‘द्विराष्ट्रवादाचे मढे!’ हे संपादकीय (१० फेब्रुवारी) वाचले. महंमद अली जीनांनी धर्माच्या आधारे फाळणी घडवून आणली असली तरी याची मुहूर्तमेढ सर सय्यद अहमद खान यांनी रोवली होती, याचे सविस्तर वर्णन होण्यास्तव हा पत्रप्रपंच केला आहे.

प्रसिद्ध पत्रकार व इतिहास संशोधक गोविंद तळवलकर यांनी सर सय्यद अहमद खान यांच्या बाबतीत जे मत प्रदर्शन केले आहे ते वाचकांपुढे ठेवणे आवश्यक वाटते. सर सय्यद अहमद यांनी मुसलमानांचे अलगाववादी राजकारण जन्माला घातले. त्यांनी सन १८८२ मध्ये गव्‍‌र्हनर जनरलला अर्ज केला होता. यात असे म्हटले की, मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहे. सर सय्यद अहमद हे काँग्रेसच्या स्थापनेनंतर दोन वर्षे मौन बाळगून होते. नंतर मात्र त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. व्हाइसरॉयच्या कौन्सिलवर प्रतिनिधी निवडण्याच्या मागणीला विरोध केला. सर्व देश एक आहे हे सर सय्यद अहमद यांना मान्य नव्हते. १८९० च्या एप्रिलमधील भाषणात त्यांनी लोकनियुक्त सरकार स्थापन केल्यास यादवी युद्ध होईल अशी धमकी दिली. ही यादवीची भाषा नंतर १९४० मध्ये पुढे मुस्लीम लीगच्या नेत्यांनी केलेली दिसते. (संदर्भ- सत्तांतर : १९४७ – खंड १)

ज्या कारणास्तव धार्मिक आधारावर देशाची फाळणी झाली त्याने समस्येचे निराकारण न होता त्याचे अक्राळविक्राळ रूप आजही देशापुढे उभे ठाकले आहे. या कारणास्तव द्विराष्ट्रवादाचे मढे कितीही इच्छा असली तरी इतक्या सहजरीत्या दफन करणे शक्य नाही. – सतीश भा. मराठे, नागपूर

‘अखंड’ न राहिल्याचा लाभ हिंदूंनाच!

‘द्विराष्ट्रवादाचे मढे’ हा अग्रलेख (लोकसत्ता, १० फेब्रुवारी) वाचला. संघ आणि हिंदुत्ववाद्यांचा असा समज आहे की, गांधीजी हे भारताच्या फाळणीला जबाबदार होते. हे त्यांना जर खरोखरच खरे वाटत असेल तर त्यांनी गांधीजींचे अनेकदा आभारच मानले पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्यांना ‘तेहतीस कोटी एक’वा देव मानून त्यांची रोज सकाळ-संध्याकाळ पूजा करायला पाहिजे. कारण भारताची फाळणी करून गांधीजींनी हिंदुत्ववाद्यांवर मोठेच उपकार केले आहेत! कसे ते पाहा :

आज भारतात मुस्लिमांची संख्या सुमारे १४ टक्के आहे. तरीही हिंदुत्वावाद्यांना त्यांचे अस्तित्व सहन होत नाही. समजा फाळणी झाली नसती आणि ‘अखंड’ भारत असता तर येथे मुस्लिमांची संख्या किमान ४० टक्के झाली असती. आज १४ टक्के लोकांचा बाऊ करणाऱ्यांची त्या वेळी काय अवस्था झाली असती याची कल्पना त्यांनीच करावी.

अखंड भारतात मुस्लिमांना सर्वच गोष्टींत किमान ४० टक्के वाटा द्यावा लागला असता. केवळ फाळणी झाल्यामुळेच भारतात हिंदुना राजकारण, सत्ता, प्रशासन, सरकारी व खासगी नोकऱ्या, उद्योगधंदे, प्रसारमाध्यमे आणि इतर सगळ्याच ठिकाणी किमान ९० टक्के वाटा मिळतो आहे. त्यापैकी बहुतेक वाटा हिंदुत्ववाद्यांचे पुढारपण करणाऱ्या जातींकडे जातो.

अखंड भारतात दलित आणि मुस्लिमांची मिळून टक्केवारी ७० हून जास्त झाली असती. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना दलितांचे अधिकार हिरावून घेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे शक्यच झाले नसते. तेव्हा आज हिंदुत्ववाद्यांना जे काही अधिकार मिळत आहेत ते फाळणीमुळे मिळत आहेत. म्हणून फाळणी जर गांधीजींनी केली असेल तर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत की नाही? पण तसे करण्याऐवजी हे लोक गांधीजींना सतत शिव्या घालण्याचा उद्योग करत आहेत. ही कृतघ्नता नव्हे काय? खरेतर फाळणीसाठी बॅरिस्टर जिनांची मुस्लीम लीग आणि सावरकरांची हिंदु महासभा यांनी आपल्या द्वेषमूलक वक्तव्याने आणि तेढ माजवणाऱ्या कृत्यांनी देशाला दुंभगण्याचे रणिशग फुंकले होते. सावरकरांनी या हिंदुस्थानात ‘हिंदु आणि मुसलमान अशी दोन राष्ट्रं आहेत’, असे म्हटले होते. तर जिनांनी अखंड भारतसाठी खूप जाचक अटी-शर्तीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात प्रामुख्याने..

(१) अखंड भारताचा पहिला पंतप्रधान मुस्लीम असावा असे म्हटले होते.

(२) शिक्षणात आणि नोकरीत मुस्लिमांना ५० टक्के आरक्षण पाहिजे.

(३) मुस्लिमांसाठी ५० टक्के राखीव मतदारसंघ पाहिजेत.

अखंड भारतासाठी अट क्र. १ मान्यही झाली असती; पण अट क्र. २ आणि ३ गांधींना किंवा काँग्रेसला अजिबात मान्य नव्हत्या. याच दोन्ही अटींमुळे भारतावर कायम मुस्लीम पंतप्रधान राहू शकला असता; जेणेकरून भारताला मुस्लीम देश बनविण्याचा बॅरिस्टर जिनांचा डाव सफल झाला असता. आणि इथल्या बहुसंख्य समाजावर प्रचंड अन्याय-अत्याचार झाला असता. याचा दूरगामी विचार करून गांधींनी आणि काँग्रेसने बॅरिस्टर जिनांचा हा प्रस्ताव सपशेल धुडकावून फाळणीला मान्यता देऊन भारताला धर्मनिरपेक्ष देश बनवण्याचा विडा उचलला.

‘पंतप्रधानपदासाठी फाळणीचा घाट घातला गेला’, असे म्हणणे ही इतिहासाची क्रूर थट्टाच होय. उलटपक्षी मुस्लीम लीगचे जिना आणि द्विराष्ट्र कल्पनेचे जनक सावरकर हेच खरे फाळणीचे गुन्हेगार असूनही अजूनही तुम्ही गांधीजींना फाळणीचे गुन्हेगार समजणार काय, हा खरा प्रश्न आहे. – जगदीश काबरे, नवी मुंबई</strong>

‘हिंदूंचे राज्य’ ही कल्पना म्हणजे प्रतिक्रिया

अग्रलेखात एकाच बाजूने म्हणजे हिंदूंच्या मनात आलेला द्विराष्ट्रवाद मांडला आहे व त्यासाठी त्यांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले आहे. डालडा बाजारात येण्यापूर्वी दुकानावर येथे तूप मिळेल एवढीच पाटी असायची. पण डालडा आल्यावर ‘येथे शुद्ध तूप मिळेल’ अशी पाटी आली. तद्वतच मुस्लीम आक्रमणापूर्वी इथे वैदिक पंथ होता, वेद न मानणारे पंथ होते, नास्तिक होते व ते या संस्कृतीचा एक भाग होते. मुस्लीम आक्रमणानंतर आपल्याला हिंदू हे सेमेटिकप्रमाणे नामाभिधान मिळाले. मुस्लिमांएवढा बंदिस्त व आक्रमक धर्म आपण पाहिला नव्हता. ‘दर अल इस्लाम’ ही संकल्पना कुराण मांडते. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया म्हणून ‘हिंदूंचे राज्य’ ही कल्पना आली, हाही दृष्टिकोन यात आला असता तर या अग्रलेखास अधिक समग्रता आली असती असे मला वाटते. हिंदूंच्या अनेक दृश्य गोष्टी प्रतिक्रियात्मक आहेत हे लक्षात घेतले तर समस्येचे मूळ अधिक चांगले लक्षात येईल.

नेहरूंबाबत अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे लॉर्ड माउंटबॅटनबरोबरच्या मधुर संबंधांमुळे पंतप्रधानपद मिळू शकते, असे वाटण्याएवढे नेहरू दुधखुळे नक्कीच नव्हते. ‘मुस्लीम हा सत्तेतला व पूर्वीच्या स्वातंत्र्य आंदोलनातला निर्णायक घटक आहे’ हा समज अनेक त्या वेळच्या काँग्रेसी नेत्यांमध्ये होता- त्याचाच परिपाक फाळणी होती.  – डॉ. प्रसाद केळकर, सांगली.

राजकारणासाठी द्विराष्ट्रवादाचा वापर नको!

‘द्विराष्ट्रवादाचे मढे!’ या अग्रलेखात (१० फेब्रुवारी) द्विराष्ट्रवादाच्या हिंदू मांडणीचीही बाजू सांगितली आहे ती उद्बोधक व योग्यच आहे. त्या इतिहासातून लखनौ करार कसा वगळता येईल? लखनौ करार मुस्लीम लीगचे मोहम्मद अली जिना व राष्ट्रीय काँग्रेसचे लोकमान्य टिळक यांच्यात झाला. हा करार डिसेंबर १९१६ मध्ये झाला. या करारानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ व ज्या भागात अल्पसंख्य असतील तिथे संख्येपेक्षा अधिक प्रतिनिधित्व देण्यासाठी मान्यता देण्यात आली. हा करारच धर्माधारित फाळणीसाठी आधारभूत झाला असे समजले जाते. मग लोकमान्य टिळक यांनाही हिंदुत्ववादी संघटना फाळणीसाठी जबाबदार का धरत नाहीत?

दुसरी गोष्ट मुस्लिमांसहित भारताच्या सर्वच धर्मातील रहिवाशांना सोबत घेऊनच भारत बनतो हे समजून घेतले पाहिजे. फाळणीसाठी जेवढी इस्लामी कट्टरता जबाबदार आहे तेवढीच हिंदुत्ववादी कट्टरतादेखील जबाबदार आहे. पुढेही भारताच्या अखंडतेला याच दोन्ही बाजूंच्या कट्टरतेकडून धोका संभवतो. म्हणूनच याचा निवडणुकीत मतध्रुवीकरणासाठी किती वापर करावा हे संबंधित धुरिणांनी ठरवावे. नाहीतर केवळ फसव्या राष्ट्रवादाला काही अर्थ नाही. – विजय लोखंडे, भांडुप (मुंबई)

आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून ‘अखंड’ भारत!

‘द्विराष्ट्रवादाचे मढे’ या संपादकीयात (१० फेब्रुवारी) त्याचे जनकत्व हिंदुत्ववाद्यांकडेच कसे आहे हे साधार स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र नंतर हा सिद्धांत मुस्लीम नेत्यांनीही उचलून धरत जी फाळणीची मागणी केली त्यामागे त्यांची एक साधार भीतीही होती :  ब्रिटिशांचे राज्य या देशातून गेल्यावर या देशात लोकशाही म्हणजे प्रत्यक्षात बहुसंख्याकांचेच राज्य येणार आणि त्यात मुस्लिमांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाईल ही ती भीती. (ब्रिटिश गेल्यावर येथे सवर्णाचेच राज्य येणार आणि आपल्याला पुन्हा पेशवाई काळातील जीवन जगावे लागणार अशी भीती दलित समाजालाही त्या वेळी वाटत होती, हेही विसरता येणार नाही.)

मुस्लिमांच्या मनातील ही भीती दूर व्हावी म्हणून काँग्रेस नेते मुस्लिमांच्या कलाने वागण्याचे धोरण अवलंबत होते (ज्याला हिंदुत्ववादी मुस्लिमधार्जणिेपणा ठरवत होते) तर त्याच वेळी हिंदुत्ववादी नेते फाळणी टाळण्यासाठी कोणतेही लढे न उभारता ‘शठम् प्रति शाठय़म्’च्या प्रेमात पडून मुस्लिमांना शाब्दिक धमकावत होते. मात्र त्यामुळे मुस्लिमांच्या मनातील मूळ भीती अधिकाधिक दृढ होत त्यांच्या मनातील फाळणीची भावना प्रबळ होत होती. ‘मुस्लीम लीगची औलाद वाटण्यासारखी जी हिंदुसभा तिने पाकिस्तानच्या कल्पनेला बळ चढू देण्यास मदत केली. हिंदूंबद्दल मुसलमानांना वाटणाऱ्या अढीची कारणे खरी असोत वा नसोत, हिंदू महासभा त्यांना खरेपणा आणू पाहात होती’ – असे प्रा. न. र. फाटक यांचे विश्लेषण आहे. दुसरे असे की, फाळणी म्हणजे देशाच्या दृष्टीने इष्टापत्तीच कशी आहे हे मांडणारा दृष्टिकोनही विचारात घेण्यासारखा आहे. यात डॉ. आंबेडकर प्रमुख होते. ते म्हणतात, ‘अखंड भारत स्वतंत्र भारताशी विसंगत आहे. तरीही काही चमत्कारांमुळे भारत एकसंध राहिला (त्या वेळच्या परिस्थितीत ‘भारत एकसंध राहणे’ याला आंबेडकर चमत्कार मानतात ते का, हेही विचारात घ्यावे) तर एक गोष्ट निश्चितच घडेल; ती म्हणजे हे संघराज्य टिकले तर त्याचा चतन्यक्षय होईल. एकसंधता शिथिल होईल, नागरिकांचे प्रेम आणि विश्वास कमी होईल, नैतिक आणि भौतिक साधनसामग्रीच्या स्रोतांच्या विकासाची गती मंद होईल. भारत एक रक्तक्षयी आणि रोगट देश होईल, एक जिवंत प्रेत – मृत पण तरीही दफन न केलेलं’ (लोकमान्य ते महात्मा, पृष्ठ :   ११३४)

– अनिल मुसळे, ठाणे पश्चिम

loksatta@expressindia.com