22 January 2019

News Flash

आरक्षण अंमलबजावणीत जाणीवपूर्वक खोडा?

 ३१ मार्च रोजी सहायक मोटर वाहन निरीक्षक या पदाकरिता अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘एमपीएससीला एक लाखाचा दंड’ ही बातमी (१ एप्रिल) वाचली. त्यात नमूद करण्यात आलेल्या अनिलकुमार गुप्ता विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देण्यात आला आहे. जर या निकालाचे बारकाईने आकलन केल्यास लक्षात येते की आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये खोडा घालण्याचा काही जण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत, असे वाटते.

३१ मार्च रोजी सहायक मोटर वाहन निरीक्षक या पदाकरिता अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये विविध प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी कटऑफ (अंतिम निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे गुण) पुढीलप्रमाणे आहेत. खुला वर्ग-९४, अनु. जाती-१०४, विमुक्त जाती-१०४, ओबीसी-११८, एनटी (सी)-१२०, एसबीसी-१२२, एनटी (डी)-१३६ आणि अनु. जमाती-७२ म्हणजे ‘अनु. जमातीनंतर सर्वात कमी कटऑफ खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांचा आहे.’ एनटी (बी) या प्रवर्गासाठी ८३२ जागांच्या जाहिरातीत एकही जागा नव्हती हा तर संशोधनाचा विषय आहे.

एनटी (बी) या प्रवर्गातील एकाही महिला उमेदवाराची निवड झाली नाही. कारण त्यांना खुल्या महिला प्रवर्गातून संधी नाकारली गेली. हे सरळसरळ संविधानाच्या अनुच्छेद १६ चे उल्लंघन आहे. त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे. हे सर्व अनाकलनीय आहे. याला एमपीएससीची ‘ऐतिहासिक’ कामगिरीच म्हणावी लागेल. याच संदर्भातील खटला मुंबई उच्च न्यायालयाने आता ‘मॅट’कडे वर्ग केला आहे. त्यामुळे सर्व भरती प्रक्रिया ठप्प पडली आहे. जर अनिलकुमार गुप्ता विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यात सुस्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मग ही याचिका निकाली का काढली जात नाही?

ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव, औरंगाबाद

कुटिल राजकारणाने अण्णांचे आंदोलन प्रभावहीन

‘वजन ‘तत्त्वत:’ वाढले..’ हे संपादकीय (३१ मार्च) वाचले. केंद्र सरकारने अण्णांच्या मागण्या तत्त्वत: मान्य केल्या. तत्त्वत: म्हणजे काय? खरे तर सरकारने दिलेली आश्वासने पाहता ठोस असे काही नाही. मुळात अण्णांचे आंदोलन सरकार प्रायोजित असल्याची चर्चा आधीपासून होती. ‘तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो’ अशा प्रकारचे वाटत होते. या आंदोलनाच्या वेळी एकाही वरिष्ठ मंत्र्याने भेट घेतली नाही. सन २०११मध्ये अण्णांनी काँग्रेस आघाडी सरकारविरोधात धारदार आंदोलन केले. त्यामागे आर्थिक आणि इतर पाठबळ कोणाचे होते, हे आता स्पष्ट झाले आहे. ते पाठबळ आणि शक्ती आताच्या आंदोलनात पाहायला मिळाली नाही. गेल्या चार वर्षांत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक समस्या निर्माण झाल्या. राज्यातसुद्धा अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेव्हा आण्णांनी मौन का बाळगले, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. म्हणूनच भाजप सरकारविरोधात अण्णांची भूमिका कितपत प्रामाणिक आहे, अशी शंका मनात येते. कुटिल राजकारणाने अण्णांचे आंदोलन प्रभावहीन करून टाकले.

 सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)

अण्णांनी आश्वासनांवर विश्वास ठेवणे चुकलेच

अखेर अण्णा हजारेंनी सरकारच्या आश्वासनांवर भरवसा ठेवून आपले उपोषण मागे घेतले. राजकारणी दिलेली आश्वासने किती गांभीर्याने घेतात व त्यांची पूर्तता करतात हे संपूर्ण देशाला ज्ञात आहे. सांप्रतचे भाजप सरकार तर आश्वासनांना हरताळ फासण्यात वाकबगार आहे. असे असताना अण्णांनी सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवायला नको होता. अण्णांच्या अशा कृतीमुळे सरकारचे काहीच बिघडणार नाही, परंतु अण्णांच्या कचखाऊ  वृत्तीमुळे जनतेचा अण्णांच्या आंदोलनावरील विश्वासाला मात्र तडा जाईल. आंदोलन करायचेच असेल तर त्याची तड लागल्याशिवाय माघार घेतली जाऊ  नये; अन्यथा आंदोलनांच्या फंदात न पडता परिस्थिती आहे तशीच स्वीकारून व त्याकडे काणाडोळा करून स्वस्थ बसणेच इष्ट.

– चंद्रशेखर सु. खारकर, ठाणे

‘तरुण तेजांकित’च्या मानकऱ्यांचे काम प्रेरणादायी

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’मधील बाराही जणांची माहिती (रविवार विशेष, १ एप्रिल) भुरळ घालणारी आहे. त्यातही अनाथांचा आधारवड बनलेले सागर रेड्डी, धावपटू कविता राऊत व ललिता शिवाजी बाबर यांचे अतिशय कौतुक वाटले. स्वत: अनाथाश्रमातून १८व्या वर्षी बाहेर पडल्यावर येणारे दिशाहीनपण लक्षात ठेवून नंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या युवक, युवतींना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येणे, हे त्यांच्या मनातील आच दर्शविणारे आहे. त्याचप्रमाणे आयुष्यातील कष्टांचा उपयोग धावपटू होण्यात करणाऱ्या कविता व ललिता यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. एखादी व्यक्ती भूतकाळातील जखमा कुरवाळत बसण्यात धन्यता मानते, पण कविता आणि ललिता यांनी भूतकाळातील कष्टांनाच आधार बनवून उत्कृष्ट धावपटू बनून देशाला पदके  मिळवून दिली हे नव्याने या क्षेत्रांत पदार्पण करणाऱ्यांना पथदर्शक व प्रेरणादायी आहे यात वादच नाही. इतरही सर्व रत्ने झळाळणारी आहेत.

माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

खासगी शिकवण्यांवर कडक निर्बंध घालावे

‘फेरपरीक्षेविरोधात याचिका’ ही सीबीएसईच्या १०वी, १२वीच्या पेपरफुटीमुळे घ्यावयाच्या फेरपरीक्षेसंदर्भातील बातमी (१ एप्रिल) वाचली. काही विद्यार्थी हे गैरप्रकार करून परीक्षा पास व्हायची असं ठरवूनच परीक्षा देतात. त्यांना काही खासगी शिकवणी संचालक चिथावणी देतात. कारण खासगी शिकवण्यांच्या स्पर्धेत त्यांना टिकून राहण्याचा, आपले १००% विद्यार्थी उत्तीर्ण होणे हाच मार्ग दिसत असतो. त्यासाठी ते परीक्षा मंडळाकडून प्रश्नपत्रिका मिळवण्याचा गैरमार्ग स्वीकारतात. या पाश्र्वभूमीवर, खासगी शिकवणी संचालक कुणाच्या सांगण्यावरून त्या चालवत आहेत, ते कोणत्या राजकीय प्रस्थाचे नातेवाईक आहेत का, परीक्षा मंडळात त्यांचे काही लागेबांधे आहेत का याची शहानिशा झाली पाहिजे. त्यासाठी शिक्षण खात्याकडे या सर्व खासगी शिकवण्यांची रीतसर नोंदणी व्हायला हवी.  नोंदणी नसलेल्यांवर बंदी आणली गेली पाहिजे. शिकवणी वर्ग चालवणाऱ्यांतील स्पर्धा व त्यातून निर्माण होणारे पेपरफुटीसारखे गैरप्रकार थांबवण्यासाठी खासगी शिकवण्यांवर कडक निर्बंध आणण्याची वेळ आली आहे.

 श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

शेवटी ‘चहावाल्याला’ तर रोजगार मिळाला!

गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांच्या चहाचा खर्च चांगलाच गाजला. तिकडे आपल्या पंतप्रधानांची ‘चाय पे चर्चा’ जोरात सुरू असताना त्यांचे शिष्योत्तम देवेन्द्रजी मागे कसे राहू शकतात? मग त्यांनी ‘चहा’वर वादळी चर्चा व्हावी अशी व्यवस्थाच करून टाकली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येणारे राज्याचे (की आपले?) प्रश्न घेऊन येतात की चहापान करण्यासाठी येतात? एका वर्षांत ३.४ कोटी रुपयांचा चहा म्हणजे रोज साधारणपणे १ लाख रुपयांचा चहा! शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारांचे मोर्चे, पाणीटंचाई, महागाई हे आणि असे अनेक प्रश्न राज्यापुढे आ वासून उभे असताना आपले मुख्यमंत्री चहा पितात आणि पाजतात याचाच आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. शेवटी एका ‘चहावाल्याला’ रोजगार मिळाला हे महत्त्वाचे!

मुकुंद परदेशी, धुळे

याला जबाबदार आपणच

‘स्टीफन हॉकिंगना पडलेले प्रश्न’ हा लेख (३१ मार्च) वाचला. एका महान शास्त्रज्ञाने माणसाचा भूतकाळ सांगितला, वर्तमान घडविला आणि भविष्याविषयी दृष्टी दिली. ‘विज्ञानाचा सुयोग्य वापर केला तरच माणूस टिकेल नाही तर पृथ्वीचे स्मशान दूर नाही’ हे आपण वेळीच ओळखायला हवे. आजपर्यंत माणसाने इतकी प्रगती केली, इतके जीवन सुखकर केले पण तो खरेच किती समाधानी आणि सुखी आहे? जग जवळ आलेय, मात्र शेजारी दूर गेलेत. बोलायला खूप साधने उपलब्ध झाली, पण बोलायला वेळच नाही म्हणून माणसे दूर गेलीत. याला जबाबदार आपणच आहोत. बदलती जीवनपद्धती अवलंबायला काहीच हरकत नाही, फक्त आपण या एकविसाव्या शतकात आणि विज्ञान युगात सुखी व्हावे आणि आपल्या सुखाबरोबरच समोरच्या पुढच्या पिढय़ांचाही विचार व्हावा, एवढेच.

करणकुमार जयवंत पोले, पुणे

ही चूक नव्हे तर षड्यंत्र!

सध्या ऑस्ट्रेलियन खेळाडू चूक झाली असे म्हणून माफीनामे सादर करत आहेत. ऑस्टेलियन क्रिकेटपटूंनी पिवळा सँडपेपर चेंडू घासण्यासाठी आधीपासूनच बरोबर नेला होता म्हणजे हे षड्यंत्र आधीपासूनच ठरविले गेले होते. त्यामुळे या कृत्याची संभावना साध्या चुकीत न करता कारस्थान यातच करावी लागेल. ही गोष्ट उघडकीस आली आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला म्हणून ते पश्चात्ताप झाल्याचे आता म्हणत आहेत.

नितीन गांगल, रसायनी

परीक्षा घेऊनच सरकारने पुजारी नेमावेत

‘सरकारी पुजारी नियुक्तीचे लोण आता राज्यभर’ ही बातमी (३१ मार्च) वाचली. याबाबतीत तर माझे असे मत आहे की, सरकारने कायदा करून पुजारी पदासाठी परीक्षा घेऊन पारंपरिक पद्धतीने चालत आलेली विशिष्ट लोकांची मक्तेदारी बंद करण्यात यावी. तेव्हा कुठे आपल्याकडे समानता आहे असे म्हणता येईल. तसेच लोकांनी मंदिरात देणग्या देत बसण्यापेक्षा त्याच पैशांचा उपयोग शाळा, दवाखाने काढण्यासाठी केला तर देव नक्कीच प्रसन्न होईल.

– राहुल भाऊसाहेब पवार, अहमदनगर

First Published on April 2, 2018 1:31 am

Web Title: letters from readers readers opinion readers letters