निवडणुकीच्या फडात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी दिलेली ठेचा, भाकर, कांदा खात प्रचार करणारे सदाभाऊ खोत यांच्या चिरंजीवांच्या शाही विवाह सोहळ्याची बातमी (१३ ऑगस्ट) वाचली आणि धक्काच बसला. या बातमीने ‘शेतकऱ्याचा खराखुरा नेता’ या माझ्यातल्या सदाभाऊंच्या प्रतिमेला धक्का बसला. सदभाऊंचे हे उत्सवपण  महाराष्ट्रातल्या पिचलेल्या, कर्जबाजारी आणि अनेक प्रश्नांनी त्रस्त लाखो शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे नाही का?

निवडणुकीच्या फडात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी दिलेली ठेचा, भाकर, कांदा खात प्रचार करणारे सदाभाऊ खोत यांच्या चिरंजीवांच्या शाही विवाह सोहळ्याची बातमी (१३ ऑगस्ट) वाचली आणि धक्काच बसला. या बातमीने ‘शेतकऱ्याचा खराखुरा नेता’ या माझ्यातल्या सदाभाऊंच्या प्रतिमेला धक्का बसला. सदभाऊंचे हे उत्सवपण  महाराष्ट्रातल्या पिचलेल्या, कर्जबाजारी आणि अनेक प्रश्नांनी त्रस्त लाखो शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे नाही का?

काय गरज होती इतक्या उधळपट्टीची? खरे तर सदाभाऊ यांचे साधेपण, रांगडेपण आणि गावाकडच्या मातीतले वावरणे या जमेच्या, कौतुकाच्या बाबी ठरत असत. सदाभाऊंनी हाच सोहळा साधेपणाने केला असता, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाला खरोखरच मंडपातल्या पालावर बसवले असते, गावरान मिरची-भाकर खाऊ घातले असते, ते वाढायला एफआरपीनुसार बिले न मिळालेले शेतकरी बोलावले असते तर आनंद झाला असता. दुष्काळात करपलेल्या त्यांच्या पीकपाण्याची चौकशी झाली असती तर सदाभाऊंचे जाणतेपण शोभले असते. त्यांच्या निवडणुकीच्या फडातल्या गप्पा, मंडईबाहेर भाजी विकणे आणि आतापर्यंतच्या कृती दिखावा वाटल्या नसत्या.

पण सत्ता आणि संपत्तीचे  ओंगळवाणे प्रदर्शन करण्यात धन्यता मानणाऱ्यांच्या कंपूत हा खेडय़ातील जनतेचे नेतृत्व करणारा नेता फसलाच कसा याचे राहून राहून आश्चर्य आणि दु:ख वाटते.    याचा अर्थ असा नव्हे की, नेत्यांनी उत्सव साजरेच करू नये. पण आपण ज्या भूमिपुत्रांचे नेतृत्व करतो त्यांना निवडणुकीपुरते मी तुमच्यातलाच आहे असे भावनिक गोंजारायचे व काम संपले. खरे स्वरूप दाखवायचे हे योग्य नाही. शेवटी इतकेच की आणखी तीनेक वर्षांनी पुन्हा निवडणुकीचा फड उभा राहील. तो डोळ्यापुढे ठेवून गावशिवारातला आणखी कुणी सदाभाऊ शेतकऱ्यांच्या उसाच्या गाडय़ा अडवेल, टायर पेटवेल, कारखानदारांना शिव्या घालेल. पिचलेल्या शेतकऱ्याचा बेकार पोरगा येडय़ा आशेने याही भाऊला मसीहा मानेल, त्याच्यावरून जीव ओवाळेल.. आणि दोनेक वर्षांत तुटक्या स्लीपर आणि ‘फुटकळ’च्या तालावर या भाऊच्या पोरा/ पोरीच्या वरातीत नाचेल. महाराष्ट्रात हे गावोगावी सुरू आहे. पिढय़ानपिढय़ा चाललेल्या या ढोंगीपणाचे बुरखे फाडणाऱ्या ‘खऱ्या’ सदुभाऊची शेतकरी आणखी किती वष्रे वाट पाहणार आहे?

योगेशकुमार भांगे, मु. पो. शेटफळता. मोहोळ (सोलापूर)

 

इरोमच्या निर्णयांचे समाजाने स्वागत करावे

इरोम शर्मिलासोबत समाजाचे दुप्पटी वागणे हे भारतीय समाजमनाचे प्रतििबब दर्शविते. सोळा वर्षे उपोषण करून लोहनायिका ठरलेली शर्मिला क्षणात समाजद्रोही ठरली.. कारण काय तर फक्त तिने उपोषण सोडले व लग्न करण्याची तसेच मुख्यमंत्री बनण्याची मनीषा व्यक्त केली. खरे पाहिले तर तिच्या दोन्ही निर्णयांचे समाजाने स्वागत करायला हवे होते, कारण हे दोन्ही निर्णय तिचा सच्चेपणा व्यक्त करीत होते. भारतीय संस्कृतीत आढळणारा दुटप्पीपणा हा समाजमनात चांगलाच प्रसरण पावला आहे. त्याचाच परिणाम देवीची मनोभावे पूजा करणारे घरातल्या स्त्रीला अमानुष वागणूक देतात. स्त्री समानता बोलणारे स्त्रियांच्या हक्काच्या विरोधात उभे राहतात. या सर्वाना भारतीय समाजमन उदारमते नुसते माफ करून थांबत नाहीत तर त्यांना डोक्यावर घेऊन मिरवते. मात्र शर्मिलाने सरळ व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या पचनी पडल्या नाहीत.

पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकातील एका संवादात आचार्य आपली वेदना मांडताना म्हणतात- ‘संन्याशाची वस्त्रं एकदा अंगावर चढवली की ती उतरून संसारी माणसाची वस्त्रं चढवायची म्हणजे गुन्हेगाराची वस्त्रं चढवण्यापेक्षा भयंकर! लोकांना नमस्कार करायला एक बुवा हवा असतो.’’

व्यक्तीचे दैवतीकरण करण्यात भारतीय लोक पुढे असतात आणि पुढे दैवतीकरण केलेल्या व्यक्तीने लोकांना अपेक्षित असे वर्तन ठेवावे अशी लोकांची अपेक्षा असते. यात व्यक्ती म्हणून त्याचे अधिकार व स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होते याचा लोकांना विसर पडतो. हे असे दांभिक समाजमन बदलून ते परिपक्व होण्यासाठी वैचारिक खाद्य पुरवण्याची गरज आहे आणि हे ‘प्रतिमा विसर्जन’ यासारख्या संपादकीयामधून  होत आहे ही स्वागर्ताह बाब आहे.

राजू रोटे, चेंबूर (मुंबई)

 

विमानतळ सुरक्षेपेक्षा मतपेढी महत्त्वाची!

हवाई सुरक्षेच्या कारणास्तव ‘सायली’ इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिल्याची बातमी  (१२ ऑगस्ट)  आणि ‘विमानतळ सुरक्षेचे अधांतर’ हा लेख (१३ ऑगस्ट)  हे दोन्ही वाचले. यामधून विमानतळाची सुरक्षा हा जटिल प्रश्न बनल्याचे समोर आले.  मुंबई हे तसेही संवेदनशील शहर मानले जाते आणि विमानतळाच्या भोवतीच्या झोपडय़ा आणि नियमभंग करून बांधलेल्या इमारती विमानतळाला असलेल्या धोक्यांमध्ये भरच घालत आहेत. मुख्यमंत्र्यांनी विमानतळ परिसरातील झोपडीवासीयांना आहे त्याच जागी पुनर्वसन करून देण्याचे विधानसभेत जाहीर केले . विमानतळासारख्या अतिमहत्त्वाच्या जागेवर अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांना त्याच जागी पुनर्वसित करण्याचा मनोदय व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सुरक्षिततेपेक्षा मतपेढी महत्त्वाची वाटते, हेच सूचित केले आहे.

याशिवाय, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मुंबईसाठी आवश्यक असलेला दुसरा विमानतळ. येणार, येणार म्हणून गाजत असलेला नवी मुंबई विमानतळ अजूनही कागदावरच आहे. सरकारने राज्य विधानसभेच्या पुढल्या निवडणुका लक्षात घेता २०१९ मध्ये तेथून पहिले उड्डाण करण्याचे वारंवार जाहीर केले असले, तरीही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, डोंगर-कापणी, नदीचा प्रवाह वळवणे, दलदलीच्या जागेत भराव टाकणे, या सर्व कामांचा आवाका पाहता २०१९ मध्ये तो विमानतळ कार्यान्वित होणे निव्वळ अशक्य आहे. अशा परिस्थितीत मुंबई विमानतळावरील ताण वाढतच जाणार आहे. या वाढीव ताणाचे पर्यवसान अनेक गोष्टींमध्ये होणार आहे, जसे की :

१) क्षमतेच्या पलीकडे अधिकाधिक प्रवासी संख्या सामावून घेण्याच्या प्रयत्नात हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या (एटीसी) तसेच सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार. त्याचा परिणाम म्हणून प्राणघातक चुका होऊ शकतात. २) प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये तडजोड होणार. आतादेखील विमानोड्डाणांच्या सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळात सांताक्रूझ टर्मिनलवर तसेच टर्मिनल २ व पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडणाऱ्या सहार उन्नत मार्गावर वाहतूक कोंडी होते. ३) मर्यादित क्षमतेमुळे ‘पुरवठा कमी आणि मागणी जास्त’ अशी स्थिती मुंबई विमानतळावर लवकरच उद्भवणार आहे. याचा अनाठायी फायदा विमान कंपन्यांनी न उचलला तरच नवल. विमान कंपन्यांच्या प्रवासभाडय़ावर अंकुश नसल्यामुळे आजही दिवसातून मोजकीच ‘कनेक्शन्स’ असणाऱ्या शहरांसाठीचे प्रवासभाडे अवाच्या सवा असते.

याला कारण म्हणजे मागणीच्या प्रमाणात निर्माण न केलेल्या सुविधा. सुरक्षित, वाजवी आणि किमान आरामदायी हवाई वाहतुकीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा र्सवकष पूर्वनियोजन करून निर्माण करणे आणि त्यांना धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे, ही केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे.  ती जबाबदारी सरकार पार पाडणार का, हाच खरा प्रश्न  आहे..

अर्णव शिरोळकर, मुंबई

 

रेल्वे आंदोलकांवर कारवाईची भाषा संतापजनक

शुक्रवारी सकाळी बदलापूरच्या प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून पाच तास आंदोलन केले यात त्यांची काहीच चूक आहे असे वाटत नाही. महिन्यातून एखाद्या वेळी तांत्रिक बिघाड होऊन रेल्वेचे वेळापत्रक बिघडले तर समजण्यासारखे आहे, पण वारंवार अशा घटना घडू लागल्या आणि कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना उशीर होऊ लागला तर कार्यालय त्यांना सूट देईल का? कहर म्हणजे मध्य रेल्वे प्रशासन आंदोलकांवर कारवाई करण्याची भाषा करत आहे. ती चुकीची आणि संतापजनक आहे. त्यांनी रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केले असते तर तो गुन्हा ठरला असता.

गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (मुंबई)

 

मोदींच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांचे फलित काय?

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दोन वर्षांत जगभर फिरून विविध देशांमध्ये भारत आणि भारतीयांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. जगातील देश राजनतिक पातळीवर भारताचे गोडवे गात असले तरी भारतीयांना परदेशांमध्ये सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचे आढळून येते. अभिनेता शाहरुख खान याला अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी अडवून ठेवल्याची घटना नुकतीच घडली. त्याला अमेरिकेत अडविले जाण्याची ही तिसरी वेळ आहे. विश्वविख्यात सरोदवादक अमजद अली यांना ब्रिटनने व्हिसा नाकारला. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत पाकिस्तानात गेलेल्या आपल्या दूरचित्रवाणीच्या पथकास चित्रीकरणासाठी मज्जाव करण्यात आला. अंतर्गत सुरक्षा हा जरी त्या त्या देशांचा विषय असला तरी अशा वेळी विविध देशांमधील आपले दूतावास आणि तेथील अधिकारी काय भूमिका बजावतात? विशेषकरून आपत्कालीन प्रसंगात आणि परिस्थितीमध्ये परदेशातील भारतीयांमध्ये आपण असुरक्षित असल्याची भावना निर्माण होते. या पाश्र्वभूमीवर मोदींनी अनेक देशांना भेटी देऊन निर्माण केलेल्या संबंधांचे नेमके फलित काय, असा विचार  जनतेच्या मनात येणे साहजिक आहे.

रविराज गंधे, गोरेगाव (मुंबई)

 

विकतचे दान!

आपल्याकडे ज्याप्रमाणे अधिक दाम मोजले तर रांगेत उभे न राहता थेट परमेश्वराच्या पायाशी लोळण घेण्याची सोय आहे . त्याचप्रमाणे अधिक किंमत मोजून, गुणवंतांच्या आणि गरजवंतांच्या नाकावर टिच्चून उघडपणे, ताठ मानेने डॉक्टर/ इंजिनीअिरगला वैध प्रक्रियेने प्रवेश विकत घेऊन खोऱ्याने पसे ओढता येण्याची सोय शिष्टसंमत आहे. एकदा बाजारचलित अर्थव्यवस्था स्वीकारल्यावर अशा घटनांची आपण सवय करून घेतली पाहिजे. ज्याच्या खिशात पसे आहेत फक्त त्यालाच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षित प्रवास यांसारख्या अत्यंत मूलभूत स्वरूपाच्या गरजा भागवता येतील असे धोरण आपल्या या समाजवादी, कल्याणकारी घटना असणाऱ्या देशाने पत्करले आहे. त्यातूनच विकास होईल अशी आपल्या सर्वाची ठाम धारणा आहे. या व्यवस्थेत जिवंतपणीच स्वत:चे अवयव विकायला तयार होणारा आणि विकत घेण्याची क्षमता असणारा असे दोन्ही वर्ग तयार होणार हे स्वाभाविक आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यातच शहाणपणा आणि देशाचा विकास सामावलेला आहे.

प्रमोद तावडे, डोंबिवली