News Flash

अतिनियंत्रणातून ‘होय बा’ संस्कृतीचा जन्म..

चीनमधून आलेल्या करोना विषाणूच्या वेगाने झालेल्या प्रसारामुळे जगात हाहाकार झाला. 

(संग्रहित छायाचित्र)

 

 

‘विषाणूच पण..’ हा अग्रलेख (१७ मार्च) वाचला. संवाद, सर्वसंमती-सहमती, सामोपचार, संयम, सर्वसमावेशकता, सहकार्य अशा विविध ‘स-कारां’तून सकारात्मक लोकशाही निर्माण होत असते. पण आजही समाजात असे अनेकजण आहेत ज्यांना लोकशाही, स्वातंत्र्य, व्यक्तिवाद वगरे सगळे भंपक वाटते आणि हे सगळे जाऊन थेट हुकूमशाही वगरेच यायला हवी असे त्यांचे मत असते. गंमत म्हणजे, लोकशाहीत राहूनच तुम्हाला लोकशाही नको, हुकूमशाही पाहिजे असे म्हणता येते. एकदा का हुकूमशाहीत गेलात की तुम्ही लोकशाही पाहिजे म्हणू शकत तर नाहीच, शिवाय हा नको, तो हुकूमशहा पाहिजे असेही म्हणू शकत नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

एखादा नेता कर्तृत्ववान असल्याचा बोलबाला सुरू झाली की नेत्याच्याही ते डोक्यात जाण्याचा धोका असतो. यातून नेता आपल्याला आव्हानच उभे राहणार नाही याची चोख व्यवस्था करायला लागतो. उदाहरण म्हणून चीनमधील राष्ट्राध्यक्षपद आणि त्याबाबतीत घेतलेली भूमिका यांकडे पाहता येईल. त्यात नेत्याची प्रशासनावर हुकूमत असेल आणि विरोधाचा आवाज उठवायची, वेगळे मत मांडायची संधीही उपलब्ध नसेल तर नेत्यातून एकाधिकारशाही जन्माला येण्याचा धोका स्पष्टच असतो. चीनमधल्या चालू घडामोडी आपल्याच शेजारी हा धोका तयार होत असल्याचे दाखवणाऱ्या आहेत.

मुळातच इंटरनेट आणि समाजमाध्यमांवरच्या अभिव्यक्तीवर प्रचंड बंधने असलेल्या चीनमध्ये विरोधाचा स्वरही उमटू नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. इतकी की चिनी समाजमाध्यमांवर (वैबो हे तिथल्या ट्विटरसारखे) या काळात नकार दर्शवणारं ‘एन’ सदृश अक्षरच उमटू दिले जात नव्हते. ‘आय डिसअ‍ॅग्री’, ‘लाइफलाँग’ यांसारख्या शब्दांवर बंदी आली होती. या प्रकारची नियंत्रण-नियमनव्यवस्था नैसर्गिकरीत्या होणाऱ्या विरोधालाही दडपून ‘होय बा’ संस्कृतीला जन्म देऊ शकते. असा अतिनियंत्रणाचा सोस हाच कदाचित धोका ठरू शकतो. त्यामुळे करोना विषाणू हा काही काळानंतर संपुष्टात येईल, पण हुकूमशाहीचा विषाणू जर तोंड वर काढत असेल तर तो करोनापेक्षा धोकादायक आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.– विजय देशमुख, दिल्ली.

 

धर्मश्रद्धांच्या मर्यादा अधोरेखित झाल्या..

‘परीक्षा स्थगित, प्रार्थनास्थळे बंद’ ( लोकसत्ता, १७ मार्च) या बातमीने विशेष लक्ष वेधले. गेले काही दिवस खबरदारीचे उपाय म्हणून इटलीत, व्हॅटिकनमध्ये सर्व चर्च, प्रार्थना गृहे बंद केलीत; सौदी अरबस्तानात मक्का-मदीनाला येणाऱ्या श्रद्धाळूंना बंदी घातली, भारतात बऱ्याच धार्मिक स्थळांनी त्यांच्या यात्रा-जत्रा बंद केल्या, मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर बंद केले, शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांच्या पालख्या रोखण्याची विनंती केली अशा काही बातम्या वाचत होतो. प्रशासनावरचा ताण कमी करायचा असेल तर ही बंदी, या मर्यादा हे आवश्यक आहे. धार्मिक भावना बाजूला ठेवून नागरिक त्या पाळताहेत याबद्दल अभिनंदन. या सर्व घडामोडींत एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की, ‘करोनाने सर्व धर्मश्रद्धांच्या आणि त्यांच्या प्रेषित, अवतारांच्या मर्यादा अधोरेखित केल्या’. कदाचित श्रद्धावान म्हणतील, ही सुबुद्धी ‘त्याने’च दिली. आनंद आहे. अशीच सुबुद्धी दरवर्षी, दरवेळी देवो. इलेक्ट्रिसिटी नव्हती तेव्हा सूर्यास्ताला बहुतांश उद्योग व्यवहार संपवून सूर्योदयाची वाट पाहात विश्रांती घेणारा मनुष्य आज तीन शिफ्टमध्ये उद्योग-व्यवहार करतो. हा त्याचा उपजीविकेचा धर्म झाला आहे. हाच मनुष्य अपरात्री दोन-चार वाजता कामावरून घरी येतो, विश्रांतीसाठी झोपतो पण भल्या पहाटेच मशिदीवरच्या भोंग्याने किंवा काकड आरतीच्या कण्र्याने झोपमोड होते. जयंत्या मयंत्या, मिरवणुका पालख्यायांनी गल्लीबोळ, रस्ते व्यापलेले असतात. सार्वजनिक वाहतूक, सोयीसुविधा, आरोग्य याचे प्रश्न निर्माण होतात. या गरसोयी, त्रासाबद्दल कोणी बोलले की प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. थोडी बंधने घातली, असलेल्या नियमांची अंलबजावणी करायचे म्हटले तरी भावना दुखावतात, प्रशासनावर उगाचच ताण वाढतो. आकडेच पाहायचे असतील तर देवदर्शनाला जाता-येताना होणाऱ्या अपघातांत आणि अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांनी दगावणाऱ्यांपेक्षा कदाचित करोनामुळे दगावणारे कमी असतील. विनंती करून किंवा कायद्याचा धाक दाखवून प्रशासनाला जे जमले नाही, ते या करोनाने तात्पुरते का होईना बंद करून दाखवले. भीतीपोटी का होईना अनावश्यक, आवश्यक आणि अत्यावश्यक यातला फरक नागरिकांनी स्वत:च केला   आज ठरवले तरी – त्या तारणहार (?) प्रेषित, देवाची आळवणी करण्यसाठी एकत्र यायचे जरी म्हटले तरी, ते शक्य नाही. कितीही श्रद्धा, भावना टोकाला गेल्या तरी अल्लाहच्या दरबारात किंवा देवाचिये दारी तुम्ही आज नकोसे आहात, हेच वास्तव आहे.– शिवप्रसाद महाजन, ठाणे

केंद्रीय मंत्रालयाने हेही करावे..

चीनमधून आलेल्या करोना विषाणूच्या वेगाने झालेल्या प्रसारामुळे जगात हाहाकार झाला.  त्याचबरोबर देशात येणाऱ्या चिनी कच्च्या मालाची आयात थांबल्यामुळे देशातील वाहन, रसायने, बांधकाम उद्योगाचे नुकसान होत आहे. आधीच मंदी असताना हा परिणाम जाणवत आहे. चीनने आरोग्य व आर्थिक दोन्ही क्षेत्रांत हा धक्का दिलेला आहे. भारत ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी चीनवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून आहे. दिवाळीच्या विजेरी पणत्या, दिव्यांच्या माळाही चीनहून येतात. हे परावलंबित्व करोनासारख्या समस्येमुळे जाणवत असते. हाच माल भारत का नाही तयार करत? आशियात हेकटपणा करणाऱ्या चीनला आयात-पर्यायीकरणाच्या सनदशीर मार्गाने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करायला बंदी घालावी. त्यासाठी कमीत कमी खर्चात कच्चा माल तयार कसा होईल याचा अभ्यास केंद्रीय मंत्रालयाने करणे आवश्यक आहे. – गिरीश भागवत, दादर (मुंबई)

त्यांचेच फक्त पैसे, बाकीच्यांच्या कवडय़ा?

येस बँकचे व्यवहार १८ मार्चपासून सुरळीत होणार असल्याची बातमी (लोकसत्ता, १७ मार्च) वाचून आनंद झाला. भारत सरकारचे अर्थमंत्रालय, रिझव्‍‌र्ह बँक आणि तत्परतेने धावून आलेली स्टेट बँक अशा सर्वाचे आणि येस बँकेच्या ‘सुदैवी’ खातेदारांचे मन:पूर्वक अभिनंदन!  खरोखरच येस बँकेचे खातेदार सुदैवीच; नाही तर पीएमसी बँक,  सीपेकी बँक, पेण अर्बन बँक, अशा शेकडो बँकांचे खातेदार ‘आपले पसे कधी मिळणार’ या विवंचनेत गेली कित्येक वर्षे आहेत. काहींनी तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, म्हणून म्हणते येस बँकेचे खातेदार खरच सुदैवी आहेत.  एक प्रश्न पडतो, असे काय ‘सोने’ लागले होते की एवढी अफरातफर होऊनही येस बँक इतक्या लवकर सुरू झाली? बाकीच्या बँकेमधील पसे खातेदारांना कधी मिळणार? त्यांनी बँकेत काय कवडय़ा भरल्या होत्या का?   – शिल्पा पुरंदरे, मुंबई

आवाज उठलाच नाही, की दबला?

‘समोरच्या बाकावरून’ या सदरात ‘बँकिंग नव्हे निव्वळ जुगार’ (लोकसत्ता, १७ मार्च) हा लेख वाचला. येस बँकेच्या थकबाकीदारांची यादी जनतेने किवा संसदेने मागावी असे त्यात म्हटले आहे. येस बँकेची थकीत कर्जे ५५,६३३ कोटींवरून २,४१,४९९ कोटी रुपयांवर २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत, बहुस्तरीय पर्यवेक्षण पद्धत असूनही गेली आहेत. मध्यंतरी रिझव्‍‌र्ह बँकेने, वाणिज्यिक बँकांची अनुत्पादित कर्जे कमी करण्याच्या हेतूने अनुत्पादित कर्ज विकण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. परंतु बँकांनी योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे हा उपाय तात्पुरता ठरून काही बँकांकडून दुरुपयोग होऊन भविष्यावर परिणाम झाला.    सरकारने येस बँक ही बुडणारी बँक वाचवण्यासाठी तत्परतेने स्टेट बँकेचे सहकार्य घेण्याचा निर्णय घेतला. पीएमसी बँक, सिटिझन बँक आदी बँकांचे खातेदार अजूनही वाऱ्यावर आहेत. पीएमसी बँकेच्या ठेवीदारांनी अगदी रस्त्यावर उतरण्यापासून न्यायालयापर्यंत, लोकशाहीची सर्व आयुधे वापरून सनदशीर मार्गाने लढा दिला; परंतु आजतागायत काही विशेष त्याच्या पदरात पडले नाही. सरकारने मात्र खासगी बँक वाचविण्यासाठी स्टेट बँकेमार्फत सामान्य जनतेचा पसा पुढे केला यासाठी संसदेच्या योग्य माध्यमातून जेवढय़ा प्रमाणात आवाज उठवणे गरजेचे होते तेवढा उठला नाही किंवा सरकारच्या बहुमतापुढे तो दबला गेला. आर्थिक मंदीच्या काळात जनतेनेही योग्य मार्गाने आवाज न उठविल्यामुळे अर्थव्यवथेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वेळी, लोकांनी कायदे मंडळांवर पाठविलेले प्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी असतात की पक्षप्रतिनिधी हा प्रश्न पडतो. –  नामदेव तुकाराम पाटकर, काळाचौकी (मुंबई)

‘दहावी’ नव्हे, ११वी मॅट्रिक!

‘व्यक्तिवेध’ सदरातून १७ मार्च रोजी प्रा. मधुकर वाबगावकर यांच्या विषयी अतिशय हृद्य, वेधक माहिती मिळाली; पण त्यात अनवधानाने राहून गेलेली एक चूक खटकली. प्रा. मधुकर वाबगावकर यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३चा. मग ते ‘दहावी’ला प्रांतातून मेरिटमध्ये तिसरे येणे कसे शक्य आहे? दहावीची शालान्त परीक्षा बरीच अलीकडे सुरू झाली. प्रा. वाबगावकर यांच्या वेळी अकरावीत घेतली जाणारी, त्या वेळची ‘मॅट्रिक्युलेशन’ परीक्षाच असणार. – श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

सेवाभावी लढवय्यांच्या कार्याला सलाम!

‘काय चाललंय काय?’ या सदरातील १७ मार्चच्या व्यंगचित्रातून प्रशांत कुलकर्णी यांनी सध्याच्या करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवरील, परिचारिका आणि सफाई कर्मचारी यांच्या बाबतचे कटू सत्यच रेखाटले आहे. ज्याप्रमाणे एखादा सैनिक ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता देशसेवेसाठी जिवाची बाजी लावतो तसेच डॉक्टर, परिचारिका(नर्स) आणि आरोग्य कर्मचारीसुद्धा आपापले काम करून देशसेवा- तीही प्रेमाने, आपुलकीने, सेवाभावानेच करीत असतात. इतरांप्रमाणे त्यांना ते काम घरातून करता येणार नाही हे सत्यच या तमाम परिचारिका आणि सफाई कर्मचारी वर्गाचे मांडले आहे. त्यांना कोणीही कमी लेखू नये, तेच खरे सेवाभावी लढवय्ये आहेत. त्यांच्या कार्याला सलाम! – संतोष ह. राऊत, लोणंद (जोतिबानगर, ता.खंडाळा, जि.सातारा)

loksatta@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 12:02 am

Web Title: lokmanas poll opinion reader akp 94 13
Next Stories
1 जनतेने धाकाचा अधिकार गमावला आहे
2 हा तर कुंपणानेच शेत ओरबाडण्याचा प्रकार!
3 मद्यमुक्तीमुळे चंद्रपूरचा मृत्यूदर देशापेक्षा कमी!
Just Now!
X