अरविंद केजरीवालांसारख्या माणसाला दिल्लीच्या जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिले. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकशाही काय असते, लोकांच्या समस्या काय असतात, लोकांचे अधिकार काय असतात, लोकांना नेमके शासन व्यवस्थेने, प्रशासनाने काय दिले पाहिजे याचे केजरीवालांना चांगले ज्ञान आहे. यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारण्यांनी, लोकनेत्यांनी जनतेसाठी काय केले पाहिजे, हे त्यांना कळले आहे. म्हणूनच मतांची भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. उलट, ‘गेल्या पाच वर्षांत दिल्लीसाठी मी काहीही काम केले नाही असे जर तुम्हाला वाटत असेल; तर मतदानादिवशी जरूर तुम्ही कमळासमोरचे बटण दाबा,’ असे केजरीवाल दिल्लीकरांपुढे म्हणाले होते.

लोकांना जातीपातींच्या अंधाऱ्या कोठडीत ठेवून राजकारण करता येत नाही. यापुढे कामाच्या माध्यमातूनच नेत्यांनी मते मागायला जनतेपुढे जावे लागेल, याचा वस्तुपाठच केजरीवालांनी देशासमोर घालून दिला आहे. चांगल्या शाळा, दवाखाने सुरू करून सामान्य लोकांचा- खऱ्या अर्थाने समाजाचा- विचार करणाऱ्या केजरीवालांसारख्या अनेक माणसांची आज राजकारणाला गरज आहे. अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत अशा माणसांना संधी देणे आवश्यक आहे. अन्यथा देशाचा अनर्थ अटळ आहे. जोपर्यंत प्रगल्भ विचारांची माणसे राजकारणात येत नाहीत तोपर्यंत देशाची होणारी वाताहत कोणी थांबवू शकत नाही. चांगला विचार करणारा नागरिकच निपजणार नाही, याची एक सांधेबांधणी सुरू आहे. लोकांना सतत धर्मजातीपातीच्या संघर्षांत गुंतवून ठेवायचे. बेकारी, शिक्षण, आरोग्य, शेतीसमोरील प्रश्न, प्राथमिक सुविधा या सगळ्या जगण्यासंबंधित गोष्टींचा विचारच करू द्यायचा नाही, असा काहीसा कट रचला जात आहे.  लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींसमोर तगडा पर्याय नव्हता. तसेच काहीसे दिल्लीत केजरीवालांसमोर काँग्रेस व भाजप तगडा पर्याय देऊ शकलेले नाहीत. पण तरीही भाजप व काँग्रेससारख्या पक्षांनी सावध होण्याची गरज आहे, कारण आता त्यांना आपसारखा पक्ष खुणावू लागला आहे.

– तेजस चव्हाण, दुधोंडी (ता. पलूस, जि. सांगली)

हिंदुत्व हरले.. आता देशाचा सीरिया, इराक..

आपचा विजय हा दिवाळखोरीचा विजय आहे. जनतेला वीज, पाणी, बस प्रवास, इत्यादी सर्वच गोष्टी मोफत दिल्यावर- शिवाय मुसलमानांना प्रोत्साहन दिल्यावर, विजय मिळवणे साहजिकच होते. यांत खरे कर्तृत्व कुठे आहे? केजरीवालांनी कुठले चांगले काम केले आहे, हे दाखवून द्यावे. या विजयामुळे दिल्लीच्या मध्यमवर्गाच्या अकलेचीही दिवाळखोरी दिसून आली. तेही वेडय़ासारखे आपच्या फुकट सोयींमुळे हुरळून गेले. त्यांना त्याचे दुष्परिणाम कळलेच नाहीत.

दिल्लीकरांनी या निवडणुकीचे महत्त्व जाणलेच नाही.. ही निवडणूक नुसत्या दिल्लीच्या फक्त ‘विकासा’ची नव्हती, तर हिंदुत्वाचीही होती. किती दिवस जनतेला फुकट सोयी देऊ शकतील, याचा विचार तरी त्या विजयाचा आनंद- मुख्य म्हणजे भाजपच्या झालेल्या पराभवाचा हर्षवायू- झालेल्यांनी जरूर करावा. दिल्ली बकाल व्हायला वेळ नाही लागणार. देश अशा लोकांच्या हातांत जाणार असेल तर भारताचा सीरिया, इराक, आफ्रिका व्हायला वेळ नाही लागणार.

– अनिल जांभेकर, मुंबई</strong>

कायम राखलेल्या विवेकाचे कौतुक!  

‘‘आप’धर्माचा विजय’ (१२ फेब्रुवारी) या संपादकीयात म्हटल्याप्रमाणे, भाजपने प्रचंड बळ दिल्लीसारख्या लहान राज्याच्या निवडणुकीत उतरविले होते. एवढा धर्मद्वेषमूलक, विखारी प्रचार करूनही लोकांनी आपसारख्या प्रादेशिक पक्षाला भरभरून मते देऊन भाजपला धूळ चारली असेल, तर खरोखरच भाजपला विचारमंथन करण्याची गरज आहे.

देशाची एकता आणि एकात्मता राखणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद १९ नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य देण्यात आले आहे; पण या मूलभूत अमर्याद नाही. त्याला अपवाद असा की देशाच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला बाधा आणणाऱ्या अभिव्यक्तीला काही वाजवी मर्यादा आहेत.. मात्र या मर्यादांचे उल्लंघन करत भाजपमधील वरिष्ठ नेते, कॅबिनेट दर्जाचे मंत्री यांनी निवडणूक प्रचारात सुरुंग लावला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप नेत्यांनी प्रचाराचा मुद्दा शाहीनबाग आंदोलनावर केंद्रित केला; परंतु आंदोलन, मोच्रे, निषेध हा नागरिकांना मिळालेला घटनादत्त हक्क आहे – मग तो नागरिक िहदू असो की मुस्लीम किंवा इतर कुणीही- शांततेचा अवलंब करून भारतवासी आपले एखाद्या विषयाला विरोधी मत आंदोलन किंवा मोच्र्यातून प्रदर्शित करू शकतात आणि शाहीनबाग आंदोलनामध्ये असा एकही अनुचित प्रकार घडलेला नाही.

फक्त सरकारच्या धोरणांना विरोध केला म्हणजे देशातील प्रत्येक नागरिक देशद्रोही कसे? उलट भाजपमधील काही नेत्यांनीच बेताल वक्तव्ये करून या आंदोलनाचे रूप हिंसक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ासाठी, मुख्यमंत्री केजरीवालांना ‘दहशतवादी’ संबोधून त्यांची समाजमनातील प्रतिमा डळमळीत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. दिल्लीकरांचे तसेच खास करून अरिवद केजरीवालांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे; कारण स्वत:वर इतके आरोप होऊनही आपला विवेक ढळू न देता त्यांनी स्थानिक मुद्दय़ांना निवडणूक प्रचारामध्ये प्राधान्य दिले.

– फिरोज अकबर मनियार, नाशिक

‘राम’ नाही, ‘केलेले काम’!

‘पुन्हा आपच..’ ही बातमी आणि ‘‘आप’धर्माचा विजय!’ हा अग्रलेख (१२ फेब्रुवारी) वाचला. दिल्लीकरांनी देशापुढे छान पायंडा पाडला ते बरेच झाले. नाही तर इथून पुढे देशाचे राजकारण विकासावरून धर्मावर केंद्रित झाले असते आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते भूषणावह नाही. त्यामुळे या निकालावरून सर्वानीच बोध घ्यायचा तो हा की, लोकांना जीवन सुखकर करण्यासाठी धर्म नाही – तर त्यांच्या मूलभूत गरजा कामी येतात. भाजपने या निवडणुकीतही नेहमीप्रमाणे आपणच ‘देशभक्तीचे पेटंट’ घेतल्याचा आव आणला आणि आमचे विरोधक हे देशद्रोही आहेत असा विखारी आणि तितकाच बिनबुडाचा अपप्रचार केला, त्याचे उत्तर म्हणजे हा निकाल.

पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या दोन दिवस आधी जाणूनबुजून राम मंदिर न्यासाची घोषणा केली; पण इथेही राम नाही, तर केलेले काम कामी आले. याचा सरळसरळ अर्थ असा की, कुणीही जनतेला सदासर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही आणि इथून पुढे तर अजिबात नाही.

– अंकुश चंद्रकांत गाढवे, राक्षसवाडी बु. (ता कर्जत, जि. अहमदनगर)

‘विकासाला प्राधान्य’ देणारा निकाल..

दिल्लीचा हा निकाल राष्ट्रीय राजकारणाला वेगळी कलाटणी देणारा ठरेल. आज देशाची अर्थव्यवस्था अस्थिर असून इतरही काही महत्त्वाचे प्रश्न असताना त्याचे गांभीर्य फारसे लक्षात न घेता प्रत्येक निवडणुकीत विजयी होण्यासाठी राजकारणातील नैतिकतेला तिलांजली देत, सत्तेचा गैरवापर करून ‘राष्ट्रवादा’चा पुरस्कार करत मतांचा जोगवा मागणाऱ्या भाजपचा दिल्लीतील पराभव हा लोकशाहीचा खरा अर्थ सांगणारा आहे. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय मतदारांनी दिल्लीच्या निकालातून योग्य तो बोध घेण्याची गरज आहे आणि भाजपनेही या निकालातून आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, कारण हा नवा भारत आहे – जो धर्माला नाही, तर विकासाला प्राधान्य देणारा आहे.

– अरिवद अरुणा रंगनाथ कड, दरोडी (ता. पारनेर, जि. अहमदनगर)

करदात्यांचे अधिकार समजणारे राज्यकर्ते!

महिनाभर दिल्लीत असताना मी ज्या अनेक सामान्य माणसांशी बोललो त्यांचे म्हणणे एकच होते, ‘आप’ने आमच्या मूलभूत गरजा भागवल्या. त्या म्हणजे शिक्षण, पाणी, वीज आणि आरोग्य या गोष्टींकडे या पक्षाने लक्ष दिले. अगदी गल्लीत दिव्याचा खांब दिला, सीसीटीव्हीचे जाळे उभारले गेले. इतकी कामे करून २०० युनिट वीज मोफत दिली. खरे तर त्यांच्या मोफतपणावर आक्षेप आमचे बुद्धिवादी घेणार; परंतु केजरीवाल यांचे म्हणणे असे की, तुम्ही टॅक्स भरता, मग तो तुमचा अधिकार आहे. या सुविधा तुम्हाला मिळाल्याच पाहिजेत. तो तुमचा अधिकार आहे. नीट विचार करा, आपण दिवस सुरू झाला की ज्या ज्या वस्तू विकत घेतो त्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टॅक्स भरतो. आम्हाला फक्त इन्कम टॅक्स दिसतो; पण तसे नाही याचा विचार कधी केला आहे का? खरे तर ‘फुकट का?’ असा आरोप करणारे आणि त्यांचे साथीदार गेंडय़ाच्या कातडीचे आहेत. त्यांना आपण कर का भरतो आणि कसकसा भरतो हे त्यांनी ध्यानात घेतले नाही. केजरीवाल हे ‘सुशिक्षित’ असल्यामुळे त्यांनी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. त्यांना काय हवे काय नको ते ओळखले. लक्षात ठेवा, त्यांनी सरकारी कामातील पशाची गळती खूप प्रमाणात थांबवली. हे आमच्या नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांना जमणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

आपल्या देशात कुठलीही एक जात किंवा धर्म रुजू शकणार नाही हे भाजपच्या लक्षात आले नाही. त्यामुळे सामान्य माणसांच्या सुविधांकडे दुर्लक्ष झाले. याउलट केजरीवाल यांनी वाटेल त्या भानगडीत नाक न खुपसता सामान्य माणसाला जागरूक केले, की तू टॅक्स देणारा आहेस- काही सुविधा मिळाल्याच पाहिजेत- या हक्काची जाणीव करून दिली.

महाराष्ट्रात असे ‘अनकट’ राजकारण जमणार आहे का? या ‘अन-‘कट’’चे अनेक अर्थ होतात. तूर्तास इतकेच महत्त्वाचे. सामान्य माणूस जिंकला आणि जुमलेवाले हरले हे मान्यच करावे लागेल. आमच्या राज्यकर्त्यांनी केजरीवाल यांची ‘टय़ूशन’ जरूर लावावी.

– सतीश चाफेकर, डोंबिवली

‘केंद्रात भाजप.. काँग्रेस कुठेही नाही’

दिल्लीच्या निकालाचे यथायोग्य विश्लेषण सर्व पक्ष करतीलच; पण काँग्रेसला मात्र ‘फक्त भाजपला विरोध’ ही भूमिका सोडून पक्ष वाचवण्यासाठी काहीतरी करावेच लागेल. अन्यथा ‘केंद्रात भाजप राज्यात प्रादेशिक पक्ष आणि कॉँग्रेस मात्र कुठेही नाही’ असे चित्र दिसण्याचीच शक्यता जास्त असेल.

-डॉ. संजय पालीमकर, दहिसर पूर्व (मुंबई)