19 January 2020

News Flash

अपयशाचे चिंतन हृदयाने नव्हे, मेंदूने करायला हवे

लेक्ट्रिक बल्बचा शोध लावताना एडिसनला किमान हजार वेळा तरी अपयश आले.

(संग्रहित छायाचित्र)

‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ हा अग्रलेख (९ सप्टेंबर) वाचला. भावुक असणे आणि भावनांनी बुद्धीवर ताबा मिळवणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. कारण भावनाशील माणूस संवेदना जाणणारा असतो, तर भावनाविवश माणूस वेदनेचे उदात्तीकरण करणारा असतो. म्हणूनच मोदींचे भावनाविवश होणे समजू शकते; पण इस्रोच्या प्रमुख शास्त्रज्ञाने असे जाहीरपणे व्यक्त होणे, हे त्यांच्यातील आत्मविश्वासाचा अभाव दाखवते. त्या अभावामुळेच त्यांनी चांद्रयानाची प्रतिकृती बालाजीच्या पायाशी अर्पण करून करुणा भाकली होती. अपयशाचे दु:ख होणे स्वाभाविक असले, तरी उच्चपदस्थ शास्त्रज्ञाने सामान्य माणसासारखे ढसाढसा रडून ते व्यक्त करणे समर्थनीय ठरत नाही. त्यांनी या अपयशाने न खचता, आपले चुकले कुठे याचा तपास करायला त्वरित सुरुवात करून पुढच्या तयारीला लागले पाहिजे.

त्यांनीच काय, पण प्रत्येक शास्त्रज्ञाने थॉमस एडिसनचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावताना एडिसनला किमान हजार वेळा तरी अपयश आले. तरीही तो खचला नाही. तसेच त्याचे आणखी एक उदाहरण विचार करण्यासारखे आहे. १० डिसेंबर १९१४ रोजी न्यू जर्सी येथील एडिसनच्या फॅक्टरीवजा संशोधन केंद्राला आग लागली. तेव्हा त्या आगीच्या मोठमोठय़ा लपटा शांतपणे पाहात एडिसन म्हणाला, ‘‘विनाशही किती सुंदर असतो! या आगीत माझ्या सर्व चुका जळून नष्ट झाल्या, आता नवनिर्माणाला खूप संधी आहे.’’ तो असा विचार करू शकला; कारण त्याने पुस्तकी शिक्षण न घेता विज्ञानाचा गाभा असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी मुरवला होता. एकुणात शास्त्रज्ञाने हृदयाने नव्हे तर मेंदूने अपयशाचा विचार करायचा असतो.

– जगदीश काबरे, सीबीडी-बेलापूर (जि. नवी मुंबई)

धीटपणे प्रश्न विचारणाऱ्या पिढीची देशाला गरज

‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ या अग्रलेखातून वैज्ञानिक प्रयोगाकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याचा दिलेला सल्ला ‘देशप्रेमाचा देखावा’ करणाऱ्यांसाठी चपराक आहे. खरोखरच, माध्यमांच्या अतिवापरामुळे अशा वैज्ञानिक प्रयोगाचा ‘मनोरंजनात्मक कार्यक्रम’ झाला. विज्ञानविषयक संशोधनावरील खर्चाना प्राधान्य देण्याबरोबरच सरकारने वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी भावी पिढी तयार होण्यासाठी प्रामुख्याने बालशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण मेंदूशास्त्रानुसार याच वयात मुलांच्या पुढील शिक्षणासाठीचा नैसर्गिक क्षमतांचा विकास होऊन ती तार्किक आणि वैज्ञानिकदृष्टय़ा ‘धीट’ होत असतात. परंतु सद्य:स्थितीतील शैक्षणिक परिस्थिती पाहता, सरकारने फक्त शिक्षण सेवा पोहोचवण्यावर सीमित राहू नये, तर त्याच्या गुणवत्तेचा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल. महासत्तेचे शिखर सर करण्यासाठी समाजात ‘निमूटपणे नियम पाळणाऱ्या’ पिढीपेक्षा ‘धीटपणे प्रश्न विचारून संशोधन करणाऱ्या आणि वैज्ञानिक भावना जपणाऱ्या’ पिढीची देशाला जास्त गरज आहे.

– मंदार दादोडे, ग्राममंगल (जि. पालघर)

..अशाने मूलभूत प्रश्न पडतीलच कसे?

‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ या संपादकीयात एखाद्या कथित यशापयशाच्या उन्मादावर स्वार होण्यात धन्यता मानणाऱ्यांनी आपण वैज्ञानिकतेसाठी काय करतो, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा उचित सल्ला देण्यात आला आहे. पण ज्या समाजाला कुठल्याही क्षेत्रातील यशापयश हे त्या क्षेत्राच्या उत्कर्षांपेक्षा उन्मादाचे प्रदर्शन करण्यासाठीच हवे असते, त्या समाजाला असे मूलभूत प्रश्न पडत नसतात. या उन्मादाला राष्ट्रवाद आणि देशभक्तीशी जोडले गेले आहेच; पण आपल्या ‘शत्रुराष्ट्राची जिरवली’ या सुप्त अहंकाराचीही त्याला जोड देण्यात आल्यामुळे (‘काही देशांच्या ध्वजात चंद्र आहे, तर आम्ही आमचा ध्वजच चंद्रावर रोवतो’ अशा ओळी त्याचेच द्योतक!) हा उन्माद नुसताच समर्थनीय नव्हे, तर आवश्यकही मानला जाऊ  लागला. याचा परिणाम म्हणजेच, एखाद्या क्षेत्राच्या दीर्घकालीन आणि टिकाऊ  प्रगतीसाठी काय करायला पाहिजे, याचा विचार करण्यापेक्षा त्या क्षेत्रातील एखादे यश किंवा कामगिरी याच्या उन्मादी प्रदर्शनातच मश्गूल राहण्याची प्रवृत्ती बळावली.

चांद्रयान मोहिमेसाठी रॉकेटचे उड्डाण आणि या यानाने चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याचा क्षण यामध्ये जो साधारण दीड महिन्यांचा काळ गेला, त्या काळात या चांद्रयान मोहिमेबाबत कितीसे औत्सुक्य दाखविले गेले? म्हणजेच विज्ञानातील मूलभूत आणि मानवजातीला उपकारक अशा प्रगतीत स्वारस्य असण्यापेक्षा त्यातील यशापयशाचे सोहळे साजरे करण्यातच आम्हाला स्वारस्य असते. अख्खा देश इस्रोच्या पाठी कसा उभा आहे, हे हाळी दिल्याप्रमाणे सांगत राहणे; कोण कसे भावविवश झाले हे दाखवत राहणे, हा याचाच भाग. अशा समाजात विज्ञान क्षेत्रातच नाही, तर कुठल्याही क्षेत्रात मूलभूत प्रश्न पडूच शकत नाहीत.

– अनिल मुसळे

भविष्यात चंद्राला गवसणी नक्कीच घालू!

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात ‘विक्रम’ लॅण्डरशी संपर्क तुटला आणि उत्साही वैज्ञानिकांत निराशेचे मळभ दाटून आले. तरी ही मोहीम यशस्वी करण्याचा वैज्ञानिकांचा संकल्प कायम आहे. गेल्या सहा दशकांत ‘नासा’ने १०९ अंतराळ मोहिमा राबवल्या; परंतु जवळपास अर्ध्या मोहिमा अयशस्वी झालेल्या आहेत. मात्र, इस्रोने देशाच्या विकासासाठी अंतराळाचा पुरेपूर उपयोग करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तेव्हा भविष्यात चांद्रयान मोहीम यशस्वी होईलच आणि चंद्राला गवसणी घालण्याचा आत्मविश्वास आपल्या वैज्ञानिकांत आहे.

– सुनील कुवरे, शिवडी (जि. मुंबई)

मैं पल दो पल का शायर हूं..

सुप्रसिद्ध कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरातली पत्रे, कविता आदी दुर्मीळ ठेवा मुंबईत एका भंगाराच्या दुकानात सापडल्याची बातमी (‘लोकसत्ता’, ९ सप्टेंबर) वाचली. ही घटना खरोखर दु:खदायक आहे. ‘कभी कभी’ (१९७६) या चित्रपटातील ‘मैं पल दो पल का शायर हूं..’ या गीतात स्वत: साहिर यांनीच लिहून ठेवलेल्या- ‘कल कोई मुझको याद करे, क्यूं कोई मुझको याद करे? मसरूफम् जमाना मेरे लिए, क्यूं वक्त अपना बरबाद करे?’ या पंक्ती या प्रसंगावरून किती सार्थ आहेत, ते दिसून आले. मुंबईतील फिल्म हेरिटेज फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आता साहिर यांचे साहित्य जतन करून ठेवण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे.

– सुरेश पटवर्धन, कल्याण

First Published on September 10, 2019 1:51 am

Web Title: loksatta readers comments on current social issues zws 70
Next Stories
1 ..अन्यथा कार्यक्षम तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळेल
2 सेनेचे निकष अन्य प्रश्नांना लावू नका!
3 सुरुवात केली; आता शेवट कशा प्रकारे करणार?
Just Now!
X