03 December 2020

News Flash

भाजप हाच सक्षम पक्ष

या निवडणुकीदरम्यान काही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराची गाठलेली खालची पातळी.

(संग्रहित छायाचित्र)

‘पर्यायांचा पराभव’ हा संपादकीय लेख (२४ मे) वाचला. भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचे श्रेय त्याच पक्षाला आणि नेतृत्वाला जाते, यात शंकाच नाही. मात्र उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र येथे काँग्रेस पक्षाचे झालेले पानिपत तसेच नेत्यांची राजकीय अपरिपक्वता, निवडणुकीदरम्यान ज्येष्ठ नेत्यांचे गोंधळ निर्माण करणारे वातावरण, त्यात भर म्हणून ज्या पक्षाचा एकही खासदारच काय आमदारही नाही आणि लोकसभेला उमेदवारही नाही अशा पक्षाचे राज ठाकरे यांना प्रचारात उतरवून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचे मनसुबे पार धुळीस मिळाले. मनोरंजनातून गर्दी होते पण मतपरिवर्तन होत नसते. इतकेच नव्हे तर काँग्रेस घराणेशाहीपुढे जाऊ शकत नाही, यासारखे दुर्भाग्य नाही. या निवडणुकीदरम्यान काही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराची गाठलेली खालची पातळी. पक्ष म्हणूनही एक/दोन मुद्दय़ांव्यतिरिक्त त्यांनी जनतेसमोर विरोधी पक्षाची भूमिका योग्य रीतीने मांडलीच नाही. उमेदवारनिवडीतसुद्धा तुल्यबळ अथवा कार्यक्षमांना संधी देण्यात आली नाही. याउलट भाजप हा सक्षम पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसच्या पराभवाला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत.

– पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली

काँग्रेसने गांधी घराण्याच्या कोषाबाहेर पडावे

‘‘एक’मेवाद्वितीय’ हे विशेष संपादकीय आणि ‘पर्यायांचा पराभव’ हा अग्रलेख (२४ मे) वाचला. सतराव्या लोकसभेतील नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व विजयाचे उचित विश्लेषण केले आहे. भाजपच्या या विजयाचे श्रेय निश्चितच भाजपच्या नेतृत्वाने जे अथक परिश्रम केले त्याला निर्वविादपणे द्यावे लागेल. काँग्रेसकडे आज हुकमी नेतृत्वच नाही असे म्हटले तर अनुचित होणार नाही. काँग्रेसने गांधी घराण्याच्या कोषाबाहेर पडण्याची आज नितांत आवश्यकता या पराभवाने अधोरेखित केली आहे. प्रभावी नेतृत्व नसेल तर पराभव हा ठरलेलाच असतो हा निसर्गनियमच आहे. या निसर्गनियमाला उल्लंघून राहुल गांधी, प्रियांका यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व सोपवणे ही चूक अजूनही काँग्रेसला उमगत नसेल तर तिचे रक्षण कोणीच करू शकणार नाही.

– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण पश्चिम

नरेंद्र मोदी : एक चमत्कार

आमच्या पिढीचे लोक लहान व तरुण असतानाचा काँग्रेस हा अत्यंत प्रभावशाली व प्रबळ पक्ष  होता. त्या काळी विनोदाने असे बोलले जात असे की, काँग्रेसने निवडणुकीत एखाद्या विजेच्या खांबाला जरी उभे केले तरी तो निवडून येईल. आज जवळजवळ तशीच परिस्थिती किंबहुना जरा जास्तीच प्रमाणात नरेंद्र मोदींची आहे. ते तर खांबालाच काय, परंतु दहशतवादाच्या गुन्ह्य़ात आरोपी असलेल्यादेखील पक्षातर्फे निवडणुकीत उभे करून निवडून आणू शकतात. भले तो उमेदवार कितीही भयंकर प्रकारची प्रक्षोभक विधाने करू दे, त्यांच्याकडे अशा विधानांच्या समर्थनार्थ मुद्दे असतातच आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा उमेदवार निवडून येण्याची खात्री असते! त्यांचा करिश्माच तसा आहे! यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीत नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे किंवा गौरी लंकेश यांच्या खुनात सहभागी असल्याबद्दल अटकेत असलेल्या, जामिनावर असलेल्या किंवा परागंदा असलेल्या आरोपींना तिकीट देण्यास काही अडचण नसावी.

– शरद फडणवीस, पुणे

जागावाटपात ‘वंचित’ला स्थान दिले असते तर..

वंचित आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना फटका अधिक बसला हे शंभर टक्के खरे आहे. त्याचबरोबर, दुसऱ्याच्या शौर्यावर अवलंबून राहून यश मिळवता येत नसते हे देखील या निवडणुकीने सिद्ध केले आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणून काहीही फायदा झाला नाही.  वंचित आघाडीने काँग्रेसकडे जेव्हा जागावाटपाची मागणी केली त्यावेळी निम्म्या जागा जरी दिल्या असत्या तरी आज चिंता करण्याची वेळ काँग्रेसवर कदाचित आली नसती. खरे तर ‘लाट’ नसतानासुद्धा काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला, हा खूप मोठा राजकीय भूकंप आहे. त्यातून त्यांना लवकर सावरता यावे, ही आशा.

महादेव भोसले, लातूर

सामान्य माणसाचे हे मुद्दे नाहीत?

‘अर्थ निकालात’ हा (२३ मे) अग्रलेख वाचल्यानंतर असे वाटले की मतदानाचा अधिकार हा नुसता अधिकार म्हणून राहिला आहे. या अधिकाराचा कोणी विवेकबुद्धीने वापर करताना दिसत नाही. आपल्यासमोर बेरोजगारी, भाववाढ, शिक्षण, आरोग्यसेवा अशा बऱ्याच समस्या आहेत, पण या समस्यांचा कोणत्याही पक्षाने निवडणूक मुद्दा बनवला नाही. आपण फक्त राम मंदिर, भारत-पाक संबंध अशाच गोष्टींना मुद्दा बनवले, ही आपली शोकांतिका आहे. यात जास्त भर घातली ती वृत्तवाहिन्यांनी. त्यांनी सामान्य माणसांचे प्रश्न त्यांना कळूच दिले नाहीत. शिक्षित आणि अशिक्षित या दोन्ही प्रकारच्या मतदारांना एक वेगळेच चित्र दाखवण्यात आले. त्यांना निवडणुकीसाठी  त्यांचे मुद्दे काय असू शकतात, याची जाणीवसुद्धा होऊ दिली नाही आणि आम्हीसुद्धा आमचे नेमके प्रश्न कोणते आहेत याचे कधी अवलोकन केले नाही त्यामुळे आम्हीदेखील तेवढेच जबाबदार आहोत.  आपले प्रश्न कळले नाही तर आपली स्थिती मोटेच्या बलासारखी होईल- चालत तर आहोत, पण दिशाहीन.. त्यामुळे आपण साहजिकच एक योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी असमर्थ ठरू.

– महेश लक्ष्मणराव भोगल, परतूर (जि. जालना)

मुद्देच; पण निराळे..

‘अर्थ निकालात’ हे संपादकीय (लोकसत्ता, २३ मे) वाचले. यंदाच्या सार्वत्रिक निवडणूक निकालाचे कल पाहता मतदान करताना भारतातील शिक्षित युवावर्ग फक्त राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रवाद आणि अर्थव्यवस्था हे मुद्दे विचारात घेत नाही तर घराणेशाहीचा उदोउदो, शासकीय कामांतील दिरंगाई, शासकीय योजनांचा समाजाच्या गरजू लोकांना मिळणारा लाभ हे मुद्दे प्रामुख्याने विचारात घेऊनच मतदान करतो, असा या निकालाचा अर्थ निघू शकतो.

– राजीव प्रभाकर चिटणीस, मुलुंड (मुंबई.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 4:45 am

Web Title: letters from readers readers opinion readers letters 11
Next Stories
1 विरोधी आवाज किती दडपणार?
2 २००४च्या चाचण्या ‘फसल्या’ नाहीतच..
3 त्रिशंकू वा निरंकुश, दोन्हीत अडचण आहेच!
Just Now!
X