05 July 2020

News Flash

हा तर कुंपणानेच शेत ओरबाडण्याचा प्रकार!

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

हा तर कुंपणानेच शेत ओरबाडण्याचा प्रकार!

‘आमदारांना वाहन खरेदीसाठी ३० लाखांचे बिनव्याजी कर्ज’ ही बातमी (लोकसत्ता, १४ मार्च) वाचली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आतापर्यंत तरी हे सरकार आधीच्या फडणवीस सरकारपेक्षा काही तरी ‘वेगळ्या’ प्रकारे काम करत आहे, असे वाटत आहे. परंतु सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यावर आलेली वरील मथळ्याची बातमी वाचल्यास या सरकारने आपले ‘खरे’ रूप दाखवायला सुरुवात केली आहे की काय, अशी शंका येते. बातमीत म्हटल्याप्रमाणे, आमदार निधीत एक कोटी रुपयांची वाढ, वाहनचालकांना दरमहा १५ हजारांचे वेतन, यापाठोपाठ आमदारांना वाहन खरेदीकरिता ३० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा करून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार मंडळींना खूश केले. अजून सरकारची शेतकऱ्यांना जाहीर झालेली कर्जमाफी योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही, महाराष्ट्रावर असलेले काही लाख कोटी रुपयांचे कर्ज जनता फेडत आहे, देशात सर्वत्रच मंदीचे वातावरण आहे, जनतेची क्रयशक्ती काही वाढत नाही, राज्यातील विकासाची अनेक कामे पूर्ण व्हायची आहेत.. असे असताना, ज्यांनी या सर्वावर गंभीरपणे विचार करून ठोस निर्णय घ्यायचा, तेच स्वतचे भत्ते, निधी व कर्जाबद्दल मागचापुढचा कसलाही विचार न करता, लगोलग स्वतचा फायदा होईल असे निर्णय घेत असतील तर हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार झाला. अनेक आमदार हे कोटय़धीश असल्याचे, निवडणुकीआधी त्यांनीच नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून, दिसून आले आहे. त्यामुळे आमदारांना आलिशान गाडय़ांसाठी ३० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज म्हणजे खरे तर कुंपणानेच शेत ओरबाडण्याचाच प्रकार झाला. असल्या निर्णयांनी महाविकास आघाडीच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे, हे तिच्या धुरीणांनी लक्षात ठेवलेले बरे.

– मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली पूर्व

सावरकरांच्या चिकित्सेत दुर्लक्षित झालेल्या बाबी..

‘हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र’ हा अब्दुल कादर मुकादम यांचा लेख (रविवार विशेष, १५ मार्च) वाचला. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या कल्पनेची व्यावहारिक आणि वस्तुदर्शी चिकित्सा व्हायला हवी, या लेखातील मुद्दय़ावर कोणीही सहमतच होईल. सावरकरांविषयी होत असलेली चर्चा केवळ भावनिक मुद्दय़ांवर होत आहे, हेही मत मान्य आहे. मात्र, लेखात सोयीस्करपणे काही बाबींना बगल दिली आहे. फार प्राचीन काळी (राजसत्तेचा आधार असलेल्या) केवळ हिंदू संस्कृतीतच नव्हे, तर इतर धर्माच्या संस्कृतींतही सर्वसामान्य जनतेला दारिद्रय़, विषमता, शोषण, गुलामगिरीस सामोरे जावे लागले, याकडे लेखक दुर्लक्ष करतात. तसेच दुर्लक्ष- सावरकरांनी हिंदू धर्मातील अनिष्ट गोष्टींवर टीका करत दाखवलेली विज्ञानवादी दृष्टी, १९३४ साली अस्पृश्यतेच्या विरोधाचे प्रतीक असलेले रत्नागिरीचे पतितपावन मंदिर, आदी बाबींकडेही झाले आहे.

– प्रभाकर भाटलेकर, ठाणे

सावरकरांवरही ‘धर्मबुडवे’ म्हणून टीका झाली होती

‘हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र’ हा लेख वाचला. सावरकर हे कठोर आणि समतोलवादी नव्हते, असा लेखकाचा आक्षेप आहे. वास्तविक हिंदू समाज हा आधुनिक, विज्ञानवादी व्हावा यासाठी सावरकरांनी हिंदूंच्या अनेक चालीरीतींवर कोरडे ओढले आहेत. अस्पृश्यता मिटवण्यासाठी सावरकरांनी चालू केलेली पतितपावन चळवळ, हिंदूंच्या अनेक कालबाह्य़ रूढींवर त्यांनी केलेली कठोर टीका, कुर्तकोटी शंकराचार्याबद्दल केलेले वक्तव्य, तसेच सावरकरांवरदेखील ‘धर्मबुडवे’ म्हणून झालेली टीका, या सर्व गोष्टींकडे इथले तथाकथित पुरोगामी जाणीवपूर्वक काणाडोळा करतात. सावरकरांचे दुर्दैव हे की, त्यांना त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी, आधुनिक आणि समाजसुधारणेच्या विचारांसाठी अनुयायीवर्ग लाभला नाही.

– अनिल भुरे, औसा (जि. लातूर)

सावरकरांचा सोयीस्कर वापर हिंदुत्ववाद्यांकडूनच

‘हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र’ हा लेख वाचला. भारतीय जनमानसावर, विशेषत: हिंदुराष्ट्रवादाचा आग्रह धरणाऱ्यांच्या मनावर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव मोठय़ा प्रमाणावर दिसतो. सावरकरांच्या हिंदुत्ववादी राष्ट्रवादाच्या संकल्पनेत- ‘ज्यांचे पूर्वज भारतात राहत होते किंवा ज्यांची घरेदारे व जमिनी भारतात होत्या, तेच राष्ट्रवादी’ असे समजले गेले. ज्यांची धार्मिक स्थळे जेरुसलेम, रोम किंवा अरेबियात आहेत, त्यांना यात बाजूला ठेवण्यात आले. दुसरीकडे ‘भारतात राहणारे सर्वच हिंदू’ असा एक शहाजोग सिद्धांत आजकाल आक्रमकपणे मांडला जातो आहे. यावरून बहुसंख्याकवादाने राष्ट्रवादाचे सोंग घेतले असल्याचे दिसते. या सोंगातून बहुसंख्याकवाद म्हणजेच राष्ट्रवाद आणि बहुसंख्याकांचे हित म्हणजेच लोकशाही असे वातावरण पसरवले जात आहे. ‘हिंदू धर्म खतरें में’ या स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या हाकाटीबद्दल सरदार पटेल म्हणतात, ‘हिंदूंनी आपल्या धर्माचे पालन केले नसल्यामुळेच हिंदू धर्म संकटात आहे. हिंदू धर्मातील अस्पृश्यतेमुळेच कोटय़वधी हिंदूंनी धर्मातरे करत दुसरे धर्म स्वीकारले आहेत.’

हिंदुत्ववाद्यांकडून हिंदू संस्कृती जगातील थोर, प्राचीन व गौरवास्पद संस्कृती म्हणून प्रस्तुत केली जात असते. या तथाकथित हिंदू संस्कृतीतील वर्ण व जातिव्यवस्थेने हजारो वर्षे दलित, मागास समाजाप्रमाणेच स्त्रियांनाही दडपून टाकले, त्यांचे शोषण केले. तरी हिंदू संस्कृती श्रेष्ठ! वास्तविक सावरकरांवर आपला वैचारिक हक्क सांगणारेच सावरकरांच्या विचारांची सर्वाधिक पायमल्ली करताना आढळतात. सावरकरांचे विचार आणि त्यानुसार येणारे मुद्दे, त्यांचा विज्ञानवाद, गोपालन हवे- गोपूजन नको, धर्मचिकित्सा, वेद म्हणजे रिकामटेकडेपणाचे उद्योग, इत्यादी विषय वेळोवेळी चर्चिले गेले आहेतच. पण सावरकरांविषयी दुर्लक्षित असलेला एक महत्त्वाचा मुद्दा मुद्दाम नमूद करावयास हवा आणि तो हा की, सावरकर ‘ईश्वरनिष्ठ’ होते असे म्हणून त्यांच्यावर अनेक हिंदुत्ववादी अभ्यासकांनी अन्याय केला आहे. सावरकर तसे मुळीच नव्हते, तर ते नास्तिकतेकडे झुकलेले ‘अज्ञेयवादी’ होते. ‘जगन्नाथाचा रथोत्सव’, ‘सूत्रधारास..’ या त्यांच्या प्रसिद्ध कविता वाचून आणि त्यातील विचार पचवून कोणीही निरीश्वरवादी होण्याची दाट शक्यता आहे. हिंदुराष्ट्रवादाची सावरकरांची ‘थीअरी’ आज ‘प्रॅक्टिकल’ बनून अवतरली असली, तरी हिंदुत्ववादी सोयीस्करपणे सावरकर वापरत आहेत हेच अधोरेखित होत आहे.

– बाळकृष्ण शिंदे, पुणे

खेळ : कला की स्पर्धा?

‘खेळ हा कुणाचा..?’ हे संपादकीय (१४ मार्च) वाचले. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर रिकाम्या क्रीडाप्रेक्षागारात खेळवण्यात येत असलेल्या सामन्यांच्या संदर्भात ‘तपश्चय्रेमुळे प्राप्त होणारे खेळातले नपुण्य, खेळावर असलेले प्रेम आणि तंदुरुस्ती या तिन्हींपैकी एक बाजू जरी लंगडी असली तरी लाखभर प्रेक्षकही आमची कामगिरी उंचावू शकत नाहीत,’ हे एका खेळाडूचे विधान बिनतोड आहे. मुळात खेळ ही मुख्यत्वे ‘परफॉर्मिग आर्ट’ कमी आहे आणि ती ‘स्पर्धा’ जास्त आहे. त्यातील यश आणि गुणवत्ता ही प्रतिस्पध्र्यावरही ठरते. रसिकांवर नाही. वलयांकित प्रतिमेच्या आणि सवंग लोकप्रियतेच्या आहारी गेल्यामुळे कारकीर्दीकडे दुर्लक्ष झाल्याची उदाहरणे भारतीय क्रिकेटमध्येही दिसली आणि आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धातही दिसली आहेत. खेळाडूने स्वत:साठीच खेळले पाहिजे. लोकांच्या मनोरंजनासाठी नव्हे. प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाकडे त्याने आपल्या तपश्चय्रेची नंतर मिळणारी पावती म्हणूनच पाहावे. त्याचा खेळातली एकाग्रता भंग करणारा व्यत्यय होणार नाही याची काळजी त्यालाच घ्यावी लागते.

– प्रमोद तावडे, डोंबिवली

हल्ली कीर्तनांना करमणुकीसाठीच गर्दी..

‘ऐसी कीर्तन मर्यादा..’ आणि ‘विवेक हरवलेल्या समाजात..’ हे अनुक्रमे डॉ. ज्ञानेश्वर भामरे आणि अ‍ॅड. संजय भाटे यांचे लेख (रविवार विशेष, १५ मार्च) वास्तव स्थिती दाखवणारे आहेत. यानिमित्ताने तमाशाने कधीच समाज बिघडला नाही आणि कीर्तनाने तो कधीच घडला नाही, या म्हणण्याची आठवण झाली. सध्या कीर्तनाचा मूळ उद्देश बाजूला राहून त्याला फुटकळ विनोदांचे, करमणुकीचे स्वरूप आलेले दिसते. म्हणून केवळ करमणुकीसाठी, मनोरंजनासाठी कीर्तनाला गर्दी होते. त्यामुळे कीर्तनातील नीतिधर्माचा उपदेश, आत्मोद्धार, लोकजागृती आणि जिज्ञासू वृत्ती श्रोत्यांपर्यंत पोहोचतच नाही. ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ असेच घडते. त्यामुळे गाडगे महाराजांच्या कीर्तनाचा आदर्श आज सर्वानी घेण्याची गरज आहे. विवेकशील, प्रागतिक आणि विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी कीर्तन झाले पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून त्यातील मूल्यांची जोपासना व संवर्धन करणारे, आत्मभान देणारे कीर्तन ही खरी आजच्या काळाची गरज आहे. ते जमत नसल्यास इतर सर्जनशील, मनोरंजनाचे कार्यक्रम जरूर निर्माण करावेत, पण त्याला कीर्तनाचा मुलामा तरी देऊ नये.

– विवेक चव्हाण, शहापूर (जि. ठाणे)

स्थानबद्धता : तेव्हाची आणि आताची

सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलेले जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची शुक्रवारी सुटका करण्यात आली. सात महिन्यांपासून त्यांना श्रीनगर येथे त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्धतेत ठेवले होते. त्यांचे पिता शेख अब्दुल्ला यांनाही तत्कालीन नेहरू सरकारने काश्मीरपासून बऱ्याच दूर तमिळनाडूतील कोडाइकनाल या ठिकाणी विश्रामगृहात नजरकैदेत ठेवले होते. त्यांना ८ ऑगस्ट १९५३ रोजी अटक करण्यात आली व ८ एप्रिल १९६४ रोजी त्यांची सुटका करण्यात आली. याचा अर्थ ते सुमारे ११ वर्षे नजरकैदेत होते. या घटनेचे अनेकांना विस्मरण झाले असल्याची शक्यता आहे. त्यांची स्थानबद्धता त्या वेळी मानवाधिकाराचे उल्लंघन ठरली नव्हती. फारुख अब्दुल्लांच्या बाबतीत मात्र  विपरीत भूमिका काँग्रेस व इतर राजकीय पक्ष घेताना आढळतात.

– सतीष भा. मराठे, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2020 12:10 am

Web Title: loksatta readers comment loksatta reaction abn 97 2
Next Stories
1 मद्यमुक्तीमुळे चंद्रपूरचा मृत्यूदर देशापेक्षा कमी!
2 खबरदारीचे सल्ले अगतिक असतील; पण उद्धट नाहीत
3 शिंदे घराण्यातील पक्षसोडीचे वर्तुळ पूर्ण
Just Now!
X