‘शेंगा कोणी खाल्ल्या?’ हा अग्रलेख वाचला. विद्यार्थीदशेतील बाळ गंगाधर टिळक यांनी ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही…’ असे भर वर्गात सांगितले होते. परंतु ज्याने शेंगा खाल्ल्या होत्या त्याने काही ते प्रामाणिकपणे कबूल केले नाही. मात्र, टिळकांचा हा प्रामाणिकपणा मोदी सरकारकडे नाही, हे संविधानाला धोकादायक आहे. ‘गार्डियन’ या ब्रिटनमधल्या वृत्तपत्राने भारताचे नाव पेगॅसेस फोन टॅपिंगचे तंत्रज्ञान विकत घेतलेल्या देशांमध्ये आहे, हे प्रसिद्ध केले आहे. मोदी सरकारची रणनीती अशी आहे की, कोणत्याही भ्रष्टाचाराची, बेकायदेशीर केलेल्या कामांची कायदेशीर चौकशी करायचीच नाही. कारण त्यामुळे सरकारची लोकप्रियता कमी होते. अरुण जेटली यांनी जाहीरपणे सांगितले होते की, ‘मनमोहन सिंग सरकारने कायदेशीर चौकशी करण्याची केलेली चूक मोदी सरकार करणार नाही.’ तेव्हा लोकमान्य टिळकांचा वारसा सांगून भाजप केवळ जनतेत भ्रम निर्माण करीत आहे. वैष्णव यांनी संसदेत दिलेली सफाई ही गोलमाल आहे. कोणत्याही गुन्ह्याला कधी ना कधी वाचा फुटतेच. राफेलला पुन्हा वाचा फुटलीच आहे. पेगॅसेस तंत्रज्ञान विकत घेऊन भारतातील पत्रकार, निवडणूक आयुक्त, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच केंद्र सरकारच्या दोन मंत्र्यांचे फोन टॅपिंग करण्यात येत होते. या मंत्र्यांचे फोन टॅपिंग करून मोदींबद्दल त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न झाला असावा. या कामासाठी वैष्णव आणि पटेल यांना मंत्रिपदाची बक्षिसी देण्यात आली असावी. मतदान यंत्रांतही अशा प्रकारे हेराफेरी करण्याचे तंत्रज्ञान इस्राायलकडे आहे काय याचा शोधही पत्रकारांनी घ्यावा. – जयप्रकाश नारकर, माणिकपूर, वसई पश्चिम

जॉर्ज ऑर्वेलची ‘१९८४’ कादंबरी आणि आज!

‘शेंगा कोणी खाल्ल्या?’ हे संपादकीय वाचले. ते वाचल्यावर जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘१९८४’ या कादंबरीतील एका परिच्छेदामधील पुढील ओळी आठवल्या…

kThere was of course no way of  knowing whether you were being watched at any given moment. How often, or on what system, the Thought Police plugged in on any individual wire was guesswork. It was even conceivable that they watched everybody all the time. But at any rate they could plug in your wire whenever they wanted to. You had to live- did live, from habit that became instinct- in the assumption that every sound you made was overheard, and, except in darkness, every movement  scrutinized.

(स्वैर भाषांतर : कोणत्या क्षणी तुमच्यावर पाळत ठेवली जात आहे हे कळण्यास कोणताही मार्ग नव्हता. कोणत्या यंत्रणेद्वारे किती वेळा तुमच्या यंत्रणेत पोलीस जोडले जातात हा एक केवळ अंदाज होता. किंबहुना, सर्वकाळ सर्वांच्यावर पाळत ठेवली जाते असे मानणे योग्य ठरेल. कोणत्याही प्रकारे ते केव्हाही त्यांना हवे असेल तेव्हा ते तुमच्या यंत्रणेत हस्तक्षेप करू शकतात. आणि ‘तुमचा प्रत्येक आवाज ऐकला जातोय किंवा तुमची प्रत्येक हालचाल (अंधारातील हालचाली सोडून) टिपली जात आहे आणि त्याची तपासणी केली जात आहे’ हे लक्षात ठेवून या प्रकारे जगण्याची तुम्हाला सवय लावून घेतली पाहिजे.) – अशोक वासुदेव बक्षी, सातारा</strong>

बहुसंख्याकवादाची विषवल्ली

न्या. चंद्रचूड यांनी ‘बहुसंख्याकवादी प्रवृत्तीबाबत प्रश्न विचारणे आवश्यक!’ हे बहुमोलाचे वक्तव्य केले आहे. या प्रवृत्तीमुळचे झुंडशाही, आंदोलने, मोर्चे वाढत आहेत. अशा विचारांना आळा घालण्यात केंद्र आणि राज्य सरकारे असमर्थ ठरत आहेत, किंवा राजकारणापायी त्यांना त्यात रस नाही असे नाइलाजाने म्हणावे लागत आहे. आज  राजकीयदृष्ट्या सर्व काही ठीकठाक वाटत असले तरी ती वादळापूर्वीची  शांतता आह. या प्रवृत्तीचे दूरगामी परिणाम होतील. समाजातील फूट वाढत जाईल. आणि भविष्यात समाज जो उसळी घेईल, तो उद्रेक आवरणे सत्ताधारी राजकारण्यांना दुरापास्त होईल. – सुधीर ब. देशपांडे, विलेपार्ले पूर्व, मुंबई</strong>

देवत्वाची जेथ प्रचीती…

‘…ज्याचे मुखी नाम तोचि धन्य’ (‘पहिली बाजू’- २० जुलै) हा उल्हास पवार यांचा लेख वाचला. खरोखरच वारीचे प्रतीकात्मक आयोजन करून महाराष्ट्राने कुठल्याही धर्मापेक्षा मनुष्यधर्म श्रेष्ठ हे कृतीतून दाखवून दिले आहे व संकटकाळी स्वत:च्या उदाहरणातून देशाला मार्ग दाखवण्याचा महाराष्ट्रधर्मही वर्धित केला आहे. एरवी भक्तिरसापुढे इतर प्राधान्यक्रम वारीच्या वेळी मागे ठेवणाऱ्या वारकऱ्यानी ज्या प्रकारे सलग दोन वर्षे संयम दाखवला आहे त्याला तोड नाही. त्यांच्या ठायी वसलेल्या व कायम समस्त मानवजातीचे व्यापक हित पाहणाऱ्या विठ्ठलस्वरूपाचे तळपते लख्ख दर्शन त्यांनी आपल्या कृतीतून घडवले आहे. एरवी अश्रद्ध असणारेही देवत्वाची उंची गाठणाऱ्या मानवतेच्या या भव्यतेपुढे नतमस्तक होतील. वारकऱ्यानी शांततेत केलेला हा विठूनामाचा व मानवतेचा गजर दीर्घकाळ समाजमनात निनादत राहील. – प्रवीण नेरुरकर, माहीम, मुंबई

वारकरी संप्रदायातील झापडबंद

‘ज्याचे मुखी नाम…’ हा उल्हास पवार यांचा वारकरी संप्रदायाच्या ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या उल्लेखांनी भरलेला लेख म्हणजे ‘पहिली बाजू’ उजळ आहे. वारीमध्ये आणि वारीपुरते ‘नाही जातिसवे काम’ हे खरे असले तरी गावोगावी परतल्यावर ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ म्हणत जातिभेद पाळले जातात, ही त्याची  ‘दुसरी बाजू’ श्री. म. माटे यांनी मांडलेली आहे, त्याचे काय? वारीपुरता समतेचा घोष काय कामाचा? याच संप्रदायातील काहींनी तुकोबांच्या जीवनावर लिहिल्या गेलेल्या कादंबरीविरुद्ध गदारोळ करून यादवी माजवण्यात आनंद मानला होता. मग त्यांच्यात आणि तुकोबांचे अभंग नदीत बुडवण्याची आज्ञा देणारे त्यावेळचे झापडबंद सनातनी आणि आजचे संप्रदाय नेते यांत फरक तो काय? हे खरे अडचणीचे प्रश्न आहेत. संतांची नावे घेतली म्हणजे धन्य झालो… त्यांची शिकवण त्यांच्या ग्रंथांप्रमाणे बासनात गुंडाळून ठेवायची काय, याचा विचारही गांभीर्याने केला गेला पाहिजे. – गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर  पश्चिम (मुंबई)

नाशकातील ‘ती’ घटना आणि समाजवास्तव

अलीकडेच नाशिक येथे हिंदु मुलगी व मुस्लीम मुलगा यांचा कुटुंबाच्या संमतीने झालेला विवाह चर्चेत आला. या विवाहासंबंधात ‘लोकमानस’ सदरात काही वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. १९ जुलैच्या अंकात पूजा सांगळे यांनी ‘मानसिकता बदलण्यास आणखी किती काळ लागेल?’ या शीर्षकाखाली व्यक्त केलेले विचार सयुक्तिक वाटतात. संबंधित कुटुंबांच्या परस्पर संमतीने, कुठल्याही प्रकारचा धाकदपटशा वा दबाव न आणता पार पडलेल्या हिंदू-मुस्लीम विवाहामध्ये हस्तक्षेप वा तीव्र विरोध करण्यामागे कोणती कारणे व परिस्थिती असावी हे कळत नाही. वधूपक्षाची विवाह हिंदू पद्धतीने करण्याची इच्छा व त्यासाठी सुरू झालेली तयारी ही माहिती माध्यमांतून व्हायरल झाल्यामुळे विरोध कदाचित उफाळला असेल. हस्तक्षेप वा विरोध दर्शविण्यासाठी कोणत्या गटाने (धार्मिक, सामाजिक वा इतर) पुढाकार घेतला? या आंतर्धर्र्मीय विवाहामुळे समाजाच्या कोणत्या भावना दुखावल्या गेल्या? उदा. धार्मिक, सामाजिक, जीवनपद्धती, परस्परसंबंध, रीतिरिवाज वा इतर काही? या मुद्द्यांवर प्रकाश पडणे गरजेचे आहे. भारतात बऱ्याचदा हिंदू व मुस्लीम समाजातील संबंध तणावग्रस्त बनतात. यावर या दोन समाजांत समभाव निर्माण होणे आवश्यक आहे असे विचारवंत प्रतिपादित करतात. या दोन समाजांत परस्परसंमतीने होणारे विवाह हे उद्दिष्ट साध्य करू शकतात. त्यामुळे समभावाच्या पुरस्कत्र्यांनी संबंधित कुटुंबियांचे कौतुक करून आणि विरोधकांचे समुपदेशन करून अशा विवाहांचे स्वागत करायला हवे. – श.  द.  गोमकाळे, नागपूर</strong>

मेरा भारत महान?

‘चीनची घुसखोरी’ (लोकसत्ता- १८ जुलै) हा अग्रलेख महत्त्वपूर्ण विषयाला वाचा फोडणारा आहे. मात्र, लेखात म्हटले आहे त्यापेक्षाही चीनची सर्वच क्षेत्रांतली घुसखोरी खूप खूप जास्त आहे. चीनची आर्थिक ताकद आपल्या पाचपट आहे. देवळात जाऊन प्रार्थना करून आणि देव पाण्यात बुडवून आपण पाठवलेले चांद्रयान चंद्रावर उतरू शकले नाही. मात्र, चंद्राच्या न दिसणाऱ्या भागावर यान उतरवणारा चीन हा जगातील एकमेव देश आहे. चीनचा यंत्रमानव मंगळावर उतरलाय आणि तेथील भूगर्भाचे नमुने त्याने चीनला पाठवले आहेत. अमेरिकेतील सर्वात जलद आणि प्रगत संगणकाहूनही अनेक पटीने जलद असलेला संगणक चीनने नुकताच बनवला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत चीन अनेक पटीने आपल्या पुढे असेल हे आपण जाणतोच. प्रश्न एवढाच, की १९९० पर्यंत आपण आणि चीन बरोबरीने होतो. खरे तर अंतरिक्ष वगैरे क्षेत्रांत आपण थोडे पुढे होतो. पण नंतर काय झाले? बाबरी मशिदीचा विध्वंस करून महाभयानक दंगली आणि आरक्षणाच्या प्रश्नावर दोन्ही बाजूने जिवाच्या कराराने खेळलेल्या लढाया यांत आपण तन, मन, धन अर्पून मग्न राहिलो. आणि स्वत:च स्वत:ची फसवणूक करत ‘मी विश्वगुरू, मेरा भारत महान’ हे तुणतुणे जगभर वाजवीत बसलो. – दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

इतकीच तत्परता शासकीय सेवेबाबतही दाखवा…

‘राज्यपाल आणि १२ आमदार’ याची बातमी वाचली . नवल वाटते की १२ आमदारांसाठी सरकारचा जीव एवढा का कासावीस होतोय, की सरकार थेट न्यायालयात गेले ?  पण प्रश्न हा आहे की अशीच तत्परता शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्या संदर्भात का दाखवीत नाहीत.  – निळकंठ (बाळासाहेब) लांडे, एरंडी (लातूर)

loksatta@expressindia.com