‘आत्ममग्न पक्षाची लक्षणे’ हा संपादकीय लेख वाचून एकच लक्षात आले की भारतीय जनता पार्टीमध्ये ‘चिंतन’ बैठकांची परंपरा आहे, पण कधीही ‘आत्मचिंतन’ केले जात नाही. कारण एकच- स्वत:बद्दल त्यांना खूप ‘आत्मविश्वास’ आहे- अर्थात तो दिल्लीमधील एका हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्याच व्यक्तींना- हे आता सिद्ध झाले आहे. नवल याचे वाटते, भाजपमध्ये ‘चिंतन’ तरी परिस्थतीनुरूप होते का? की सरसकट होते? गुजरात राज्य चालवणे वेगळे आणि देश चालवणे वेगळे, हा फरक केंद्रातील या नेत्यांना अजून कळलेला नाही. राजकारणामध्ये फोडाफोडीला किती महत्त्व द्यावे हे देखील कळले नाही. फोडलेला माणूस एखाद्या पक्षाकडे येईल, परंतु मतदार मात्र जाणार नाही, हे शरद पवार यांनी ओळखले होते. कारण त्यांनी महाराष्ट्राचा इंच न् इंच अनेकदा पिंजून काढलेला आहे. खरे तर भाजपला २०१४ पासून, काम करण्याची जबरदस्त संधी होती. परंतु फडणवीस यांच्यासारखा चांगला नेता केंद्राच्या हवा देण्याच्या पद्धतीने पार दिशाहीन झाला. घटकेत शिवसेनेवर टीका करणे, घटकेत त्यांच्याशी मत्री करणे हे खूप वेगळे होते. राजकारणात कोणीही कोणाचे मित्र नसतात, कोणीही शत्रू नसतो ही गोष्ट खरी; परंतु एका सत्तेच्या छत्रीखाली राहून मात्र नाही.

अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त ‘आत्ममग्नते’चे रूपांतर भाजपच्या प्रत्येक नेत्याने ‘आत्मचिंतना’त केले पाहिजे आणि याबाबत केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली पाहिजे. अर्थात हे सांगणे फक्त भाजपला नाही, तर सत्तेवर येणाऱ्या पक्षालाही लागू होते. त्यांनीही अशी चूक करू नये. कारण सुडाचे वारे आता केंद्रातूनही येण्याची शक्यता नाकारता येणार नाही; तर त्याला प्रत्युत्तर म्हणून राज्यातून काही होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. सुडाचे राजकारण सर्वानाच महागात पडेल.  -सतीश चाफेकर, डोंबिवली

..पण चिंतन कशावर करायचे?

‘आत्ममग्न पक्षाची लक्षणे’ हे संपादकीय वाचले, त्यातील ‘काँग्रेसमध्ये एक घराणे तर इथे फक्त दोन व्यक्ती’ हे निरीक्षण तर मर्मभेदीच! मात्र काँग्रेस बुद्धिवंत लोकांच्या मताला किंमत द्यायची हेही खरेच. अनुच्छेद ३७० सारखा भावनिक मुद्दा, तोही महाराष्ट्रासारख्या शिक्षित समाजापुढे, शेतकऱ्यांच्या अगणित समस्यांच्या पाश्र्वभूमीवर प्रचाराचा मुख्य मुद्दा करणे यातून पक्षाचे बंद डोकेच दिसते. या संपादकीयाचा उपयोग भाजपच्या ‘चिंतन शिबिरात’ चांगला होऊ शकतो..पण चिंतन कशावर करायचे हेही बहुधा दोनच व्यक्ती ठरवत असाव्यात. -श्रीनिवास बेलसरे, वारजे, पुणे.

नेतृत्वाचे दैवतीकरण हा खरा रोग!

‘आत्ममग्न पक्षाची लक्षणे’ (२७ नोव्हेंबर) आणि त्याआधीचा ‘तीन पक्षांचा तमाशा’ (१२ नोव्हेंबर) हे दोन्ही अग्रलेख वाचले. इतर पक्षही याच आत्ममग्नतेचे बळी आहेत हे लक्षात येते. या आत्ममग्नतेचे मूळ काय याचा विचार केला तर आपल्या पक्ष नेतृत्वाचे दैवतीकरण हाच खरा रोग आहे असे वाटते. ज्याप्रमाणे मोदी हे चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य नाहीत, अमित शहा हे चाणक्य नाहीत, तसेच शरद पवार हे ‘जाणता राजा’ नाहीत हेदेखील सत्य आहे. नाही तर ते १९७९ मध्ये जेथे होते तेथेच २०१९ मध्ये का आहेत याचे उत्तर मिळणार नाही. इंदिरा गांधी शैलीतील चमत्कृतीपूर्ण धक्कातंत्र नेहमीच उपयोगी पडते असे नाही. इंदिराजींनासुद्धा याचा अनुभव जसा आणीबाणी व ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये आला होता. तसाच तो मोदींना निश्चलनीकरणाच्या (नोटाबंदी) फसलेल्या प्रयोगात आला. हे धक्कातंत्र जेव्हा फसते तेव्हा पुरती फजिती होते. -प्रमोद पाटील, नाशिक

‘जाऊन जाणार कुठे?’ हाही अहंकारच

‘तीन दिवसांचा तमाशा’ हे (२७ नोव्हे.) बातमीवजा टिपण वाचले. राजकीय पक्षांनी हे लक्षात घेतले पाहिजे की आपला अहंकार आपल्यालाच खातो. गीतेमध्ये (३/२७) श्लोक आहे : ‘अहंकारविमूढात्मा कर्ताऽहंमिती मन्यते’ याचा अर्थ अहंकारी माणूस अज्ञानवश असतो आणि त्यातून हे माझे आहे आणि मीच कर्ता आहे, असे समजून प्रत्येक कार्य मीच केले आहे असे समजतो. श्लोकाचा भावार्थ भाजपच्या राजकीय परिस्थितीस लागू पडणारा आहे. कार्य मीच केले, मीच कर्ता आहे असे समजणारा माणूस कर्माच्या बंधनामध्ये अडकतो आणि कर्माचे फळ भोगण्यासाठी वारंवार (मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन) इकडून तिकडे भटकत असतो. हेच दुखाचे कारण आहे. त्यांना आपल्या अहंकारावर वेळीच आवर घालता नाही आला तर यांचेही ‘पानिपत’ होऊ शकते. ‘केंद्रीय’ नेतृत्वाचा हट्ट असो किंवा राज्यतली परिस्थिती असो, शिवसेना हा पक्ष ३० वर्षे आपल्यासोबत आहे आणि जाऊन जाऊन तो कुठे जाणार हा फाजील आत्मविश्वास भाजपला नडला आणि भाजप सपशेल पडला. गेली पाच वर्षे भाजप नेत्यांनी शिवसेनेसोबत हेच केले. मग ते मंत्रिपदांचे वाटप असो वा या सत्तेमध्ये असूनही शिवसेनेचे न ऐकणे असो. इतरांना ‘नामधारी’ समजून आपले तेच खरे करून एकहाती निर्णय घेणे महाग पडले. -महादेव सुधाकर भोसले, लातूर

हा खेळ शहांचाच होता का?

भाजपने, मुख्यत्वे फडणवीसांनी गाढवही घालवले आणि ब्रह्मचर्यही, हेच मंगळवारच्या राजीनाम्यातून स्पष्ट झाले. नुसत्या भाजपचे सरकार पडले असते तर असे वाटले नसते, पण ज्या अजित पवारांविरोधात एवढे आकांडतांडव केला, त्यांनाच बरोबर घेऊन काळोखात सरकार स्थापन केले; वर भाजपचे प्रवक्ते ‘अजितदादां’ची भलामण करत होते, हे केविलवाणे होते. भाजपने असा अव्यापारेषु व्यापार केल्याने सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांतील संबंध बळकट तर झालेच, वर नैतिकतेचे ओझे आले सरकार टिकवण्यासाठी!  एक शक्यता आहे की हा ‘गेमप्लॅन’ शहांचा असावा. त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते, त्यांच्याकडे रोकडय़ाला जास्त किंमत आहे तर इथे शब्दाला. म्हणून तर शेवटपर्यंत पवारांवर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते! भले शहा गुजरातच्या राजकारणात मोदींचा अ‍ॅसेट असतील, पण देशाच्या राजकारणात ते मोदींची लायॅबिलिटी होणार यात शंका नाही. -सुहास शिवलकर, पुणे

‘महापरीक्षा’चे घोळ आवरावेत..

‘अखेर शिक्षा.. पण कुणाला?’ हा मध्य प्रदेशातील ‘व्यापम घोटाळ्या’विषयीचा ‘अन्वयार्थ’ (२७ नोव्हेंबर, वाचला. ‘व्यापम’पेक्षाही अधिक मोठी व्याप्ती असणाऱ्या महापरीक्षा पोर्टलचा घोटाळा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेला असू शकतो. ऑक्टोबर २०१४ पासून फडणविसी कारभार सुरू झाल्यानंतर त्या सरकारने पहिला निर्णय घेतला तो नोकरभरती बंद करण्याचा; परंतु त्यानंतरचा निर्णय म्हणजे सर्व सरकारी पदावरील भरतीसाठी ‘महापरीक्षा पोर्टल’ सुरू करण्याचा! या दोन निर्णयांमुळे महाराष्ट्रभरातील तरुणांची फरफट सुरू झाली. एका खासगी संस्थेला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले गेले. या कंपनीस परीक्षा घेण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. परत या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात येत होत्या आणि तेवढे संगणक उपलब्ध असलेली परीक्षा केंद्रे उपलब्ध नव्हती म्हणून तीन सत्रांत, महिनाभर एकाच पदासाठी परीक्षा घेण्यात येत होती. अशा परीक्षेची एकत्रित गुणवत्ता यादी योग्य कशी येणार? त्यातच सामूहिक कॉपी, वरून ‘पेपर सेटलमेंट’, अतिशय भिकार दर्जाच्या प्रश्नपत्रिका, भोंगळ शिस्त, ऑनलाइन असूनही निकालास मात्र दिरंगाई, अपारदर्शकता याचे व्हायचे तेच झाले. मागील सरकारने नोकरभरतीस लावलेली सर्व शिस्त या पोर्टलमुळे नष्ट  झाली व तरुणांचा संताप होऊ लागला. या विरोधात राज्याच्या शहराशहरांत तरुण रस्त्यावर उतरले, मोच्रे-उपोषण आदी मार्गाने त्यांनी संतापास वाट मोकळी करून दिली. ‘तरुणांचा देश’ म्हणून भाषणातून मिरवणारे नेते तरुणांच्या प्रश्नावर मात्र मूग गिळून बसले होते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांनीच, मिळेल त्या माध्यमातून पोर्टल व सरकारविरोधात आवाज उठवून तत्कालीन विरोधी पक्षाचे लक्ष वेधले. मग राष्ट्रवादी व काँग्रेस यांनीही निवडणूक प्रचारात, महापोर्टल बंद करण्याची मागणी लावून धरली होती. आता महाविकास आघाडीच्या सरकारने तरुणांच्या मानगुटीवर बसलेले हे महापोर्टलचे भूत उतरवावे व नोकरभरतीत पुन्हा शिस्त लावावी. – दीपक पवार, धुळे

भाऊबंदकी’चा संदेश एकदिलाने कामाचा!

महाराष्ट्रातील सत्तानाटय़ासंदर्भात आनंद करंदीकरांचा ‘संस्कृती संवर्धकांचे अभिनंदन, आभारही!’ हा व्यंग्यलेख वाचला. त्यात ‘भाऊबंदकी’ हा  शब्दप्रयोग केला आहे. त्यावरून (कै.) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित ‘भाऊबंदकी’ नाटक, त्याची कथावस्तू आणि काळ आठवला, त्यातील काही साम्यस्थळेही दिसू लागली. मात्र ‘भाऊबंदकी’ नाटकाचे आणखी एक वेगळेपण आहे. आपण मराठी माणसे दुही/भांडणासाठी प्रसिद्ध आहोत. नाटकाचे नाव ‘भाऊबंदकी’ असले तरी नाटकाचा संदेश एकीचा/ एकत्र येऊन काम करण्याचा आहे. – श्रीधर गांगल, ठाणे</strong>

अजित‘दादां’चे स्वागत कशासाठी?

एक माणूस सत्तेच्या लालसेसाठी आपल्या पक्षातील आमदारांच्या सह्य़ांचा गरवापर करतो. पक्षाशी दगाबाजी करतो त्या माणसाचे जणू काही झालेच नाही अशा थाटात ‘बहीण’ म्हणून सुप्रियाताई सुळे स्वागत करतात, स्वागताचे ट्वीटदेखील करतात, यातून इतरांनी काय धडा घ्यावा? अजित पवारांनी राजीनामा केव्हा दिला हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ते गप्प होते. निर्णय आल्यावर आता गुप्त मतदान शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आले, त्यानंतरच त्यांनी राजीनामा दिला. अन्यथा भाजपच्या- ‘सर्व प्रकारचे मार्ग वापरून’ आमदार फोडण्याच्या खेळात तेदेखील सामील झाले होते. बंधुप्रेमाच्या जाहीर प्रदर्शनामुळे नीतिमत्ता, पक्षशिस्त ही दुय्यम गोष्ट आहे, फक्त नाती महत्त्वाची असाच संदेश सुप्रिया सुळे देत आहेत.

– नीलेश मोरे, उस्मानाबाद</strong>

loksatta@expressindia.com