‘शाहीनबागेतील शांतीधडा!’ हा लेख (लालकिल्ला, २ मार्च) वाचला. मुळात शाहीनबागेतील आंदोलनाला ‘शांततापूर्ण आंदोलन’ म्हणणेच बरोबर नाही. गेल्या १५ डिसेंबरपासून, म्हणजे गेले अडीच महिने राजधानी परिसरातील एक महत्त्वाचा महामार्ग (राजधानी दिल्लीला नोएडा व फरिदाबाद यांच्याशी जोडणारा) काही आंदोलकांनी अडवून धरलेला आहे. या आंदोलनामुळे रोज सुमारे एक लाख वाहनांचा खोळंबा होत असून प्रवासाचे मार्ग बदलावे लागल्याने, हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. या प्रवाशांत रोजगारासाठी नेहमीच दिल्ली-नोएडा प्रवास करावा लागणारे रोजंदारीवर अवलंबून असणारे गरीब कामगार मोठय़ा संख्येने असणार. त्यामुळे कौतुक करायचे झाले, तर जे लोक हा त्रास विनाकारण गेले अडीच महिने सहन करत आहेत, त्यांचे करावे लागेल; त्यांना वेठीस धरणाऱ्या आंदोलकांचे नव्हे.

एखादे आंदोलन ‘हिंसक’ झाले, असे म्हणण्यासाठी लोकांनी प्रत्यक्ष हातात दगड/ शस्त्रे घेण्याचीच गरज असते, असे नाही. तथाकथित ‘शांततापूर्ण’ आंदोलनाने हजारो दैनंदिन प्रवाशांचे, मजुरांचे हाल होत असतील, तर ते आंदोलन शांततापूर्ण म्हणून गौरवणे, हे लोकांच्या विनाकारण होणाऱ्या हालांना अगदीच तुच्छ लेखणे होय.  – श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

 अवहेलना करूनही ‘लोकशाही मार्ग’..

‘लालकिल्ला’ या सदरातील ‘शाहीनबागेतील शांतीधडा!’ हा लेख (२ मार्च) वाचला. भाजपने राखलेले विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य दिल्लीत हिंसेचा वणवा पेटलेला असताना, दक्षिण दिल्ली भागात येणाऱ्या शाहीनबागेत मात्र शांततेचे साम्राज्य पसरलेले होते.. ते का? ज्या मुलुखमदानी जिव्हारूपी अस्त्रातून, ‘गोली मारो’चा प्रचार करून, विरोधकांना नामोहरम करण्याचे षड्यंत्र रचले जात होते, तिथे शांततेची अपेक्षा ती कशी करावी?  दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी तर, शांतता प्रस्थापित करण्याऐवजी थेट राजघाटावर मौन सत्याग्रह करण्याचा बालिश हट्ट धरावा, हे सहज घडलेले नाही. गृहमंत्री अमित शाह बरोबर मांडीला मांडी लावून झालेल्या भेटीनंतर केजरीवाल यांचा ताल पुरेपूर बिघडल्याचे दिसते. अमित शाह यांनी केजरीवाल यांचा ‘ब्रेनवॉश’ तर केला नाही ना?

तीच गत गृहमंत्री अमित शहा यांची व्हावी, हा दैवदुर्विलास नव्हे तर काय? काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेताच या मदांध नेत्यांना शांतता प्रस्थापित करण्यासाठीची आवाहने आठवली. विशेष म्हणजे, दंगल नियंत्रणाची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे सोपवून शाह यांना लोकांपासून अलिप्त ठेवण्याची खेळी म्हणजे ‘शतरंज की चाल’ म्हणावी लागेल, कारण ज्या नेत्यांनी आधीच हिंदुत्वाच्या नावाने रणभेरी फुंकल्या, ते कोणत्या नाकाने जनतेत शांततेचे आवाहन करू शकणार होते?  लोकशाही मूल्यांची अवहेलना करूनही जनमतावर आपले वर्चस्व प्रस्थापित  करण्यात नेते पटाईत असतात, हेही दंगलीमुळे उघड झाले. –  डॉ. नूतनकुमार सी. पाटणी, औरंगाबाद</strong>

लोकांच्या मनाचे व मताचे अपहरण

‘‘विदा’नंद शिव सुंदर ते..!’ (२ मार्च) हा अग्रलेख राज्यकत्रे आणि ‘प्रजा’ यांच्या मानसिकतेवर उपरोधिक भाष्यही करणारा आहे. प्रजेला स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याच्या फंदात पडू न देता कशात तरी गुंतवून ठेवणे, पर्यायाने मानसिक गुलामगिरीत ठेवणे, ही राज्यकर्त्यांची पुरातन कला आज एकविसाव्या शतकातसुद्धा कशी जिवंत व प्रभावी आहे याचा प्रत्यय या अग्रलेखातून येतो. यात विशेष म्हणजे राज्यकर्त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आपल्या या कलेत कालानुरूप, परिस्थितीनुरूप बदल केलेला (चित्रवाणी वाहिन्या/ समाजमाध्यमे) दिसतो आहेच. ‘प्रजा’ मात्र आपली गुलामगिरीची परंपरागत मानसिकता घट्ट कवटाळून बसलेली दिसत आहे. आपल्यासमोर एका क्लिकने किंवा टचने इंटरनेटच्या महाजालावर असलेल्या प्रचंड ‘विदे’चा खजिना उघड होऊ शकतो व ‘सर्च इंजिन’च्या साहाय्याने आपल्यावर राज्यकर्त्यांनी लादलेल्या माहितीची शहानिशा आपण करून घेऊ शकतो, एवढा साधा ताíकक विचारसुद्धा माणसे करू शकत नाहीत, हे आज पदोपदी जाणवणारे भीषण वास्तव प्रजेच्या या गुलामगिरीची प्रचीती आणून देते. खुबीने ‘विदा’वापर करून उद्या ‘‘देशात धार्मिक विद्वेष, जातिभेद, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, गुन्हेगारी अस्तित्वातच नाही’’ आणि ‘‘राज्यकत्रे हे साक्षात दयाळू, कृपाळू देवाचे अवतार आहेत’’ असे प्रजेच्या मनावर ठसवले गेले की प्रजाही ‘विदा’-नशेत सुखाने माना डोलावू लागेल! यात आपला भारत देश आघाडीवर नसला तरच आश्चर्य वाटावे अशी परिस्थिती आहे. विज्ञानाचा व लोकशाहीचा वापर करूनच लोकांच्या मनाचे व मताचे अशा प्रकारे केले जाणारे अपहरण आपल्या देशातील विज्ञान व लोकशाहीलाच घातक आहे.  – उत्तम जोगदंड, कल्याण 

बाजारात ‘फुकट’ काहीही नसते!

‘‘विदा’नंद शिव सुंदर ते..!’ हे संपादकीय (२ मार्च) वाचले. विदावापराची लोकांना सवय लावायची, लोकांना विदेशिवाय राहणे अशक्य वाटेल अशी परिस्थिती निर्माण करायची. मग हळूहळू दर वाढवीत न्यायचे आणि लोकांना वाढीव खर्च करायला भाग पाडायचे, असे हे मार्केटिंग तंत्र असावे. लोकांकडून प्राप्त विदेचा गरवापरदेखील फार मोठय़ा प्रमाणात केला जातो. ही विदा पुन्हा ‘मार्केटिंग’साठी वापरली जाते. उदाहरणार्थ, सध्या नववीत  असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना क्लासेसवाल्यांचे, त्यांच्याचकडे क्लास लावण्यासाठी सतत फोन कॉल येत आहेत. क्लासेसकडे पालकांचे मोबाइल क्रमांक कसे गेले? अमेरिकेसारख्या देशात निवडणुकीत विदेचा गरवापर करून सरकार अस्तित्वात येऊ शकते.  विदेला मोठे विक्रीमूल्य आहे. तेव्हा बाजारात उगाचच कुणीही फुकट  काहीही देत नसते, हे सर्वाना लवकरात लवकर कळावे. – विवेक चव्हाण, शहापूर (ठाणे)

 बँक कर्मचारी- चर्चा अडते कुठे?

मार्चमध्ये होणारा तीन दिवसांचा संप बँक कर्मचाऱ्यांनी २९ फेब्रुवारी रोजी झालेल्या चच्रेनंतर मागे घेतला. त्या चच्रेत काय मिळाले याचा तपशील जाहीर केलेला नाहीच. ज्या प्रश्नांसाठी हा संप आहे, त्यांवर किमान ४१ वेळा चर्चा झाल्या आहेत. मग ४२ व्या चच्रेत प्रश्न का सुटू शकला नाही हे एक कोडेच आहे. सन २००० च्या स्वेच्छानिवृत्तीनंतर बँक संघटना कमकुवत झालेल्या आहेत, असे वाटते. विद्यमान कर्मचाऱ्यांचेच घोडे पुढे सरकत नसेल तर निवृत्तिवेतन वाढविण्याचा प्रश्न गेल्या अनेक वेतन कराराप्रमाणे पुढे ढकलला जाईल हे आता स्पष्ट दिसू लागले आहे. फार तर, कुटुंब निर्वाहवेतनात काहीशी वाढ करून निवृत्तांसमोर तुकडा टाकला जाईल व सरसकट पेन्शन वाढीचा मुद्दा ‘पुढील चच्रेत घेऊ’ असे सांगून निवृत्तांच्या तोंडाला नेहमीप्रमाणे पाने पुसली जातील! कदाचित बँकांच्या विलीनीकरणाचा प्रश्न ऐरणीवर असेल व तेथेच चर्चा थबकत असेल. गेली दोन-तीन वर्षे संप करून ग्राहकांचा रोष ओढवून घेऊन संघटना काय पदरात पाडून घेणार आहेत ते कळेनासे झाले आहे आणि कर्मचारी-अधिकारी संघटनांना जर चच्रेचे गुऱ्हाळ चालूच ठेवायचे असेल तर संप तरी कशाला जाहीर करतात? – कुमार करकरे, पुणे

वैज्ञानिक दृष्टिकोनाला विवेकशक्तीची जोड हवी

‘घरचे वारेच बदलले पाहिजे’ या अग्रलेखात (२९ फेब्रुवारी) विज्ञान वापरून अविज्ञान पसरविले जात असल्याचा उल्लेख उचित आहे. विज्ञानाची ही ऐशीतशी खेदजनक आहेच त्याबरोबरच विज्ञानाचा समाजविघातक गोष्टींसाठी वापर ही बाबही गंभीर आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर वैज्ञानिक दृष्टिकोनावरील आपल्या भाषणांत हा मुद्दा आवर्जून मांडीत असत. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुढची पायरी म्हणजे विवेकवाद.  वैज्ञानिक दृष्टिकोनाला नीतिमूल्यांची जोड देऊन विवेकवाद बनतो. तेथे ‘सत्य काय’ याबरोबर ‘इष्ट काय’ हाही प्रश्न येतो. याचे साधे, सुंदर उदाहरण डॉ. दाभोलकर देत. गणेशोत्सवात मूर्ती लहान करा, पार्थिवाची म्हणजे मातीची करा किंवा धातूची पुनर्वापर करता येईल अशी करा म्हणजे पर्यावरण रक्षण होईल, असे आपण म्हणतो. हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन. पण गणेश बुद्धीची देवता आहे तेव्हा ‘गोळा केलेल्या वर्गणीतील दोन टक्के रक्कम वस्तीतल्या शाळेसाठी द्या’ असे सांगणे ही झाली माणसाच्या विवेकबुद्धीला घातलेली साद.

एका बौद्ध प्रवचनातील वचनाने विज्ञानाची ही दुधारी (एक चांगली आणि एक वाईट) कळते. ते वचन सांगते की, देवाने प्रत्येक माणसाला स्वर्गाचे दार उघडणारी एक किल्ली दिली आहे. पण त्यात मेख अशी आहे की, त्याच किल्लीने नरकाचेही दार उघडते. आपल्याला ‘कुठले दार कोणते’ हेच जर समजले नाही तर?  सोनोग्राफी व्यंगचिकित्सेसाठी वापरायची की स्त्रीभ्रूणहत्येसाठी, हे आपल्याला उमगणे गरजेचे आहे. त्याबाबत निर्णय विवेकबुद्धी वापरून घ्यायला हवा.

अशा रीतीने वैज्ञानिक दृष्टिकोनाला नीतिमूल्याची जोड देऊन तयार झालेल्या विवेकशक्तीने माणूस आपले धर्मविद्वेषाचे, सामाजिक असमानतेचे, पर्यावरण असमतोलाचे, तसेच युद्धसंघर्षांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवू शकतो. विज्ञान सांगते की मानवी जनुकांच्या जोडय़ांत अवघा ०.६ टक्के फरक संभवतो. मग जाती-जातीमधील, विविध धर्मामधील विद्वेषाला, भेदभावाला काय आधार उरला? म्हणून पं. नेहरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ही आपली विचारपद्धती, कार्यप्रणाली आणि जीवनशैली मानली पाहिजे. आपले सर्व व्यवहार हे माणसाचे या जगातील लौकिक जीवन सुखावह व्हावे या दृष्टिकोनातून झाले पाहिजेत. माणसाच्या ऐहिक कल्याणाआड येणाऱ्या संस्थांना आणि विचारांना आपण विरोध केला पाहिजे.

– प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)

loksatta@expressindia.com