18 January 2021

News Flash

‘तारणहारच नाही’ ही भूमिका बदलावी!

‘गांधी घराण्याशिवाय पक्षाला आणि देशाला दुसरा कोणी तारणहार नाही,’ अशी हुजऱ्याची भूमिका घेणे पक्षांतील इतर नेत्यांनी टाळावे.

संग्रहित छायाचित्र

‘तारणहारच नाही’ ही भूमिका बदलावी!

एका बाजूला गांधी कुटुंबाने खऱ्या अर्थाने पूर्णपणे पक्षाच्या आणि देशाच्या राजकारणांतून अंग बाजूला काढून घेऊन फक्त मार्गदर्शकाप्रमाणे जर कोणी विचारले तरच वाटाडय़ाची भूमिका वठवण्याची तयारी ठेवायला हवी. दुसऱ्या बाजूला ‘गांधी घराण्याशिवाय पक्षाला आणि देशाला दुसरा कोणी तारणहार नाही,’ अशी हुजऱ्याची भूमिका घेणे पक्षांतील इतर नेत्यांनी टाळावे. हे यथार्थाने घडले तर आणि तरच काँग्रेस पक्ष उभारी धरू शकेल.

– राजीव मुळ्ये, दादर, मुंबई

पुनर्बाधणीची नितांत गरज

‘सोनिया’चा क्षण’ हे संपादकीय (२४ ऑगस्ट) वाचले. देशात झालेल्या मागील दोन लोकसभा निवडणुकांचा सखोल अभ्यास केल्यास निदर्शनास येते की अ. भा. काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली आहे. बऱ्याच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसला पक्ष पुनर्बाधणीची नितांत गरज आहे. त्यांनी घराणेशाही बंद करून एखाद्या तरुण नेत्यास पक्षाची सर्व सूत्रे द्यावीत. पक्षातील अंतर्गत कलह आणि कार्यकर्त्यांत निर्माण झालेला असंतोष पक्षाला अचूक नेतृत्व देऊन शांत केला जाऊ शकतो.

– फ्रँक डॉ. मिरांडा, वसई (प्रदीप करमकर- ठाणे, संदीप चांदसरकर -डोंबिवली, प्रवीण आंबेसकर – ठाणे, मोहन गद्रे – कांदिवली, नरेन्द्र थत्ते- पुणे यांनीही, काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील पक्षनेतृत्व हवे, असा मुद्दा विविध प्रकारे मांडणारी पत्रे पाठवली आहेत. )

मोदी सरकारवर घसरणे टाळता आले असते

‘‘सोनिया’चा क्षण’ हे संपादकीय वाचले. देशातील सर्वात जुना पक्ष जो लोकशाहीच्या गप्पा तर मारतो, पण पक्षाध्यक्ष निवडीसाठी या पक्षाला निवडणूक घ्यावीशी वाटत नाही. नेहमी अल्पसंख्याक आणि बहुजनांचे राजकारण करणारा हा पक्ष त्यामधून एखाद्याची पक्षाध्यक्ष पदावर मात्र नियुक्ती करू धजावणार नाही. काही काँग्रेसजनांनी पत्रे लिहिली आहेत, मात्र त्यातही राजकारण आहे. तरुण नेते राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत या मतांचे, तर वृद्धांना सोनियाच आपल्या नेत्या हव्यात. आपली वर्णी तर लागणार नाहीच, मग आपल्या प्रतिस्पध्र्याची का लागावी त्यातून ही पत्र उठाठेव. कारण सगळ्यांनाच माहीत आहे, सोनिया यांनी नकार दिल्यावर राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरे आहेच कोण? पण नेत्यांना पत्र पाठवण्याची सुबुद्धी सुचणे हे लक्षण नक्कीच चांगले आहे. त्याचा योग्य तो ऊहापोह करणाऱ्या संपादकीयाच्या पूर्वार्धातील लिखाण मोदी सरकारवर घसरलेले आहे. खरे तर हे टाळता आले असते.

– संजय पालीमकर, दहिसर पूर्व (मुंबई)

जबाबदारी विरोधी पक्षांचीच की माध्यमांचीही?

‘रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था, चीनने गलवान खोऱ्यात चिमटीत दाबलेले नाक, काश्मीरचा न सुटलेला गुंता, एकलकोंडय़ा करोना हाताळणीमुळे निर्माण झालेल्या समस्या आणि लाखो स्थलांतरितांना सहन कराव्या लागलेल्या हालअपेष्टा अशा अनेक घटनांनंतरही यातील काहीही नरेंद्र मोदी सरकारला चिकटत नसेल तर ती काही त्यांची पुण्याई नाही. हे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ढळढळीत अपयश..’ हे  देशाच्या सद्य:स्थितीवरचे ‘‘सोनिया’चा क्षण’ या संपादकीयातील भाष्य भक्त सोडून कोणीही नाकारू शकणार नाही. यास मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेससुद्धा जबाबदार आहे. पण यासाठी केवळ विरोधी पक्षाला जबाबदार धरणे पूर्णत: योग्य नाही. यात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची- माध्यमांचीही भूमिका व जबाबदारीही महत्त्वाची आहे. काँग्रेस सत्तेवर असताना सरकारचे वाभाडे काढणारी माध्यमे आता मात्र सरकारधार्जिणी भूमिका घेताना दिसतात. आपली निसर्गदत्त जबाबदारी पार पाडण्यात माध्यमे सपशेल अपयशी ठरत आहेत. शिवाय काँग्रेस घेत असलेली भूमिकासुद्धा माध्यमे प्रामाणिकपणे लोकांसमोर आणताना दिसत नाहीत.   कमकुवत विरोधी पक्ष व सरकारशरण माध्यमे हे दोन्हीही तेवढेच आजच्या अवस्थेस कारणीभूत आहेत.

– डॉ. प्रवीण घोडेस्वार, नाशिक

पर्याय नसल्यासारखी स्थिती

‘सोनिया’चा क्षण’ (२४ ऑगस्ट) हे संपादकीय वाचले. लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रचना आवश्यक आहे. मात्र गेल्या काही काळात विरोधी पक्षातील नेतृत्वाच्या मर्यादा, एखाद्या प्रश्नाबाबत ठाम धोरण नसणे, विचारधारेच्या बाबतीत धरसोडपणा, महत्त्वाच्या बाबीवर व्यक्त होण्यातला विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्याचा बालिशपणा या काही ठळक बाबींमुळे आज, प्रबळ विरोधी पक्षाचा पर्याय नसल्यासारखी स्थिती आहे.

– राजेश श्रीराम बुदगे, ठाणे

पिळवणुकीची भिंत पार करावी..

‘कृषी धोरण सुधारणा आणि शेतकऱ्यांपुढील आव्हाने’ हा श्रीकांत कुवळेकर यांचा लेख (लोकसत्ता ‘अर्थवृत्तात’, २४ ऑगस्ट २०२०) वाचला. सध्याच्या माध्यमकाळात भारतीय अर्थव्यवस्थेतील खूप दुर्लक्षित राहिलेला भाग म्हणजे ‘शेती अर्थकारण’. शेतकरीबहुल देशात शेतकरी सशक्तीकरण ही संज्ञा फक्त कागदावरच राहू नये असे वाटत असल्यास, लेखकाने सुचवलेल्या मुद्दय़ांकडे लक्ष द्यायला हवे. शेतकरी व्यक्तींनी ‘तंत्रज्ञान शिका- संघटित व्हा- माहिती मिळवा’ या त्रिसुत्रीचा कार्यक्षमपणे वापर करून व्यापारी/अडत्ये संघटनांची अभेद्य अशा पिळवणुकीची भिंत पार करावी.

– डॉ. रुपाली माने, नेरुळ (नवी मुंबई)

रोहयोचे जनक वि. स. पागे नव्हे, शाहू महाराजच!

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत तीनदा (१८९६-९७,१८९९-१९००,१८१८-१९मध्ये) दुष्काळ पडला. दुष्काळाच्या काळात केवळ कुटुंबांना धान्य देणे, गुरे पोसणे अशा सोयीसवलती देऊन महाराज थांबले नाहीत तर दुष्काळ निर्मुलनाचे दीर्घकालीन प्रयत्नही केले. त्यासाठी जनतेच्या हाताला काम आणि मजुरी देऊन धरणे, तळे, विहिरी इत्यादी कामे करवून घेतली. राधानगरी, कर्जत धरण त्यापैकी च आहेत. दुष्काळाच्या काळात भाष्करराव जाधव हे खास दुष्काळ आयुक्त होते. शिवाय दुष्काळाकडे लक्ष देण्यासाठी खास खाते व अधिकारी होते. ‘रोहयो/नरेगा अभिमानास्पदच’ या मेधा कुळकर्णी यांच्या लेखात (लोकसत्ता, १९ जुलै) ‘रोहयोचे जनक वि.स.पागे’ असा उल्लेख केला आहे. म्हणून हा पत्रप्रपंच.

– एन. डी. दोनाडकर, आरमोरी (गडचिरोली)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:00 am

Web Title: loksatta reader response email letter abn 97
Next Stories
1 माध्यमे आव्हान देणार, की ‘अपप्रचार’ कबूल?
2 कोंबडय़ांच्या झुंजींत गुंग जनमानस..
3 मग महाराष्ट्राला तरी दोष का द्यायचा?
Just Now!
X