19 March 2019

News Flash

गृहप्रकल्पांत फसलेल्या लोकांना न्याय मिळावा

बिल्डर बुडाला तर ग्राहकांना गुंतवलेले पैसे परत मिळण्यास खूपच त्रास होत असे.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘बुडण्यानंतरचे तरंगणे’ हा अग्रलेख  (२५ मे) वाचला. सद्य:परिस्थिती पाहता बिल्डरांकडे घरखरेदीसाठी ग्राहकाला पैसा गुंतवणे खूप जोखमीचे झाले आहे. घरखरेदीसाठी एखाद्या बँकेचे कर्ज घ्यायचे आणि बिल्डरकडे गुंतवायचे.  वेळेत बिल्डरांनी प्रोजेक्ट पूर्ण केला तर ठीक, नाही तर ग्राहकांना बँक हप्ते भरावेच लागतात. घरही नाही व हप्तेही चालू अशा कोंडीत तो सापडतो. बिल्डर बुडाला तर ग्राहकांना गुंतवलेले पैसे परत मिळण्यास खूपच त्रास होत असे. त्यामुळे केंद्राचा नवा कायदा खूप महत्त्वाचा ठरतो. या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली पाहिजे. डीएसकेसारख्या बिल्डरांच्या गृहसंकुलांमध्ये अनेक ग्राहकांचे लाखो रुपये गुंतून पडले आहेत. डीएसके तुरुंगात गेल्याने हे गृहप्रकल्प होतील की नाही तसेच गुंतवलेले पैसे परत कधी मिळतील याविषयी अनिश्चितता असल्याने अनेक ग्राहक रडकुंडीला आले आहेत. केंद्राच्या ताज्या निर्णयामुळे त्यांना आता न्याय मिळेल हीच आशा.

विठ्ठल गोपाळ कल्याणपाड, अंबुलगा(बु.), ता. मुखेड (नांदेड)

तुतिकोरिनमध्ये संवेदनशून्यताही दिसली..

‘संवादशून्यतेचे बळी’ हा अग्रलेख (२४ मे) वाचला. मानवतेला काळिमा फासणारी ती घटना फक्त संवादशून्यतेतूनच घडली असे नाही तर ‘संवेदनशून्यतेतूनही’ घडली असे म्हणावे लागेल. थोडीफारही संवेदना त्या पोलिसांकडे असती तर त्यांनी सामान्य जनतेला आपले शत्रूच समजून गोळीबार केला नसता. राजकारणी, मग ते सत्ताधारी असोत किंवा नसोत, ते केवळ स्वहित (राजकीय,आर्थिक इ.) करून घेण्यासाठीच राजकारणात जातात हे आजपर्यंत दिसून आलेले आहे. (काही सन्माननीय अपवाद सोडून..). त्यांच्याकडून काही समाजहित घडेल किंवा ते अशा अटीतटीच्या प्रसंगी जनतेची बाजू घेतील अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे ठरेल. पण म्हणून सुशिक्षित अशा पोलीस वा लष्करी अधिकाऱ्यांनीही आपला विवेक विकून टाकावा असेही नाही. कमीत कमी त्यांनी तरी विचार करावा की आज भलेही मी अधिकारी आहे पण माझी येणारी पुढील पिढी अशा पदावर असेलच असे नाही, ते आज मी ज्या जनतेवर गोळी झाडतो आहे त्या सामान्य जनतेचा भाग असू शकतात व आज मी जो पायंडा पाडत आहे त्याचे तेही बळी पडू शकतात. पोलीस वा लष्कर जर राजकारणातील धेंडांचा जुलमी आदेश मानणे बंधनकारक मानत असतील तर स्वत:चा विवेक वापरणे त्यांनी अधिक बंधनकारक मानले पाहिजे तरच अशा कलंकित करणाऱ्या घटना थांबू शकतात.

-सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड

उपऱ्या उमेदवारांवरच परभणीकरांचे प्रेम

‘जगात जर्मनी तर भारतात परभणी’ असे म्हणतात ते उगाच नाही. परभणीकरांची पहिली महत्त्वाची खासियत ही की विकास झाला नाही तरी चालेल, पण नेतृत्व मोठे होऊ  द्यायचे नाही. परभणीचा जो नेता मंत्री झाला त्याला पुढच्या निवडणुकीत पराभूत करणार म्हणजे करणार ! जिल्ह्य़ातले आमदार असोत की खासदार, त्यातील बहुतेक सर्वच बाहेरचे. अगदी  सीताराम घनदाट नावाचे मुंबईकर परभणी जिल्ह्य़ात येऊन तीन वेळा आमदार बनतात. परभणीचे विद्यमान खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव लातूर जिल्ह्यतील अहमदपूर तालुक्यातील आहेत. मोहन फड नावाचे आमदारही जिल्ह्य़ाबाहेरचेच..

आताही  विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विप्लव बाजोरिया हे विदर्भातील उमेदवार स्थानिक उमेदवाराचा पराभव करून निवडून आले आहेत. जनतेची तर सोडाच, मतदारांची साधी ओळख नसलेले बाजोरिया का व कसे निवडून येतात या खोलात जाण्यापेक्षा बाहेरचा उमेदवार निवडून देण्याची परंपरा परभणीकरांनी याही वेळी मोठय़ा प्रामाणिकपणे पार पाडली हे मात्र खरे!

– दत्ता सातपुते, परभणी

क्रिकेटरसिकांना चुटपुट लावणारी निवृत्ती

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून एबी डी’व्हिलियर्सने घेतलेली निवृत्ती क्रिकेटरसिकांच्या दृष्टीने अनपेक्षित होती. १४ वर्षांच्या कारकीर्दीनंतर आपण थकलो असल्याची प्रामाणिक कबुली डी’व्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना दिली. यातच त्याची खिलाडूवृत्ती दिसून येते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक, अर्धशतक आणि दीडशे धावा बनवण्याचे विक्रम त्याच्या नावावर आहेत. हल्लीच आयपीएलच्या एका सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना उंच उडी मारून एका हाताने घेतलेला अफलातून झेल त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची साक्ष देणारा ठरला.  त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न बघितले होते. पण त्याचे हे स्वप्न आता पूर्ण होणार नाही. त्याची जागा भरून काढेल असा खेळाडू सध्या तरी दृष्टिक्षेपात नाही.

– दीपक काशिराम गुंडये, वरळी (मुंबई)

लालू कुटुंबाचे हेही अपयशच

गेल्या महिनाभरात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याशी निगडित दोन घटना घडल्या. घटना तशा वरवर सामान्य वाटत असल्या तरी त्या घटना १५ वर्षे मुख्यमंत्रिपद उपभोगलेल्या एका कुटुंबीयांची शोकांतिका दर्शविणाऱ्या आहेत. पहिली घटना म्हणजे लालू प्रसाद यांनी रांची येथील इस्पितळाऐवजी दिल्लीच्या एम्स इस्पितळात स्वत:वर उपचार करण्याची केलेली मागणी. ज्या अखंड बिहारचे  त्यांच्या कुटुंबीयांनी १० वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविले, त्या परिसरात किमान एक अद्ययावत व उपचारासाठी ‘विश्वसनीय’ वाटावे असे इस्पितळ उभारता येऊ नये?   दुसरी घटना म्हणजे त्यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांच्या लग्नाचा शाही समारंभ. या समारंभात परिसरातील लोकांनी चक्क मंडपातील ‘जेवण’, भांडी वगैरे चोरून नेली. हे कृत्य साध्या साध्या गोष्टीपासूनही वंचित राहिलेल्या तेथील जनतेच्या भावनेची तीव्रता दर्शविते. ज्या कुटुंबाने बिहारचे विभाजन होण्याआधी व नंतर एकत्रितरीत्या १५ वर्षे राज्य केले आहे त्यांचे अपयश ठळक करणारे हे दोन प्रसंग आहेत.

– डॅनिअल मस्कऱ्हेन्नस, वसई

First Published on May 26, 2018 2:24 am

Web Title: letters from readers readers opinion readers letters 8