‘पोलिसांसमोरच तरुणाचा आंदोलकांवर गोळीबार’ या शीर्षकाची बातमी (लोकसत्ता, ३१ जानेवारी) वाचली. एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केले ही जास्त गंभीर बाब. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जहाल विषासारखा असतो; मग ते धर्मप्रेम असो अथवा गणवेशप्रेम. आज आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान हे तरुणांना योग्य दिशा देणे हे आहे. त्यात राजकीय पुढाऱ्यांची जबाबदारी खूप मोठी आहे, परंतु ती समजून घ्यायला ते तयार नाहीत.आजकाल राजकीय पुढारी भर सभेत प्रक्षोभक विधाने करत आहेत, उदा.- अनुराग ठाकूर यांचे (देश के गद्दारों को गोली मारो) वक्तव्य. याचा अल्पवयीन मुलांवर परिणाम होतो याची जाणीवच राहिलेली नाही. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारण्यांनी देशाचे भवितव्य (तरुण पिढीस)पणाला लावू नये.अल्पवयीन गुन्ह्यंचा विचार केल्यास असेही लक्षात येऊ शकते की, १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत अल्पवयीन समजले जाण्याचा गुन्हेगार चतुररीतीने फायदा घेतात, क्रूर गुन्ह्यंतील(उदा. निर्भया प्रकरण) गुन्हेगारही अल्पवयीन या शिक्क्याखाली सुटतात. सद्यस्थितीला या गुन्हेगारी कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे. गुन्हा हा गुन्हाच असतो. त्यासाठी कायद्यात सकारात्मक बदल करण्याची गरज आहे.

महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा यांचा संदेश दिला तो आपण किती पाळतोय, याचा विचार करायला हवा. बहात्तर वर्षांपूर्वी याच कट्टरतेने बापूंना संपवले आज पुन्हा बापूंच्या पुण्यतिथीच्या दिवशीसुद्धा आपण बापूंच्या संदेशाचा आदर करू नये, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. कट्टरतावाद लोकशाहीला धोका निर्माण करतो आणि अंधकाराकडेच घेऊन जातो हा इतिहास आहे आणि त्यामुळे फक्त लोकशाहीचे अशक्तीकरणच होणार आहे.

-सोनल शिंदे, आणे (ता. जुन्नर,  जि. पुणे)

पुरुषांना आत्मभान येण्यासाठी स्त्रीमुक्ती..

सामान्य लोकांत स्त्रीपुरुष समानतेचा संस्कार रुजावा म्हणून विविध माध्यमातून कार्यरत रहाणाऱ्या कर्त्यां सुधारक विद्याताई बाळ यांचे निधन झाल्याची बातमी (लोकसत्ता, ३१ जानेवारी) वाचल्यावर मनाला अस्वस्थता जाणवली. कारण ८० च्या दशकात जेव्हा स्त्रीमुक्ती चळवळ जोर धरू लागली होती, त्याचवेळेस ‘स्त्रियांना म्हणे पुरुषांपासून मुक्ती हवी आहे!’ अशा प्रकारे पुरुषांनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली होती. हे लक्षात आल्यामुळे विद्याताईनी ‘स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांना पुरुषांपासून मुक्ती असा अर्थ नसून स्त्रीपुरुषांनी एकाच पातळीवर येऊन संवाद साधावा म्हणून पुरुषांना आत्मभान येण्यासाठी केलेली चळवळ आहे’ , हे ठरवण्यासाठी ‘पुरुष उवाच अभ्यासकेंद्र’ आणि ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू करून पुरुषांनाही स्त्रीमुक्ती चळवळीत सहभागी करून पुरुषी वृत्तीला लगाम घालण्याचे आत्मभान आणले. हे त्यांचे कार्य माझ्यासारख्या अनेक पुरुषसत्ताक केंद्री घरांतून आलेल्यांमध्ये बदल घडवणारे ठरले आहे.

प्रत्येक माणसाचा पृथ्वीवरील प्रवास कधी ना कधी तरी संपणार असतोच. दरम्यानच्या काळात विचारांची सोबत लाभलेल्या विद्याताई बाळांसारख्या व्यक्तींविषयी एक प्रकारचा जिव्हाळा उत्पन्न झालेला असतो. तो ती व्यक्ती गेल्यावर तसूभरही कमी होणार नसतो, पण त्या व्यक्तीशी प्रत्यक्षात आपण आता यापुढे कधीही संवाद साधू शकणार नाही याचे दुख मोठे असते. तरीही त्यावर मात करून विद्याताईंच्या स्त्रीपुरुष समानतेच्या विचारांचा पाठपुरावा करत स्वततील पुरुषी मानसिकता त्यागण्याचा प्रयत्न करत जगणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल.

– जगदीश काबरे, सीबीडी-बेलापूर (नवी मुंबई)

विचारी मेंदू आणि संवेदनशीलता..

‘स्त्रीमुक्तीवादी’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो त्या बुद्धिप्रामाण्यवादी आणि विचारवंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां आता अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर मला ‘अजून चालतेची वाट’ या त्यांच्या ‘चतुरंग’ (३ फेब्रुवारी २०१८) मधील लेखातील शेवटचे वाक्य आठवले. त्या लिहितात, ‘माणूसपण म्हणजेच विचारी मेंदू आणि संवेदनशीलता म्हणजेच माणुसकी. यांच्याशी इमान राखतच मी जगते आहे. माणूस म्हणून जगताना आणि मरतानाही आणखी काय हवं असतं माणसाला?’

अगदी मोजक्याच शब्दांत आयुष्याविषयी, जगण्याविषयी किती सुंदर, शाश्वत मूल्य त्यांनी मांडले आहे! आजकाल सर्वत्र स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद या आणि अशा अनेक मूल्यांचा जो उद्घोष चालू आहे आणि तो जपण्याच्या नावाखाली देशातील सगळे सामाजिक वातावरणच पार बिघडून गेले आहे, त्याला कारणीभूत असलेल्या समस्त राजकारणीवर्ग, विद्यार्थीवर्ग आणि समाजसुधारक विचारवंतांनी विद्याताईंचे हे अवघ्या दोन ओळींत सांगितलेले तत्त्वज्ञान स्वत: आकलन करून घेऊन जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देशाचे सामाजिक चित्र आमूलाग्र बदलेल!

– चित्रा वैद्य, पुणे

ही अपयशाची कबुली तर नाही?

‘नाइट लाइफ नव्हे हे तर कििलग लाइफ’ (लोकमानस ३१ जानेवारी) हे आमदार आशीष शेलार यांचे ‘मुंबई २४/७’ या निर्णयाचा ऊहापोह करणारे पत्र वाचले. निर्णयाचा विरोध करताना त्यांनी म्हटले आहे की मुंबईचा पायाभूत सुविधांचा विकास, सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयास या सगळ्या गोष्टी भाजप सरकारच्या काळात झाल्या. ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु नंतर ते म्हणतात की पोलीस दलातील अनेक जागा रिक्त आहेत. भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळात ही बाब नजरेआड केली गेली का? या रिक्त जागा का भरल्या गेल्या नाहीत? दुसरा एक मुद्दा मांडताना ते म्हणतात की सार्वजनिक शौचालये दिवसाही महिलांना असुरक्षित वाटतात. भाजप सरकारने याबाबतीत काय पावले उचलली होती? वरील दोन उदाहरणे पत्रात समाविष्ट आहेत म्हणून वानगीदाखल त्यांचा उल्लेख केला. मुंबई २४/७ ला केलेला विरोध तसा योग्यच आहे. पण त्यासाठी ज्या बाबी ते पुढे आणत आहेत त्यावरून तरी भाजपलाही त्यांच्या कार्यकाळात या बाबींचा समाचार घेता आलेला नाही हे स्पष्ट होते. इतरही परस्परविरोधी मुद्दे पत्रातून समोर येतात. त्यामुळे त्यांनी मांडलेले मुद्दे एक प्रकारे भाजप सरकारच्या अपयशाची कबुलीच वाटते.

-दीपक काशीराम गुंडये, वरळी