04 March 2021

News Flash

श्रद्धासुद्धा पिकते तिथे विकत नाही!

शनीच्या चौथऱ्यावर महिलेच्या प्रवेशाची घटना हा ट्रस्टींमधील शह-प्रतिशहाचा भाग होता.

शनीच्या चौथऱ्यावर महिलेच्या प्रवेशाची घटना हा ट्रस्टींमधील शह-प्रतिशहाचा भाग होता. पुरोगाम्यांना त्यातही क्रांतिकारकत्व दिसले. त्यावर बरेच चर्वतिचर्वण झाले. अखेर अनीता शेट्टी नामक महिलाच आता ट्रस्टच्या अध्यक्षपदी आल्या असून िलगविषमता संपल्याचा दावा त्यांनी केला आहे. ती विषमता कशी संपली आहे, तर.. चौथऱ्यावर प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांचे ‘प्रबोधन’ करत ‘परंपरा’ जोपासण्याचा माझा प्रयत्न राहील. महिला भाविकांच्या ‘हिताचे’ निर्णय घेऊ, असे अनीता शेट्टी म्हणतात.

‘बाई गं चौथऱ्यावर न चढण्यातच तुझे हित आहे,’ हे आता एका महिलेकडूनच समस्त महिलांना कळविण्यात व दानपेटी (तिला कुलूप आहे!) सुजलाम्, सुफलाम् करण्यात धुरीणांना यश आले आहे. शनीचे माहात्म्य वाढवूनच गावाचा व्यापार-उदीम वाढला आहे. जपायचाय तो व्यापार. श्रद्धासुद्धा पिकते तिथे विकत नाही. बाहेरचा ग्राहक टिकविणे महत्त्वाचे.

किशोर मांदळे, भोसरी (पुणे)

 

मंदिरांची निगा राखणेही आवश्यक

‘देशात प्रत्येक गावात राम मंदिर उभारण्याची विश्व हिंदू परिषदेची घोषणा’ (लोकसत्ता, १२ जानेवारी) ही बातमी मला गमतीची वाटली. आज युरोपमध्ये चर्च ओस पडत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे हॉटेलांमध्ये रूपांतर होत आहे. मात्र भारतात आताच्या युगात मध्ययुगीन मानसिकता डोके वर काढत आहे. माझे पूर्वज निर्मळ येथील शंकराचारीय मंदिरात पुजारी होते. त्यांनी पोर्तुगीज अमलात कॅथोलिक धर्म स्वीकारला. आजच्या घडीला मला धर्म कालबाह्य़ वाटत आहे. मात्र न चुकता मी नियमित प्रत्येक वर्षी निर्मळच्या शंकराचारीय मंदिरात मे महिन्याच्या १५ व १६ तारखांना संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत बसून पूर्वजांची आठवण करीत सभोवरचा निसर्ग पाहत मानसिक आनंद घेत असे. आता गेली दोन वर्षे हा नाद मी सोडून दिला. कारण या निसर्गदत्त परिसराचा बोऱ्या वाजला आहे. सर्वत्र लाकूड कारखाने, करवतींचे आवाज, आजूबाजूची घाण व मंदिराच्या आत झोपलेले कुत्रे हे दृश्य मनास यातना देणारे आहे. िहदू धर्माच्या तथाकथित रक्षकांनी सर्वप्रथम ही अशी मंदिरे स्वच्छ व निसर्गदत्त करून घ्यावीत म्हणजे माझ्यासारखे पूर्वाश्रमीचे िहदू पुन्हा एकदा तेथील निसर्गशांतता उपभोगतील. गावात जी मंदिरे आहेत त्यांची निगा राखली तरी खूप उपकार होतील.

मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

 

हुरळून जाण्याचे कारण नाही..

पदोन्नती प्रक्रियेच्या वेळापत्रकासंबंधीची बातमी (लोकसत्ता, ११ जाने.) वाचली. या बातमीने अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अतीव आनंद झाला असेल. परंतु असे वेळापत्रक यापूर्वी विहित नव्हते का? होते, तर त्याप्रमाणे कार्यवाही झाली का? झाली नसेल तर का झाली नाही? व योग्य कार्यवाही झाली असेल तर नव्याने वेळापत्रक तयार करून जाहीर करण्याचे कारण कोणते? इतर अनेक विषयांचे कामाचे वेळापत्रक आहे, त्याप्रमाणे कार्यवाही होते का? परंतु आपली माध्यमेही हे प्रश्न विचारण्याचे स्वत:चे कर्तव्य विसरली असावीत, असे अनुमान करण्यास भरपूर वाव आहे.

तसेच अधिकारी व कर्मचारी भरती, बदली व शैक्षणिक संस्थांना मंजुरी, वरिष्ठ श्रेणी मंजुरी, उत्कृष्ट कामाची वेतनवाढ, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता, विविध प्रकल्पांची कार्यवाही, योजनांची कार्यवाही, १ तारखेस वेतन, आíथक तरतुदीचे वितरण, सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव, गृहकर्ज मंजुरी किंवा अशा अनेक विषयांच्या कार्यवाहीची वेळापत्रके राज्य सरकारने विहित केलेली आहेतच. या वेळापत्रकांप्रमाणे कार्यवाही झाली का? याची माहिती कधी प्रसिद्ध झाली आहे का? किंवा वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही झाल्याचा अनुभव नागरिकांना कधी आला आहे का? याचे उत्तर माध्यमांनी शोधून जाहीर करणे आवश्यक आहे. थोडक्यात, अशा वेळापत्रकाच्या बातमीने हरपून/ हरखून जाण्याचे कारण नाही.

तसेच कर्मचारी भरतीच नियतकालीनरीत्या होत नसेल तर नियतकालीन बदली व बढती करण्याचा प्रश्नच कोठे उपस्थित होतो?

दिलीप वसंत सहस्रबुद्धे, सोलापूर

 

जे प्रत्युत्तर द्यायचे, त्याची वाच्यता नको..

पठाणकोटचा हल्ला होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारे आक्रस्ताळेपणा न करता शांत व धोरणीपणाने, एक परिपक्वव सुसंस्कृत राजकारणी  म्हणून जागतिक पातळीवर स्थान प्राप्त केले. त्यामुळे अमेरिकेने आपले वजन खर्च करून पाकिस्तानला अतिरेक्यांविरुद्ध पाऊल उचलण्यास भाग पाडले. मोदींच्याच सरकारातील संरक्षणमंत्रीसुद्धा लष्करी प्रमुखांच्या उपस्थितीत पाकिस्तानशी जशास तसे वागण्याची भूमिका जाहीर करताना ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगायला विसरले नाहीत.  सरकारने पाकिस्तानशी कसे वागायचे, यासाठीच्या धोरणात एकवाक्यता नाही हेच यातून दिसले.

‘जशास तसे’ ही संरक्षणमंत्री पíरकरांनी मांडलेली भूमिका योग्य असली तरी तिचा जाहीर उच्चार केल्याने ती मोदींच्या राजनीतीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मारक ठरू शकते. बलुचिस्तानमधील फुटीर संघटनांना मदत करून पाकिस्तानला सहज सतावता येईल, पण आपण हे अगोदरच जाहीर केल्याने पाकिस्तानात कुठेही होणाऱ्या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरणे पाकिस्तानला सोपे होईल व आपल्यालाही आपली बाजू जागतिक पटलावर मांडणे  अवघड जाईल. त्यामुळे आपल्या कोणत्याही भविष्यकालीन धोरणाची वाच्यता न करता जशास तसे हेच धोरण चालवणे गरजेचे आहे.

काहीही झाले तरी युद्धामुळे त्यांच्याप्रमाणेच आपली हानी होणार असल्याने इतकी केलेली प्रगती वाया जाईल. त्यामुळे युद्ध पुकारण्यापेक्षा पíरकर म्हणतात त्याप्रमाणे ‘जशास तसे धोरण’ कोणतीही वाच्यता न ठेवता करणे गरजेचे आहे. त्याच वेळी राजकारणाच्या मंचावर वाटाघाटीचा राबता चालू ठेवून आपण कसे शांतताप्रेमी देश आहोत हेच दाखवून देण्याचा प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे आहे.

प्रसाद भावे, सातारा

 

व्यापाराव्यतिरिक्त नाक खुपसणे गैरच

‘हल्लेखोरांना जशास तसे उत्तर!’ हा पठाणकोटवरील हल्ल्याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचा इशारा ही बातमी व ‘पठाणकोटचे वास्तव’ हा अग्रलेख (१२ जाने.) वाचला. अमेरिकेने पठाणकोट प्रसंगावर पाकिस्तानला दिलेला इशारा म्हणजे लहानगा खूश व्हावा म्हणून मोठय़ाला डोळे मिचकावून दिलेला दम आहे, याचा भारताने अनेक वेळा अनुभव घेतला आहेच. त्याचप्रमाणे लगोलग ‘आम्ही तुम्हाला बघून घेऊ!’ या भारताने दिलेल्या दमाचीही पाकिस्तानला सवयच झाली आहे! तालिबान्यांनी एकत्र येऊन पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि अमेरिकेला लक्ष्य केले आहे. आता हे बंडखोर पाकिस्तानी, अफगाणी आणि काही परकीयांना अतिरेकी कारवायांचे प्रशिक्षण देतीत व सीमा ओलांडून अफगाणिस्तानात जाऊन अमेरिकी सन्याला लक्ष्य करतीत. यामागे पाकिस्तानच आहे हे सर्व जगास माहीत आहे. पुन्हा याच अफगाण शांततेबाबतची चर्चा पाकिस्तानातच होत आहे, ही क्रूर चेष्टा अमेरिकेच्या सहमतीशिवाय शक्य आहे का? पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि तालिबानच्या अंतर्गत प्रश्नांचा कर्ताकरविता अमेरिका आहे म्हणूनच अग्रलेखात भारताला या चच्रेत आमंत्रण न दिल्याची व्यक्त केलेली चिंता निर्थक आहे. अफू (उत्पादन व त्यामागील जागतिक अर्थकारण), अतिरेकी, अफगाणिस्तान, अमेरिका (हे ४ अ) आणि त्याचे मर्कट अपत्य पाकिस्तान या एकमेकात गुरफटलेल्या प्रश्नांत भारताने व्यापाराव्यतिरिक्त आपले नाक खुपसणे गर आहे.

प्रवीण आंबेसकर, ठाणे

 

जाग कधी येणार?

‘पठाणकोटचे वास्तव’ हा अग्रलेख (१२ जानेवारी) वाचला. गेली पाच दशके आपणच आपल्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेच्या हाती सोपवून निद्रिस्त झालो आहोत. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ‘ऐ मेरे वतनके लोगों, जो शहीद हुये है, उनकी, जरा याद करो कुर्बानी’ ही कॅसेट वाजवली की आमची इतिकर्तव्यता संपते. त्या गीतातील ‘जब हम बठे थे घरोंमे, वो झेल रहे थे गोली’ या भावपूर्ण ओळी कानावर पडल्या की सीमारेषेवर जिवाचे बलिदान करून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांसमोर नक्कीच नतमस्तक व्हावेसे वाटते आणि त्याच वेळी शहीद जवानांसाठी असलेल्या शवपेटिका, ब्लँकेट्स व बोफोर्स तोफा खरेदी व्यवहारात झालेला मागचा भ्रष्टाचार आठवला की संताप होतो. १९६२च्या चीन आक्रमणानंतर आम्ही काहीच शिकलो नाही का? ९/११च्या ऐतिहासिक हल्ल्यानंतर अमेरिकी सुरक्षा यंत्रणा अधिक आक्रमक बनली, जेणेकरून आजतागायत त्याची पुनरावृत्ती झाली नाही. आपण मात्र दहशतवादी हल्ल्याच्या छायेखाली आजही वावरत आहोत. आमची खाबूगिरी जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत सुरक्षा यंत्रणाच काय, कोणतीही यंत्रणा या देशात यशस्वीपणे राबवली जाणार नाही.

सूर्यकांत भोसले, मुलुंड (मुंबई)

 

सीसीटीव्ही बसवाच, पण शिस्तही आणा

मुंबईतील एका नामांकित शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या या विकृत घटना मन विषण्ण करणाऱ्या आहेत. शाळेसारखे पवित्र विद्यास्थानही मुलींसाठी सुरक्षित नाही, हे एक भयाण वास्तव समोर आले. या गुन्हेगारांवर तत्परतेने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच याबाबत नुकत्याच उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे लवकरात लवकर खासगी व सरकारी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत आणि शाळेच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात यावी. शाळेतील शिस्त व सुरक्षेसंबंधी नियमावली अधिक कडक करून शाळासंबंधित अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वावर बंधनकारक करण्यात यावी.

प्रज्ञा मनीष पंडित, ठाणे

loksatta@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 6:01 am

Web Title: loksatta readers article 4
Next Stories
1 ११ महिन्यांनी यांचे काय करणार?
2 सेल्फीवेडय़ांना आवरा..
3 आयपीएलमुळे झालेला फायदाही बघा की!
Just Now!
X