02 June 2020

News Flash

संयत, ठाम मांडणीचा ‘विजय’

‘मानव विजय’ ही लेखमाला संपूर्ण वर्षभर वाचनीय राहिली.

निधर्मीवाद म्हणजेच निरीश्वरवाद हेदेखील खरे आहे. ‘जगामाजी धर्म अगणित होती, लढाया खेळती रेडय़ापरी’, असे महात्मा जोतीराव फुले यांनी म्हटले आहे. मानवाचा धर्म एकची असावा.

‘मानव विजय’ ही लेखमाला संपूर्ण वर्षभर वाचनीय राहिली. अतिशय तर्कशुद्धपणे आणि शास्त्रीय संदर्भासहित व्यक्त केले गेलेले विचार वाचक म्हणून पटत होते. विशेषत: गत चार-पाच लेखांमधून निरीश्वरवादाचा पुरस्कार करताना शब्द आणि भाषेमध्ये कोणताही आक्रस्ताळेपणा न करता (बहुतेक नास्तिकवादी आपला मुद्दा तावातावानेच सांगतात.) संयत भाषेत पण ठामपणाने मांडणी केल्याने लेख वाचकांना भावले.
निधर्मीवाद म्हणजेच निरीश्वरवाद हेदेखील खरे आहे. ‘जगामाजी धर्म अगणित होती, लढाया खेळती रेडय़ापरी’, असे महात्मा जोतीराव फुले यांनी म्हटले आहे. मानवाचा धर्म एकची असावा. तो सत्यधर्म असावा असेही ते म्हणत. हाच विचार पुढे नेला पाहिजे. फुल्यांच्या काळात दीडशे वर्षांपूर्वी आधुनिक विज्ञान जरी अस्तित्वात होते, तरी ते आजच्याइतके प्रगत निश्चितच नव्हते. त्यामुळे विश्वनिर्मिती करणाऱ्या ऊर्जेला त्यांनी निर्मिक असे संबोधले. चार्वाकाच्या काळात आधुनिक विज्ञान नव्हते, तरीही त्यांचे विचार आजच्या विज्ञानवादाला धरून होते.
गॅलिलिओने पृथ्वीविषयी शास्त्रीय सत्य शोधले व जगाला सांगितले तेव्हा त्याला त्याची वाईट पद्धतीने किंमत मोजण्यास धर्मसमर्थकांनी भाग पाडले. वैज्ञानिक विचार जेव्हा जेव्हा मांडला गेला तेव्हा तेव्हा धर्मसमर्थकांनी त्याला कडवा विरोध केला. तरीही कालांतराने हे वैज्ञानिक विचार केवळ टिकूनच राहिले नाहीत तर कडव्या धर्मसमर्थकांनीही मान्य केले.
मुद्दा हा की, जसजसे वेगाने वैज्ञानिक संशोधन होऊन जगापुढे येईल तसतसा धर्मसमर्थकांचा हा विरोध अधिकाधिक कडवा व तीव्र होत जाईल. आज जग नेमके या अवस्थेत आहे.
वेगवेगळ्या धर्माचे मूलतत्त्ववाद आज दहशतीचा पुरस्कार करीत आहेत. कारण आता धर्माची आणि धर्मसमर्थकांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. विज्ञानाच्या ‘हायस्पीड’मुळे ही लढाई जरी अधिक तीव्र होते आहे असे आणखी काही काळ वाटत राहिले (किंवा तसे घडलेच) तरीही दीर्घकालानंतर धर्मसमर्थकांना पराभूत व्हावेच लागेल. कारण वैज्ञानिक सत्य फक्त अस्तित्वात असेल आणि ते जनमान्यही झालेले असेल. यातूनच मग ह्य़ूमन फिजिऑलॉजीकडून मृत्यूविषयीचे वैज्ञानिक सत्यही बाहेर येईल. तेव्हा आत्मा-परमात्माची भाषा आपोआप थांबेल. अर्थातच ईश्वराची गरजही उरणार नाही.
– डॉ. कैलास कमोद , नाशिक.

संपलेल्या अधिवेशनानंतर उरलेले प्रश्न
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवारी संपले. या अधिवेशनात सभागृहात बोलताना अगदी सगळ्यांनाच चीतपट करण्याची हातोटी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांचा बोलण्याचा पवित्रा बघून, त्यांचे म्हणणे पटू लागते, असे हे वक्तृत्व आहे.
पण अधिवेशन संपले, मुख्यमंत्र्यांची ती भाषणेही ऐकली, तरी शेवटी मनात काही प्रश्न शिल्लक राहतातच-
* कापसाला ५,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव असताना उपोषण करणारे भाजप नेते व सध्या फडणवीस यांचे ‘खास’ सहकारी गिरीश बापट हे आज कापसाचा भाव अवघा ४,००० रु. असताना काहीच का करू शकत नाहीत?
* केळी उत्पादक सध्या मिळणाऱ्या भावाने त्रस्त असतानाही, केळी उत्पादक मतदारसंघातून निवडून आलेले एकनाथ खडसे यांना ३८ लाख रुपयांचे अनुदान- तेही ‘गुलाबाच्या’ शेतीवर, हे कसे?
* शेतकऱ्यांपर्यंत कधीच न पोहोचणारे, पण गगनालाच भिडणारे तूरडाळ आणि लसूण यांचे भाव कधी उतरणार?
* शिक्षण खात्याने महापुरुषांचे १३९५ रुपयांना एक इतके पैसे मोजून कोणते फोटो घेतले?
* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यासाठी लढले त्या अनेकांना हक्काची पत्र्याची खोलीही मिळत नसताना बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकांचा त्या शोषितांना उपयोग काय?
* कुंभासाठी २३०० कोटी रुपयांचा प्रवाह वाहू देणारे हे सरकार कापूस, केळी, सोयाबिन, धान, संत्री यांच्या हमीभावात अशीच शेकडा-कोटींमध्ये जाणारी घसघशीत वाढ का करू इच्छित नाही?
* व्यापाऱ्यांसाठी ८०० कोटींचा ‘एलबीटी’ माफ करताना मागेपुढे न पाहणाऱ्या या सरकारला, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वेळीच राज्यावरच्या कर्जाचे आकडे आठवू लागतात का?
– योगेश पाटील, नाचणखेडा (जामनेर, जि. जळगाव)

कायदे लोकांसाठीच आहेत, तर हतबलता का?
‘पौगंडपर्व’ हा संपादकीय लेख (२२ डिसेंबर) व त्याच दिवशी योगेंद्र यादव यांच्या ‘देशकाल’ सदरातील ‘बदला हवा की बदल’ हे दोन्ही लेख १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत झालेल्या निर्घृण बलात्कार प्रकरणाशी संबंधित असे होते. नेमके याच दिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे २१ तारखेला आपल्या देशाच्या कायदेमंडळाने ‘बालन्याय सुधारणा विधेयक’ मंजूर केले, त्याचेही पडसाद दोन्ही लेखांत होते. या कायद्यातील तरतुदीनुसार गंभीर गुन्ह्य़ांमध्ये १६ ते १८ या वयोगटातील गुन्हेगारावर प्रौढाप्रमाणे खटला भरण्याची व्यवस्था केली आहे. म्हणजेच या कायद्यानुसार १६ ते १८ या वयोगटातील गुन्हेगार हा बाल गुन्हेगार न समजता त्याला प्रौढ गुन्हेगार समजून त्याप्रमाणे शिक्षा करण्यात येईल.
स्व. राजीव गांधी यांच्या कार्यकाळातच (१९८६ साली) १६ वर्षांखालील गुन्हेगार हा बाल गुन्हेगार समजला जाईल असा कायदा मंजूर होता. मात्र पुढे अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात (२००० साली) बाल गुन्हेगाराची व्याख्या बदलून १८ वर्षांखालील गुन्हेगार हा बाल गुन्हेगार समजला जाईल असा बदल करण्यात आला. दिल्लीच्या बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार हा गुन्हा करत असताना त्याचे वय हे १८ वष्रे पूर्ण होण्याला काही महिनेच शिल्लक इतके असल्याने तो कायद्याच्या भाषेत बाल गुन्हेगार या व्याखेत बसला आणि वयाच्या विसाव्या वर्षी तीन वष्रे सुधारगृहात काढून सुटलाही. त्याची सुटका करू नये म्हणून सामाजिक संस्था तसेच तरुण वर्गाने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या उद्रेकाला ‘भावनिक’ ठरवण्याचा प्रयत्न झाला (दोन्ही लेखांतही तसा सूर आहे). दिल्ली महिला आयोगाने तशी याचिकाही दाखल केली; परंतु कायद्याच्या तरतुदींचे कारण सांगून न्यायालयाने हतबलता दर्शवली. हे सगळे पाहिल्यानंतर मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की, कायदे नेमके कोणी आणि कुणासाठी तयार केले आहेत? कायदे हे आम्हीच आमच्यासाठी तयार केले असतील तर अशी हतबलता दाखवण्याची वेळ आमच्यावर का यावी?
– दादासो संभाजी हजारे, कुमठे (तासगाव, जि. सांगली)

हीदेखील वसुली झाल्यास भले
‘बरे झाले देवा..’ हा अग्रलेख (२४ डिसेंबर) वाचला. त्यात नवीन कायद्याप्रमाणे दिवाळखोरीत जाण्याचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे बँकांची देणी बुडणार नाहीत, त्यामुळे त्याचे स्वागत केले पाहिजे असे म्हटले आहे, ते योग्यच आहे. पण एखादी कंपनी विद्यमान कायद्याप्रमाणे पुनरुज्जीवित करण्याच्या प्रक्रियेत असताना बुडते किंवा बुडू दिली जाते त्या वेळी बँकांचेच पसे बुडतात असे नाही तर तिला वीज, पाणी, या सेवा पुरवणाऱ्या इतर आस्थापनांचेही पसे बुडतात. त्यात भरपूर थकबाकीची शक्यता असते, कारण पुनरुज्जीवनाच्या सबबीखाली थकबाकी असूनही सेवा खंडित न करण्याची सवलतही दिली जात असण्याची शक्यता असते. नवीन कायद्याप्रमाणे त्याचीही थोडीफार वसुली झाली तर चांगलेच आहे.
– शरद कोर्डे , ठाणे

उद्योगांचे ‘दयामरण’ कामगारांच्या जिवावरचे
उद्योगांच्या दिवाळखोरीचा उन्मादपूर्ण उत्सव साजरा करणारा अग्रलेख (२४ डिसें.) वाचला. उद्योग बुडण्यापूर्वीच त्याला वेदनारहित दयामरण देण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. उद्योग बुडाला की नुकसान होते ते बँकांचे आणि सामान्य गुंतवणूकदाराचे आणि उद्योगपतींना त्यांच्या उद्योगांची (मतलबी) पुनर्रचना करणे शक्य होत नाही. आपल्याकडे (‘अजागळ’!) समाजवादाचा पगडा असल्यामुळे आपल्याकडच्या उद्योगपतींच्या नवोन्मेषशाली (आíथक आणि बेपारी) प्रतिभेला वाव मिळत नाही. त्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होते. मात्र उद्योग बुडाला किंवा बंद केला तरी दोन्ही पर्यायांत मरण ओढवते ते कामगाराचे. उद्योजकाच्या केसालाही धक्का लागत नाही.
कामगाराला मरू द्यायचे की उद्योगाला मरू द्यायचे, या पर्यायातील ‘कामगार मरो’ हा पर्याय सरकारने निवडला ते बरेच झाले. न्यायसंस्थेलाही बाजूला सारून कंपन्या बुडू नयेत या सद्हेतूने त्या विनासायास बंद करण्याचा अधिकार भांडवलदारांना बहाल केला आहे. कंपन्यांतील बेकार होणाऱ्या कामगारांना उद्योगांच्या ‘पुनर्रचने’तून साकार होणाऱ्या नव्या उद्योगात नव्या (वेठबिगारी) कामगार कायद्यानुसार रोजगार मिळूही शकेल! उद्योगपतींच्या (गेल्या फक्त सहा वर्षांतीलच) पाच लाख कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली करण्यास आपली कथित (अजागळ) समाजवादी व्यवस्था असमर्थ ठरत आहे. त्यावर उपाय शोधणे आपल्याला मान्य नाही. कारण आता आपण आपला मार्गच बदलला आहे. या रस्त्यावर हे थांबे लागतच नाहीत.
– प्रमोद तावडे, डोंबिवली

चैतन्य ‘आहे’ तर त्याबद्दलची कृतज्ञता नाकारण्याची घाई कशाला?
‘मानव विजय’ या लेखमालेत नोव्हेंबरअखेरच्या दोन तीन लेखात शरद बेडेकर यांनी निरीश्वरवादावर लिहिले आहे. बेडेकर ‘वैश्विक भौतिक शक्ती’चे अस्तित्व मान्य करतात. तिला त्यांनी ‘चतन्य’ असे नाव दिले आहे. ती शक्ती इतर भौतिक ऊर्जासारखीच (प्रकाश, ऊष्णता, विद्युत्चुंबकीयत्व आदी) आहे, तिला माणसाशी काही देणे घेणे नाही, असे त्यांचे म्हणणे अहे. ते काही अंशी खरे आहे. मात्र, सजीव प्राणी जन्मापासून आणि नंतर आयुष्यभर ‘प्रोग्राम्ड’ असल्यासारखे वाढतात/ वागतात . संगणकाची परिभाषा वापरायची झाल्यास त्यात प्रोग्राम्स (आज्ञावली) घालावे लागतात, संगणक स्वत ते बनवीत नाही. सर्व सजीवांचे (वनस्पति, प्राणी)आपापले स्वतंत्र प्रोग्राम कुणीतरी बनविले आहेत वेळोवेळी त्यात बदलही केला जातो. बेडेकर या ‘कुणीतरी’ला ‘चतन्य’ म्हणतात. त्या शक्तीला जीवसृष्टीवर सतत लक्ष ठेवावयाचे झाल्यास दृष्टी, संवेदना, बुद्धी, उपाय काय करायचा ते माहिती असणे, तो करता आला पाहिजे; मुख्य म्हणजे तो करण्याची इच्छा असायला हवी. हे सगळे होत आले आहे.. म्हणजे चतन्य इतर ऊर्जासारखे निर्जीव नसून सजीव आहे. जीव सृष्टीतील उत्क्रांती त्या चतन्याने ती योजना पूर्वक सतत प्रयोग करत राहून ती घडवून आणली आहे.
मानव हा उत्क्रांतीतला परमोच्च िबदू, म्हणून त्याच्याकडे इतर प्राण्यांच्या मानाने कैकपट अधिक बुद्धी आहे, विचार करण्याची शक्ती व इच्छा आहे, हे विचार/ इच्छा तो व्यक्तही करू शकतो. नवी वस्तू घडवू शकतो.(अद्याप त्याला निर्जीव वस्तूत जीव घालता आलेला नाही).
आज विज्ञान सांगते की, अमुक एक भावना अमुक एक होर्मोन किंवा रसायन शरीरात तयार झाल्यामुळे उत्पन्न होते. विज्ञानाने आपणाला येथपर्यंत आणून सोडले आहे.. मानव जातीच्या सुरुवातीला त्याला सारे जग- विश्व नवखे होते त्याच्या ‘प्रोग्राम्स’नी त्याला जगायला शिकवले. त्याने ती शिकवण पुढील पिढय़ांच्या सुपूर्द केली. चंद्र सूर्य तारे वगरे तो पाहात होता, त्याबद्दलची काही माहिती नव्हती, पण जाणून घेण्याची जिज्ञासा होती.. त्या जिज्ञासेने माणसाला येथवर आणले आहे
चतन्य माणसाला जाणवत होते पण दिसत नव्हते. त्याच्याशी संवाद साधता येत नव्हता पण हे चतन्य आपल्या येथील अस्तित्वास कारणीभूत आहे याची त्याला जशी जाणीव झाली तशी त्याच्या मनात चतन्याबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. कृतज्ञता ही भावना माणसाला चतन्याकडून तर मिळाली नसेल ?
ईश्वराची संकल्पना या कृतज्ञतेच्या भावनेतून निर्माण झाली आहे. माणसाने त्या चतन्याला देवत्व दिले. या चतन्याने समग्र सजीव सृष्टीसाठी- वनस्पती, कीटक, पक्षी, प्राणी, माणूस सर्वासाठी अगणित प्रयोग केले. सूक्ष्मात सूक्ष्म ते मोठय़ात मोठी कोणतीही जात जी त्याने जन्मास घातली- स्वयंपूर्ण केली व ती पुढे चालू राहील अशी योजनाही करून ठेवली. उत्क्रांती सर्व प्राणीमात्रांत सुरू होती. आपल्या पुराणांत दशावतार सांगितले आहेत, ते उत्क्रांतीचे द्योतक अहेत. हा योगायोग, कविकल्पना की उत्क्रांतीज्ञान ?
ह्या सगळ्याचा अर्थ इतकाच की चतन्य सर्वव्यापी सर्वकालीन, सर्वज्ञ होते आणि आहे, उत्कांती जिला कोटय़वधी वष्रे लागली ती चालू राहण्या मागे तेच चतन्य कोटय़वधी वष्रे असले पाहिजे कारण तीत सातत्य दिसते.
मला ईश्वर ह्या संकल्पनेत-कृतज्ञता, श्रद्धा प्रेम ह्या भावना दिसतात. तेव्हा जर चतन्य नाकारायचे नाही तर ईश्वर का नाकारायचा? मूळ संकल्पनेला काळाच्या ओघात विकृत स्वरूप आले इश्वराची संस्थाने झाली, तो कुणा एका वर्गाची मक्तेदारी झाली. या सगळ्या अनिष्ट गोष्टी घडल्या आहेत घडत आहेत हे मला मान्य आहे. पण वरील कारणांसाठी निरीश्वरवादी होणे फार कठीण आहे
आपल्या श्रद्धेचा दुसऱ्या कुणाला त्रास होऊ नये – दुसऱ्या कुणावर जबरदस्ती होऊ नये एवढे जरूर पहावे. दृष्टिकोन वैज्ञानिक असावा हेही मान्य आहे परंतु केवळ कृतज्ञतेपायी श्रद्धा ठेवली तर त्यात गर काही नाही ईश्वरावरील श्रद्धा माणसाला पापभिरू बनवते हा मोठाच फायदा आहे. बेडेकर म्हणतात त्याप्रमाणे आपण सगळे हळू हळू निरीश्वरवादी होत अहोत. पण ईश्वराला नाकारण्याची एवढी घाई का ? चतन्य काही कोटी वष्रे प्रयोग करत आहे. माणसाला चतन्याचे ज्ञान होऊन काही हजार वष्रेच झाली आहेत विज्ञानात आपली प्रगती खूप वेगाने होते आहे.. कुणी सांगावे, हे शतक संपण्या अगोदर आपल्याला चतन्याचे स्वरूप दिसेलही!  बेडेकरांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन
– सुरेश देवळालकर, हैदराबाद

वाचक-पत्र ते माध्यम-चर्चा
‘ते आपल्या जातीचे नाहीत म्हणून गप्प कसले राहता?’ हे पत्र (लोकसत्ता, २३ डिसें.) वाचले. ब्राह्मण मुलाचा ऑनर कििलगमधून खून झाल्यानंतर ज्या प्रकारे पुरोगामी चळवळी गप्प राहिल्या, हे धक्कादायक असल्याचे त्या पत्रातील म्हणणे योग्यच होते. या पत्राची दखल घेऊन २३ डिसें. रोजी एका मराठी वृत्तवाहिनेने याच विषयावर चर्चा आयोजित केली.. या चच्रेत सूत्रसंचालिकेने स्पष्ट केले की, चर्चेत हा सवाल येण्यामागचे कारण म्हणजे प्रकाश पोळ यांचे ‘लोकसत्ता’मध्ये अशा प्रकारचे पत्र प्रसिद्ध झाले आहे.
‘लोकसत्ता’च्या वाचक-पत्राची दखल घेऊन एका वृत्तवाहिनीवर चर्चा आयोजित केली जाते, ही ‘लोकसत्ता’ आणि त्यांच्या वाचकांसाठी अभिमानास्पद बाब आहे.
– रोहित शंकर घनवट, राजापूर, ता. खटाव, जि. सातारा.

एकसंध समाजासाठी मनुस्मृतीविषयी पूर्वग्रह नको
‘‘मनुस्मृती दहन दिन’ सरकारी पातळीवर का नाही?’ हे पत्र (लोकमानस, २४ डिसें.) वाचले. मनुस्मृती दहन करण्यामागची पूज्य बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती याबाबत प्रबोधन करावे, हे त्यातील म्हणणे योग्यच आहे. कारण त्या घटनेला ८७ वष्रे होऊन गेली आहेत व त्या काळातील सामाजिक परिस्थिती, त्याचे त्यांना बसलेले चटके, स्वत: ते ज्या जातीत जन्मले त्या ज्ञातिबांधवांची दयनीय स्थिती पाहून त्यांतून त्यांना बाहेर काढण्याची त्यांची तळमळ या सर्वाचा परिणाम म्हणून व या सगळ्याला जबाबदार असणारा ग्रंथ म्हणून त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले असावे, असे म्हणता येईल; परंतु आज ८७ वर्षांनंतरच्या बदललेल्या सामाजिक राजकीय व आíथक परिस्थितीत या विषयासंबंधी वस्तुनिष्ठ अभ्यास व विचार करून समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता आहे असे वाटते.
कारण आज मनुस्मृतीचे प्रामाण्य समाजात किती आहे, हा प्रश्नच आहे. स्वत: मनुनेच लोकमान्यता नसलेल्या व लोकांना त्रासदायक असणाऱ्या गोष्टींचा त्याग करावयास सांगितले आहे. म्हणजेच मनुने सांगितलेले नियम शब्दश: पाळले पाहिजेत, असा त्याचाही आग्रह नाही. धर्मशास्त्र म्हणून मनुस्मृतीकडे बघितले तरी त्याच्या नंतरच्या काळातही अनेक स्मृती निर्माण झाल्या आहेतच. त्यामुळे िहदूंचे धर्मशास्त्र म्हणजे फक्त मनुस्मृती असेही म्हणता येत नाही. मात्र, या विषयासंबंधी प्रबोधन होण्याची पत्रलेखकाने मांडलेली गरज रास्तच आहे.
मात्र हे काम शासनाने करण्याचे नसून हे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तींसारख्या अभ्यासकाने करावयाचे आहे. या विषयावर नाशिकच्याच कै. डॉ. म. बा. कुलकर्णी यांनी २० वर्षांपूर्वीच नाशिकहून निघणाऱ्या अमृत मासिकात २८ लेख लिहिले होते व त्यांचे एकत्रित पुस्तक ‘मनु आणि स्त्री’ या नावाने २००४ मध्ये प्रकाशितही झालेले आहे. अशा अभ्यासातूनच एकांगी व पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन नसलेले निखळ प्रबोधन होऊन संपूर्ण समाज एकसंध राहील, असा प्रयत्न करावा लागेल.
– गोिवद यार्दी, नाशिक.

मनुस्मृती नव्हे, इतर धर्मग्रंथांचीही चिकित्सा करा
‘मनुस्मृती दहन दिन सरकारी पातळीवर का नाही?’ याबाबत ‘लोकमानस’मधील पत्र (२४ डिसेंबर) वाचले. सदर पत्र हे काही प्रमाणात पूर्वग्रहदूषित असल्याचे जाणवते. एक तर मनुस्मृती हा काही िहदूंचा एकमेव धर्मग्रंथ नव्हे. ते एक तत्कालीन समाजाचे नियमन करणारे पुस्तक/ ग्रंथ होते. वेद व भगवत् गीता हे िहदूंचे प्रमुख ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांतील तत्त्वज्ञान हे हिंदू धर्माचे मूळ आहे, असे मानले जाते. तसेच इस्लाममध्ये ‘कुराण’ हा धर्म ग्रंथ व ‘हदीस’ हा पूरक ग्रंथ म्हणून मानला जातो. जर मनुस्मृती माहीत असलेल्यांचे सर्वेक्षण केले तर एक टक्कासुद्धा नसेल. कोणत्याही धर्मग्रंथ, पुराण व इतर पुस्तकात विषमतावादी विचार असल्यास त्याचा विरोध केलाच पाहिजे. पण प्रश्न असा आहे की, एकटय़ा मनुस्मृतीतच विषमतावादी विचार आहेत काय? इतर धर्मीयांच्या ग्रंथांमध्ये विषमतावादी विचार नाहीत काय? इस्लाम, ख्रिस्ती व इतर धर्मीयांच्या ग्रंथांमध्ये विषमता नाही काय? काही ठिकाणी तर ती िहदू धर्मापेक्षाही क्रूर आहे. एकूणच काय, कोणत्याही धर्मातील एक वर्ग सर्व सूत्रे व सत्ता आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करतो. भारत हा जर धर्मनिरपेक्ष असेल तर इतर धर्मग्रंथांचीही चिकित्सा व्हावी. पण दुर्दैवाने ती होत नाही. कारण िहदू धर्म हा ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे.
राहिला प्रश्न मनुस्मृती दहन दिन सरकारी पातळीवर साजरा करण्याचा; त्याला इतर अनेक कारणे असू शकतात. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला त्या घटनेबाबत. काही वर्षांपासून अफझल खान वधाचे पोस्टर लावण्यावर बंदी लादण्यात आली आहे. त्याला तात्कालिक करणे असू शकतात. आजही ती बंदी आहे. अशा सगळ्या प्रकारात सामान्य लोकांना काही देणे-घेणे नसते. अफझल खानाचे फार कोणी समर्थक नसावेत किंवा मनुस्मृतीमधील विषमतावादी विचारांनाही फार कोणाचे समर्थन नसेल. पण निव्वळ कोणी तरी मनुस्मृती दहन करत असेल किंवा अफझल खानाचे पोस्टर लावत असेल तर आपोआप समर्थक व विरोधक निर्माण होऊ शकतात. आणि ‘ते आणि आम्ही’ असे गट तयार होण्याची शक्यता असते. यातून सामाजिक सौहार्दाला धोका निर्माण होऊ शकतो व मूळ उद्देश बाजूला राहतो.
– तुषार सावरकर, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 1:36 am

Web Title: loksatta raiders replay on different issues
Next Stories
1 बदल हवाच, पण कशात?
2 ‘ते आपल्या जातीचे नाहीत’ म्हणून लांब कसले राहता?
3 पूर्वग्रह कायम आहेतच, मग आगपाखड कशाला?
Just Now!
X