‘देऊळ ते दवाखाना’ या अग्रलेखात (१२ ऑगस्ट) शेवटी व्यक्त केलेली अपेक्षा ‘देऊळ असो की दवाखाना, पसे फेकून रांग मोडणाऱ्यांनाही शिक्षा कशी देता येईल, याचा विचार आणि निर्णय व्हायला हवा’ वास्तवात येणे महाकर्मकठीण. याचे महत्त्वाचे कारण की हे दुखणे फक्त ‘देऊळ ते दवाखाना’ यापुरतेच मर्यादित नाही तर जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात मुरले आहे. ज्यांच्यासाठी मेडिकल्सच्या सीट्स राखून ठेवल्या होत्या, त्याच्यावर काही लोकांनी आडनावे बदलून डल्ला मारल्याची बातमी ताजीच आहे. कलावंत, साहित्यिक, खेळाडू यांच्यासाठी राखून ठेवलेली घरे भलत्याच मंडळींनी बळकावल्या आहेत. रेल्वेची वेटिंग लिस्ट पुढे न सरकता एजंटतर्फे बुकिंग केले तर कन्फर्म तिकीट मिळण्याची खात्री असते. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत खोटय़ा सर्टििफकेटच्या जोरावर निवडून येणारे कमी नाहीत. सिग्नल तोडून पुढे जाणे किंवा ट्रॅफिक जाम असेल तर ओव्हरटेक करणे हे तर आपण सर्वच जण करीत असतो आणि विशेष हे की यात काही चुकीचे करीत आहोत याची पुसटशी जाणीवही मनास होत नसते. म्हणजेच कुठेही रांगेत उभे न राहता मलाच प्रथम पुढे कसे जाता येईल, हा आपल्या भारतीयांचा स्थायिभाव आहे.

निशिकांत मुपीड, कांदिवली (मुंबई)

 

अज्ञानाचा गरफायदा घेणे चालूच

‘देऊळ ते दवाखाना’ या अग्रलेखात (१२ ऑगस्ट) ‘चोरीचे अवयव विकत घेणाऱ्यांनाही शिक्षा कशी देता येईल याचा विचार आणि निर्णय व्हायला हवा’ हे व्यक्त करण्यात आलेले मत योग्यच आहे. अनीती विरुद्ध नीती हा लढा सार्वकालिक आहे. समाजोन्नतीसाठी हा लढा कायम चालू राहणे आवश्यकच आहे. सामान्य लोक डॉक्टरला देव मानत असतात. परंतु उच्चभ्रू वस्तीतील हिरानंदानी इस्पितळातील डॉक्टरांच्या टोळीचे मूत्रिपड चोरी सत्राचे हे घृणास्पद वृत्त सामान्य लोकांच्या नीती-संकल्पनांना उद्ध्वस्त करणारे आहे. दरिद्री, अशिक्षित लोकांच्या अज्ञानाचा गरफायदा घेऊन अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या नावाखाली मूत्रिपड काढून घेण्याचे अत्यंत हीन जीवघेणे प्रकार पूर्वीही चालत होते आणि आजही चालत आहेत. असले डॉक्टर व रुग्णालयांचा कायमचा बंदोबस्त झाला तरच हे प्रकार बंद होतील.

 – अशोक सावंत, लोअर परेल (मुंबई)

 

 मुंबईची मराठी गेली कुठे?

हल्ली ‘लोकसत्ता’सकट अनेक माध्यमांत सतत  मुंबईच्या भाषेचा अनुल्लेख आढळतो. इतर शहरांच्या भाषेतील शब्दांचा वापर तेथे केलेला असतो.

उदा. : बरोबर, सकट, कठीण, पोहोचलो, भेटून, भेटलो, मिळत नाही, कळत नाही, नवीन, आजपर्यंत, बरेच, मिळत आहे, करत आहे, होत आहे, अजून, कोणी, कोणाला, जवळ, कल्याणला, बदलापूरला  या शब्दांऐवजी अनुक्रमे : सोबत, सहित, अवघड, गाठले, गाठून, गाठ पडली, मिळेना, कळेना, नवा, आजवर, खूपसारं, मिळू लागले, करू लागले, होऊ लागले, अद्याप, कुणी, कुणाला, जवळपास, कल्याणात, बदलापुरात  हे शब्द सर्रास वापरले जातात. प्रत्येक शहराची वेगळी भाषा असते, त्याप्रमाणे मुंबईचीही भाषा आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन त्यात सुधारणा करावी, अन्यथा एके दिवशी हीच मुंबईची बोली भाषासुद्धा होईल.

विवेक चितळे, ठाणे

 

अशी तत्परता राजकारण्यांबाबत का नाही?

इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन तसेच अ‍ॅन्ट्रिक्स व देवासच्या माजी संचालकांवर सीबीआयने गुरुवारी आरोपपत्र दाखल केल्याचे (१२ ऑगस्ट) वाचले. यापकी कुणीही दोषी असल्यास लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हावी. एका प्रश्नाचे उत्तर मिळत नाही की, सीबीआय अशी तत्परता राजकारण्यांबाबत का दाखवत नाही. मला वाटतं एकंदरीत अशा व इतर आíथक खटल्यांची शीघ्रगती न्यायालयांमार्फत सुनावणी होऊन त्वरित निपटारा व्हावा. एखादा दोषी आढळल्यास त्वरित कठोर शासन करावे. असे केले तर न्यायसंस्थेवरील विश्वास अढळ होण्यास मदत होईल.

शैलेश न. पुरोहित, मुलुंड (मुंबई)

 

कंत्राटी अधिव्याख्यात्यांच्या सेवेचे राजकारण

कंत्राटी अधिव्याख्यात्यांच्या सेवा नियमित करण्याचा न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यानुसार व त्या विपरीत शासनाने घेतलेले निर्णय हे खरंच हास्यास्पद आहेत. न्यायालयाने दिलेला निर्णय हा २००२ पासून कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या अधिव्याख्यात्यांना न्याय मिळवून देणारा होता तर त्यामागेही शासन आता राजकारण करत आहे. न्यायालयाने निर्णय देताना नमूद करून काही मुद्दे सांगितले की अधिव्याख्यात्यांच्या सेवा नियमित का कराव्यात, कारण

१) ऑगस्ट २००३ मध्ये शासनाने निवड समितीचा काढलेला जीआर. २) वय उलटून गेल्याने कंत्राटी अधिव्याख्यात्यांना पुढे निघालेल्या परीक्षेत न मिळणारी संधी. ३)आतापर्यंत शासनाला त्यांनी दिलेले योगदान.

यावरून न्यायालयाने दिलेला निर्णय शासनाने आता २०१२ मध्ये नियुक्त झालेल्या कंत्राटी अधिव्याख्यात्यांनासुद्धा लागू केला असून तो न्यायालयाच्या निणर्याच्या विपरीत आहे. कारण न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड प्रक्रिया सुरू असेल तर कंत्राटी अधिव्याख्यात्यांच्या सेवा नियमित करू नये. पण शासन मात्र २०१३ पासून निकालाची वाट पाहत ताटकळत बसलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगपुरस्कृत उमेदवारांना वाट पाहायला लावत आहे. जेणेकरून जास्तीत जास्त कंत्राटी अधिव्याख्याता नियमित करता यावेत. आता या मागचा खरा उद्देश शासनालाच माहीत!

जीवन वानखेडे, पुणे

 

निषेध कुणाचा आणि विटंबना कुणाची!

कराडमधील रस्त्यावरील खड्डय़ांच्या निषेधार्थ तेथील भाजप युवा मोच्र्याच्या कार्यकर्त्यांनी खड्डय़ात (डबक्यात) सत्यनारायणाची पूजा केल्याची बातमी (११ ऑगस्ट) वाचली. तेथेच पायात बूट घालून कार्यकत्रे उभे होते. या प्रकाराने तेथील पालिकेची काय नाचक्की झाली माहीत नाही, पण सत्यनारायणाची विटंबना झाली हे नक्की.

वि. म. मराठे, सांगली