसे करू दिले नाही.’’
किरमाणी याच्या या वाक्यावरून टिपू हा धर्माध होता किंवा नाही याचा अंदाज येईल. प्रख्यात इतिहासकार सेतु माधवराव पगडी यांनी आपल्या ‘एका माळेचे मणी’ (प्रकाशक : परचुरे प्रकाशन मंदिर) या पुस्तकात टिपू सुलतानाच्या धर्माधतेचे व अत्याचारांचे भरपूर समकालीन पुरावे दिले आहेत. या पत्रातील दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे टिपू सुलतानाची ‘राम’ नाम असलेली अंगठी. या अंगठीबाबतची माहिती मला ‘क्रिस्टीज’ या लंडनस्थित पुराणवस्तूंचा लिलाव करणाऱ्या संस्थेच्या संकेतस्थळावर मिळाली. या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे ही अंगठी प्रसिद्ध इंग्रज सेनापती ऑर्थर वेलस्ली याला म्हैसूरच्या युद्धात मिळाली, मात्र ती टिपू सुलतानच्या बोटातून मिळाली किंवा कसे, याबाबत ठाम असे पुरावे उपलब्ध नाहीत. हे संकेतस्थळही या अंगठीबाबत संशय व्यक्त करते.
किरमाणी याने लिहिलेले टिपूच्या चरित्रातील उल्लेख व या अंगठीबाबत असलेली साशंकता, यामुळे एका तथाकथित वादग्रस्त अंगठीच्या आधारे टिपू सुलतान ‘निधर्मी’ होता असा निष्कर्ष काढणे उतावळेपणाचे ठरेल!
– सत्येन वेलणकर, पुणे</p>